इतिहास जपण्याची परंपरा (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 2 जुलै 2017

आयपीएल आणि प्रो-कबड्डी लीगसारख्या स्पर्धा भारतात आता सुरू झाल्या असल्या, तरी पाश्‍चिमात्य जगात बऱ्याच काळापासून त्या सुरू आहेत. ब्रिटनमधल्या ‘मॅंचेस्टर्स युनायटेड फुटबॉल क्‍लब’चं नाव अशा साखळीत खूप वरचं आहे. इतिहास जपण्याची परंपरा आणि आपल्या क्‍लबचा जाज्ज्वल्य अभिमान म्हणजे नक्की काय असतं, याचा हा क्‍लब म्हणजे वस्तुपाठ आहे. या क्‍लबविषयी....

आयपीएल आणि प्रो-कबड्डी लीगसारख्या स्पर्धा भारतात आता सुरू झाल्या असल्या, तरी पाश्‍चिमात्य जगात बऱ्याच काळापासून त्या सुरू आहेत. ब्रिटनमधल्या ‘मॅंचेस्टर्स युनायटेड फुटबॉल क्‍लब’चं नाव अशा साखळीत खूप वरचं आहे. इतिहास जपण्याची परंपरा आणि आपल्या क्‍लबचा जाज्ज्वल्य अभिमान म्हणजे नक्की काय असतं, याचा हा क्‍लब म्हणजे वस्तुपाठ आहे. या क्‍लबविषयी....

आयपीएल आणि प्रो-कबड्डी लीगसारख्या स्पर्धा भारतात सुरू झाल्यापासून फॅंचायझी, संघमालक, संघचालक, त्या त्या संघांचे खरे अस्सल चाहते असे कंगोरे आपल्याला बघायला मिळू लागले. पाश्‍चिमात्य जगात या गोष्टी सुरू होऊन शतकं लोटली. कोणतीही अतिशयोक्ती मी करत नाहीये. इसवीसन १४२१मध्ये ब्रिटनमधल्या ब्रयुवर्स कंपनीनं फुटबॉल खेळाडूंचा कार्यक्रम वीस पेन्स देऊन हॉलमध्ये आयोजित केल्याची नोंद आहे. भारतातली पहिली नोंद इसवीसन १७९२मधली आहे. तेव्हा कोलकता क्रिकेट क्‍लब आणि फुटबॉल क्‍लबची स्थापना झाल्याचं वाचायला मिळतं. इसवीसन १८२४मध्ये एडिंबर्ग फुटबॉल क्‍लब पहिला अधिकृत क्‍लब म्हणून नोंदला गेला. हे माझे शोध नाहीयेत. ब्रिटनमध्ये एका महान फुटबॉल क्‍लबला भेट द्यायला गेलो होतो, तेव्हा तिथला गाइड सांगत होता. चॅंपियन्स करंडक स्पर्धेचं वार्तांकन करायला ब्रिटनला गेलो असताना हाती आलेल्या संधीचा फायदा घेत माझा मित्र अमेय कारखानीस मला थेट मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबला घेऊन गेला. इतिहास जपण्याची परंपरा आणि आपल्या क्‍लबचा जाज्ज्वल्य अभिमान म्हणजे नक्की काय असतं, हे मला मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबला गेल्यावर समजलं.

सुरवात अशी झाली
इसवीसन १८७८मध्ये न्यूटन हिथ नावाचा क्‍लब स्थापन केला गेला, ज्यात रेल्वे यार्डात काम करणारे कामगार उत्साहानं फुटबॉल खेळायचे. नंतर त्याची व्याप्ती वाढू लागल्यावर मोठा क्‍लब त्यातून घडवायचे प्रयत्न सुरू झाले. विसाव्या शतकाच्या सुरवातीला क्‍लबला अर्थकारणाच्या संकटानं घेरलं. स्थानिक बिअर कंपनीचा मालक जॉन हेन्‍री डेव्हिसनं पुढं येऊन क्‍लबला आर्थिक संकटातून बाहेर काढायला गुंतवणूक करायची तयारी दाखवली. काळाची पावलं जॉन हेन्‍रीनं आधीच ओळखली आणि विचारपूर्वक क्‍लबचं नाव मॅंचेस्टर युनायटेड क्‍लब ठेवलं. इतकंच नाही, तर जॉन हेन्‍रीनं अर्नेस्ट मॅग्नाल नावाच्या जाणकाराला संघाचा व्यवस्थापक म्हणून नेमलं. प्रगतीचा आलेख पुढं सुरू ठेवताना जॉन हेन्‍रीने क्‍लबचं नवं स्टेडियम बांधलं- ज्यात १९ फेब्रुवारी १९१० रोजी ऐंशी हजार प्रेक्षकांनी सामना बघितला. मोठ्या क्‍लबची मुहूर्तमेढ त्याच दिवशी रोवली गेली होती.

सर्वांत मोठा धक्का
मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबला लागलेला सर्वात मोठा धक्का भयानक अपघाताचा होता. ६ फेब्रुवारी १९५८ रोजी म्युनिक विमानतळावर इंधन भरून विमानानं आकाशात झेप घेतली. त्यात मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबचा संपूर्ण संघ प्रवास करत होता. विमानाला अपघात झाला आणि वीस प्रवासी मृत्युमुखी पडले, ज्यात सात खेळाडू होते. डंकन एडवर्डस नावाचा अत्यंत कमाल गुणवान खेळाडू मृतांच्या यादीत होता. बॉबी चार्लंटन यांचं दैव बलवत्तर होते आणि ते अपघातातून सुखरूप बचावले. क्‍लबकरता सात प्रमुख खेळाडू गमावणं हा मोठा आघात होता, ज्यातून सावरायला खूप वेळ लागला.

ॲलेक्‍स फर्ग्युसन यांची नियुक्ती
क्‍लबच्या भवितव्याचा विचार करून १९८६मध्ये माजी स्कॉटिश खेळाडू ॲलेक्‍स फर्ग्युसन यांची नियुक्ती व्यवस्थापक म्हणून करण्यात आली. जम बसवायला वेळ लागला असताना क्‍लबच्या संचालकांनी अलेक्‍स फर्ग्युसन यांच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास कायम ठेवला. १९८८मध्ये मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबनं शेवटच्या दहापैकी आठ सामन्यांत विजय मिळवत आणि दोन सामने अनिर्णित राखत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

‘‘ॲलेक्‍स फर्ग्युसन यांची कार्यपद्धती जबरदस्त होती. खेळाडूंनी शिस्त पाळण्यात कोणतीही कसूर करू नये, याकडं त्यांचा कटाक्ष असायचा. ड्रेसिंग रूममध्ये कोणीही मोबाईल तर सोडाच; पण बाकी चैनीच्या वस्तू आणायलाही बंदी होती. हातातली अत्यंत महागडी घड्याळं आणि बोटातल्या हिऱ्याच्या अंगठ्या काढून ठेवायला फक्त एक कुलपाचा बॉक्‍स होता. बाकी ड्रेसिंग रूममध्ये लॉकरही त्यांनी ठेवून दिले नव्हते. खेळाडूंनी फक्त आणि फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावं, यासाठी या उपाययोजना ॲलेक्‍स फर्ग्युसन यांनी केल्या होत्या,’’ क्‍लबचा पदाधिकारी अभिमानानं त्यांच्या आठवणी जागवताना सांगत होता.

‘‘ॲलेक्‍स फर्ग्युसन चुकीचा खेळ करणाऱ्या खेळाडूवर इतके चिडायचे, की मध्यंतरात आणि खेळ संपल्यावर ते चूक करणाऱ्या खेळाडूच्या नाकाला नाक लावून खड्या आवाजात सुनवायचे. मग तो खेळाडू डेव्हिड बेकहॅम असो, वा ख्रिस्तियानो रोनाल्डो- त्यांना फरक पडायचा नाही. परिणामी मध्यंतर किंवा खेळ संपायला काही मिनिटं बाकी असताना मॅंचेस्टर युनायटेडचे गोल व्हायचे ते उगाच नाही. फर्ग्युसन यांची बोलणी खाण्याची भीती खेळाडूंना वाटायची इतका त्यांचा धाक होता,’’ कथा सांगताना गाइड म्हणाला.

फर्ग्युसन यांनी १९८६मध्ये व्यवस्थापकपदाची सूत्र होती घेतली, जी त्यांनी २०१३मध्ये सोडली. कारण त्यांनी वयाची ७२ वर्षं पूर्ण केली होती. २६ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ॲलेक्‍स फर्ग्युसन यांच्या मार्गदर्शनाखाली मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबनं १३ वेळा इंग्लिश प्रीमिअरशिपसह ३८ विजेतेपदं जिंकली.

मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबचं ग्लॅमर
मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबकडून एकाहून एक चमकते तारे खेळले. या ग्लॅमरस खेळाडूंना सांभाळणं मोठं कठीण काम होतं. खासकरून डेव्हिड बेकहॅम किंवा रोनाल्डोसारख्या खेळाडूंना. क्‍लब बघताना गाइडनं ड्रेसिंग रूमजवळची एक जागा डोळे मिचकावत दाखवली. ‘‘व्हिक्‍टोरिया कॅरोलीन ॲडम्स असं नाव सांगितलं, तर तुम्ही विचाराल ही कोण?...पण मी तेच नाव व्हिक्‍टोरिया पॉश स्पाइस म्हणून उच्चारलं, तर तुम्हांला लगेच ‘स्पाइस गर्ल्स’चा समूह आठवेल. व्हिक्‍टोरिया गाण्याकरता भरपूर लोकप्रिय झाली असताना क्‍लबनं एकदा तिला खास बक्षीस समारंभाकरता बोलावलं होतं. ही तीच जागा आहे जिथं डेव्हिड बेकहॅमनं व्हिक्‍टोरियाची पहिल्यांदा गाठ घेतली होती...नंतर काय झालं ती दंतकथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच,’’ गाइडनं जागा दाखवताना सांगितलं.

ड्रेसिंग रूममधली अजून एक गोष्ट दाखवताना गाइडच्या बोलण्यात कमालीचा मिश्‍कील भाव होता. ‘‘या आरशाला आम्ही ‘रोनाल्डो मिरर’ म्हणतो. कारण रोनाल्डो मॅंचेस्टर युनायटेडला खेळत असताना मध्यंतरात दोन मिनिटं घाम पुसून जर्सी बदलायचा आणि नंतर आठ मिनिटं आरशासमोर उभा राहून केशरचना नीट करायचा,’’ हसतहसत गाइड म्हणाला.

अत्याधुनिकतेची आस
मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबला सतत आधुनिकतेची आस लागलेली दिसते. बाकी क्‍लब्जची मैदानं जेव्हा जेमतेम चाळीस हजार प्रेक्षकांना सामावून घ्यायची, तिथं मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबनं ऐंशी हजार क्षमतेचं प्रेक्षागृह जुन्या काळात उभारलं. आधी तर नव्वद हजार प्रेक्षक सामना बघायला दाटीवाटीनं बसायचे. आता प्रत्येक प्रेक्षकाकरता स्वतंत्र आसन ठेवणं बंधनकारक केल्यानंतर ऐंशी हजार खुर्च्यांचं प्रेक्षागृह तयार करण्यात आलं आहे. क्‍लबला भेट देताना सगळीकडं क्‍लबची खासियत असलेला लाल रंग उठून दिसतो.

क्‍लबनं मोठी गुंतवणूक करून पावसाचं पाणी साठवण्याच्या मोठ्या टाक्‍या तयार केल्या आहेत. मैदानाची देखभाल याच साठवलेल्या पाण्यानं वर्षभर केली जाते. इतकंच नाही, तर या पाण्याचं नातं सोलर पॅनेलबरोबर जोडण्यात आलं आहे. तुफान थंडीत बर्फ पडतो, तेव्हा या गरम पाण्यानं मैदानावरचा बर्फ त्वरित वितळवून मैदान खेळण्यायोग्य करायचं तंत्रज्ञानही इथं वापरण्यात येतं. क्‍लबच्या सुरक्षेची यंत्रणा मजबूत आहे. बाकी क्‍लब्जमध्ये सामन्यांदरम्यान दंगली होतात; पण मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबमध्ये शिस्त पाळली जाते. कोणताही प्रसंग घडला, तर फक्त ११ मिनिटांत ऐंशी हजार प्रेक्षकांना सुरक्षित जागी बाहेर नेण्याची यंत्रणा इथं आहे.  
अचंबित करणारे आकडे

जगात बरेच धनाढ्य फुटबॉल क्‍लब आहेत, हे मान्य केलं, तरी अखेर मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबची बातच न्यारी आहे. तोंडात बोटं जातील असे आकडे त्यांच्या ताळेबंदात दिसतात. एक नजर टाकूयात या आकड्यांवर.
सामन्याच्या दिवशीचं उत्पन्न ः ६६.३ कोटी डॉलर
टीव्ही प्रक्षेपणाच्या हक्कांचं उत्पन्न ः ९०.४ कोटी डॉलर
कमर्शिअल हक्कांचं उत्पन्न ः १५५.८ कोटी डॉलर
क्‍लबची बाजारातली किंमत ः ३६८.९ कोटी डॉलर

लक्षात घ्या, हे कमाल आकडे जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकानं जाहीर करताना मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबला जगातला पहिला क्रमांकाचा क्‍लब जाहीर केलं आहे.

क्‍लबनं २०१६ पासून जोसे मोरीन्होची नेमणूक व्यवस्थापक म्हणून केली आहे. वेगळी कार्यपद्धती असलेल्या जोसे मोरीन्होच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच वर्षी संघानं एक विजेतेपद पटकावलं आहे. मॅंचेस्टर युनायटेड क्‍लब श्रीमंत आहे, म्हणून मनाला भावतो अशातला भाग नक्कीच नाही. इतिहास जपण्याची त्यांची परंपरा जास्त भुरळ पाडते. कधी ब्रिटनला गेलात, तर मॅंचेस्टरला जा आणि या कमाल क्‍लबला नक्की भेट द्या. तुम्ही नक्कीच भारावून जाल.

Web Title: sunandan lele write article in saptarang