क्रिकेटच्या लंकेला अवकळा (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 13 ऑगस्ट 2017

एके काळी विश्‍वकरंडकाला गवसणी घातलेल्या श्रीलंकेतल्या क्रिकेटला आता मात्र ग्रहण लागलं आहे. या क्रिकेटला ‘सोन्याचे दिवस’ मिळवून देणाऱ्या अर्जुन रणतुंगानं निवृत्त झाल्यावर वेगळ्या भूमिका घेतल्या आणि त्यामुळं खूप फटका बसला. इतर काही खेळाडूंनी खिंड लढवून धरली; मात्र तेही आता निवृत्त झाले आहेत. या देशाच्या क्रिकेटला सावरायला हवं. ही उतरती कळा अशीच सुरू राहिली, तर क्रिकेटविश्‍वाचीच रया उडून जाऊ शकते.

एके काळी विश्‍वकरंडकाला गवसणी घातलेल्या श्रीलंकेतल्या क्रिकेटला आता मात्र ग्रहण लागलं आहे. या क्रिकेटला ‘सोन्याचे दिवस’ मिळवून देणाऱ्या अर्जुन रणतुंगानं निवृत्त झाल्यावर वेगळ्या भूमिका घेतल्या आणि त्यामुळं खूप फटका बसला. इतर काही खेळाडूंनी खिंड लढवून धरली; मात्र तेही आता निवृत्त झाले आहेत. या देशाच्या क्रिकेटला सावरायला हवं. ही उतरती कळा अशीच सुरू राहिली, तर क्रिकेटविश्‍वाचीच रया उडून जाऊ शकते.

कॅंडी ते नुवारा इलिया भाग जेमतेम ऐंशी किलोमीटरचा आहे. अंतर कमी असलं, तरी कॅंडीहून नुवारा इलियाला पोचायला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो- कारण संपूर्ण प्रवास वळणावळणाचा आणि डोंगर चढ-उताराचा आहे. निसर्गाचा आनंद घेत नुवारा इलियाला पोचलं, की प्रवासाचा शीण निघून जातो. नुवारा इलियाला अशोकवाटिका आहे- जिथं रावणानं सीतामाईंना डांबून ठेवलं होतं. रामभक्त हनुमान सीतामाईंना भेटायला अशोकवाटिकेत आले, तेव्हा त्यांनी पाऊल ठेवलं, त्याची खूण आजही ठशाच्या रूपानं बघायला मिळते. श्रीलंकेत रामायणातल्या अशा बऱ्याच पाऊलखुणा बघायला मिळतात- ज्यानं मन भारावून जातं.

नुवारा इलियाहून परत येताना मनात उगाच श्रीलंकेच्या क्रिकेटच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार चालू होता. मग वाटलं, की रावणानं हनुमानाला बांधून ठेवायचा आणि त्यांच्या शेपटीला आग लावायचा प्रयत्न केला. झालं काय? हनुमानाला इजा झाली का? नाही...उलट मारूतरायांनी त्याच धगधगत्या शेपटीचा वापर करून संपूर्ण लंकेला आग लावली. त्या प्रकारानं अशी हानी झाली, की रावणही हतबल झाला. हे उदाहरण जरा अतिशयोक्तिपूर्ण आहे; पण आताच्या घडीला श्रीलंकेच्या क्रिकेटची झालेली अवस्था बघून श्रीलंका क्रिकेट बोर्डानं कळत-नकळत क्रिकेटच्या शेपटीला आग लावली असल्याचा भास होत आहे- ज्यामुळं श्रीलंकेतल्या क्रिकेटची घसरगुंडी झालेली दिसते आहे.

अतिसामान्य ते विश्‍वविजेते प्रवास
इसवीसन १९७५मध्ये श्रीलंकेला मुख्य क्रिकेट प्रवाहात आणलं गेलं. त्यानंतर सहा वर्षांनी श्रीलंकेच्या संघानं पहिला कसोटी सामना खेळला. पहिला कसोटी सामना जिंकायला त्यांना चार वर्षं लागली. १९७५ आणि १९७९च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत या संघाची अवस्था ‘कोणीही यावे आणि टिचकी मारूनी जावे’ अशी होती. विश्‍वकरंकडक स्पर्धेत चांगली कामगिरी करणं त्यांना थेट १९९६मध्ये जमलं. भल्याभल्या संघांना जे अजून करायला जमलं नाही, ते श्रीलंकेच्या संघानं करून दाखवलं. १९९६मध्ये या संघानं थेट विश्‍वविजेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर सलग १५ वर्षं श्रीलंकन क्रिकेटच्या प्रगतीचा आलेख सतत वर जात राहिला. गेल्या तीन वर्षांत मात्र अचानक श्रीलंकेतल्या क्रिकेटला ग्रहण लागलं आहे, असं वाटतं.

चढता आलेख
श्रीलंकेच्या क्रिकेटच्या चढत्या आलेखाचं वर्णन करताना त्यांनी आयसीसीनं आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये काय कामगिरी केली, हे बघायला हवं.

मुख्य विश्‍वकरंडक :
  १९९६ : विश्‍वविजेतेपद
  २००७ : उपविजेतेपद
  २०११ : उपविजेतेपद
आयसीसी चॅंपियन्स करंडक :
  २००२ : विजेतेपद
टी-२० विश्‍वकरंडक :
  २०१२ : उपविजेतेपद
  २०१४ : विजेतेपद

नामांकित संघांनाही जागतिक स्पर्धांमध्ये कामगिरीत इतकं सातत्य राखता आलेलं नाही, हे इथं लक्षात घ्यावं लागेल. अर्जुन रणतुंगा ‘हिरो’ १९८७च्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर अर्जुन रणतुंगानं श्रीलंकेच्या क्रिकेटची जबाबदारी कर्णधार म्हणून हाती घेतली. १९९२नंतर रणतुंगानं संघबांधणीला खरी सुरवात केली. संघातल्या खेळाडूंना ताठ मानेनं डोळ्याला डोळा भिडवून क्रिकेट खेळायला अर्जुन रणतुंगानं शिकवलं. चामिंडा वासला वेगवान गोलंदाज म्हणून प्राधान्य देताना रणतुंगानं मुथय्या मुरलीधरनला संपूर्ण पाठिंबा दिला. १९९५मध्ये ऑस्ट्रेलियन पंच डेरे हेअर यांनी मुरलीच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेताना त्याला एकाच सामन्यातल्या तीन षटकांत सात वेळा ‘नोबॉल’ घोषित केले होते. रणतुंगानं मनातून खचलेल्या मुरलीला धीर दिला. १९९६अगोदर अर्जुननं मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या सनथ जयसूर्याला सलामीला फलंदाजीला पाठवून शेवटच्या १५ षटकांत नव्हे, तर खेळ चालू झाल्यावर पहिल्याच १५ षटकांत जोरदार आक्रमण करायची सूचना आणि मनमोकळा खेळ करायची मुभा दिली. अनुभवी फलंदाज अरविंद डिसिल्व्हाच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत १९९६चा विश्‍वकरंकड जिंकला. अर्जुन रणतुंगा श्रीलंकेचा ‘राष्ट्रीय हिरो’ बनला.      

अर्जुन रणतुंगा ‘झिरो’
१९९६चा विश्‍वकरंकडक जिंकलेल्या अर्जुन रणतुंगाची खेळाडू म्हणून कारकीर्द २००१मध्ये संपुष्टात आली. सगळ्यांनाच अपेक्षा होती, की जो मान रणतुंगाला क्रिकेट जगतात आहे, त्याचा वापर तो श्रीलंकन क्रिकेटच्या संयोजनाकरता करणार.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर अर्जुन रणतुंगानं लगेच राजकारणात प्रवेश केला. २००२मध्ये त्यानं श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बनण्याचा जोरदार प्रयत्न केला. निवडणुकीत पराभूत झाल्यानं त्याला शांत बसावं लागलं. स्थानिक लोक सांगतात, की दरम्यानच्या काळात अर्जुननं तीन वेळा पक्ष बदलला. विविध नेत्यांना पाठिंबा देत बहुतांशी वेळेला स्वत:च्या फायद्याचा विचार केला. दोन वेळा रणतुंगाला मंत्रिपद मिळालं. आत्ताच्या क्षणालाही अर्जुन रणतुंगा श्रीलंकन सरकारमध्ये महामार्ग, बंदर आणि जहाजवाहतूक या खात्याचा मंत्री आहे.

श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळातून प्रतिनिधित्व मिळवत रणतुंगा २००८मध्ये पहिल्यांदा एशियन क्रिकेट कौन्सिलचा अध्यक्ष बनला. रणतुंगानं श्रीलंकेच्या क्रिकेटच्या भल्याचा निर्णय घेणं अपेक्षित असताना त्यानं खुर्चीत बसल्यावर पहिलं काय केलं असेल, तर नेम धरून आयपीएलच्या काळातच इंग्लंडचा दौरा ठरवून माहेला जयवर्धने, मुरलीधरन, कुमार संघकारा आणि तिलकरत्ने दिलशान या चार मोठ्या खेळाडूंना अडचणीत आणायचा घाट घातला. रणतुंगाची तिरकी चाल लक्षात आल्यावर चारही खेळाडू जाम वैतागले. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना आयपीएलसारखी स्पर्धा नावलौकिकाबरोबर आर्थिक स्थैर्य देणार हेच रणतुंगाला बोचलं, असं आजही उघड बोललं जातं. परिणामी रणतुंगानं सरकारमध्ये काम करत असूनही श्रीलंकेच्या क्रिकेटकरता संयोजक म्हणून खास काही सकारात्मक काम केलं नाही, हे स्पष्ट बोलताना श्रीलंकेतले माजी खेळाडू आणि पत्रकार बिचकत नाहीत.

आता गड सांभाळणार कोण?
रणतुंगा आणि डिसिव्हाच्या जोरावर श्रीलंकेनं विश्‍वविजेतेपदाला गवसणी घातली, हे मान्य; पण रणतुंगा-डिसिल्व्हा निवृत्त झाल्यावर माहेला जयवर्धने-संघकारा-मुरलीधरन या त्रिकुटानं अत्यंत प्रामाणिकपणे श्रीलंकेच्या क्रिकेटची सेवा करत संघाला पुढं नेलं, हेसुद्धा कबूल करावं लागेल. तिघांच्या कामगिरीतलं सातत्य वाखाणण्याजोगं होतं. दोन फलंदाजांनी दहा हजार धावांचा टप्पा पार केला, तर मुरलीधरननं विश्‍वविक्रमी आठशे कसोटी बळी मिळवले.

टप्प्याटप्प्यानं हे तिघं दिग्गज खेळाडूही निवृत्त झाल्यावर श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये खरी पोकळी जाणवू लागली आहे. नवीन खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खंबीरपणे उभं राहायला शिकवणारी यंत्रणा बंद झाली आहे, ही मनाला खलणारी गोष्ट आहे. रणतुंगानं जसं विविध खेळाडूंना घडवलं, तसे घडवणं माहेला जयवर्धने आणि संघकारासह मुरलीलाही जमलेलं नाही. त्याचं थेट प्रतिबिंब श्रीलंका संघाच्या खेळात दिसू लागलं आहे.

लक्ष दिलं नाही तर...
गेल्या २५ वर्षांत खरी अचाट प्रगती केलेला एकच संघ आहे आणि तो म्हणजे श्रीलंकेचा, हे लक्षात घ्या. मला वाटतं, की ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंडचे संघ चांगले होते आणि चांगलेच राहिलेत. दक्षिण आफिका आणि न्यूझीलंड संघ चांगल्या आणि खराब कामगिरीच्या झोपाळ्यावर झोके घेत आहेत. वेस्ट इंडीज आणि झिंबाब्वे संघाची दुर्दशा झाली आहे. पाकिस्तान संघ ‘सातत्यानं असातत्यपूर्ण’ कामगिरी करत आला आहे आणि बांगलादेशाचा संघ अजूनही पाय रोवून सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करण्यापासून लांब आहे. अशा परिस्थितीत खरी प्रगती करून दाखवलेल्या श्रीलंका संघाला लागलेली उतरती कळा अशीच चालू राहिली, तर क्रिकेट जगताची रया भुर्रकन्‌ उडून जायला वेळ लागणार नाही.

कोणत्याही खेळातल्या प्रगतीच्या वाटेतला मुख्य अडथळा अर्थकारणाचा असतो. आयसीसीची तिजोरी खचाखच भरलेली असताना क्रिकेटची प्रगती आणि प्रसार तर सोडाच; पण होत असलेली अधोगती रोखणंही कठीण जायला लागलं, तर आयसीसीला कोण मान देणार? हा प्रश्‍न स्थानिक प्रशासनाचा आहे, असं सांगून भागणार नाहीये. घसरण थांबवायला त्या-त्या देशातल्या महान माजी खेळाडूंना योग्य मान आणि मानधन देऊन स्थानिक क्रिकेटच्या मार्गदर्शनाकरता नेमणं हाच एक दूरगामी उपाय ठरू शकतो. तरुण गुणवान क्रिकेटपटू संघातल्या किंवा संघ व्यवस्थापनातल्या चांगल्या आजी-माजी खेळाडूकडून जे शिकतो तेच गुरुकुल क्रिकेटमधल्या संस्कारांकरता लागू पडतं. श्रीलंकेच्या क्रिकेटला लागलेल्या आगीचं वणव्यात रूपांतर होणार नाही याची खबरदारी श्रीलंकेचे माजी खेळाडू, श्रीलंका क्रिकेट मंडळ आणि आयसीसीनं मिळून घेतलीच पाहिजे.

Web Title: sunandan lele write article in saptarang