‘पाचशतकी’ मनसबदार (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

रणजी क्रिकेटमध्ये ‘वजन’ असलेल्या मुंबई क्रिकेट संघानं तब्बल ४१ वेळा रणजी करंडकावर नाव कोरलं आहे. भारतीय क्रिकेट संघाला उत्तमोत्तम खेळाडू देणाऱ्या या संघानं क्रिकेटचे संस्कारही रुजवले आणि एक परंपरा निर्माण केली. कमालीची सातत्यपूर्ण कामगिरी असलेला हा संघ आज पाचशेवा सामना खेळत आहे. त्या निमित्तानं या संघाच्या कामगिरीवर आणि त्याच्या वैशिष्ट्यांवर एक नजर.

रणजी क्रिकेटमध्ये ‘वजन’ असलेल्या मुंबई क्रिकेट संघानं तब्बल ४१ वेळा रणजी करंडकावर नाव कोरलं आहे. भारतीय क्रिकेट संघाला उत्तमोत्तम खेळाडू देणाऱ्या या संघानं क्रिकेटचे संस्कारही रुजवले आणि एक परंपरा निर्माण केली. कमालीची सातत्यपूर्ण कामगिरी असलेला हा संघ आज पाचशेवा सामना खेळत आहे. त्या निमित्तानं या संघाच्या कामगिरीवर आणि त्याच्या वैशिष्ट्यांवर एक नजर.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सरकारदरबारी सरदारांचं वजन ‘किती हजारी मनसबदार’ यावरून ठरायचं. ‘पाचहजारी’ मनसबदार म्हणजे पाच हजार घोडदळ असलेले सरदार म्हणजे मोठा रुबाब. मुंबई रणजी संघ ‘पाचशतकी’ मनसबदार होत आहे. अत्यंत विस्मयकारक असा हा टप्पा. यात तब्बल ४१ वेळा मुंबईनं रणजी स्पर्धा जिंकली आहे. काय कमाल सातत्यपूर्ण कामगिरी आहे ना मुंबई रणजी संघाची! आजच मुंबई रणजी संघ आपला पाचशेवा सामना खेळत आहे. त्या निमित्ताने मुंबई रणजी क्रिकेट संघाचा घेतलेला हा रंजक आढावा.

रणजी करंडकाचा इतिहास  
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं १९३४मध्ये ‘द क्रिकेट चॅंपियनशिप ऑफ इंडिया’ स्पर्धा  चालू करायचा घाट घातला- ज्याचं नंतर नामकरण रणजी करंडक स्पर्धा झालं. नियोजन करून पुढच्या वर्षी म्हणजे १९३५-३६च्या मोसमात पहिली स्पर्धा पार पडली. यात मुंबईनं उत्तर भारत संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. १९५८-५९ ते १९७२-७३ या सलग १५ मोसमांत मुंबई रणजी संघानं विजेतेपद कायम राखलं, हे आपल्याला समजतं, तेव्हा मुंबईनं रणजी स्पर्धेवर गाजवलेल्या अधिराज्याची कल्पना येते. रणजी स्पर्धा भारतीय संघाचं प्रवेशद्वार आहे, असं समजलं जातं. मुंबई संघानं ४१ वेळा विजेतेपद मिळवलं. त्यामुळंच मुंबई रणजी संघाकरता सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले गेले, याचं आश्‍चर्य वाटत नाही.

सर्वोत्तम संघ कोणता?
मुंबईकडून रणजी विजेतेपद पटकावणारा सर्वोत्तम संघ कोणता, यावर बरीच चर्चा होऊ शकते. जुनेजाणते लोक १९६०च्या दशकातला मुंबईचा संघ सर्वोत्तम मानतात. याला कारण असं आहे, की मुंबई संघाची फलंदाजी दशकानुदशकं सर्वोत्तम राहिली आहे, यात शंका असायचं कारणच नाही. प्रश्‍न उरतो सर्वोत्तम गोलंदाजीचा. १९६०च्या दशकात रमाकांत देसाई नवा चेंडू टाकायचे आणि फिरकी गोलंदाजी करायला बापू नाडकर्णी, बाळू गुप्ते हे दोन दिग्गज आणि साथीला तरुण ‘ऑफ स्पिनर’ शरद दिवाडकर होते. दुसरं कारण अजून मजेशीर आहे. १९६३-६४च्या मोसमात मुंबई संघानं राजस्थान संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावलं, तेव्हा राजस्थान संघात विजय मांजरेकर, हनुमंतसिंग आणि सलीम दुराणी हे तीन दादा फलंदाज होते. दुसऱ्या डावात या तीनही फलंदाजांनी शतकं ठोकली, तरीही मुंबई संघानं आरामात सामना जिंकून विजेतेपद पटकावलं होतं.

अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईनं चार वेळा, तर पॉली उम्रिगर, बापू नाडकर्णी आणि सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा रणजी करंडक पटकावला आहे. याचा अर्थ या काळातला मुंबई संघ उत्तम असणारच. फक्त रमाकांत देसाई, बापू नाडकर्णी आणि बाळू गुप्ते यांचा मारा एकत्र असलेल्या संघाला जाणकार जरा उजवा कौल देतात इतकंच.

संस्कारांचं मोल : वेंगसरकर
भारताचे आणि मुंबई रणजी संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर रणजी संघाबद्दल भरभरून बोलले. ‘‘जेमतेम १८ वय असताना मला मुंबई रणजी संघातून खेळायची संधी लाभली. सुनील गावसकर, अशोक मांकड, एकनाथ सोलकर, पद्माकर शिवलकर आणि दिलीप सरदेसाई यांच्यासारखे एकाहून एक सरस खेळाडू त्यावेळी मुंबई संघातून खेळायचे. त्यांच्या कार्यपद्धती बघून मला शिकायला मिळायचं. सराव आणि सामन्यादरम्यान क्रिकेटवर बरंच बोललं जायचं. खेळातले बारकावे चर्चेला असायचे. मी मोठे कान करून ते ऐकायचो. घरात पालक करतात तसे संस्कार संघातले ज्येष्ठ खेळाडू तरुण खेळाडूंवर करायचे. मला वाटतं, की रिले शर्यतीत बॅटन पास केला जातो, तसाच ड्रेसिंग रूममधल्या क्रिकेट संस्कारांचा बॅटन गेली कित्येक दशकं ज्येष्ठ खेळाडूंकडून नव्या खेळाडूंकडं पास केला जातो आहे, हेच मुंबई रणजी संघाच्या यशाचं गमक आहे,’’ वेंगसरकर मर्माचं बोलत होते.

कचखाऊंना थारा नाही : मांजरेकर
मुंबई संघाची सेवा केलेला असाच एक दर्जेदार शैलीदार खेळाडू म्हणजे संजय मांजरेकर. मुंबई रणजी संघाकडून खेळणं म्हणजे नेमका काय अनुभव होता इतका एकच सरळ साधा प्रश्‍न संजयला बोलतं करायला पुरेसा होता. ‘‘आपण खेळत होतो सुनंदन तेव्हाच्या काळात मुंबई रणजी संघात प्रवेश करणं कर्मकठीण काम होतं. बडोद्याला आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग सहा-सात शतकं केल्यावर माझ्यासाठी मुंबई संघाचे दरवाजे उघडले. दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, रवी शास्त्री इत्यादी खेळाडूंसोबत रणजी सामने खेळायला काय धमाल यायची! रोज काही ना काही नवं शिकायला मिळायचं. रणजी संघात प्रवेश मिळाल्यावर लगेच एक गोष्ट समजली ती म्हणजे मुंबई रणजी संघात जम बसवायचा असेल, तर ‘बडे दिलवाला’ फलंदाज बनावं लागेल. मुंबई फलंदाजीत कचखाऊ खेळाडूला थारा नसतो.

वेगवान गोलंदाजांना सामोरं जाणं असो, वा कठीण खेळपट्टीवर किंवा गंभीर परिस्थिती असताना फलंदाजीला जाणं असो, तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून धीटपणानं फलंदाजी करायची मानसिकता दाखवायलाच हवी. संघ अडचणीत असताना किंवा दर्जेदार गोलंदाजांसमोर धावा केल्या, तरच मुंबई संघात फलंदाजाला मान मिळतो, इतका सरळ मार्ग असायचा. वरच्या स्तरावर क्रिकेट खेळताना नक्की काय बदल करावे लागतील, याचा परिपाठ संघातले ज्येष्ठ खेळाडू घालून द्यायचे. त्यामुळं क्रिकेटशिकवणी आपोआप व्हायची. अशाच काही कारणांमुळं मुंबई रणजी संघातून खेळायला खूप मजा यायची,’’ संजय सांगत होता.

काही संस्मरणीय सामने
मुंबई संघानं इतके चित्तथरारक सामने खेळले आहेत, की त्यातले काही निवडणं फार कठीण आहे. तरीही चार सामन्यांची आठवण निघतेच. १९७२-७३च्या रणजी अंतिम सामन्यात मुंबईची गाठ तमिळनाडूबरोबर पडली होती. मुंबई संघाची फलंदाजी बघता फिरकीला साथ देणारी भिंगरी खेळपट्टी बनवून गावसकर, रामनाथ पारकर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई यांना रोखण्याची योजना आखली गेली. व्यंकटराघवन आणि कुमार या दोन फिरकी गोलंदाजांनी मुंबईला रोखण्यात यश मिळवलं; पण त्यांनी सोडलेलं फिरकीचं अस्त्र पद्माकर शिवलकर यांनी त्यांच्या फलंदाजांवर उलटवलं. फक्त १६ धावांत तमिळनाडूच्या आठ फलंदाजांना बाद करून शिवलकर यांनी सामना मुंबईकडं खेचला. दुसऱ्या डावात शिवलकर- सोलकर जोडीनं प्रत्येकी पाच बळी घेऊन मुंबईकरता १२३ धावांचा विजय साकारला.

१९९१मधला मुंबई विरुद्ध हरियाना सामना विसरता येणं शक्‍य नाही. कपिल देवनं तरुण खेळाडूंना साथीला घेत बलाढ्य मुंबई संघावर अवघ्या दोन धावांचा विजय मिळवला होता. दिलीप वेंगसरकर यांनी दुसऱ्या डावात उभारलेलं नाबाद शतक लक्षणीय होतं. शेवटचा फलंदाज धावबाद झाला आणि मुंबई संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं; पण त्या सामन्यात खरा विजय क्रिकेटचा झाला होता.
तिसरा सामना उपांत्य फेरीचा झाला, ज्यात खरं महत्त्व पहिल्या डावाच्या आधिक्‍याला होते. तमिळनाडू संघासमोर खेळताना सचिन तेंडुलकरनं नाबाद द्विशतक ठोकून तळातल्या फलंदाजांसोबत मोलाची भागीदारी रचली होती. मुंबईला पहिल्या डावात पाच धावांची आघाडी मिळाली म्हटल्यावर तमिळनाडू संघ मनातून इतका खचला, की त्यांचा दुसरा डाव साफ गडगडला आणि मुंबईनं गरजेच्या धावा आरामात काढत सामना जिंकला. चौथा सामना होता२००९-१० मोसमातल्या मुंबई विरुद्ध कर्नाटक अंतिम लढतीचा. म्हैसूरला झालेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबई संघानं, मनिष पांडेनं बहारदार शतक करून केलेल्या कडव्या प्रतिकाराला मोडून काढत सहा धावांनी सामना जिंकून रणजी करंडकावर नाव कोरलं होतं.

चक्र सुरू राहणं गरजेचं
मुंबई रणजी संघाच्या यशाचं गमक अनुभवी खेळाडूंनी तरुण खेळाडूंवर केलेल्या क्रिकेटच्या मूलभूत संस्कारांमध्ये दडलेलं आहे. १९३५पासून आठ दशकं चांगल्या संस्कारांचं चक्र चालू राहिलं आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघ वर्षभर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात मग्न व्हायला लागला आहे. त्याचा विपरीत परिणाम सगळ्याच रणजी संघांवर व्हायला लागला आहे. खासकरून मुंबई रणजी संघावर तर तो परिणाम दिसू लागला आहे. भारतीय संघातले अजिंक्‍य रहाणे आणि रोहित शर्मा सातत्यानं भारतीय संघासोबत सामने खेळत जगभर फिरत आहेत. साहजिकच मुंबई संघाकरता रणजी खेळण्याचं त्यांचं प्रमाण कमी झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असणाऱ्या खेळाडूंनी तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचं चक्र मंदावलं आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. संभाव्य धोका तिथंच जाणवतो आहे आणि त्याचं सोपं उत्तरही कोणाकडे नाही.   

पाचशेवा रणजी सामना खेळण्याचा उत्सव साजरा करणं जितकं गरजेचं आहे, तितकंच क्रिकेटपटू ज्या मातीतून घडतो त्या मातीला, त्या संस्कारांना जपणं गरजेचं आहे. बीसीसीआयकडून येणाऱ्या कोट्यवधी रुपयांनी हे जपणं शक्‍य होणार नाही. त्याकरता ज्येष्ठ खेळाडूंची नाळ तरुण नवख्या खेळाडूंशी क्रिकेटमधूनच जोडली गेली पाहिजे. आजी तसंच माजी खेळाडूंनी नुसता मुंबई क्रिकेटच्या सुवर्णकाळाचा उदोउदो करून भागणार नाही. मुंबई क्रिकेटचे दिग्गज मानल्या जाणाऱ्या प्रत्येकानं आपापल्या व्यग्र दिनक्रमातून वेळात वेळ काढून मुंबई क्रिकेटसाठी ‘खरं’ योगदान दिलंच पाहिजे. मुंबई क्रिकेटनं बऱ्याच खेळाडूंना घडवलं... धावांसोबतीनं कुबेराच्या तिजोरीचे दरवाजे उघडले. ही उज्ज्वल परंपरा पुढं सुरू राहावी अशी मनोमन इच्छा असेल, तर आजी-माजी खेळाडूंना मैदानावर खेळाडू घडवूनच मुंबई क्रिकेटचं ऋण फेडावं लागेल.

Web Title: sunandan lele write article in saptarang