अथक 72 तास... (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

पुण्यातल्या आशिष कासोदेकर या अवलियानं लेह-लडाख भागात होणारी "ला अल्ट्रा' ही शर्यत विक्रमी वेळेत पूर्ण केली. तब्बल 333 किलोमीटरची ही अचाट शर्यत आणि तीही प्राणवायूचं प्रमाण कमी असणाऱ्या भागात. सलग 72 तासांमध्ये आशिषनं ही शर्यत पूर्ण केली. ही आगळीवेगळी शर्यत पूर्ण करताना आशिषनं काय तयारी केली, कुणाची मदत घेतली, शर्यत नक्की कशी असते या सगळ्या गोष्टींचा वेध.

प्रसंग 1 :
माझा मित्र सांगत होता, की मोठ्या उत्साहानं लेह- लडाखला फिरायला गेलो होतो कुटुंबाबरोबर. इतकं काही ऐकलं होतं लेह- लडाख- खारदुंगलाबद्दल, की कधी बघतोय असं झालं होतं. कसलं काय आणि कसलं काय... मला कमी प्राणवायूचा आघात सहन झाला नाही. अस्वस्थता यायला लागली. श्वास घेता येईनासा झाला. मग काय पकडलं विमान आणि 72 तासांनंतर परत आलो.

प्रसंग 2 :
माझा मित्र सांगत होता, की मोठ्या उत्साहानं लेह-लडाखला गेलो होतो. इतकं काही ऐकलं होतं लेह- लडाख- खारदुंगलाबद्दल की कधी जातोय असे झाले होते. खूप तयारीनं गेलो होतो; पण तरीही कमी प्राणवायूचा आघात सहन करावा लागला. अस्वस्थता यायला लागली. श्वास घेता येईनासा झाला. मग काय जिद्दीचं विमान पकडलं आणि 72 तासांनंतर परत आलो... ला अल्ट्रा शर्यत पूर्ण करून.

पहिल्या प्रसंगात आणि दुसऱ्या प्रसंगातले बरेचसे शब्द तेच आहेत, हे मला माहीत आहे. मात्र, बदललेल्या मोजक्‍या शब्दांत पुण्याच्या आशिष कासोदेकरची कमाल कहाणी दडलेली आहे. लेह- लडाखला पर्यटक उत्साहानं फिरायला जातात. हिमालयाचा रुद्र निसर्ग बघून भारावून जातात आणि सगळीकडं वाहनातून प्रवास करूनही थकून जातात. बहुतांशी लोकांना कमी प्राणवायूचा त्रास होतो. आशिष कासोदेकर याला अपवाद आहे. पहिल्यांदा एका वाक्‍यात कहाणी सांगतो मग सविस्तर कथा मांडतो.
पुण्याच्या आशिष कासोदेकरनं लेह- लडाख- खारदुंगला भागात होणाऱ्या "ला अल्ट्रा' स्पर्धेत भाग घेऊन सतत 72 तास कष्ट करताना 333 किलोमीटर पळायची शर्यत विक्रमी वेळेत पूर्ण केली. होय! तुम्ही वाचता आहात ते सत्य आहे. 333 किलोमीटर पळायची शर्यत आणि तीसुद्धा जेमतेम 60 टक्के प्राणवायू असलेल्या लेह- लडाख भागात. आता विस्फारलेले डोळे बारीक करा आणि आशिषची कहाणी वाचा.
मानवी सहनशक्तीची टोकाची परीक्षा बघणारी क्रूर स्पर्धा म्हणून "ला अल्ट्रा' स्पर्धा नावाजली जाते. पर्यटक निसर्गाचं रुद्र रूप नुसतं बघून थक्क होतात. त्या समुद्रसपाटीपासून 17,400पेक्षा जास्त उंचीवरच्या लेह- लडाख भागात ही स्पर्धा भरवली जाते. मॅरॅथॉनमध्ये आजकाल हजारोंनी स्पर्धक भाग घेतात. "ला अल्ट्रा'ची गोष्ट मात्र वेगळी आहे. डॉ. रजत चौहान नावाचा माणूस काहीशी विचित्र स्पर्धा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात भरवतो. ज्याला "बेबी रन' म्हणून संबोधतात, ती शर्यतच 111 किलोमीटरची असते. खरे स्पर्धक 222 किलोमीटरच्या स्पर्धेत सहभागी होतात आणि जे तंदुरुस्ती आणि जिद्दीच्या बाबतीत "गॉन केस' असतात, तेच मोजके स्पर्धक 333 किलोमीटरच्या स्पर्धेत भाग घेण्याची हिंमत दाखवतात. 333 किलोमीटरची शर्यत आत्तापर्यंत फक्त 10 स्पर्धकांनी पूर्ण केली आहे- जे सर्वच्या सर्व परदेशी स्पर्धक होते. 23 ते 26 ऑगस्ट या काळात झालेली स्पर्धा सर्वार्थानं वेगळी ठरली- ज्यात 333 किलोमीटर शर्यतीत भाग घेणारे सर्व पाच स्पर्धक भारतीय होते- ज्यात एक होता पुण्याचा आशिष कासोदेकर.

खेळाची आवड
आशिष मूळचा बास्केटबॉलपटू. खेळाचा बहर संपल्यावर आशिषला नेहमी काहीतरी स्वत:लाच आव्हान देणारं करायला आवडायचं. 11 नोव्हेंबर 2011ला त्यानं पुण्याहून गोव्याला सायकलवरून थेट सफर केली. 12 डिसेंबर 12ला पुणे ते पाचगणी प्रवास चालत पूर्ण केला. 11 डिसेंबर 13ला 2400 किलोमीटरचा सायकल प्रवास 36 तासांत पूर्ण केला. पुण्याहून मदुराईच्या वाटेवर जाऊन 1,200 किलोमीटरनंतर आशिष सायकल उलटी फिरवून पुण्याला परतला होता.

थोडक्‍यात सांगायचं, तर सर्वसामान्य माणसाच्या मनातही येणार नाहीत, असे उपक्रम करायची आशिषला जणू सवय लागली होती. त्याचाच पुढचा अतिरेकी प्रकार म्हणजे "ला अल्ट्रा' शर्यत- ज्याची सुरवातच 111 किलोमीटरनं होते. "ला अल्ट्रा' शर्यत म्हणजे येऱ्या गबाळ्याचं काम नाही. नुसतं पळणं नाही, तर हिमालयाच्या कुशीतल्या डोंगर-दऱ्यांतून पळायची ही शर्यत ज्याचा प्रत्येक टप्पा सहभागी खेळाडूंची सत्त्वपरीक्षा बघत असते. 2015 मध्ये आशिषनं 111 किलोमीटर शर्यत पूर्ण केली. ""शर्यत पूर्ण केल्यावर मला कृतकृत्य वाटत असताना बाकीचे सहभागी खेळाडू आणि खास करून संयोजक म्हणाले, की 111 किलोमीटर म्हणजे आम्ही "बेबी रन' म्हणतो. खरी मजा 222 आणि 333ला येते. तेव्हापासून माझ्या मनात थेट 333 किलोमीटर आव्हानाला गवसणी घालायचे विचार घोळत होते,'' आशिष सांगत होता.

यंदाच्या शर्यतीबद्दल बोलताना आशिष म्हणाला : ""111 किलोमीटरला "बेबी रन' म्हणतात, हे ऐकल्यापासून ला 222 पेक्षा 333 किलोमीटर आव्हानाला गवसणी घालायचा विचार घोळायला लागला होता. शारीरिक आणि मानसिक तयारी मी चालू केली होती. बऱ्याच लोकांना वाटेल, की तयारी म्हणजे फक्त स्टॅमिना वाढवायचे कष्ट. तसं नाहीये. "ला अल्ट्रा' शर्यतीत भाग घेताना शारीरिक तयारीइतकंच लक्ष मानसिक तयारीला द्यावं लागतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती शरीराला द्यायचं तंत्र आत्मसात करावं लागतं. ते शिकणं कठीण गेलं. गंमतीची गोष्ट अशी, की कितीही तयारी केली, योजना आखल्या, तरी ला अल्ट्रा शर्यतीत कधी काय आव्हान अचानक पुढं उभं ठाकेल हे सांगता येत नाही.''

निसर्गसुंदर नुब्रा व्हॅलीजवळच्या सुमूर नावाच्या सुंदर गावाजवळून 23 तारखेला संध्याकाळी सहा वाजता शर्यतीला प्रारंभ झाला. त्या तीन दिवसांची कहाणी सांगताना आशिष म्हणाला : ""111 किलोमीटर आणि 222 किलोमीटर मिळून 46 स्पर्धक होते आणि 333 किलोमीटर शर्यतीत पाच स्पर्धकांनी भाग घेतला होता. 111 किलोमीटरचं अंतर सर्व धावपटूंनी वीस तासांमध्ये पूर्ण केलं. 222 किलोमीटरचं अंतर 48 तासांत कापलं गेलं. 111 किलोमीटर शर्यतीत जगातल्या सर्वात उंचीवरच्या रस्त्यावरची खारदुंग ला पास खिंड खेळाडूंनी पार केली. 222 च्या टप्प्यात सहनशक्तीचा अंत पाहणारी वारी ला खिंड पार करावी लागली. 46 स्पर्धक थकून भागून विश्रांती घेत असताना आम्ही फक्त पाच धावपटू पुढच्या 111 किलोमीटरच्या शर्यतीचं आव्हान पेलायला पळू लागलो. शेवटच्या टप्प्यात तांगलांग भागातून पळायचं होते. रात्रंदिवस आम्ही पळत होतो. रात्रीच्या काळात कधी तापमान शून्याच्या खालीही जात होतं. 17,500 फूट उंचीवरच्या तांगलांग भागातून जाताना आमचा कस लागला.''
शेवटच्या टप्प्याबद्दल बोलताना आशिषनं सांगितलं : ""तांगलाग ला खिंडीनंतर वीस किलोमीटर अंतरावरच्या देब्रिंग गावात शर्यत संपणार होती. शेवटच्या टप्प्यात मला कुठून ऊर्जा आली माहीत नाही; पण मी शेवटचं वीस किलोमीटर अंतर चांगल्या दमानं पूर्ण केलं. तब्बल 31 सेकंद बाकी ठेवून मी 71 तास 59 मिनिटं आणि 29 सेकंदांत पूर्ण केली- जो एका अर्थानं विक्रम ठरला. माझ्या विक्रमी धावेनं माझे सहकारीच नव्हे, तर संयोजक भारावून गेले कारण त्यांच्याकरताही हा मोठा आनंदाचा क्षण होता.''

विश्रांतीचं काय?
ही सगळी धाव सुरू असताना विश्रांती केव्हा आणि कशी घेतलीस, असं विचारलं असताना आशिषनं दिलेलं उत्तर वेड लावणारं होतं. ""विश्वास ठेव, मी संपूर्ण 72 तासांच्या शर्यतीत 90 मिनिटं झोपलो. अगदी खरं सांगायचं, तर एकदा 30 मिनिटे सलग झोपलो आणि नंतर चार वेळा 15 मिनिटांच्या पॉवर नॅप्स काढल्या. खूप दमलो असताना झोप येत नाही; पण विश्रांती गरजेची असते. अशा वेळी पॉवर नॅप्स फार उपयोगी पडतात. जास्त विश्रांती घेतली, तर तापलेलं शरीर गार व्हायला लागतं. मग गडबड होते. तसंच "ला अल्ट्रा' शर्यतीत प्रत्येक टप्प्याचा एक "कट ऑफ टाइम' असतो जो खेळाडूला पाळावा लागतो. काही खडतर चढणीवर मला चांगली लय मिळाली- ज्यामुळं अडचणीच्या टप्पा मला कमी वेळेत पूर्ण करता आला- ज्याला आम्ही "टाइम गेन' करणं म्हणतो. हाती वेळ राहिला, तर त्याचा फायदा पुढच्या शर्यतीत घेता येतो. 90 मिनिटं विश्रांती घेऊन मी शर्यत पार केली हे सत्य आहे,'' आशिष म्हणाला. 72 तासांच्या शर्यतीत फक्त 90 मिनिटं विश्रांती हे गणित ऐकून मी खाली पडायचा बाकी होतो.

""मात्र, हे यश माझ्या एकट्याचं नव्हते...'' सहकाऱ्यांचं योगदान काय होतं, हे सांगताना आशिष म्हणाला : ""बाळकृष्ण देसाई, धनंजय आपटे, मंगेश शिंदे आणि प्रसाद शेट या माझ्या चार जवळच्या मित्रांनी मला खूप मदत केली. चांगला क्रू असल्याशिवाय ही शर्यत पूर्ण करणं अशक्‍य आहे. प्रत्येक टप्प्यावर या चौघांनी मला प्रोत्साहन दिलं आणि योग्य काळजी घेतली.''

शर्यत नाही- ध्यानधारणा!
333 किलोमीटरची शर्यत विक्रमी वेळेत पूर्ण करून आशिषचे पाय अजून जमिनीवर आहेत. ""खरं सांगू तुला, मला ही शर्यत नाही तर ध्यानधारणा वाटली. माझी कोणाशी स्पर्धा नव्हती. स्वत:च्या क्षमतेला दिलेलं आव्हान होतं. मी इतकंच म्हणीन, की आपल्या शरीराची आणि मनाची ताकद अचाट असते. आपण त्याचा खरा वापर करत नाही... खरी परीक्षा घेत नाही. आपल्याला वाटतं त्यापेक्षा आपल्या मनाची आणि शरीराची ताकद खूप जास्त असते. प्रयत्नपूर्वक ती ताणून बघायची जिद्द हवी इतकंच. 333 किलोमीटरची ला अल्ट्रा शर्यत पूर्ण केल्यावर मला माझा शोध लागला.''
लेह लडाखला फिरायला जाऊन समाधानी होणारे आपल्यासारखे पर्यटक कुठं आणि त्याच दुर्गम भागातली 333 किलोमीटरची ला अल्ट्रा शर्यत 72 तासांमध्ये पूर्ण करणारा जिद्दी आशिष कासोदेकर कुठं? मानवी शरीराची क्षमता खऱ्या अर्थानं तपासणाऱ्या आशिषच्या निग्रहाला किमान मानवंदना देणं तरी आपल्याला जमेल का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com