संघर्ष आणि व्यक्तिमत्त्वविकास (सुनंदन लेले)

sunandan lele write article in saptarang
sunandan lele write article in saptarang

प्रतिकूलतेवर मात करून आपण सर्वोत्तम कामगिरी करू शकतो, याचा प्रत्यय स्वप्ना बर्मन आणि हिमा दास या दोघींनी यंदा एशियन गेम्समध्ये आणून दिला. या दोघींची कहाणी प्रेरक आहे, तशी पालकांना धडाही देणारी आहे. मुलांना खूप "कंफर्ट झोन'मध्ये न ठेवता थोडं मुक्तपणे संघर्षालाही सामोरं जाऊ दिलं पाहिजे. वाढत्या वयात संकटांना समस्यांना सामोरं जायला लागलं नाही, तर त्या मुला-मुलींचं व्यक्तिमत्त्व घडणार तरी कसं? कठीण समस्यांवर मार्ग दाखवणारे उपाय क्रीडाविश्‍वात आहेत. त्यामुळं व्यक्तिमत्त्वविकासासाठी "खेळा आणि खेळू द्या' ही घोषणा गरजेची झाली आहे.

पश्‍चिम बंगालमधल्या जलपायगुडी गावात जन्माला आलेल्या स्वप्ना बर्मनची आई बसाना चहाच्या मळ्यात काम करायची आणि तिचे वडील पंचनन रिक्षा ओढायचे. होय! बरोबर म्हणालो मी! पंचनन रिक्षा चालवायचे नाहीत- ओढायचे. अतिश्रमानं पंचनन यांना पाच वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हापासून पंचनन अंथरुणाला खिळले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत याच स्वप्ना बर्मनचं नाव आपल्या कोणाच्या तोंडी नव्हतं. स्वप्ना बर्मननं अत्यंत कठीण अशा हॅप्टाथलॉन क्रीडा प्रकारात नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समधे सुवर्णपदक पटकावलं आणि स्वप्नाची कहाणी ऐकून आपण सगळे चकित झालो.

यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं भरपूर कौतुक व्हायलाच हवं. नेमबाजी, बॉक्‍सिंग, हॉकी, टेनिस या खेळात आपण चांगली कामगिरी करतोच; पण यंदाच्या एशियन गेम्समधे आपल्या खेळाडूंनी ऍथलेटिक्‍स प्रकारात कमाल कामगिरी करून दाखवली, ज्याचा आनंद जास्त होतोय. देदीप्यमान यश मिळवलेल्या खेळाडूंमध्ये मोठ्या शहरातून आणि चांगल्या कौटुंबिक परिस्थितीतून आलेले खेळाडू कमी आहेत. जीवनात ज्यांनी अचाट संकटांचा सतत सामना केला, अशा खेळाडूंनी यशाचे शिखर गाठून सगळ्यांना थक्क करून सोडलं आहे. मग मनात विचार येतो, की संकटं व्यक्तिमत्त्व घडवतात का?

स्वप्ना बर्मन ज्या परिस्थितीवर मात करून आली आहे ते वाचता शहरात राहणारे आपण सुखवस्तू लोक किती चांगलं आयुष्य जगत असतो हे कळतं. स्वप्नाला तीन भावंडं. आई चहाच्या मळ्यात काम करायची आणि वडील रिक्षा ओढायचे. सहा तोंडांना अन्न पुरवताना बसाना आणि पंचननची त्रेधा उडायची. लहानपणापासून स्वप्नाला खेळाची आवड. एक नाही सगळ्याच खेळात तिला जात्याच रस होता. त्यामुळंच स्वप्नाला तिच्या प्रशिक्षकानं हॅप्टाथलॉन क्रीडा प्रकारात घुसायला प्रोत्साहन दिलं.
जकार्ताला झालेल्या एशियन गेम्समधल्या हॅप्टाथलॉन क्रीडा प्रकारातल्या अंतिम टप्प्यात जाताना स्वप्नासमोर मोठी आव्हानं होती. गतवर्षी भुवनेश्वरला झालेल्या स्पर्धेत स्वप्ना दमून खाली कोसळली होती. सातपैकी ताकदीच्या खेळ प्रकारात स्वप्नाला चांगले गुण पटकवायचा आत्मविश्वास होता. उंच उडी आणि भालाफेक हे प्रकार तिनं अव्वल क्रमांकानं पूर्ण केले. लांब उडी, गोळाफेकीत स्वप्ना दुसरी आली. तिची कमजोरी शंभर आणि दोनशे मीटर वेगवान पळायच्या शर्यतीत होती. त्या दोन शर्यतींत स्वप्ना चक्क सातवी आली. शेवटच्या आठशे मीटरच्या शर्यतीत चांगली कामगिरी करायचं मोठं आव्हान समोर उभं असताना स्वप्नाच्या दातातून कळा मारत होत्या. दातदुखी किती भयानक असते, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तोंडाला पट्टी बांधून स्वप्नानं शर्यतीत धाव घेतली. सुवर्णपदक पटकावल्यावर स्वप्नानं दातदुखीबरोबर पायदुखी असल्याचं हळूच सांगितलं, तेव्हा सर्वसामान्यांना तिची खरी व्यथा कळाली. स्वप्नाच्या दोनही पावलांना पाच नाही, तर सहा बोटं आहेत. सहाव्या बोटामुळं कोणताही बूट घातल्यावर तिला बूट घट्टच बसतो आणि मग वेदना चालू होतात. घरच्या परिस्थितीमुळं वेगळे चांगले बूट बनवून घ्यायचीही तिची ऐपत नव्हती. स्पर्धेअगोदरचा सगळा सराव स्वप्नानं अशाच वेदना उरात साठवत केला आणि अखेर संकटांवर मात करत स्वप्ना हॅप्टाथलॉन क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ऍथलिट झाली. उद्योगपती आनंद महिंद्र यांनी स्वप्नाची कहाणी ऐकून तिला सर्वतोपरी मदत करायला तयारी दाखवली आहे.

हिमा दासची दौड
आसाममध्ये धिंग नावाच्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या शेतकऱ्याच्या मुलीनं जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत चारशे मीटरसारख्या नावाजलेल्या खेळ प्रकारातली शर्यत जिंकणं हा फार मोठा पराक्रम मानला पाहिजे. रोनजित आणि जोनाली या भाताची शेती करणाऱ्या दाम्पत्याचं हिमा हे पाचवं मूल. लहानपणी हिमाला फुटबॉल सोडून काहीच सुचायचं नाही. बहुतांश वेळेला हिमा मुलांच्यात खांद्याला खांदा लावून फुटबॉल खेळायची. शाळेतल्या एका शिक्षिकेने हिमाला फुटबॉल सोडून ऍथलेटिक्‍समध्ये जाण्याचा मोलाचा सल्ला दिला.

निष्णात प्रशिक्षक निपॉन दास यांनी हिमाला योग्य मार्गदर्शनाबरोबर मेहनत करायला लावली. हिमाच्या क्षमतेचा आणि कौशल्याचा विचार करून निपॉन यांनी हिमाला चारशे मीटर पळायच्या शर्यतीकरता तयार केलं. यातलं मुख्य प्रशिक्षण हिमाला गाव सोडून गुवाहाटीला अकादमीत जाऊन करायला लागलं. लहान वयात घरापासून दूर जाऊन एकाग्रतेनं मेहनत करायची हिमाची मानसिक तयारी झालीच कशी, हा अभ्यासाचा विषय आहे.

यंदाचं वर्ष हिमाकरता विशेष ठरलं. प्रथम हिमानं फिनलॅंडला झालेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत 51.46 सेकंदात चारशे मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकलं आणि नंतर कामगिरीत सुधारणा करताना एशियन गेम्समध्ये तीच चारशे मीटरची शर्यत 50.79 सेकंदात पूर्ण करून रौप्यपदक मिळवलं.

खरं बघायला गेलं, तर या वेळच्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी धमाल कामगिरी करून दाखवली; पण मी मुद्दाम स्वप्ना बर्मन आणि हिमा दास यांचं उदाहरण दिलं- कारण या दोघींची कहाणी मला वेगळी वाटली. कष्टाच्या जोरावर या दोघींनी इतरही क्षेत्रांत कदाचित काहीतरी चांगलं करून दाखवलं असतं. तरीही जो ठसा त्यांनी खेळाचा ध्यास धरून उमटवला- त्याला तोड नाही. इंजिनिअर किंवा डॉक्‍टर बनून जे मिळालं नसतं, ते हिमा- स्वप्ना यांना खेळानं दिलं आहे आणि पुढंही देणार आहे.

खेळ काय शिकवतो?
हर्षा आणि अनिता भोगले यांनी "विनिंग वेज' नावाचं पुस्तक लिहिलं आहे- ज्यात त्यांनी खेळाच्या जगतातली उदाहरणं घेऊन ती व्यावसायिक जगात तंतोतंत लागू कशी पडतात, हे सांगितलं आहे. याच विषयावर ते भाषण देतात, कार्यक्रम सादर करतात- ज्याला तुफान मागणी आहे.

हर्षा भोगलेंनी खूप वर्षांपूर्वी आयआयएम, अहमदाबादच्या विद्यार्थ्यांना एका भाषणात "गुणवत्ता म्हणजेच सर्व काही नाही,' हे समजावून सांगताना काय सांगितलं तो व्हिडिओ अजूनही प्रचंड गाजतो आहे. त्याच भाषणात हर्षानं खेळ माणसाला काय शिकवतो, हे उलगडून सांगताना पोहण्याच्या शर्यतीचं उदाहरण दिलं आहे. हर्षा म्हणतो ः ""पोहण्याच्या शर्यतीत बाजूच्या लेनमध्ये कोण रथी-महारथी आहेत याचा विचार चांगला पोहणारा करत नाही. आपली कामगिरी अजून उंचीवर कशी नेता येईल, इतकंच तो मनोमन ठरवतो.'' मन्सूर अली खान पतौडी यांना बऱ्याच वेळा भेटल्यावर त्यांच्या सुंदर व्यक्तिमत्त्वाची स्तुती करताना हर्षानं सांगितलं, की पतौडी भेटीदरम्यान एकदाही त्यांच्या डोळ्याला झालेल्या अपघाताविषयी बोलले नाहीत.
या दोन उदाहरणांतून मार्ग दाखवताना हर्षा म्हणतो ः "रोजच्या आयुष्यात जगताना आपण सध्या चालू असलेल्या भयानक आणि अनावश्‍यक शर्यतीकडं लक्ष न देता फक्त रोज मी सर्वोत्तमतेच्या ध्यासानं चांगलं काम कसं करू शकीन, याचा विचार करायला हवा. पतौडी यांच्या उदाहरणातून हे शिकायला हवं, की "काय नाही'पेक्षा "काय आहे' याचा विचार करायला हवा.

खेळ आपल्याला रोजच्या आयुष्यातल्या अडचणी कशा सोडवायला पाहिजेत, हे खूप सोप्या पद्धतीनं शिकवून जातो, हे यातून मला सांगायचं आहे. म्हणून ठासून सांगावंसं वाटतं, की प्रत्येक पालकानं आपल्या मुलांना खेळायला सर्वांत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे.

सुखवस्तूपणाचा तोटा
शहरी वातावरणात वाढणाऱ्या मुला-मुलींसमोर फार मोठ्या समस्या "आ' वासून उभ्या आहेत. या समस्येचं मूळ आहे सुखवस्तूपणात. गावाकडची साध्या कुटुंबातली मुलं- मुली सहज चार-पाच किलोमीटर चालत शाळेला जाताना मी बघितलं आहे. शहरातल्या मुलांना पालक स्वत: सोडतात किंवा वाहनाची सोय करतात. गावाकडची मुलं शाळेत अगोदर जाऊन आणि नंतर थांबून सहजी खेळाचा आनंद घेतात. शहरातली मुलं घंटा वाजताना शाळेत प्रवेश करतात आणि शाळा संपल्यावर लगेच त्यांना न्यायला आलेल्या वाहनात बसून घरच्या प्रवासाला लागतात. ही वाहनं मुलांनी इतकी खचाखच भरलेली असतात, की हालचाल करायला तर सोडा- श्वास घ्यायलाही जागा नसते.

गावाकडची मुलं दणादण उड्या मारतात- शहरातल्या मुलांना जिन्याच्या दोन पायऱ्या सोडून उडी मारायला पालक "नको रे राजा लागेल तुला' म्हणत मुरड घालतात. गावाकडच्या मुलांना खेळताना लागलं, खरचटलं तर ती सहजी सहन करतात. घरगुती उपाय करून पुढं सरकतात. शहरातल्या मुलांना खेळताना चुकून लागलं, तर त्यांच्या आया "कोणामुळं माझ्या बंडूला लागलं' हे विचारत भांडायला येतात. गावाकडच्या मुलांना पालक एकच वेळी दहा गोष्टी करायला लावत नाहीत. शहरातले काही पालक आपल्या पूर्ण न झालेल्या अपेक्षा मुलांकडून पूर्ण करून घ्यायचा वेडा अट्टाहास करतात. मग असे पालक मुलांना एकाच वेळी खूप अभ्यास करून घ्यायला शाळा सोडून क्‍लास लावतात आणि त्याबरोबर तबला, पियानोपासून ते चित्रकला, गायन यांचेही क्‍लास लावतात. असे पालक मुलांना काय आवडतं आहे, याचा विचार करतच नाहीत. फक्त आपले विचार लादतात.

यात सर्वांत घातक गोष्ट अशी आहे, की शहरातले बरेच पालक मुलांकरता इतकं काही करायला जातात, की त्यांना कोणत्याही संकटांचा सामनाच करायला लागणार नाही, याकरता धडपडतात. वाढत्या वयात संकटांना समस्यांना सामोरं जायला लागलं नाही, तर त्या मुला-मुलींचं व्यक्तिमत्त्व घडणार तरी कसं? कारण संकटातून मार्ग काढण्याची कला त्यांना शिकवणार कोण? दडपणात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायचं कसब त्यांच्यात येणार कसं? स्वत:च्याच यशात मनस्वी आनंद न मानणारे हे लोक मग दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिकणार कसे?
वर मांडलेल्या जटिल समस्यांवर मार्ग दाखवणारे उपाय क्रीडाविश्‍वात आहेत. जगातल्या अस्थिरतेच्या वातावरणात "जगा आणि जगू द्या' ही घोषणा जशी सर्वश्रुत झाली, तशीच आधुनिक धकाधकीच्या वातावरणात मन रमवायला, निरोगी राहायला, "सांघिक' माणूस बनायला "खेळा आणि खेळू द्या' ही घोषणा गरजेची झाली आहे. हिमा दास आणि स्वप्ना बर्मनच्या संघर्षमय कहाणीतून आपण खरंच बरंच काही शिकायला हवं, असं नाही का वाटत तुम्हाला?

स्वप्ना बर्मन आणि हिमा दास (उजवीकडील) या दोघींनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये स्वतःच्या क्षमतेची चुणूक दाखवून दिली आणि एक प्रेरणाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com