प्रेरक 'सिक्‍सर किंग' (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात करण्यापासून पुन्हा मैदानावर येण्याची जिगर दाखवण्यापर्यंत त्याचं सगळं आयुष्यच प्रेरणादायी आहे. युवराजसिंगच्या या सगळ्या प्रवासाचा धांडोळा.

'बेटा उठ. भागने जाना है...'' एक वडील आपल्या बारा वर्षांच्या मुलाला उठवत होते. चंडीगडला कडाक्‍याची म्हणजे सात डिग्री सेल्सिअसची थंडी पडलेली असताना कोण लहान मुलगा पळायला जायला उत्साहानं उठेल?
'बेटा उठ जल्दी. भागने जाना है...देर मत कर...'' वडील परत कडाडले.
...नंतर पाच मिनिटांनी योगराजसिंग येतात ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेला पाण्याचा जार हाती घेऊनच. ते चक्क गाढ झोपलेल्या मुलाच्या डोक्‍यावर त्यातलं सर्व पाणी ओततात. कडाक्‍याच्या थंडीत कोणाचे वडील 10-12 वर्षाच्या लहान मुलाला पळायला जायला अशा निर्दयी प्रकारे उठवतील मला कळत नाही.
झोप तर उडतेच- वर कडाक्‍याची थंडी त्या लहान मुलाच्या अंगात घुसते. काकडत तो मुलगा उभा राहतो.
'चल, कपडे बदल. भागने जाना है!'' वडील फर्मान सोडतात. मुलगा तिरमिरीत कपडे बदलतो. मुलगा पळत असताना मागं वडील स्कूटरवरून येत असतात. पाच किलोमीटर पळणं झाल्यावरच मुलाची वडिलांच्या तावडीतून सुटका होते. हे सगळे का, तर वडिलांना आपलं एक अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचं असतं. भारताकरता खेळून मैदान गाजवायचं स्वप्न.
...ही कहाणी दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून युवराजसिंगची आहे.

तयारी का छळ?
योगराजसिंग स्वत: कपिल देवच्या काळातले तगडे वेगवान गोलंदाज होते. सन 1980-81 च्या ऑस्ट्रेलिया-न्यूझिलंड दौऱ्याकरता योगराजसिंग यांची अचानक निवड झाली होती. ते एकमेव कसोटी सामना खेळले- ज्यात त्यांना एकच बळी मिळाला. त्यानंतर ना ते भारताकरता परत खेळले, ना त्यांनी नंतर प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये चांगलं खेळून पुनरागमनाचा खास प्रयत्न केला. तीच आग त्यांच्या मनात धुमसत होती.
योगराजसिंग यांचं लग्न झालं आणि त्यांना दोन मुलगे झाले. त्यातला मोठा मुलगा म्हणजे युवराजसिंग. योगराज यांनी मनाशी खूणगाठ बांधली, की कसंही करून युवराजला चांगला क्रिकेटपटू बनवायचं- इतका चांगला, की त्यानं भारताकरता वर्षानुवर्षं खेळावं. आपल्या हातून जे स्वप्न साकारलं गेलं नाही, ते मुलाकडून पूर्ण करून घेण्याचा योगराज यांनी ध्यास घेतला.
योगराज यांनी घराच्या मागच्या आवारात चक्क सिमेंटचं विकेट बनवून घेतलं होतं. मुलाला मैदानावर नेऊन क्रिकेटचं प्रशिक्षण देण्यासोबत वेळ मिळेल तेव्हा अगदी कधीही योगराज युवराजला पॅड बांधायला लावायचे आणि बराच काळ फलंदाजी करायला लावायचे. सगळे दमूनभागून झोपायची तयारी करायला लागले, की सरावाचा असा प्रकार रात्री 11 वाजतासुद्धा चालू व्हायचा. लहानगा युवराज थकून जायचा. ही जुलमाची शिकवणी युवराजला नकोशी व्हायला लागली होती.
युवराज थोडा मोठा झाला, तसा लेदर चेंडूनं सराव सुरू झाला. प्रचंड वेगानं योगराज युवराजला चेंडू टाकायचे. "हेल्मेट घालू का?' असं विचारलं, तर 'विवियन रिचर्डस्‌ घालतात का हेल्मेट? नाही ना? मग तूसुद्धा नाही घालायचं,'' असं योगराज म्हणायचे. युवराजला तेव्हा विवियन रिचर्डस्‌ कोण होते हेसुद्धा कळत नव्हतं, इतका तो लहान होता.
योगराज यांनी केलेला हा अट्टाहास सराव होता का छळ हे युवराजला समजलं नाही. वडिलांनी ज्या प्रकारे युवराजची तयारी करून घेतली, त्यावर बोलताना युवराज म्हणतो : 'मैं क्रिकेट से नफरत करने लगा था...लेकिन दुसरा कुछ आता भी तो नहीं था!''
लहानपणी मुलं जेव्हा सवंगड्यांसमवेत धमाल करायची, तो नाजूक काळ युवराजनं क्रिकेट सरावात घालवला. त्याचा एक चांगला परिणाम असा झाला, की युवराजचं पारडं अगदी लहान वयापासून त्याच्या वयोगटातल्या मुलांपेक्षा जड व्हायला लागलं. युवराज 14 वर्षांचा झाला असतानाच त्याला सोळा वर्षांखालच्या पंजाबच्या संघात घेतलं गेलं. नंतर त्याच्याकरता 19 वर्षांखालच्या संघाचे दरवाजेही खूप लवकर उघडले. वयोगटातल्या क्रिकेटमध्ये युवराजसिंगचा काय दबदबा होता, हे महेंद्रसिंह धोनीनं आपल्या सिनेमात दाखवलं आहे.

जीवनाला कलाटणी
वर्ष 2000 युवराजच्या क्रिकेट जीवनाला कलाटणी देणारं ठरलं. एकीकडे त्याच्या पालकांच्यात मतभेद होऊन गोष्ट वेगळं राहण्यापर्यंत गेली. विश्वकरंडक स्पर्धेत भाग घ्यायला जाणाऱ्या 19 वर्षांखालच्या भारतीय संघात युवराजची वर्णी लागली. युवराजनं ती स्पर्धा सर्वांगीण खेळानं दणाणून सोडत स्पर्धेच्या मानकऱ्याचं बक्षीस पटकावलं.
भारतीय संघ तेव्हा कात टाकत होता. नव्या ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्याच्या मानसिकतेत होता. सन 2000 मध्ये पहिली चॅंपिअन्स ट्रॉफी स्पर्धा आयसीसीनं भरवली. त्या स्पर्धेकरता युवराजसिंगला थेट भारतीय संघात घेतलं गेलं. युवराजनं विश्वास सार्थ ठरवत ऑस्ट्रेलियासमोर 84 धावांची तगडी खेळी पेश केली आणि गुणवत्ता सिद्ध केली.

सौरवचा विश्‍वास
जबरदस्त पदार्पणानंतर युवराजला मोठं यश मिळवायला मात्र चांगलाच वेळ लागला. अखेर सन 2002 मध्ये लॉंर्डस्‌ मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात युवराजनं संघ अडचणीत असताना 69 धावांची खेळी करून सामना भारताकडे खेचला- ज्याला अंतिम रूप मोहंमद कैफनं दिलं. त्या सामन्यातल्या विजयानं युवराज- कैफचं एकदिवसीय संघातलं स्थान मजबूत झालं. सौरव गांगुलीनं युवराजसिंग, हरभजनसिंग, झहीर खान, वीरेंद्र सेहवाग या खेळाडूंना खूप भक्कम पाठिंबा दिला. त्यांना मनमोकळा खेळ करायला प्रोत्साहन दिलं. सौरव कर्णधार असल्यानं कधीतरी तो युवराजची फिरकीही घ्यायचा. एकदा त्यानं युवराजला "तू सलामीला फलंदाजीला जाणार आहेस,' असं सांगून रात्रभर विचार करत बसायला लावलं आणि सकाळी "गंमत केली' म्हणून सांगितलं. श्रीलंका दौऱ्यादरम्यान त्याच फिरकीचा वचपा काढताना युवराजनं हरभजनसिंगचे केस मोकळे सोडून त्याला भुताचा ड्रेस घालून सौरव गांगुलीला जाम घाबरवलं होतं.

विश्‍वकरंडकाचं सुख-दु:ख
युवराजसिंगकरता विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे सुख-दु:खाच्या लहरींसारखंच झालं. सन 2003 च्या विश्वकरंडक मोहिमेत प्रशिक्षक जॉन राईट यांनी युवराज आणि कैफला फिल्डिंगचे कर्णधार बनवले होते. संघाची फिल्डिंग कशी धारधार होईल याची जबाबदारी युवराज- कैफनं स्वीकारून संघातल्या ज्येष्ठ खेळाडूंनाही वेळप्रसंगी दटावलं होतं. संघ आता युवराजकडे भरवशाचा खेळाडू म्हणून बघायला लागला होता.
सन 2003 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघानं सुरवातीला गेलेला तोल सावरून नंतर विजयाची लय पकडली होती. पाकिस्तानसमोरच्या सामन्यात सगळ्यांना सचिनची भन्नाट खेळी स्मरणात राहिली; पण त्याच सामन्यात फिनिशिंग टच राहुल द्रविडसोबत युवराजनं दिला होता. युवराजनं नाबाद अर्धशतक केलं होतं त्या महत्त्वाच्या सामन्यात.

जे सुख 2003 च्या विश्‍वकरंडकानं युवराजला दिलं, त्याच्या दसपट दु:ख 2007च्या विश्‍वकरंडकानं दिलं. भारतीय संघ साखळीतल्या बांगलादेश आणि श्रीलंकेसमोरचे सामने हरल्यानं खालमानेनं संघाला मायदेशात परतावं लागलं. अर्थात ज्या 2007 नं भारतीय क्रिकेट जगताला निराशेच्या खाईत लोटलं, त्याच 2007 वर्षानं त्याच भारतीय क्रिकेट जगताला पहिल्या टी-20 विश्‍वकरंडकाचं विजेतेपदही बहाल केलं. युवराजनं स्टुअर्ट ब्रॉडला मारलेल्या सलग सहा षटकांची चर्चा आजही होते. भारतानं पहिला टी-20 विश्‍वकरंडक जिंकून धमाल उडवली. युवराजचा यशात सिंहाचा वाटा होता.

सचिनशी खास नातं
युवराज आणि सचिनचं खास नातं आहे. कितीही प्रयत्न करूनही दोघांनाही नाव देता येत नाही असं नातं. हरभजनसिंग म्हणतो : 'भारतीय संघात आलो तेव्हा आम्ही फारच गावठी होतो. सचिनपाजींनी आम्हाला क्रिकेटबरोबर बऱ्याच गोष्टी शिकवल्या. अगदी सुरवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफलातून कामगिरी केल्यावर सचिनपाजींनी मला "तुला काय पाहिजे बोल,' असं विचारलं, तेव्हा वेड्यासारखे मी फक्त बोलिंग करायचे चांगले शूज मागितले होते...'' विश्‍वकरंडक स्पर्धेच्या वार्तांकनाकरता इंग्लंडला आलेला हरभजनसिंग डोक्‍याला हात लावत सांगत होता.
युवराजची एक कहाणी सांगताना हरभजन म्हणाला : 'एकदा सचिनपाजींनी मला आणि युवराजला जपानी जेवण करायला नेलं. जपानी जेवणात मोमोज खाताना त्याला "वसाबी' नावाचा सॉस लावतात. युवराज नुसता त्या सॉसकडे बघतोय, हे जाणून पाजींनी युवराजला गुगली टाकला. "युवी, खाया है क्‍या ये सॉस?' असं त्यांनी विचारलं. "पंजाबमें बहोत मशहूर हैं ये सॉस पाजी...हम लोग बहोत खाते है,' असं म्हणत युवराजनं टोमॅटो सॉस लावतात तसा वसाबी सॉस लावला. प्रत्यक्षात वसाबी सॉस अत्यंत जहाल असतो. अगदी कणभर लावला तरी पुरतो. युवराज काय करतो आहे, हे बघून सचिननं अखेर त्याला थांबवलं आणि मग आम्ही दोघं हसत बसलो. "इतना वसाबी सॉस एक साथ खायेगा तो टेल लॅंप लग जायेगा,' असं सचिन पाजी हसतहसत म्हणाले. मग युवराजनं आयुष्यात वसाबी सॉस बघितलासुद्धा नसल्याची कबुली दिली.'' अशी ही युवराजच्या भोळेपणाची कहाणी.

अंतिम ध्येय
सन 2011च्या विश्‍वकरंडक स्पर्धेअगोदर भारतीय संघ दौऱ्यावर गेलेला असताना सचिननं युवराजला आपल्या खोलीत बोलावून विचारलं : 'तू तयार आहेस ना?''
युवराज म्हणाला : 'कशाकरता?''
'अर्थात विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी.''
'होय म्हणजे काय? तयार आहेच!''
'तसं नाही मला म्हणायचं. येणारा विश्‍वकरंडक तुझा असणार आहे. क्रिकेट तुला खास काहीतरी द्यायला येणार आहे. मला वाटतं, युवराज येणाऱ्या विश्‍वकरंडकाचा स्टार असेल...तू तयार आहेस ना?'' सचिननं विचारलं.
युवराजला सचिनच्या बोलण्यातली खोली उमगली नाही; पण ऐकून तो हैराण झाला. त्यानं नुसती मान हलवली.
युवराजबद्दल बोलताना महेंद्रसिंह धोनी म्हणाला : 'सन 2011 चा विश्‍वकरंडक सुरू होत असताना युवराज चांगल्या लयीत दिसत होता. मला चिंता होती तो पहिल्या काही सामन्यात कसा खेळतो याची. कारण एकदा का सुरवातीला युवराजला लय सापडली, की मग तो एक-दोन सामने नाही, तर संपूर्ण स्पर्धेत धमाल करतो हे मी सन 2007च्या टी-20 विश्‍वकरंडकामध्ये बघितलं होतं. एकदा का युवीच्या सुरवातीला धावा झाल्या, की मग मी त्याला गोलंदाजीही द्यायला मागंपुढं बघत नव्हतो. युवराजनं बॅट आणि बॉल दोनही प्रकारात अफलातून कामगिरी केली. अगदी अंतिम सामन्यात विजयी धावा काढताना माझी आणि युवराजची भागिदारी झाली होती...''

...आणि स्वप्नपूर्ती
विश्‍वकरंडक जिंकायचं स्वप्न साकारण्याच्या ध्येयानं भारतीय संघ पछाडला होता. प्रत्येक सामन्यात युवराज संघाच्या यशात वाटा उचलत होता. उपांत्यपूर्व सामन्यात युवराजनं ऑस्ट्रेलियाला आडवं करताना अप्रतिम खेळी केली. त्या खेळीदरम्यान युवराजला श्वास घेताना त्रास झाला. इतकंच नाही, तर कोरड्या उलट्या झाल्या. तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून तपासणी करून घेता वरकरणी दिसणारा खोकला जरा जास्त गंभीर रूप धारण करत होता.
उपांत्य सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारतीय संघ मुंबईच्या वानखेडे मैदानावर अंतिम सामन्याकरता दाखल झाला. श्रीलंकेनं कष्ट करून उभारलेल्या धावांचा यशस्वी पाठलाग करताना गौतम गंभीर, धोनी आणि युवराजनं मस्त फलंदाजी केली. विश्वविजेतेपदाचं स्वप्न अखेर साकारलं गेलं होतं. संपूर्ण भारतीय संघ आनंदानं रडला होता. युवराजनं संपूर्ण स्पर्धेत मिळून चार अर्धशतकं केली, एक शतक ठोकलं, वर उत्तम गोलंदाजी करताना 15 फलंदाजांना बाद केलं. अर्थातच स्पर्धेचा मानकरी युवराज ठरला.

आयुष्य धोक्‍यात
सन 2011 चा विश्‍वकरंडक सुरू असताना सुरवातीला जो खोकला सुरू झाला, त्यानं युवराजचा पिच्छा सोडला नाही. औषधं घेतली, तरी खोकला वाढतच गेला. विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर खरी सखोल तपासणी झाली, तेव्हा युवराजच्या फुफ्फुसात मोठा ट्युमर असल्याचं दिसून आलं. भयानक गोष्ट म्हणजे तो ट्युमर साधा नव्हता, तो कॅन्सर होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं युवराजला सर्वतोपरी साह्य केलं. अमेरिकेत युवराजवर उपचार झाले. केमोथेरपीच्या कठीण उपचारातून युवराजचा आजार जणू जाळला गेला.
झाल्या प्रसंगानं खचून जाईल तो युवराज कसला? त्यानं प्रेरणा घेत सन 2012 मध्ये "युवीकॅन' फौंडेशनची स्थापना केली. युवीकॅन फौंडेशन कॅन्सर संदर्भातलं जनजागरण करतं आणि कॅन्सरची पूर्वचाचणी करायला लोकांना मदत करतं. आत्तापर्यंत लाखो रुपयांची देणगी जमा करून हजारो लोकांना युवीकॅन फौंडेशननं कॅन्सर उपचारांकरता मदत केली आहे.
कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी लढत देऊन पूर्ण बऱ्या झालेल्या युवराजनं जिद्दीनं भारतीय संघात पुनरागमनही केलं. दुर्दैवानं यशाची जुनी शिखरं युवराजला पुनरागमनाच्या प्रयत्नात पादाक्रांत करता आली नाहीत. अखेर 10 जून 2019ला युवराजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पुढची दोन वर्षं जगातल्या बाकी काही टी-20 स्पर्धांत सहभागी होण्याचा युवराजचा मानस आहे.
निवृत्तीनंतर बोलताना युवराज म्हणाला : 'सोचा था उससे बहोत ज्यादा मिला मुझे. इसी लिये मै क्रिकेटका शुक्रगुजार हूँ. और एक-दो साल थोडा अलग क्रिकेट खेलना है और युवीकॅन फौंडेशनका काम जोर से करना है. बहोत ही मजेदार जर्नी रहीं है क्रिकेटकी जिसने मुझे सब रंग करीबसे दिखाये है!''

क्रिकेटपटू म्हणून युवराज खास आहेच, तसा माणूस म्हणूनही अजब रसायन आहे. सामाजिक कार्याला मदत करताना लाडकी बॅट किंवा ग्लोव्हज्‌ सहजी हाती देणारा युवराज अनुभवायला मिळाला. एक मजेदार किस्सा सांगतो. पुण्यात एकदिवसीय सामना खेळायला आलेल्या युवराजला त्याच्या आईनं शनिवारी शनीच्या मंदिरात जायला सांगितलं. मी पुण्याचा असल्यानं युवराजनं मला फोन केला. त्यानं मला आईनं बरोबर न्यायला सांगितलेल्या शिध्याची यादी सांगितली. भारतीय संघ त्यावेळी हिंजवडीच्या मॅरीएट हॉटेलात राहायला होता. म्हणून मी पुणे-मुंबई रस्त्यावर इंदिरा इन्स्टिट्यूटच्या पुढ्यात एक छोटं शनीमंदिर आहे तिथं घेऊन गेलो. मंदिरात अचानक युवराजसिंगसारखा स्टार आलेला बघून पळापळ झाली. मी बरोबर नेलेला शिधा युवराजनं शनीला वाहिला. नंतर तिथं बसलेल्या गरीब आजी-आजोबांना शाली केवळ दिल्या नाहीत तर पांघरल्या आणि हाताला येतील त्या नोटा दिल्या- ज्यातल्या काही नोटा हजार रुपयांच्या होत्या, तर काही पाचशे रुपयांच्या.
दर्शन घेऊन हॉटेलात परत आल्यावर युवराज म्हणाला : 'भाई शिधा के पैसे कितने हुए?''
मी म्हणालो : 'कमऑन युवी छोड दे यार.''
'मां चिल्लायेगी मुझे...शिधाके पैसे मुझे देनेको बोला है...कितने हुए बोलो आप?'' आईची आज्ञा पाळणारा युवराज म्हणाला.
मी सांगितलं : '35 रुपये.''
मग युवराजनं खिशात हात घातला, तर एकही पैसा नव्हता.
'आप क्रिकेटर ऐसेही करते हो...पैसा लेना पता है...देना नहीं...'' मी संधी साधून पुणेरी टोमणा मारला.
'आप भी ना भाई,'' हसतहसत युवराजनं मिठी मारली.
या सगळ्या आठवणी जागवताना मला वाटतं, तो मैदानावर युवराज होता आणि मैदानाबाहेर "महाराज' आहे. तरीही युवराज अजून माझे 35 रुपये तू देणं बाकी आहेस हं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com