esakal | दैवताची पूजा त्याची तत्त्वं जगून...

बोलून बातमी शोधा

Tendalya Movie Shooting
दैवताची पूजा त्याची तत्त्वं जगून...
sakal_logo
By
सुनंदन लेले saptrang@esakal.com

ही कहाणी फार थराराक आहे, होय एखाद्या चित्रपटासारखीच. पुण्यात असतो तेव्हा मी मित्रांना भेटायला फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या वाडेश्‍वर हॉटेलात संध्याकाळी जात असतो. बऱ्‍याच लोकांना माझा हा संध्याकाळचा अड्डा असल्याचे समजल्यापासून भेटायचे असेल तर मला इथे पकडता येता हे कळले होते. एक दिवस संध्याकाळी मला अशीच दोन मुले भेटायला आली. अंगापिंडाने मजबूत, पण पेहरावाने अत्यंत साध्या कपड्यात ते दोघे होते. त्यांच्या हातात मोठे बाड होते. मला वाटले पुस्तक किंवा लेख असेच काहीतरी त्यांना दाखवायचे असेल. दोन वेळा मी त्यांना आज वेळ नाही सांगून कटवले होते. पण त्यांनी पिच्छा सोडला नाही. पुढची वेळ घेऊन ते ठरल्या वेळेवर पुन्हा हजर झाले, तेव्हा त्यांना टाळणे कठीण गेले. मग मी वेळ काढून त्यांना भेटलो आणि त्यांनी त्यांचा काय प्रकल्प आहे ते सांगितले, तेव्हा मी अवाक झालो. त्यांच्या हातात कागदांचे जाडजूड बाड होते, ती एका चित्रपटाची कथा होती. माझ्याकडे येण्याचे कारण होतं की चित्रपटाच्या कथेचा विषय होता क्रिकेटप्रेमाचा. मग काय आवडीचा विषय असल्याने मी मनाने त्या प्रकल्पात अडकलो आणि सचिन जाधव - चैतन्य काळेच्या जोडीला बऱ्‍याच वेळा भेटू लागलो.

चित्रपटाच्या नावातच जादू

चित्रपटाचा विषय सांगत असतानाच, मला पटकथा लिहिलेल्या सचिन जाधवनं नाव सांगितले, ज्यानं मी हैराण झालो; कारण त्यांनी पहिल्यापासून नाव ठेवले होते ‘तेंडल्या’. सचिन तेंडुलकरला शारदाश्रम शाळेच्या संघातील सहकारी ‘तेंडल्या’ नावाने प्रेमाने बोलावतात. आमच्या चित्रपटाचे नाव ‘तेंडल्या’ म्हणजे सचिन तेंडुलकरला जोडणारे असेल आणि तसे म्हणायला गेले तर चित्रपटाचा आत्मा सचिन असला, तरी हा चित्रपट सचिनवर आधारित नाहीये, सचिन जाधवने पहिल्याच भेटीत स्पष्ट केले.

आमचा विषय क्रिकेटचा असल्याने कथेत मूलभूत चुका नसाव्यात म्हणून तुमचे मार्गदर्शन हवे, सचिन आणि चैतन्य काळे म्हणाले. मग मला समजले की कथा गावाकडच्या क्रिकेटप्रेमाची आहे. संभाव्य चित्रपटाच्या नावात जादू होती म्हणून २०१५ मध्ये आमच्यातल्या भेटीगाठी वाढत गेल्या.

चित्रपट मग तो मराठी जरी असला, तरी त्याची किती सखोल तयारी असते. चार- सहा वेळा कथा परत परत लिहावी लागते. मग त्यातून पटकथा तयार करावी लागते. त्याला खटकेबाज संवादांची जोड द्यावी लागते. हे सर्व टप्प्याटप्प्याने तयार केले, की अभिनय करायला पात्रं शोधावी लागतात. त्याला जोडून चित्रीकरण करायच्या जागा त्याची काळ, वेळ ठरवावी लागते. नाटकाची करतात तशी तालीम करून घ्यावी लागते. सगळी तयारी करून झाली, की प्रत्यक्ष चित्रीकरणाकरिता कॅमेरापासून ते लाइट्‌सपर्यंत सगळी जमवाजमव करावी लागते. चित्रिकऱणाच्या वेळापत्रकाची आखणी करावी लागते आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागते. आणि सर्वात शेवटचा भाग म्हणजे या सगळ्याकरिता अमाप पैसा हातात लागतो. चित्रपटाचे लेखन करणारा सचिन जाधव, निर्मिती प्रमुख चैतन्य काळे आणि दिग्दर्शक नचिकेत वाईकर आर्थिकदृष्ट्या अत्यंत साध्या घरातून आलेली मुले. इतकेच काय कॅमेऱ्‍यामागे उभे राहणारे चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक हे तर सोडाच, पण या चित्रपटातले यच्चयावत सगळे कलाकार कॅमेऱ्‍यासमोर पहिल्यांदाच उभे राहणार होते. त्यावरची कडी म्हणजे सगळे सांगली जवळच्या इस्लामपूर गावातील रहिवासी. म्हणजे त्यांना या चमकधमक अशा दुनियेचा काहीच अनुभव नाही.

मला या पोरांच्या हिमतीची दाद द्यावीशी वाटली; कारण स्वप्न साकारायला त्यांनी स्वत:चे घर नुसते गहाण नाही टाकले नाही, तर नातेवाईक मित्रं मंडळींकडून कर्ज घेतले. चित्रपटाचे दोन नायक आहेत. एक तरुण नायक आहे जो आपले क्रिकेटप्रेम जपायला आणि स्वत:च्या टीव्हीवर सामना बघायचा या जिद्दीला पेटतो. दुसरा शाळकरी नायक गावातील खुन्नसचा सामना जिंकायला मन कसे खंबीर करतो, गावाकडे लोक क्रिकेटवर किती मनापासून प्रेम करतात हे सांगणारी आणि दोन समांतर रुळांवरून जाणारी अशी ही कहाणी होती. सचिन जाधव आणि चैतन्य काळे या दोघांनी मिळून चित्रपट तयार करायला लागणारा पैसे जमा करून अत्यंत मेहनतीने चित्रपट पूर्ण केला.

चित्रपट तयार करणे आणि त्याचे वितरण करून जाहिरातीचा गाजावाजा करून तो चित्रपटगृहांमधून प्रदर्शित करणे ही दोन भिन्न कामे आहेत. मग सचिन जाधव - चैतन्य काळेने त्याची शोधाशोध करून त्या क्षेत्रातील प्रतिथयश कंपन्यांना चित्रपट दाखवला. चित्रपट अर्थातच आवडला आणि ‘झी सिनेमा’ ने तो वितरण आणि प्रदर्शित करायची प्राथमिक तयारी दाखवली. दरम्यानच्या काळात हा चित्रपट राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांकरिता पाठवला गेला. ‘तेंडल्या’ चित्रपटाला पाच राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. २०२० हे वर्ष सुरू झाल्यावर २४ एप्रिल रोजी सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला नेमका शुक्रवार असल्याने त्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करायचा अशी बोलणी व सगळी तयारी चालू झाली. आणि नेमके कोरोना महामारीचे संकट जगावर पसरले.

हातातोंडाशी आलेला घास दूर गेला. घरदार गहाण ठेवून सगेसोयऱ्‍यांकडून कर्ज घेऊन तयार केलेला प्रकल्प, कोणाचा काहीही दोष नसताना अडकला आणि सचिन जाधव - चैतन्य काळे आर्थिक अडचणीत सापडले. याबाबत बोलताना सचिन - चैतन्य म्हणतात, की गेल्या एका वर्षापेक्षा जास्त संकटातून बाहेर पडायला काही मार्ग दिसत नसल्याने निराशा मनात डोकावायला लागली. एकीकडे खासगी कर्ज घेतले, ते लोक स्वत: आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना पैशाचा गरज होती. तेव्हा त्यातील निदान काही पैसे देणे गरजेचे होते. दुसऱ्‍या बाजूला बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरायची गरज होती. जर चित्रपट प्रदर्शित झाला असता तर पहिल्या चित्रपटाबद्दल सरकारकडून मिळणारे अनुदान हाती लागले असते आणि वितरण कंपनीच्या करारातून जी सुरुवातीची रक्कम हाती आली असती त्यातून सर्व कर्ज दूर करता आले असते. झाल्या परिस्थितीला दोष कोणाचाच नाहीये, पण आम्ही मेटाकुटीला आलो आहोत.

सचिनकडून काय शिकलो

हार मानणाऱ्‍यातील सचिन जाधव नाहीये. त्याने ‘तेंडल्या’ सिनेमात काम केलेल्या ६ शाळकरी मुलांना हाताशी धरून बत्तीस शिराळा भागात काही एकर शेत जमीन भाड्याने घेऊन त्यावर कष्ट करणे चालू केले. सगळे मिळून काबाडकष्ट करून शेतात कल्पकतेने भाजीपाला पिकवत आहेत. सचिन जाधव म्हणतो, चित्रपटाची कथा लिहिताना सचिन तेंडुलकर अडचणीतून मार्ग कसा काढतो आणि कठीण काळात हार न मानता कष्ट करून परिस्थितीवर मात कसा करतो हे अभ्यासले होते. आम्हाला त्याचाच उपयोग करावासा वाटला. वातावरण खराब असेल, समोरचा गोलंदाज टिच्चून मारा करत असेल आणि मनासारखी फलंदाजी जमत नसेल तरी विकेटवर खंबीर उभे राहणे महत्त्वाचे असते हेच सचिनला बघताना आम्ही शिकत आलो आहोत. सचिनचे चाहते म्हणून नुसतेच मिरवणे बरोबर नाही. त्याच्या शिकवणीचा वापर करून लढत देणे जमले पाहिजे हा विचार करून आम्ही लढाई करत आहोत. यश मिळेल का नाही माहीत नाही, पण विकेटवर खंबीर उभे आहोत. क्रिकेटवर आम्ही मनापासून प्रेम केले. मग प्यार किया तो डरना क्या, सचिन हसत हसत म्हणतो.

कोरोनाचे संकट कधी दूर होणार... वातावरण चांगले कधी होणार... चित्रपटगृहे कधी चालू होणार आणि गावाकडच्या क्रिकेटप्रेमावर आधारित चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे फक्त क्रिकेट देवाला माहीत. एक नक्की आहे, ते म्हणजे काही लोक असेही आहेत जे सचिन तेंडुलकरवर नुसते प्रेम करत नाहीत, तर त्याने दाखवून दिलेल्या कष्टाच्या ध्येयासक्तीच्या मार्गावरून चालत राहतात.