त्यांनाच कळाला खरा सचिन!

चित्रपट काढायचा आहे त्यात तुमचे मार्गदर्शन आणि मदत पाहिजे वेळ द्या ना आम्हांला, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरची तीन पोरं बहुतेक २०१६ मध्ये अशीच मला भेटण्यासाठी पुण्यात आली होती.
Tendalya Movie
Tendalya MovieSakal
Summary

चित्रपट काढायचा आहे त्यात तुमचे मार्गदर्शन आणि मदत पाहिजे वेळ द्या ना आम्हांला, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरची तीन पोरं बहुतेक २०१६ मध्ये अशीच मला भेटण्यासाठी पुण्यात आली होती.

चित्रपट काढायचा आहे त्यात तुमचे मार्गदर्शन आणि मदत पाहिजे वेळ द्या ना आम्हांला, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरची तीन पोरं बहुतेक २०१६ मध्ये अशीच मला भेटण्यासाठी पुण्यात आली होती.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील वाडेश्वर उपहारगृहात संध्याकाळी आम्हां मित्रांचा अड्डा जमतो. विविध व्यवसाय करणारे आम्ही मित्र ज्याला जमेल तसे संध्याकाळी चहा प्यायला गप्पा मारायला जमतो. पुण्यात असताना मी येथे असतो याची कल्पना बर्‍याच लोकांना झाली होती. मग क्रिकेट संदर्भातील विविध कामे घेऊन बरेच लोक तिकडे यायला लागले. त्यातच ही पोरे होती, दिसायला एकदम साधी गावाकडची.

बोलण्यातला हेल कोल्हापुरीपेक्षा किंचित वेगळा. बरेच लोक उगाच नको ती कामं सांगतात तेव्हा कटकट होते. त्यातून चित्रपट काढायचा विषय आहे हे लक्षात आल्यावर, ‘मुलांनो मला त्या प्रांतातील काहीच कल्पना तसेच ज्ञान नाही’ असे सांगत दोन तीन वेळा मी त्यांना कटवले. काही थातूर मातूर कारणे देऊन नंतर यायला सांगितले. पण पोरे महा जिद्दी माझा पिच्छा त्यांनी सोडला नाही. त्यातील एक मुलगा सचिन जाधव मला काकुळतीला येऊन म्हणाला, अहो चित्रपटाचा विषय क्रिकेट आणि थोडासा सचिन तेंडुलकरांचा आहे म्हणून तुम्हांला त्रास देतोय.

चित्रपटाचा विषय जिव्हाळ्याचा म्हणल्यावर मी गुंतलो. त्या मुलांकडून त्या चित्रपटाची कथा ऐकली. कथा सत्य घटनांवर आधारीत होती. सचिन जाधवने सांगली जिल्ह्यातील शिराळा भागातील औंढी नावाच्या गावी स्वत: अनुभवलेली ती कथा होती. जेव्हा कथेचा मूळ नाव त्यांनी ‘तेंडल्या’ असल्याचे सांगितले तेव्हा मी जरा उडालो. गावाकडची लोकं क्रिकेटवर प्रेम कशी करतात आणि सचिन तेंडुलकरकडे नुसते खेळाडू म्हणून नव्हे तर प्रेरणेचा स्त्रोत म्हणून कसे बघतात अशी ती दुहेरी ट्रॅक कथा होती.

त्यानंतर त्या मुलांमध्ये कष्टाची तयारी आणि खरी ओढ आहे का नाही तपासायला वेळ घेतला. दरवेळी सचिन जाधव दिल्या वेळेला हजर असायचा. मग मला खात्री पटू लागली. कथेतील काही चुका निदर्शनास आणून मी त्यांना पटकथा तयार करायला सांगितली. त्यानंतर एका वर्षापेक्षा जास्त काळ सचिन जाधवने पटकथा लिहून तयार करण्यात घालवला कारण २-४ वेळा ती पटकथा लिहून त्यातली धार वाढवावी लागते. ते सर्व सोपस्कार करून सचिन जाधव, नचिकेत वाईकर आणि चैतन्य काळे मला परत परत भेटले. माझा कथेतील रस वाढू लागला आणि आमच्यातील बैठकांमध्ये सगळ्यालाच एक रूप येऊ लागले.

नंतरची गोष्ट सर्वांत कठीण होती कारण सिनेमा तयार करायचा ना अनुभव तिघांकडे होता ना आर्थिक पाठबळ. शहरातील कोणीही पालक करणार नाही ते धाडस तो विश्वास सचिन जाधवच्या वडिलांनी दाखवला. औंढी गावी शिक्षक म्हणून बरीच वर्ष काम केल्यावर निवृत्त झालेल्या सचिन जाधवच्या वडिलांनी चक्कं पेन्शन फंडाचे जमा झालेले पैसे एक रकमी सचिनच्या हाती दिले. चैतन्य काळेने घरातील दागिने गहाण ठेवले आणि कर्ज घेतले. नचिकेत वाईकरने त्याची जमा असलेली पुंजी चित्रपट बनवायला ओतली. बाकीच्या मित्रांकडून कर्ज घेऊन तिघांनी मिळून चित्रपट तयार करायचं स्वप्न नेटानं जपले. चित्रपटासाठी एकही सेट वापरायचा नाही आणि शूटिंग चालू असतानाचा आवाज रेकॉर्ड करून वापरायचा घाट घातला. अनुभव नसल्याने अनेक अडचणींना तोंड देत चित्रपटाचं शूटिंग संपवलं.

पैशाची चणचण असूनही तांत्रिक गोष्टीत अजिबात तडजोड न करता चित्रपट तयार केला. सचिन तेंडुलकरने चित्रपट बघितला आणि गावाकडच्या लोकांचे प्रेम बघून तो भारावून गेला. २०१८ मध्ये राज्याचे तब्बल पाच पुरस्कार ‘तेंडल्या’ सिनेमाला मिळाले. इतकेच नाही तर लाईव्ह रेकॉर्डिंगचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मग सिनेमा कोण प्रदर्शित करेल म्हणून विविध चॅनल्स आणि सिनेमा दिग्गजांना भेटणे चालू केले. सिनेमाचे लेख दिग्दर्शक एडिटर आणि सर्वच्या सर्व कलाकारांचे पदार्पण असल्याने कुठलंही चॅनल चित्रपट बघून आवडूनही पाऊल पुढे टाकेना.

अगोदरच कर्जाची चिंता मनात घरघर निर्माण करत असताना, तयार सिनेमा थिएटरमध्ये लागला नाही तर तो वितळणार्‍या बर्फासारखा असतो, या भाषेत वारंवार बोलून सिनेमा व्यवसायातील लोक चिंता अजून वाढवू लागले. अखेर २०२० मध्ये एक चांगली कंपनी चित्रपट प्रदर्शित करायला तयार झाले. बोलणी झाली सगळे पक्के झाले आणि सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘तेंडल्या’ चित्रपट २४ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित करायची योजना पक्की झाली. तेव्हापासून तेंडल्या सिनेमा सचिन तेंडुलकरला अर्पण केला गेला आहे. पण काय करणार नियतीला ही योजना मान्य नव्हती. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ जमून आली कारण कोरोना महासाथीनं त्या सुंदर योजनेला सुरुंग लागला. चित्रपटगृह बंद झाली आणि सिनेमा रखडला. राज्यपातळीवरची पाच आणि एक राष्ट्रीय पुरस्कार लाभूनही हा चित्रपट योग्य पाठबळाविना चांगलाच रखडला.

प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली असताना सचिन जाधव, नचिकेत वाईकर आणि चैतन्य काळे डगमगून जायला तयार नव्हते कारण ते नुसते सचिनचे चाहते नव्हते तर सचिनच्या विचारांना सोबत घेऊन जगणारे होते. कितीही समस्या आली तरी विकेटवर खंबीरपणे उभे राहून मुकाबला करायचे सचिन तेंडुलकरचे वागणे त्यांनी मनात कोरले होते. कर्जाची परतफेड थोडीतरी चालू रहावी म्हणून सचिन जाधवने शिराळा भागातलं आठ एकर शेत भाडे तत्त्वावर घेतले. सिनेमात बाल कलाकार म्हणून काम केलेली मुलेच सचिन जाधवला सामील झाली आणि सगळ्यांनी मिळून भाजीपाला पिकवून तो विकायला सुरुवात केली. दैवाला ते पण मान्य नव्हते जणू. कारण सांगली जिल्ह्यात आलेल्या भयानक पुराने शेत वाहून गेले आणि छोटा ट्रॅक्टर जमिनीत गाडला गेला. केवळ सचिन तेंडुलकरला आदर्श मानत जगल्याने या पोरांनी जिवाचे बरे वाईट करून घेतले नाही आणि झगडणे चालू ठेवले.

कर्जाच्या डोंगरातून बाहेर यायला एकच तरणोपाय होता तो म्हणजे कसेही करून सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करणे. पुण्यातील टूडीप नावाच्या मोठ्या कंपनीच्या संचालकांनी ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या मुलांची सत्यकथा समजल्यावर आर्थिक मदत केली. आता सचिन जाधव, नचिकेत वाईकर आणि चैतन्य काळे यांनी संकटांचे डोंगर पार करून बनवलेला ‘तेंडल्या’ सिनेमा ५ मेपासून महाराष्ट्रातील शंभर चित्रपटगृहांमध्ये सादर केला जातोय. ‘कोणताही अनुभव पाठीशी नसताना या मुलांनी सुंदर सिनेमा घडवला आहे. केवळ त्यांच्या पदार्पणाकडे बघून विचार करू नका.

पदार्पणात खेळाडू जसा शतक ठोकतो किंवा पाच बळी मिळवतो तसेच आहे. तेंडल्या चित्रपटाचे लेखक - दिग्दर्शक शतक ठोकणार अशी मला खात्री आहे. ‘मी चित्रपट बघितला आहे आणि मला आवडला आहे, तुम्ही नक्की बघा तुम्हांलाही आवडेल’, या सरळ साध्या भाषेत सचिन तेंडुलकरने तेंडल्या सिनेमाची पाठराखण केली आहे.

सचिन जाधव, नचिकेत वाईकर आणि चैतन्य काळे यांना खर्‍या अर्थाने सचिन तेंडुलकर उमगला असे त्यांची संघर्ष कहाणी बघून कळते. म्हणूनच भावनिक आव्हान करावेसे वाटते की आपल्या मातीतला चित्रपट म्हणून ज्याचे वर्णन करता येईल असा ‘तेंडल्या’ चित्रपट तुमच्या गावात लागेल तेव्हा त्याला लागणारा सक्रिय पाठिंबा तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघून देणार ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com