सरावाची संधी कमी (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

सर्वोत्तम कामगिरीसाठी गुणवत्तेबरोबर सरावही तितकाच महत्त्वाचा असतो. मात्र, महाराष्ट्रातल्या क्रिकेटपटूंना खेळायला फार कमी सामने मिळत आहेत. क्‍लबकडून भरवल्या जाणाऱ्या आणि इतर जिल्ह्यांतल्या अनेक क्रिकेट स्पर्धा बंद झाल्या आहेत. सर्वसाधारण खेळाडूला वर्षातून जेमतेम तीन अधिकृत सामने खेळायला मिळत असले, तर मग राज्यातल्या क्रिकेटकरिता ती चिंतेची स्थिती नाही का वाटत? महाराष्ट्र क्रिकेट संघटना, इतर क्‍लब, संघटक त्यासाठी प्रयत्न का नाही करत?

सर्वोत्तम कामगिरीसाठी गुणवत्तेबरोबर सरावही तितकाच महत्त्वाचा असतो. मात्र, महाराष्ट्रातल्या क्रिकेटपटूंना खेळायला फार कमी सामने मिळत आहेत. क्‍लबकडून भरवल्या जाणाऱ्या आणि इतर जिल्ह्यांतल्या अनेक क्रिकेट स्पर्धा बंद झाल्या आहेत. सर्वसाधारण खेळाडूला वर्षातून जेमतेम तीन अधिकृत सामने खेळायला मिळत असले, तर मग राज्यातल्या क्रिकेटकरिता ती चिंतेची स्थिती नाही का वाटत? महाराष्ट्र क्रिकेट संघटना, इतर क्‍लब, संघटक त्यासाठी प्रयत्न का नाही करत? स्थानिक पातळीवर उपांत्य किंवा अंतिम सामन्यात खेळण्याच्या दडपणाचा अनुभव पाठीशी नसेल, तर बीसीसीआयच्या स्पर्धांमध्ये मोक्‍याच्या सामन्यांत राज्यातले संघ अडखळतात, त्याचं आश्‍चर्य वाटायला नको.

‘‘सर्वोत्तम कामगिरी आणि गुणवत्ता यांचा तसा अर्थाअर्थी थेट संबंध नसतो. उलटपक्षी एक पातळी गाठल्यावर क्षमता आणि गुणवत्ता हे निकामी शब्द बनून जातात. अंगात असलेल्या क्षमता आणि देवानं दिलेल्या नैसर्गिक गुणवत्तेचा योग्य वापर तुम्ही कसे करता यावर सगळं काही अवलंबून असतं,’’ हर्षा भोगलेनं आयआयएम, अहमदाबादला दिलेल्या लेक्‍चरची क्‍लिप यूट्यूबवर बघताना त्याचे विचार ऐकत होतो. पुढं हर्षा सांगत होता, ‘‘गुणवत्ता तुम्हाला पहिली काही दारं नक्की उघडून देते. ‘नुसती गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना कारकिर्दीत पहिला मोठा अडथळा किंवा मोठं अपयश आलं, की ते गळाठून जातात. त्यांना परत यशाचा मार्ग कसा शोधायचा, हे समजतच नाही. यश मिळवायला आणि टिकवायला जे अपार सुनियोजित कष्ट करावे लागतात, त्याची त्यांना खरी जाणीव नसते- कारण गुणवत्तेवर त्यांची गाडी चालू असते,’ असं महान क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ सॅंडी गॉर्डननं म्हटलं आहे. विनोद कांबळी सचिनपेक्षा कदाचित जास्त ‘टॅलेंटेड’ होता. त्याच्या कारकिर्दीचं काय झालं, ते आपण सगळे बघत आहोत. रमाकांत आचरेकर सरांनी सचिन तेंडुलकरला वयाच्या पंधराव्या वर्षी सलग ५० दिवस सामने खेळायला लावले होते. कधी कधी सचिन दिवसात दोन सामन्यांत फलंदाजी करायचा. काही स्पर्धेतले सामने असायचे, तर काही मित्रत्वाचे. पण सचिनला सामन्यातल्या ताणतणावांची- ज्याला ‘मॅच सिच्युएशन’ म्हटलं जातं, त्याची इतकी भरपूर ओळख आचरेकर सरांनी करून दिली होती. मोठी खेळी कशी उभारायची इथपासून ते संघाची गरज ओळखून फलंदाजीचे ‘गिअर’ कसे बदलायचे, तणावाच्या प्रसंगात डोकं शांत ठेवून फलंदाजी कशी करायची आणि समोरच्या संघानं रचलेल्या योजनांना सुरूंग कसा लावायचा याचं प्रशिक्षण जाळ्यातल्या सरावानं नव्हे, तर प्रत्यक्ष सामने खेळायला लावून त्यांनी दिलं होतं. आचरेकर सरांनी जे करून घेतलं, त्याचा पाठपुरावा सचिननं पुढची २४ वर्षं केला, म्हणून कमाल त्याला कामगिरी साध्य करता आली.’’
...गुणवत्ता नव्हे, तर अपार मेहनतीची, ध्येयासक्तीची कार्यपद्धतच हर्षा उलगडून दाखवत होता.

नाटकाची नुसती तालीम करणं वेगळं असतं आणि प्रेक्षकांनी भरलेल्या नाट्यगृहात नाटक सादर करणं वेगळं असतं. रियाज करणं वेगळं असतं आणि ‘कानसेन’ चोखंदळ प्रेक्षकांसमोर ताकदीनं राग सादर करणं वेगळं असतं. तसंच खेळ कोणताही असो, सराव करणं वेगळं असतं आणि निर्णायक सामन्यात चोख कामगिरी करणं फार फार वेगळं असतं...हे सगळे विचार घोळण्याचं कारण माझ्या मनात सध्या धोक्‍याची घंटा वाजत आहे.

गेले ते दिन गेले
मी पहिला हाडाचा क्रिकेटर आहे आणि मग पत्रकार. माझा नुसताच क्रिकेटचा अभ्यास नाही तर बऱ्यापैकी क्रिकेट मी खेळलो आहे. क्रिकेटमहर्षी दि. ब. देवधरांनी चालू केलेल्या देवधर ट्रस्टच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी. राजाभाऊ ओक सर आणि कर्नल हेमू अधिकारी सरांकडून मी क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे. १९८० ते १९८६ पुण्यातलं बीएमसीसी कॉलेज आणि त्याच्या जोडीनं पीवायसी क्‍लबकडून मी भरपूर क्रिकेट खेळलो. खेळाच्या नशेचा तो काळ होता. बेधुंद होऊन सराव करायचा आणि नंतर सर्वस्व झोकून देऊन सामना खेळायचा, यातच मन गुंतलेलं असायचं. पुण्यातल्या कॉलेज क्रिकेटचा त्यावेळचा दर्जा चांगला होता. मला स्पष्ट आठवतं- एसपी कॉलेज विरुद्ध बीएमसीसी कॉलेज या अंतिम सामन्याच्या दिवशी स्थानिक वर्तमानपत्रांत दोनही संघांचं बलाबल देणारे लेख होते. इतर सामने मॅटिंग विकेटवर झाले; पण दोन डावांचा अंतिम सामना पीवायसी क्‍लबवर आयोजित करण्यात आला होता. रणजी निवड समितीचे पाचही सदस्य संपूर्ण सामना बघायला पीवायसीवर हजर होते. इतकंच नाही, तर तब्बल तीन-चार हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घ्यायला मैदानावर आले होते- इतकं त्या सामन्याचं महत्त्व होतं.

त्याच मैदानावर पुढच्या रविवारी पीवायसी विरुद्ध पूना क्‍लब असा दुसऱ्या स्पर्धेचा अंतिम सामना होता. या दोनही संघांत मिळून आठ-दहा रणजी खेळाडू होते. त्या सामन्याला तर सहा-सात हजार प्रेक्षक उपस्थित होते. एसपी विरुद्ध बीएमसीसी कॉलेज सामन्याला किंवा पीवायसी विरुद्ध पूना क्‍लब सामन्याला चांगल्या क्रिकेटची धार होती, म्हणून प्रेक्षक गर्दी करत होते. या सगळ्या आठवणी तीन दशकांच्या भूतकाळात विरून गेल्या.

आता परिस्थिती काय आहे?
मी क्रिकेट खेळायचो, तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण क्‍लब खेळाडूला निमंत्रितांच्या साखळी स्पर्धेतले दहा सामने खेळायला मिळायचे. त्या सोबतीला मांडके करंडक, जोगळेकर करंडक, कालेवार करंडक या पुण्यातल्या क्‍लबनी भरवलेल्या स्पर्धांमध्ये खेळायला मिळायचं. त्याचबरोबर साताऱ्यात होणारी युनायटेड वेस्टर्न बॅंक स्पर्धा, लोणावळ्याला होणारी सर्जू भवानी स्पर्धा, दौंडला होणारी रेल्वे करंडक स्पर्धा आणि कोल्हापूरला होणारी पॅकर्स स्पर्धा यांच्यात खेळायला मिळायचं. त्यात मुंबईचे नामांकित संघही सहभागी असायचे. थोडक्‍यात सांगायचं, तर वर्षातले किमान १२५ दिवस आम्ही कॉलेज किंवा क्‍लबचे चांगले सामने खेळण्यात मग्न असायचो.
...आता तपासणी केली, तर परिस्थिती फार बदलली आहे. तुमचा विश्‍वास बसणार नाही; पण पुण्यातलं शालेय क्रिकेट दहा किंवा जास्तीत जास्त बारा षटकांच्या सामन्याचं असतं आणि इंटर-कॉलेज स्पर्धा टी-२० असतात. महाराष्ट्र क्रिकेट संघटना १४ वर्षांखाली, १६ वर्षांखाली, १९ वर्षांखाली आणि खुल्या गटाकरिता निमंत्रितांची साखळी स्पर्धा भरवते, ज्यात ४ संघांचा ग्रुप असतो. म्हणजे प्रत्येक संघातल्या खेळाडूंना फक्त तीन सामने खेळायला मिळतात. पूर्वी पुण्यातल्या क्‍लबकडून किंवा इतर जिल्ह्यांत भरवल्या जाणाऱ्या स्पर्धा बंद पडल्या आहेत. १४ आणि १६ वर्षांखालच्या गटाचे सामने दोन दिवसांचे असतात आणि १९ वर्षांखालच्या आणि खुल्या गटाचे सामने एकदिवसीय असतात. तीन वर्षांपूर्वी अत्यंत रंगलेली महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धाही होताना दिसत नाहीये. वर्षातून सर्वसाधारण खेळाडूला जेमतेम तीन अधिकृत सामने खेळायला मिळत असतील, तर मग महाराष्ट्राच्या क्रिकेटकरिता ती चिंतेची स्थिती नाही का वाटत?

करता काय तुम्ही?
यात सगळा दोष महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला देता येणार नाही. पीवायसी, डेक्कन जिमखाना, पूना क्‍लब किंवा सातारा, नाशिकसारख्या जिल्हा संघटना वर्षातून एक स्पर्धा स्वत:च्या हिमतीवर का नाही आयोजित करत, हे कोडं आहे. पूना क्‍लबचे राहुल ढोले पाटील, डेक्कन जिमखान्याचे अजय गुप्ते, पीवायसीचे कुमार ताम्हाणे किंवा सातारा जिल्हा संघटनेचे सुधाकर शानबाग, नाशिक जिल्हा संघटनेचे धनपाल शहा यांचा अनुभव आणि क्षमता नक्कीच मोठी आहे. प्रायोजक मिळवून आपल्या क्‍लब किंवा संघटनेची वर्षातून एक चांगली स्पर्धा भरवणं त्यांना अशक्‍य नक्कीच नाही.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीत काही सदस्य गेली कित्येक वर्षं संघटनेत काम करत आहेत. त्यांना ही गोष्ट कशी खटकत नाही? प्रश्‍न क्षमतेचा नसून इच्छाशक्तीचा आहे. महाराष्ट्रातल्या खेळाडूंना जास्त सामने मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न करायला नकोत का?  

हा योगायोग कसा समजणार?
गेल्या वर्षी १९ वर्षांखालच्या निमंत्रितांच्या साखळी स्पर्धेतले बाद फेरीचे सामने झालेच नाहीत. साखळी स्पर्धा आणि सुपर लीग संपल्यावर केडन्स क्रिकेट संघाला विजयी घोषित करून बक्षीस समारंभही करून टाकला गेला. १९ वर्षांखालच्या निवड समितीच्या एका सदस्याला मी फोन केला. माझ्यासोबत तो पूर्वी खेळला होता.
‘‘कधी भेटतोस खूप दिवस झाले,’’ मी त्याला म्हणालो. ‘‘अरे सुनंदन कसा आहेस...भेटू की या शनिवार किंवा रविवारी...मी निवड समितीत आहे ना...पुण्यात उपांत्य आणि अंतिम सामना बघायला येतोय,’’ असं तो मित्र म्हणाला. मी त्याला उपांत्य सामना होणार नाहीये, कारण बक्षीस समारंभ झाला असल्याचं सांगितलं तेव्हा त्यानं फोन खाली ठेवून दिला.

१६ वर्षांखालच्या गटाचं असंच झाले. उपांत्य सामने झाले; पण पीवायसी विरुद्ध अध्यक्षीय संघ हा अंतिम सामना भरवण्यातच आला नाही. खेळाडू उपांत्य किंवा अंतिम सामना खेळायला किती तयारी करून आपलं कसब दाखवायला कसा उत्सुक असतो हे वेगळं सांगायची खरंच गरज नाही. क्षमतेची आणि शारीरिक, मानसिक तयारीचा कस लागणारा तो सामना असतो; पण तापल्या तव्यावर पाणी टाकणारा प्रकार नाही का वाटत?
स्थानिक पातळीवर उपांत्य किंवा अंतिम सामन्यात खेळण्याच्या दडपणाचा अनुभव पाठीशी नसेल, तर बीसीसीआयच्या स्पर्धांमध्ये मोक्‍याच्या सामन्यांत महाराष्ट्राचे संघ अडखळतात, त्याचं आश्‍चर्य वाटायला नको.
          
खर्च खूपच कमी
२००८ मध्ये आयपीएल चालू झाल्यापासून बीसीसीआयकडून सर्व राज्य क्रिकेट संघटनांना भरघोस मोठा निधी गेली काही वर्षं मिळत आला आहे. यात स्टेडियम उभारणीकरिता मिळणारं अनुदान आणि बीसीसीआयच्या स्पर्धांवर केला गेलेला खर्च हे निधी वेगळे असतात. महाराष्ट्र क्रिकेट संघटना यातला किती पैसा स्थानिक क्रिकेटच्या वृद्धीकरिता खर्च करते, हे तपासणं त्रासाचं ठरलं. गेल्या वर्षी बीसीसीआयकडून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला तीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, ज्यापैकी ८४ लाख रुपये खर्च हा स्थानिक क्रिकेटवर करण्यात आला आहे. म्हणजेच एमसीए जमा झालेल्या निधीतला फक्त तीन टक्के खर्च स्थानिक क्रिकेटवर करत आहे. राज्यातल्या सर्वसाधारण क्‍लबमधल्या किंवा जिल्ह्यांतल्या खेळाडूला वर्षातून तीन सामने खेळायला मिळत असतील आणि एमसीए हाती आलेल्या पैशातली फक्त तीन टक्के रक्कम त्यावर खर्च करत असेल, तर मग ही चिंतेची स्थिती आहे, असं नाही का तुम्हाला वाटत?

Web Title: sunandan lele's article

फोटो गॅलरी