‘राजा’ रॉजर (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोन दिग्गजांत गेल्या रविवारी (२९ जानेवारी) टेनिस सामना रंगला. एखाद्या मैफलीसारख्या रंगलेल्या या सामन्यात फेडररनं बाजी मारली. त्याच्या हातून सामना सुटत असताना एका क्षणी त्यानं पकड घट्ट करत सामना जिंकला. अठरावं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवणं ही कठीण गोष्ट त्यानं शक्‍य करून दाखवली. अर्थात, केवळ अठरा ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या म्हणून त्याचे चाहते त्याच्यावर प्रेम करत नाहीत. त्यांच्या खेळातल्या नैपुण्याच्या बरोबरीनं त्याच्यातली कमालीची सभ्यता, दिलदारपणा, माणुसकीचा ओलावा या गोष्टी त्याला महान बनवतात. या ‘राजा’ रॉजरविषयी...

रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोन दिग्गजांत गेल्या रविवारी (२९ जानेवारी) टेनिस सामना रंगला. एखाद्या मैफलीसारख्या रंगलेल्या या सामन्यात फेडररनं बाजी मारली. त्याच्या हातून सामना सुटत असताना एका क्षणी त्यानं पकड घट्ट करत सामना जिंकला. अठरावं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवणं ही कठीण गोष्ट त्यानं शक्‍य करून दाखवली. अर्थात, केवळ अठरा ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या म्हणून त्याचे चाहते त्याच्यावर प्रेम करत नाहीत. त्यांच्या खेळातल्या नैपुण्याच्या बरोबरीनं त्याच्यातली कमालीची सभ्यता, दिलदारपणा, माणुसकीचा ओलावा या गोष्टी त्याला महान बनवतात. या ‘राजा’ रॉजरविषयी...

त्या  मैफलीत सगळेच गुंग झाले होते. निष्णात धनुर्धारी प्रत्यंचा ताणत बाण सोडताना टणत्कार काढतो, तसे आवाज स्ट्रिंग्जमधून ऐकायला मिळत होते. दोन कलाकारांची कला अनुभवताना प्रेक्षक कधी ‘क्‍या बात है’, कधी ‘अरे बाप रे’, तर कधी ‘उफ उफ’ म्हणत दाद देत होते.

मैफल अशी काही रंगली होती, की पाचही खंडातले कलाप्रेमी खुर्चीला खिळून बसले होते. होय! २९ जानेवारीच्या रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजल्यापासून सगळी कामं, सगळे विचार बाजूला ठेवून प्रेक्षक टीव्हीला चिकटले होते. कारण साधं होतं- रॉजर फेडरर आणि राफेल नदालदरम्यान ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतला अंतिम सामना रंगणार होता. खरं सांगायचं, तर तो सामना नव्हता. ती एक टेनिसची लाजवाब मैफल होती. दोन दिग्गज कलाकारांनी मेलबर्नच्या रॉड लॅव्हर एरीनावर ती मैफल ताकदीनं सादर केली आणि सगळे क्रीडाप्रेमी टेनिसच्या साक्षात्कारानं न्हाऊन निघाले. जवळपास चार तासांच्या मैफलीनंतर सगळे प्रेक्षक तृप्त होऊन दोनही महान टेनिस कलाकारांना दुवा देत होते. लढतीत बाजी मारणाऱ्या रॉजर फेडररनं राफेल नदालला मानवंदना देताना सांगितलं, की ‘‘टेनिसच्या खेळात सामना बरोबरीत सुटत नाही...तसा नियम असता तर आजचा सामना बरोबरीत सुटला म्हणताना मला आनंद झाला असता...राफेल, टेनिसला तुझ्यासारख्या योद्‌ध्याची गरज आहे.’’   

तो वेगळा आहे
जगातले लाखो कलाकार तबला वाजवतात; पण उस्ताद झाकीर हुसेन यांचे हात तबल्यावर पडतात, तेव्हा तबला वाजत नाही, तर ‘बोलू’ लागतो. तसंच जगातले लाखो लोक टेनिस खेळतात; पण फेडरर टेनिस खेळू लागतो, तेव्हा त्याच्या रॅकेटमधून विविध फटक्‍यांचे सप्तसूर ऐकू येऊ लागतात. हे वेगळेपण काय आहे, हे नक्की शब्दांत मांडणं कठीण आहे. अँडी मरे आणि राफेल नदाल कष्टकरी खेळाडू आहेत; तर नोवाक जोकोविच शिस्तपूर्ण खेळाडू आहे. फेडरर खेळतो, तेव्हाच फक्त तो टेनिसची कविता सादर करतो आहे, असं का वाटतं ते समजत नाही. त्याच्या खेळातली लय, सहजता, नैसर्गिकता त्याला कदाचित कारणीभूत असेल. अशक्‍य वाटणारे फटके फेडरर मनगटाच्या एका झटक्‍यानं सहजी मारून दाखवतो, तेव्हा हाताचीच नाही; तर पायाची बोटं तोंडात घालायची वेळ येते. १८ ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या म्हणून फेडरर मनाला भुरळ घालतो, असं मला वाटत नाही. त्याच्याबद्दल प्रत्येक टेनिस रसिकाला वेगळं प्रेम, आपुलकी वाटते याला वेगळं कारण आहे का?

सभ्यतेची ताकद
फेडरर आणि नदाल सामन्यात मनाला सर्वांत भावलेली गोष्ट कुठली असेल, तर त्यांच्या वागणुकीत असलेली सभ्यता. मैदानावर दोनही योद्धे जिवाचा आकांत करत लढत होते; परंतु कोणत्याही क्षणी ते सभ्यता सोडताना दिसले नाहीत. अत्यंत मोक्‍याचा गुण गेला किंवा नको त्या वेळी चुकीचा फटका मारला गेला म्हणून कोणी राग-राग करत नव्हतं. क्रिकेट फुटबॉलच्या लक्षणीय सामन्यांत दोनही संघातले काही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून जातात किंवा सभ्यतेची लक्ष्मणरेषा ओलांडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. फेडरर आणि नदाल विजेतेपदाकरता जीवघेणा मुकाबला करत असताना कधीही वाईट वर्तणूक करत नाहीत. सामना संपल्यावर ते दोघं एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्यानं भेटून बोलताना दिसतात. बक्षीसवितरणादरम्यान एकमेकांची खुल्या मनानं स्तुती करतात. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळं करताना कणभरही नाटकीपणा नसतो. खरंच खूप शिकण्यासारखं आहे, या दोन महान खेळाडूंकडून जगभरच्या खेळाडूंना.

टीकाकारांना चपराक
फेडररनं वयाची पस्तिशी गाठली, तरी तो अजून खेळायचा अट्टहास का करतोय, अशी टीका त्याच्यावर होत होती. नदालला दुखापतींनी ग्रासलं असताना तो खेळाला रामराम का ठोकत नाही, असेही वाकडे प्रश्‍न विचारले जात होते. दोघंही टेनिस तपस्वी कोणत्याही टीकेला शब्दांनी उत्तर देत नव्हते. ‘एकला चालो रे’ पद गात जणू दोघं टेनिसची साधना करणं सोडत नव्हते. गेले सहा महिने स्पर्धात्मक टेनिसपासून दूर असल्यानं फेडररला सतरावं मानांकन मिळालं होतं. परिणामी, फार सु?वातीपासून फेडररला वरच्या क्रमांकाच्या चांगल्या खेळाडूंसोबत मुकाबला करावा लागला. बर्डीच, निशिकोरी, झेवरेव, वावरिंका अशा एकाहून एक चांगल्या खेळाडूंवर मात करत फेडरर अंतिम सामन्यात पोचला होता. नदालनं ग्रॅंड स्लॅम अंतिम सामन्यात फेडररला सहा वेळा पराभूत केलं होतं. हा सर्व इतिहास फेडररला सतावत नव्हता. त्याचं लक्ष फक्त सर्वोत्तम टेनिस खेळण्याकडं होतं. अंतिम सामन्यातल्या शेवटच्या सेटमधे फेडररची सर्व्हिस नदालनं तोडून आघाडी घेतली असताना आता सामन्यात पुनरागमन करणं फेडररकरता अशक्‍य असल्याचीच भावना बघणाऱ्यांची होती. सर्व अंदाजांना सुरुंग लावत फेडररनं नदालची सर्व्हिस तोडून नंतर हाती आलेली पकड घट्ट करत सामना जिंकला. अठरावं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवणं ही अविश्‍वसनीय कामगिरी फेडररनं करून दाखवली. पाच सेकंदच त्यानं आपला विजय उड्या मारत साजरा केला आणि लगेच जाळ्याजवळ येऊन राफेलला घट्ट मिठी मारत आपल्या भावना मोकळ्या केल्या. त्या सगळ्यात असलेली ‘ग्रेस’ विलक्षण होती.

माणुसकी जपणारा खेळाडू
फेडररबद्दल आपुलकी का वाटते, याला त्याच्यातली माणुसकी जबाबदार ठरू शकते. त्याच्या दोन छोट्या कहाण्या सांगतो. चालू ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत फेडररच्या बॉक्‍समध्ये त्याचा कोच आणि पत्नीच्या मागं एक थोडं वयस्कर जोडपं बसलेलं दिसायचं. गमतीची गोष्ट म्हणजे ते फेडररचे नातेवाईक नव्हते. ते होते त्याचा पहिल्या मोठा कोच पीटर कार्टरचे आई-वडील बॉब आणि डायना कार्टर.
नऊ वर्षांचा असताना पीटर कार्टरनं फेडररला आपल्या पंखाखाली घेतलं होतं. सुरवातीला काहीशा रागीट स्वभावाच्या; परंतु गुणवान फेडररला पीटर कार्टरनं मार्ग दाखवला होता. शांत केलं होतं. फेडरर २१ आणि पीटर कार्टर फक्त ३७ वर्षांचा असताना भयानक कार अपघातात पीटरचं निधन झालं. फेडररवर त्याचा खूप वाईट परिणाम झाला. फेडररला खराखुरा महान खेळाडू बनवण्यात पीटर कार्टरचा मोठा हातभार होता, हे फेडरर विसरला नाही. २००५पासून फेडरर पीटरच्या आई-वडिलांना सर्वच्या सर्व खर्च करून मोठ्या मानानं मेलबर्नला ऑस्ट्रेलियान ओपन बघायला बोलावतो आणि आपल्या खास बॉक्‍समधे पत्नीसोबत बसवतो. बॉब आणि डायना कार्टरला आपला मुलगाच जणू रॉजरमधे दिसतो.

दुसरी कथा बेट्रीझ नावाच्या अमेरिकन चाहतीची आहे. बेट्रीझला दोन वेळा कॅन्सरनं ग्रासलं होतं. कॅन्सर पीडितांसोबत काम करणाऱ्या ‘मेक अ विश फाउंडेशन’कडं बेट्रीझनं इच्छा प्रदर्शित केली होती, की आयुष्यात एकदा तिला रॉजर फेडररला प्रत्यक्ष भेटायचं आहे. एक वर्ष निघून गेलं, तरी काहीच उत्तर आलं नाही म्हणून बेट्रीझनं मनातला विचार सोडून दिला होता. एक दिवस तिच्या शाळेत टेनिस स्पर्धा असताना एका माणसानं खेळानंतर तिला आयपॅडवर फेडररच्या विंबल्डन अंतिम सामन्याची क्‍लिप दाखवली. आपला हिरो बघून बेट्रीझचे डोळे लकाकले. अचानक क्‍लिप बंद झाली आणि पडद्यावर खरखर आली. दोन सेकंदांनी आयपॅडवर फेडररच दिसू लागला. ‘हाय बेट्रीझ कशी आहेस तू...तू माझी खूप मोठी चाहती आहेस, असं मला समजलंय...यंदाच्या विंबल्डन स्पर्धेत माझ्या खेळाचे प्रेक्षक म्हणून तुला आणि तुझ्या कुटुंबाला निमंत्रण देण्याकरता मी बोलतो आहे...तेव्हा आता वेळ घालवू नकोस...बॅग पॅक कर...आपण विंबल्डनला भेटूयात...बाय,’’ फेडररनं स्वत: बेट्रीझकरता संदेश रेकॉर्ड केला होता.
बेट्रीझ आनंदानं किंचाळू लागली. तिला संदेश बघायला मिळाला सोमवारी आणि रॉजर फेडररनं तिच्यासाठी गुरुवारचं विमान तिकीट बुक केलं होतं. लंडनमधे उतरल्यावर फेडररच्या मॅनेजरनं बेट्रीझचं विमानतळावर स्वागत केलं. इतकंच नाही, तर फेडररनं तिच्या मापाचे खास कपडे नाईके कंपनीकडून बनवून घेतले होते. ते खास कपडे घालूनच बेट्रीझ थेट विंबल्डनच्या सराव कोर्टवर जाऊन फेडररला भेटली. इतकंच नाही, तर फेडररनं बेट्रीझला स्वत:ची रॅकेट दिली आणि तो तिच्यासोबत टेनिसही खेळला. त्यानं तिच्याशी १५ मिनिटं गप्पा मारल्या. त्यांची काही जुनीच ओळख आहे अशा थाटात. नंतर विंबल्डनच्या अध्यक्षांसोबत फेडररनं बेट्रीझला परिसराची सफर घडवली. सगळ्या अनपेक्षित प्रेमानं बेट्रीझला भावना आवरता आल्या नाहीत आणि ती आनंदानं रडू लागली. फेडररनं जवळ घेत तिला शांत केलं.

समाजकार्याचा धडाका
गेली बारा वर्षं फेडररनं आपल्या फाउंडेशनद्वारे आफ्रिकेतील गरीब मुलांसाठी अव्याहत काम केलं आहे. कोट्यवधी रुपये देणगी जमा करून रॉजर फेडरर फाउंडेशननं गरीब मुलांच्या प्राथमिक शिक्षण आणि आरोग्यासाठी काम केलं आहे. बोत्स्वाना, मलावी, झांबिया, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका इतक्‍या देशांत रॉजर फेडरर फाउंडेशन गेली बारा वर्षं काम करत आहे. मला वाटतं, फक्त १८ ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या म्हणून आपण फेडररवर प्रेम करत नाही; तर त्यांच्या खेळातील नैपुण्याच्या बरोबरीनं त्याच्यातली कमालीची सभ्यता, दिलदारपणा, माणुसकीचा ओलावा या गोष्टी त्याला महान बनवतात.

२९ जानेवारी २०१७ ला ज्या राफेल नदालबरोबर टेनिसची लढाई फेडरर लढला, त्याच नदालनं स्वत:च्या टेनिस अकादमीचं उद्‌घाटन करायला त्याला बोलावलं होतं. ‘‘राफा, आता आपल्याला ग्रॅंड स्लॅमच्या अंतिम सामन्यात लढताना प्रेक्षकांना बघायला मिळणार नाहीये...आपण मस्तपैकी एक एक्‍झिबिशन सामन्याचं आयोजन करूयात, ज्यातून आपल्या दोघांना खेळताना परत एकदा बघायचा आनंद टेनिस प्रेक्षकांना मिळेल,’’ हसत-हसत फेडरर म्हणाला होता. त्याच नदालविरुद्ध अशक्‍य दर्जाचा सामना खेळून फेडररनं १८वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं. टेनिसदेव जाणे- कदाचित फेडररपेक्षा जास्त विजेतेपद जिंकणारा खेळाडू भविष्यात निर्माण होईलसुद्धा; पण जी प्रतिभा फेडररनं टेनिस कोर्टवर दाखवली आणि चांगल्या वागणुकीनं जी प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण केली, त्याची जागा कोणी घेऊ शकेल, असं नक्कीच वाटत नाही. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, की रॉजर फेडरर नसता महान खेळाडू नाही, तर रॉजर ‘राजा’ आहे.

Web Title: sunandan lele's article in saptarang