धोनीचे बोल...अनमोल (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 21 मे 2017

महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपटू म्हणून जितका चांगला आहे, तितकंच त्याचं वेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञानही महत्त्वाचं आहे. खेळताना, जीवन जगताना त्याला सापडत गेलेलं तत्त्वज्ञान सगळ्यांनाच खूप उपयोगी पडेल. धोनी पुण्यात नुकताच येऊन गेला, तेव्हा त्यानं करिअरच्या निवडीपासून यश पचवण्यापर्यंत अनेक गोष्टींवर विचार मांडले. त्याच्या अतिशय सहजसोप्या विचारधनाचं हे सार...

महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपटू म्हणून जितका चांगला आहे, तितकंच त्याचं वेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञानही महत्त्वाचं आहे. खेळताना, जीवन जगताना त्याला सापडत गेलेलं तत्त्वज्ञान सगळ्यांनाच खूप उपयोगी पडेल. धोनी पुण्यात नुकताच येऊन गेला, तेव्हा त्यानं करिअरच्या निवडीपासून यश पचवण्यापर्यंत अनेक गोष्टींवर विचार मांडले. त्याच्या अतिशय सहजसोप्या विचारधनाचं हे सार...

मुंबईच्या खेळाडूंचा मला हेवा वाटतो. या ना त्या कारणानं त्यांना मोठ्या खेळाडूंना भेटायची सतत संधी मिळते. महान माजी खेळाडू येऊन तरुण गुणवान खेळाडूंशी संवाद साधतात. जाणत्या खेळाडूंचे विचार ऐकून डोक्‍यात प्रकाश पडतो, ज्याचं प्रतिबिंब कधीकधी मैदानावरच्या कामगिरीत दिसून येतं. बाकीच्या शहरांचं बोलायचं झालं, तर दिल्ली आणि बंगळूर ही दोनच शहर अशी आहेत, जिथं असा फायदा तरुण खेळाडूंना मिळू शकतो. आयपीएल सामने पुण्यात होऊ लागल्यानं पुण्याच्या खेळाडूंना अशी संधी लाभू लागली आहे. नुकताच महेंद्रसिंह धोनी पुण्यातल्या सात क्रिकेट क्‍लब्जच्या होतकरू खेळाडूंशी हितगूज करून गेला. संवादादरम्यान धोनीनं जे विचार मांडले, ते क्रिकेटपटूंनाच नाहीत, तर बाकी खेळाडूंना आणि नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यक्तींनाही काही प्रमाणात लागू पडतात. म्हणून ते लेखातून पोचवण्याचा हा खटाटोप ः

लहान शहरातून खेळाडू जास्त प्रमाणात पुढं यायला लागले आहेत त्याबद्दल ः
धोनी : क्रिकेटमध्ये खूप सुधारणा झालीय भारतात. क्रिकेट सुविधांमध्ये लक्षणीय बदल झालेत. छोट्या गावांत किंवा शहरांत चांगली क्रिकेट मैदानं उभारली गेली आहेत, तसंच क्रिकेट एक व्यवसाय म्हणून स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध झालाय. प्रथम श्रेणीच्या टप्प्यापर्यंत कोणी मजल मारू शकला, तर त्याला चांगले पैसे मिळतात. माध्यमांनी या सर्व प्रगतींत आपली भूमिका पार पाडली आहे. नुसत्या शहरांतल्या मुला-मुलींनी चांगली कामगिरी केली, तर तो किंवा ती प्रसिद्धीच्या झोतात नाही येत. गावाकडच्या खेळाडूनं मात्र चांगली कामगिरी केली, तर स्थानिक वर्तमानपत्रं किंवा टीव्ही चॅनेल्स त्याला चांगली बातमी करून प्रसिद्धी देतात. योग्य प्रसिद्धी मिळाली, की खेळाडूचा गवगवा होतो- ज्याचा फायदा त्याची कारकीर्द फुलण्यासाठी होतो. राज्याच्या संघात तुम्ही जागा मिळवून चांगला खेळ करून दाखवला, की राष्ट्रीय स्तरावरची प्रसारमाध्यमं तुमच्या कामगिरीचा आढावा घेतात. भारतीय क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आला- ज्याचा फायदा घेत स्थानिक संघटनांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदानं आपापल्या गावी उभारली. प्रगतीच्या प्रवासात बीसीसीआयनं केलेली पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक क्रिकेटसाठी परिणामकारक ठरली आहे.

गावाकडच्या मुलांना जरा जास्त कष्ट घ्यावे लागतात, जरा जास्त झगडा करावा लागतो, असं मला नेहमी वाटतं. जरा चांगल्या स्तरावर तुम्ही खेळू लागलात, की सामने खेळायला रेल्वेनं प्रवास करायला लागतो. सामने बऱ्याच वेळा थंडीच्या मोसमात असतात- म्हणजेच तुमच्या किट बॅगसोबत जी बॅग असते, त्यात निम्मी जागा ब्लॅंकेटनं घेतलेली असते. जाताना कधीकधी रिझर्व्हेशन करून प्रवास करायला मिळतो. येतानाची तारीख पक्की नसते- कारण तुमच्या जिंकण्या-हरण्यावर ती अवलंबून असते. लवकर हरलात, तर तुम्हाला लगेच परत पाठवलं जातं- म्हणजे रिझर्व्हेशनचा सवालच नसतो. माझ्या वैयक्तिक आयुष्यात रेल्वे डब्यात टॉयलेटशेजारी बसून प्रवास नेहमी व्हायचे. नेहमीच्या जीवनात आपण छोट्या असुविधांवरून कुरकुरत असतो. तुम्हाला मोठं काही तरी सिद्ध करून दाखवायचं असेल, तर या अडचणी तुम्ही न कुरकुरता सहज पार करता- कारण तुमचं ध्येय मोठं असतं.

यशाकरता अतिरिक्त मेहनत करण्याबाबत ः
धोनी : यश मिळवायचं झालं, तर मेहनत सर्वात महत्त्वाची आहे, याबाबत शंका नाही; पण त्याबरोबर तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असणं तितकंच गरजेचं आहे. लहान वयात खेळ खेळायला लागलो, तर साधारणपणे दहावीत असतानाच आपल्या ताकदीचा अंदाज येतो. आपण खेळात प्रगती करू शकतो का अभ्यासात हे समजू लागतं. गरज असते ती पालक, खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी प्रामाणिक राहण्याची. खेळात समज जास्त असेल, तर नक्कीच त्या मुलानं किंवा मुलीनं खेळात जीव ओतावा. मात्र, आपल्यात लांबचा पल्ला गाठायची क्षमता कमी आहे आणि अभ्यासात गती जास्त आहे, असं लक्षात आलं, तर ते मान्य करून, तसा निर्णय घेऊन अभ्यासात तन-मन गुंतवायला हवं. फक्त हे मोलाचे निर्णय घ्यायला स्वत:शी प्रामाणिक असणं गरजेचं आहे.

मला इतकंच सांगायचं आहे, की ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण असते त्याकडं लक्ष द्या. कोणत्याही संघामध्ये निवड होणं न होणं आपल्या हाती नाहीये. त्याचा विचार करत बसायचा नाही. तुमच्या हाती आहे असतं ते म्हणजे सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी धडपड करत राहणं. त्याच्यावर लक्ष केंद्रीत करा. तुमच्यापेक्षा कोणी थोडा चांगला किंवा थोडा वाईट असला, तर निवडीच्या बाबतीत झुकतं माप दुसऱ्याला मिळायची संधी असते. मात्र, गुणात्मक फरक वाढला, तर समोरच्याला संधीच राहत नाही तुम्हाला डावलायची. एक गोष्ट लक्षात घ्या ः आपण अभ्यास किती केला आहे आणि आपल्याला पेपर कसा गेला आहे, हे प्रत्येक मुला-मुलीला पक्कं माहीत असतं. त्यामुळं निकालाच्या दिवशी, आपल्याला साठ टक्के मिळणार का ऐंशी टक्के, याचा साधारण अंदाज असतो. हा अंदाज थोडा इकडं-तिकडं होऊ शकतो; पण तुम्ही पेपर साठ टक्के मिळणारा लिहिला आहे आणि तुम्हाला नव्वद टक्के मिळाले आहेत, किंवा अभ्यास खूप केला आणि साठच टक्के मिळाले, असं कधी होत नाही.
गेली काही वर्षं मी मेहनतीला पर्याय शोधतो आहे...पण मला अजून तरी पर्याय मिळालेला नाही. थोडक्‍यात खेळ असो, वा अभ्यास मेहनत करणं अपरिहार्य आहे. अपार कष्ट, त्यात निर्माण केलेलं शिस्तपूर्ण सातत्य याला खरंच पर्याय नाही. आपल्या पालकांचं किंवा प्रशिक्षकांचं म्हणणं समजून घेऊन ऐकणं गरजेचं असतं. त्यांनी जास्त पावसाळे बघितलेले असतात, म्हणून त्यांच्या सल्ल्यांना कमी लेखणं आपल्यालाच तोट्याचं ठरतं.

अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे लोक म्हणतात ः चुकांतून शिकत जा...पण धडा मिळण्यासाठी तुम्ही स्वत:च चूक करायला पाहिजे असं नसतं...दुसरा चूक करताना आपण बघतो, त्यातून धडा नाही का घेता येत?... तुमचे नाक-कान-डोळे उघडे असले, तुम्ही बरोबर निरीक्षण करत असलात तर काय बरोबर, काय चूक हे समजतंच की! आपल्यात काही उणिवा असल्या, तर त्यात काहीही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. उलट ते मान्य करून त्यावर उपाय योजणं हेच प्रगतीचं लक्षण ठरू शकतं.

कष्टाच्या प्रक्रियेत सातत्य राखणं हाच खेळाडूचा खरा धर्म आहे. यश मिळालं नाही, म्हणून प्रयत्न सोडून देणं मला मान्य नाही. कित्येक वेळा आपण कष्ट करूनही अपेक्षित यश मिळालं नाही, तर कष्ट सोडून देण्याचा विचार करतो. बऱ्याच वेळेला यश पुढच्याच पावलावर तुमची वाट बघत असतं. तुम्ही संयम दाखवण्याची गरज असते.

पालकांनी काय करायला हवं याबाबत ः
धोनी : मला पालकांना नम्र विनंती करायची आहे. मुलांना घरात अडकवून ठेवू नका. त्यांना टीव्ही, लॅपटॉप, टॅब आणि मोबाईलमध्ये गुंतू देऊ नका. त्यांना बाहेर जाऊन मैदानात खुल्या वातावरणात खेळूदेत. दर चार वर्षांनी ऑलिंपिक्‍स आलं, की सगळ्यांना मेडल हवं असतं. मात्र, प्रत्यक्षात जरा ऊन वाढलं, की पालक म्हणतात ः ‘बाहेर जाऊ नकोस... हा घे टॅब आणि बस घरात खेळत.’ मुलं आयपॅडवर खेळत बसली, तर ऑलिंपिक मेडलचा विचार तरी करणं बरोबर आहे का? मला पालकांना इतकंच सांगायचं आहे, की मुलाला खेळात भविष्य घडवता आलं, तर त्यासारखी मजा नाही. समजा  दुर्दैवानं जमलं नाही, तरी जी मुलं भरपूर खेळतात, त्यांना अभ्यासात आकलन जास्त वेगानं होतं, हे सत्य आहे. स्मरणशक्तीपासून ते एकाग्रतेपर्यंत बऱ्याच गोष्टी खेळामुळं तुम्हाला मिळतात, हे लक्षात घ्या. बाकीचं सोडा हो... तंदुरूस्त राहण्याचा फायदा वेगळा सांगायची गरज नाही...आणि त्यासाठी मैदानावर जाऊन मनमोकळेपणानं खेळण्याला पर्याय आहे का? आपण ही काळजी घेतली नाही, तर पुढच्या पिढीत ताकदीचा वारसा जपला कसा जाणार? मोठे चष्मे लावून लहान वयात आयपॅडवर खेळणाऱ्या मुलांपेक्षा गरजेच्या वेळी पळत जाऊन बस पकडू शकणारी मुलं मला जास्त आवडतात.

दुसऱ्यांच्याही यशामध्ये आनंद शोधण्याबाबत आणि जीवघेण्या स्पर्धेबाबत ः
धोनी :
सांघिक खेळ खेळण्याचे बरेच फायदे आहेत. त्यात दुसऱ्यांच्याही यशात आनंद शोधणं तुम्हाला शिकावं लागतं. साधी गोष्ट आहे- कोणी सातत्यानं यश किंवा अपयश मिळवत नसतो. ते एक चक्र असतं- ज्यात कधी यश मिळतं, तर कधी अपयश. फरक इतकाच असतो, की महान खेळाडू चुका परत करत नाही आणि यश टिकवायला अपार मेहनत करत राहतो. क्रिकेटचं उदाहरण बघा. काही लोक म्हणतात- संघात फलंदाज पाच-सहा असतात आणि गोलंदाज चार-पाच असतात. विकेटकीपर एकच असतो. मी म्हणतो, की फलंदाज आणि गोलंदाजांच्या जागेकरता २५ चांगले खेळाडू धडपडत असतात. विकेटकीपरच्या जागेसाठी तीन-चारच खेळाडूंच्यात स्पर्धा असते. स्पर्धेकडं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे, यावर सगळं ठरत असतं. मला सकारात्मक विचार करायला नेहमी आवडतं. मी विकेटकीपर असलो, तरी मला पार्थिव पटेल किंवा रिद्धिमान सहाला संघात घेऊन खेळताना कधीही असुरक्षित वाटलं नाही. संघाच्या भल्याकरता जो सर्वोत्तम संघ निवडायला हवा तोच मी निवडत आलो आहे.

वर्तमानात राहण्याबाबत ः
धोनी: अगदी सरळ साधी गोष्ट आहे. मी केलेल्या चुकांतून काय शिकायला पाहिजे इतकंच मी भूतकाळातून स्वतःसाठी घेतो. संपूर्ण लक्ष वर्तमानकाळावर एवढ्याकरता देतो, की या क्षणाला मी काय करतो आणि किती एकाग्रतेनं करतो, यावर तर भविष्य अवलंबून आहे ना! वर्तमानावर लक्ष बरोबर दिलं, की भविष्य आपोआप घडतं, ही माझी ठाम समजूत आहे. म्हणून मी भूतकाळात रमत नाही आणि भविष्यात डोकावून बघायला जात नाही. कठीण परिस्थितीत फलंदाजी करायला जाताना मी पुढं काय होईल किंवा माझ्याच नशिबी अशी अवस्था का असा नकारात्मक विचार करत बसत नाही. उलट, संघाला गरज असताना अशा परिस्थितीत धावा करून विजय मिळवून देऊन हिरो बनायची ही सुवर्णसंधी आहे, असा विचार मी करतो. मग मी मोठे विचार न करता फक्त पाच षटकांचा टप्पा डोक्‍यात ठेवतो आणि नंतर फक्त पुढच्या एका चेंडूवर लक्ष केंद्रीत करतो. तसंच क्रिकेट चांगलं खेळलो, तर बाकी सर्व गोष्टी आपोआप चांगल्या होतील, हे मला पक्कं माहीत असतं. यश-अपयशापेक्षा चांगला माणूस बनून जगणं मला जास्त मोलाचं वाटतं. क्रिकेट काय आज आहे उद्या नाही!
महेंद्रसिंह धोनीवर लोक इतकं प्रेम का करतात, हे त्याचे विचार ऐकल्यावर समजतं. धोनीला चाहते नुसता ‘वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन’ म्हणून लक्षात ठेवणार नाहीत, तर एक अत्यंत सर्जनशील चांगला माणूस म्हणून त्याला जास्त स्मरणात ठेवतील.

Web Title: sunandan lele's article in saptarang