"घटना नसती तर पत्नी असती'! (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 6 मे 2018

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं ः "...पण समजा राज्यघटनेच्या मर्यादा नसत्या आणि तुम्ही दोन टर्मनंतरही पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हावं असं लोकांना वाटलं, तरी तुमची पत्नी मिशेल तुम्हाला रोखेल म्हणजे नेमकं काय करेल?''
ओबामा ताबडतोब उत्तरले होते ः ""मी जर सत्तेची हाव धरली तर मिशेल मला घटस्फोट देईल!''

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं ः "...पण समजा राज्यघटनेच्या मर्यादा नसत्या आणि तुम्ही दोन टर्मनंतरही पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हावं असं लोकांना वाटलं, तरी तुमची पत्नी मिशेल तुम्हाला रोखेल म्हणजे नेमकं काय करेल?''
ओबामा ताबडतोब उत्तरले होते ः ""मी जर सत्तेची हाव धरली तर मिशेल मला घटस्फोट देईल!''

"अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार एका व्यक्तीनं राष्ट्राध्यक्ष होण्यावर दोन टर्मची मर्यादा आहे. ती नसती तर तुम्ही तिसऱ्या टर्मसाठी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिला असतात का?''
प्रसिद्ध पत्रकार डेव्हिड लेटरमन यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना एका प्रकट मुलाखतीत हा प्रश्‍न विचारला होता.
ओबामा उत्तरले होते ः ""घटना नसती तर मिशेल होती!'' यावर लेटरमन म्हणाले ः ""काही समजलं नाही!''
ओबामा म्हणाले ः ""राज्यघटनेनं जरी मर्यादा घालून दिली नसती तरी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा विचारही माझी पत्नी मिशेल हिनं मला करू दिला नसता! आपल्याला जे काही करायचं आहे, ते ठराविक कालमर्यादेतच केलं पाहिजे. जे लोकांना आवडेल त्याचं लोक स्वागत करतील. जे आपल्याला जमलं नाही ते करण्याची संधी दुसऱ्या नेत्याला मिळाली पाहिजे.''

ओबामा यांनी सत्तेच्या मागं धावत न जाता आयुष्यातल्या इतरही गोष्टींची मजा लुटायला हवी, असा मिशेल यांचा आग्रह आहे. अमेरिकेतली सर्वच राजकीय नेत्यांची कुटुंबं तशी नाहीत. क्‍लिंटन, बुश व ट्रम्प या तीन कुटुंबांचा सत्तेचा हव्यास जगभर सगळ्यांना माहीत आहे; पण ही तीन कुटुंबं अपवादात्मक आहेत. सर्वसाधारणतः राजकीय नेत्यानं सत्तास्पर्धेत सहभागी होण्यावर मर्यादा असाव्यात, असा तिकडच्या नेत्यांच्या कुटुंबीयांचा आग्रह असतो. "सगळ्यांना संधी मिळावी,' असा उदात्त हेतू काही त्यामागं नसतो, तर सत्तास्पर्धेपेक्षा कौटुंबिक जीवनात रमणं, एखाद्या व्यवसायात पारंगत होणं, सुटीच्या कालावधीत जगाची सफर करणं, चांगलं साहित्य वाचणं, खेळांचा आनंद घेणं या गोष्टींना महत्त्व दिलं जावं, असा उद्देश असतो.
अमेरिका, कॅनडा व युरोपमध्ये कर्तृत्ववान व्यक्ती राजकारणात खूप वेळ काढत नाहीत. कारण, आर्थिक नुकसान होतं. माझा मित्र निकोलो रिनाल्डी हा युरोपीय पार्लमेंटचा सदस्य होता. मागच्या निवडणुकीत तो निवृत्त झाला व त्यानं प्रशासनात नोकरी स्वीकारली. मी कारण विचारलं तर म्हणाला ः ""एक सनदी अधिकारी म्हणून मला संसदसदस्यापेक्षा दुप्पट पगार मिळतो. संसदेत खासदार बनून योगदान देता येतं. ते एक टर्म केलं. आता व्यवस्थित उत्पन्न मिळवण्यासाठी चांगली नोकरी मिळाली ती स्वीकारली. पत्नीला व मुलांना हायसं वाटलं. खासदार असताना मी तुला नेहमी चहा प्यायला बोलावत असे. आता भोजनासाठी ये!''
***

सन 1977 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी निष्णात कायदेपंडित नानी पालखीवाला यांना केंद्रीय मंत्र्याचा दर्जा देऊन अमेरिकेत भारताचं राजदूतपद स्वीकारण्याची विनंती केली होती. पालखीवाला हे पद स्वीकारण्यासाठी तयार नव्हते. "त्यामुळं आर्थिक नुकसान होईल,' असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र, देशाची सेवा करण्याच्या हेतूनं त्यांनी दोन वर्षांसाठी ते पद स्वीकारलं. ठरल्यानुसार, ते दोन वर्षांत राजीनामा देऊन मुंबईला परतले.

राजकीय पदाला "नाही' म्हणणाऱ्यांमध्ये भारतात नानी पालखीवाला हे एक अपवाद होते. नानाजी देशमुख हे दुसरे अपवाद. मोरारजी देसाई यांनी नानाजींनाही उद्योगमंत्री होण्याचा आग्रह धरला होता; पण नानाजी "नाही' म्हणाले व काही काळानं वयाच्या 60 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झाले. नानाजींनी जनसंघाचा म्हणजे सध्याच्या भारतीय जनता पक्षाचा उत्तर प्रदेशात पाया रचला. त्यांना सत्तेचं आकर्षण नसल्यामुळं त्यांचे समाजवादी नेत्यांशी चांगले संबंध होते. सगळ्याच पक्षांत त्यांना मान होता. ग्रामीण अर्थनीतीचं त्यांना ज्ञान होतं. स्वतः कोणतीही अभिलाषा न बाळगता, सत्तेसाठी धडपड न करता, जाहिरातींवर पैसे खर्च न करता, केवळ लोकाग्रहाच्या बळावर नानाजी सत्तेच्या अत्युच्च पदी जाणं शक्‍य होतं; परंतु या कर्तृत्ववान नेत्यानं राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्त्वाचं मानलं व सत्तेपेक्षा समाजाला प्राधान्य दिलं. सत्तेपासून दूर राहण्यासाठी नानाजींकडं सद्‌सद्विवेकबुद्धी होती आणि राष्ट्रकारण अथवा राजकारण याला किती महत्त्व द्यायचं हे पाहण्याची दृष्टी होती.

भारतात पालखीवाला व नानाजी यांच्यासारख्या उत्तुंग विचारांच्या व्यक्ती अपवादात्मक आहेत. पाश्‍चिमात्य देशांतही क्‍लिंटन व ट्रम्प यांच्यासारखी सत्तापिपासू कुटुंबं अपवादात्मक आहेत. रशिया, चीन, कंबोडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अशा आशियातल्या देशांत व आफ्रिकेतल्या अनेक देशांत सत्तेची हाव अमर्यादित प्रमाणात दिसते. सर्वसाधारणतः थोडे अपवादात्मक नेते सोडले तर युरोप खंडात नेते व त्यांचे कुटुंबीय हे सत्तेत राहण्याबाबत स्वतःहूनच मर्यादा घालून घेतात.

पूर्व व पश्‍चिम युरोप यांना एकत्र आणणारी "ओएससीई' (ऑर्गनायझेशन फॉर सिक्‍युरिटी अँड को-ऑपरेशन इन युरोप) नावाची संघटना आहे. 56 देश तिचे सभासद आहेत. या संघटनेच्या महासचिवांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांप्रमाणे राष्ट्रप्रमुखांचा दर्जा व राजशिष्टाचार मिळतो. संघटनेचं मध्यवर्ती कार्यालय व्हिएन्ना इथं आहे. थॉमस ग्रेमिंगर हे सध्या महासचिव आहेत.

मला अलीकडं या संघटनेनं त्यांच्या काही सदस्यराष्ट्रांतल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचं निमंत्रण दिलं होतं. दिवसभर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. रात्री ग्रेमिंगर यांनी मला भोजनासाठी बोलावलं. ते मला घेण्यासाठी आले व गाडीतून बाहेर येऊन उभे राहिले. ते म्हणाले ः ""तुमच्या भेटीचा सविस्तर वृत्तान्त मला मिळाला आहे; पण माझ्या अधिकाऱ्यांना न सांगता प्रत्यक्ष मला काही सांगायचं असेल तर इथंच उभं राहून आपण थोडा वेळ बोलू या. गाडीत बरोबर पत्नी आहे. तिच्या समोर राजकीय चर्चा नको. नाहीतर रात्री मला घरी गेल्यावर ती रागावेल!''
त्यानंतर आम्ही रात्रीचे साडेसात ते साडेबारा एवढा वेळ ऑक्‍सफर्ड विद्यापीठ, युरोपमधली सामाजिक परिवर्तनं, युवकांचे प्रश्‍न अशा विषयांवर गप्पा मारल्या. विशेष म्हणजे आम्ही भोजनाच्या स्थळी पोचल्यावर ग्रेमिंगर यांची पत्नी मला म्हणाली ः ""हे बघा, इथून तुमचं हॉटेल व आमचं घर फार लांब नाही. तेव्हा तुमची हरकत नसेल तर मी गाडी व चालक परत पाठवते. आपण एका उंची रेस्तरॉंमध्ये मेजवानी करायची व खाली वाहनचालकानं चार तास गाडीत उपाशी बसायचं हे पूर्णतः चूक आहे. तुम्हाला रस्ता सापडणार नाही अशी धास्ती वाटत असेल तर आम्ही दोघं तुमच्या हॉटेलपर्यंत बरोबर चालत येऊ.'' मी मुक्कामाला असलेल्या हॉटेलपर्यंत ग्रेमिंगर पती-पत्नी रात्री साडेबाराला चालत आले व मी सुखरूप पोचल्याची खात्री करून घेऊन परतले.

भारतातल्या राजकीय नेत्यांना सत्तेची अमर्याद लालसा का आहे, ते मला अजून समजलं नाही. काहीजण म्हणतात ः "सत्ता प्राप्त करून समाजात परिवर्तन घडवून आणता येतं म्हणून सत्ता हवी.' मात्र, स्वामी विवेकानंद, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण आदींनी एकही पद न स्वीकारता एवढं परिवर्तन केलं आहे की त्याची सर कोणत्याही पदाधिकारी नेत्याला येणार नाही.
काही जण म्हणतात ः "सत्तेमुळं खूप सन्मान मिळतो...' मात्र, डॉ. होमी भाभा, पु. ल. देशपांडे आदींसारख्या असंख्य नामवंतांना लोकांकडून एवढा सन्मान मिळाला आहे, की महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याला एवढं भाग्य क्वचितच लाभलं असेल.
काही जण म्हणतात ः "राजकारण हे सत्तास्पर्धेसाठी आहे, तिथं कुणी संत बनण्यासाठी येत नाही...' मात्र, बरेचसे राजकीय नेते हे संत, साधू, बाबा यांच्यामागं धावतात. त्यांच्या पायांशी लोटांगण घालतात व एखादा बाबा रामरहीम जर कायद्याच्या कचाट्यात सापडला तर नेतेमंडळी दुसऱ्या बाबाच्या शोधात जातात.
लेटरमन यांनी घेतलेल्या ओबामा यांच्या मुलाखतीचा उल्लेख मी या लेखाच्या सुरवातीला केला आहे. याच मुलाखतीत लेटरमन यांनी ओबामा यांना विचारलं होतं ः ""पण समजा राज्यघटनेच्या मर्यादा नसत्या आणि तुम्ही राष्ट्राध्यक्ष व्हावं असं लोकांना वाटलं, तरी तुमची पत्नी तुम्हाला रोखेल म्हणजे नेमकं काय करेल?'' ओबामा ताबडतोब उत्तरले होते ः ""मी जर यापुढं सत्तेची हाव धरली तर मिशेल मला घटस्फोट देईल!''
समजा, जगातल्या सगळ्याच सत्तापिपासू नेत्यांच्या पत्नींनी हा विचार केला तर?

Web Title: sundeep waslekar write article in saptarang