स्वातंत्र्य म्हणजे काय? (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 13 ऑगस्ट 2017

‘स्वातंत्र्य’ म्हणजे स्वतःचं तंत्र, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था व स्वतःचं बंधन. ‘स्वातंत्र्य’ हा केवळ शब्द नाही. ‘परकीय शक्तीपासून मुक्ती मिळालेली स्थिती’ एवढंच या शब्दाचं वर्णन नाही, तर ‘स्वातंत्र्य’ ही एक संकल्पना आहे व या संकल्पनेचा उगम भारतीय तात्त्विक विचारांत आहे. ‘स्वातंत्र्य’ म्हणजे मुक्ती, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम होय. हे सूत्र आपल्याला मनात खोलवर रुजवावं लागेल. आपले नेते व नागरिक असं अर्थपूर्ण स्वातंत्र्य देशात सर्वत्र प्रस्थापित करतील, अशी आशा येत्या स्वातंत्र्य दिनानिमित्त करू या.

‘स्वातंत्र्य’ म्हणजे स्वतःचं तंत्र, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था व स्वतःचं बंधन. ‘स्वातंत्र्य’ हा केवळ शब्द नाही. ‘परकीय शक्तीपासून मुक्ती मिळालेली स्थिती’ एवढंच या शब्दाचं वर्णन नाही, तर ‘स्वातंत्र्य’ ही एक संकल्पना आहे व या संकल्पनेचा उगम भारतीय तात्त्विक विचारांत आहे. ‘स्वातंत्र्य’ म्हणजे मुक्ती, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम होय. हे सूत्र आपल्याला मनात खोलवर रुजवावं लागेल. आपले नेते व नागरिक असं अर्थपूर्ण स्वातंत्र्य देशात सर्वत्र प्रस्थापित करतील, अशी आशा येत्या स्वातंत्र्य दिनानिमित्त करू या.

दरवर्षी १५ ऑगस्टला आपण आनंदोत्सव साजरा करतो. इंग्लिशमध्ये ज्याला Independence Day म्हणतात त्याचं आपण मराठीत ‘स्वातंत्र्यदिन’ असं भाषांतर केलेलं आहे. वास्तविक, ‘इंडिपेंडन्स’ या शब्दाचा अर्थ ‘कुणाचंही आपल्यावर बंधन नाही अशी स्थिती,’ असा आहे. मात्र, ‘स्वातंत्र्य’ म्हणजे स्वतःचं तंत्र, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था व स्वतःचं बंधन असा अर्थ होतो. जगात इतर कोणत्याही देशात अथवा भाषेत ‘इंडिपेंडन्स’चा अर्थ ‘स्वतःचं नियंत्रण’ असा केलेला माझ्या तरी माहितीत नाही.

‘स्वातंत्र्य’ हा केवळ शब्द नाही. ते केवळ ‘परकीय शक्तीपासून मुक्ती मिळालेली स्थिती’ असं वर्णनही नाही, तर ‘स्वातंत्र्य’ ही एक संकल्पना आहे व या संकल्पनेचा उगम भारतीय तात्त्विक विचारांत आहे. ‘भारतीय तत्त्वज्ञान’ हे केवळ कुण्या एका ऋषीच्या चिंतनातून आलेलं नाही, तर हजारो वर्षांपूर्वीपासून निसर्गाचं अवलोकन करून अनेक विद्वानांनी अनेक ग्रंथांमधून, काव्यांतून व इतर विविध प्रकारच्या उक्तींमधून गुंफलेली ती विचारसरणी आहे.

निसर्गावर स्वतःचं नियंत्रण असतं. झाडं नेहमी २००-३०० फुटांपेक्षा कमी उंचीची असतात. अमेरिकेत ‘रेडवूड’ नावाचं ४०० फूट उंचीचं झाड आहे, ते अपवादात्मकच; पण हा अपवाद जरी हिशेबात धरला तरी निसर्गानं स्वतःच ४०० फुटांची मर्यादा झाडाच्या उंचीसाठी राखली आहे.
मानवाच्या उंचीवरही नऊ फुटांची मर्यादा निसर्गानंच ठेवलेली आहे. जगात नऊ फुटांहून उंच एकही माणूस नाही. वास्तविक, सात-साडेसात फुटांहून उंचदेखील खूप कमी लोक आहेत.
आपल्या आयुर्मानावरही नैसर्गिक मर्यादा आहेत. शंभरीपलीकडं जीवन जगणारे खूप कमी लोक आहेत व १२५ वर्षांपेक्षा जास्त वृद्ध असा कुणी माणूस पृथ्वीतलावर नाही. चीनमध्ये कधीकाळी २५६ वर्षांचा पुरुष होता, अशी अफवा आहे. मात्र, त्याबाबतचा शास्त्रीय पुरावा कुणाकडंही नाही. निसर्गानं माणसाच्या वयावर १२५ वर्षांची कमाल मर्यादा स्वतःच ठेवलेली आहे. सगळ्याच प्राण्यांच्या आयुर्मानावर मर्यादा आहे.
आपली वैचारिक बैठक निसर्गाच्या नियमांपासून प्रेरणा घेऊन तयार झालेली असल्यामुळं ‘आपल्यावर नियंत्रण असावं’, अशी संकल्पना आपल्या देशात व समाजात वाढणं साहजिकच आहे.

राजकीय व कायदेशीरदृष्ट्या आपण १५ ऑगस्ट १९४७ ला पारतंत्र्य संपवलं; परंतु आपण स्वतंत्र झालो आहोत का? म्हणजे आपण स्वतःवर स्वतःचं नियंत्रण असण्याची सामाजिक पद्धती प्रस्थापित केलेली आहे का?
जेव्हा आपण रस्त्यात अथवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी थुंकतो, तेव्हा आपलं आपल्यावर नियंत्रण नसतं.
जेव्हा आपण आपल्या वैचारिक बैठकीस विरोध असणाऱ्या व्यक्तीला गर्दी करून मारतो व हिंसाचार करतो, तेव्हा आपलं आपल्यावर नियंत्रण नसतं.
जेव्हा आपण कमकुवत व्यक्तींना अथवा सामाजिक घटकांना जाणूनबुजून फसवतो, तेव्हा आपल्यावर आपलं नियंत्रण नसतं.
असे सगळ्या प्रकारचे हिंसाचार, फसवणूक वा समाजविघातक कृत्यं आपण करतो, तेव्हा आपण ‘स्वतंत्र’ नसतो, तर स्वैराचारी असतो. पारतंत्र्य झुगारल्यानंतर आपण स्वतंत्र नागरिक बनण्याची इच्छा धरली. प्रत्यक्षात नेत्यांपासून ते नागरिकांपर्यंत अनेक वेळा असे प्रसंग घडतात, की आपल्याला स्वातंत्र्य व स्वैराचार यातला फरकच कळत नाही, असं वाटतं.
रोजच्या जीवनात ‘स्वातंत्र्य’ हे तत्त्व धरून कसं वागावं, हे स्वातंत्र्याच्या ३०० वर्षं आधी होऊन गेलेल्या
संत रामदास स्वामींनी चांगल्या पद्धतीनं शिकवलेलं आहे. ते म्हणतात ः

अती लोभ आणि जना नित्य लाज
अती त्याग तो रोकडा मृत्यू आज।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे।।

अती द्रव्यही जोडते पापरास
अती घोर दारिद्य्र तो पंकवास।
धनें वैभवें त्वा नं केव्हा फसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत
अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत।
खरे तत्त्व ते अल्पशब्द ठसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे।।

अती वाद घेता दुरावेल सत्य
अती ‘होस हो’ बोलणे नीचकृत्य।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे।।

अती भांडणे नाश तो यादवांचा
हठाने अती वंश ना कौरवांचा
कराया अती हे न कोणी वसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे।।

समर्थांच्या वरील उक्तींमध्ये स्वातंत्र्य म्हणजे स्वतःवर नियंत्रण असलेली व्यवस्था करून आर्थिक धोरण, सहिष्णु-असहिष्णु वाद व परदेशांशी संबंध असे सगळे विषय हाताळण्यासाठी मोलाचा उपदेश आहे. त्याचं अनुकरण नेत्यांपासून ते नागरिकांपर्यंत सगळ्यांनी केलं, तर भारत खऱ्या अर्थानं ‘स्वातंत्र्य’ ही संकल्पना वृद्धिंगत करू शकेल.

स्वातंत्र्याच्या विरुद्ध शब्द ‘पारतंत्र्य’ हा आहे; पण सामाजिक आचार-विचारांच्या दृष्टीनं पाहिलं तर ‘स्वातंत्र्याच्या विरुद्ध अतिरेक’ ही संकल्पना आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अथवा सामाजिक घटक अतिरेक करतो, तेव्हा तो स्वतःवरचं नियंत्रण काढत असतो. १९४७ मध्ये आपण स्वतंत्र नव्हतो म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो; पण आपल्यावर जुलूम करणारी ब्रिटिश राजवट ही काही स्वतःवर मानवी तत्त्वांचं नियंत्रण वापरून वागत नव्हती, ती अतिरेकी होती. याशिवाय दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्यांच्यावर अत्याचार करणारी राजवट अतिरेकी होती.

सध्याच्या जगात वसाहतवाद संपुष्टात आलेला आहे. आता दक्षिण अमेरिका खंडात गयाना या देशात फ्रेंचांचं राज्य आहे. पश्‍चिम आशियात ‘वेस्ट बॅंक’ इथं इस्रायलचं राज्य आहे व आफ्रिकेत पश्‍चिम सहारा विभागात मोरोक्कोचं राज्य आहे. हे अपवाद सोडल्यास आता ‘स्वातंत्र्य विरुद्ध पारतंत्र्य’ हा वाद संपुष्टात आलेला आहे. वसाहतवाद व पारतंत्र्य या कल्पनांचा जवळजवळ संपूर्ण जगभरात पराभव झालेला आहे. याचा अर्थ ‘स्वातंत्र्य’ ही कल्पना सर्वत्र रूढ झालेली आहे, असं मात्र नव्हे.

जगातल्या अनेक देशांत व भारतातदेखील स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं कसं जोपासावं, हा प्रश्न येत्या काही वर्षांत महत्त्वाचा ठरेल. त्यासाठी सगळ्या प्रकारच्या अतिरेकाला विरोध करावा लागेल व ‘प्रमाणामध्ये सर्व काही असावे’ हा विचार मनाशी बाळगून देशांतर्गत संबंध व परराष्ट्रसंबंध निर्माण करावे लागतील. याशिवाय, सामाजिक व आर्थिक प्रवासाचे मार्ग बांधावे लागतील. ‘स्वातंत्र्य’ म्हणजे मुक्ती, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम, हे मनात खोलवर रुजवावं लागेल. आपले नेते व नागरिक असं अर्थपूर्ण स्वातंत्र्य देशात सर्वत्र प्रस्थापित करतील, अशी आशा करून वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो.

Web Title: sundeep waslekar write article in saptarang