अशाही काही आकांक्षा (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 17 डिसेंबर 2017

व्यापक परिणाम करणारी आकांक्षा कोणाकडं असेल आणि तिला मूर्त स्वरूप देण्याची तळमळ असेल, तर ती संपूर्ण समाजाची अथवा शहराची आकांक्षा बनते, याची जगात अनेक उदाहरणं आहेत. स्लोवेनियातलं लुबलियाना, संयुक्त अरब आमिरातीमधलं दुबई, आयर्लंडमधलं डब्लिन, इस्टेनियातलं तालिन, कोरियातलं सोल; सॅनफ्रान्सिस्को, सिएटल, सिंगापूर, जीनिव्हा, व्हिएन्ना अशा किती तरी शहरांतले नागरिक अशा आकांक्षा बाळगतात आणि त्या पूर्तीस नेऊन दाखवतात. आकांक्षा प्रामाणिक असतील आणि त्यांच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची तयारी असेल आणि आकांक्षांना भरीव स्वरूप देण्याची समाजाची प्रकृती असेल, तर सर्व काही शक्‍य होतं.

व्यापक परिणाम करणारी आकांक्षा कोणाकडं असेल आणि तिला मूर्त स्वरूप देण्याची तळमळ असेल, तर ती संपूर्ण समाजाची अथवा शहराची आकांक्षा बनते, याची जगात अनेक उदाहरणं आहेत. स्लोवेनियातलं लुबलियाना, संयुक्त अरब आमिरातीमधलं दुबई, आयर्लंडमधलं डब्लिन, इस्टेनियातलं तालिन, कोरियातलं सोल; सॅनफ्रान्सिस्को, सिएटल, सिंगापूर, जीनिव्हा, व्हिएन्ना अशा किती तरी शहरांतले नागरिक अशा आकांक्षा बाळगतात आणि त्या पूर्तीस नेऊन दाखवतात. आकांक्षा प्रामाणिक असतील आणि त्यांच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची तयारी असेल आणि आकांक्षांना भरीव स्वरूप देण्याची समाजाची प्रकृती असेल, तर सर्व काही शक्‍य होतं.

स्लो  वेनिया हा तसा एक गरीब देश आहे. तिथल्या मध्यमवर्गीयांचं उत्पन्न मुंबई-पुण्यातल्या उच्च मध्यमवर्गीय लोकांसारखं आहे. भारतात बॅंकेत काम करणारा अधिकारी अथवा विद्यापीठातला प्राध्यापक स्लोवेनियाला फिरायला गेला, तर त्याला तिथले भाव भारतात रुपयांतल्या उत्पन्नाच्या तुलनेत कमी वाटतील. काही गोष्टी तर पुण्यापेक्षा स्वस्त वाटतील.

स्लोवेनियाची राजधानी लुबलियाना हे शहर आहे. शहराच्या मध्य भागातून नदी वाहते. नदीच्या दोन्ही बाजूंना बाजार, दुकानं, विद्यापीठ, सरकारी कार्यालयं आहेत. त्या संपूर्ण विभागात कोणत्याही वाहनाला येण्यास बंदी आहे. सकाळी सात ते नऊ या वेळात फक्त दुकानांत मालवाहतूक करणारे आणि त्या विभागातून कचरा नेणारे ट्रक येतात. एरवी कोणतंही वाहन तिथं जाऊ शकत नाही. केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी एका बॅटरीवर चालणाऱ्या छोट्या बसची सोय केली आहे. कोणी ज्येष्ठ नागरिक, लहान बाळ असलेली माता, अथवा रुग्ण यांना चालणं शक्‍य नसेल, तर त्या बसचा विनाशुल्क वापर करू शकतात.

लुबलियाना शहराच्या मध्यवर्ती भागात वाहनांना बंदी असल्यामुळे प्रदूषण होत नाही. शिवाय संपूर्ण शहरात कुठंही कचरा दिसत नाही. नदीचं पाणी तर आपण ओंजळीनं पिऊ शकतो इतकं निर्मळ आहे. शहरातला कचरा शहराबाहेर नदीत किंवा मोठ्या खड्ड्यांत टाकला जात नाही. सध्या सुमारे ८२ टक्के कचरा विविध स्वरूपात रूपांतर करुन पुन्हा वापरला जातो. २०२५ पर्यंत शंभर टक्के कचऱ्याचा पुर्नवापर करायचा म्हणजे त्याचं खतं, तेल, काही पदार्थ असा विविध प्रकारांत रूपांतर करायचं ही लुबलियाना शहराची आकांक्षा आहे. शहरातल्या सर्वच लोकांची आपलं शहर संपूर्णतः कचरा, अस्वच्छता आणि प्रदूषण यांतून मुक्त व्हावं, अशी आकांक्षा आहे.
लुबलियानात स्वच्छता अभियान हा काही सरकारी कार्यक्रम नाही. तिथल्या लोकांची ऐपत मुंबई-पुण्यातल्या लोकांपेक्षा वेगळी नाही. मात्र, त्यांची आकांक्षा ‘मी स्वतः मोठं घर आणि मोठी गाडी घेऊन मोठ्या पार्टीला जाताना सिग्नलपाशी कसा बिनधास्त थुंकेन आणि पार्टी झाल्यावर उकिरड्याचा मनात विचारही आणणार नाही,’ अशा वैचारिक बैठकीतली नसून, ‘मी एक स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी काही तरी हातभार लावेन,’ अशी आहे. हातभार लावण्याची व्याख्या म्हणजे एखाद्या सामाजिक संस्थेतर्फे माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘नागरी स्वच्छता’ या विषयावर चर्चासत्र घडवून आणणं ही नाही, तर ‘स्वतः स्वच्छतेचे नियम पाळून नगराध्यक्षांना स्वच्छतेचे कायदे आणि योजना बनवण्यासाठी मदत करेन,’ ही आहे. लुबलियाना अशी महत्त्वाकांक्षा असणारं एकटं शहर नाही. जगातल्या अनेक शहरांची कचरा आणि प्रदूषणापासून संपूर्ण मुक्ती करण्याची आकांक्षा आहे.

दुबईला स्वच्छ शहर करण्याची महत्त्वाकांक्षा नाही- कारण दुबई मुळातच तसं स्वच्छ आहे. आपल्याला दुबई म्हणजे खरेदी करण्याचं ठिकाण वाटतं. तिथं बांधकाम क्षेत्रात अनेक मजुरांना आणि व्यापारी क्षेत्रात अनेक भारतीय व्यावसायिकांना उपजीविका मिळाली आहे, हे आपल्याला माहीत आहे. तिथं बेनझीर भुत्तो यांच्यापासून ते दाऊद इब्राहिमपर्यंत भारताला त्रास देणारे लोक राहत होते, हेही आपल्याला माहिती आहे. हे सर्व खरंही आहे.
मात्र, दुबईतल्या युवकांची आकांक्षा वेगळीच आहे. दुबईला ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (artificial Intelligence) या क्षेत्रातलं जगातलं अग्रगण्य संशोधन केंद्र करायचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्या आकांक्षापूर्तीसाठी त्यांना देशाच्या पंतप्रधानांचा सक्रिय पाठिंबा आहे.

दुबई हे ‘संयुक्त अरब आमिरात’ (यूएई) या देशातलं प्रमुख व्यापारी शहर आहे. त्या देशातल्या सरकारचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर काम करणारे चार मंत्री आहेत. त्यापैकी तीन मंत्री २९-३० वयोगटातले आहेत. चौथे मंत्री पन्नाशीच्या आसपासचे आहेत. हे चारही मंत्री मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. कोणाचंही शाही कुटुंबाशी नातं नाही. चारपैकी दोन मंत्री युवती आहेत आणि त्या उच्चविद्याविभूषित असल्यानं त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. हे चार मंत्री आणि आमिराती राष्ट्रीयत्व असलेले युवक एकत्र येऊन त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, जैविक शास्त्र आणि संगणकशास्त्र यांचं मिलन करून दुबईत वैज्ञानिक क्रांती घडवून आणण्याची आकांक्षा बाळगली आहे. विज्ञानाच्या साह्यानं जेलीफिश आणि काही झाडांच्या मुळांच्या पेशींचा जलशुद्धीकरण करण्यासाठी वापर कसा करायचा, हे त्यांचं आणखी स्वप्न. मंगळावर आमिराती नागरिक पोचवण्याचं दुसरं एक स्वप्न. तळघरात पाणी आणि सूर्यप्रकाशाशिवाय जैविक क्रांतीच्या साह्यानं धान्य निर्माण करणं हे एक स्वप्न. अशा विविध स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी दुबईत artificial Intelligence वृद्धिंगत करायचं, ही त्यांची आकांक्षा.

दुबईच्या युवक मंत्र्यांच्या आकांक्षेत सर्वसामान्य युवक मोठ्या संख्येनं सहभागी होतात. ऑक्‍सफर्ड प्रशिक्षित २४ वर्षांच्या मंत्री शमा अल माझरुई या सामाजिक माध्यमांतून खुलं आमंत्रण देऊन युवकांना चर्चा करण्यासाठी बोलावतात. त्यात भाग घेण्यासाठी त्यांची अथवा कोणाचीही ओळख लागत नाही. चर्चेमध्ये प्रथम एका विषयावरच्या समस्येची चर्चा होते आणि उत्तरार्धात त्या समस्येवर तंत्रज्ञानाच्या साह्यानं तोडगा कसा काढता येईल, यावर चर्चा होते. एखादा तोडगा मिळाला, तर त्यासाठी लागणारी सामग्री कशी पुरवता येईल, त्याबाबतची जबाबदारी शमा अल माजरुई यांच्याकडं जाते. चर्चेचा संपूर्ण भर तोडगा शोधणं आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्यासाठी मार्गाक्रमण निश्‍चित करणं यावर असतो.
कोणी टीकाकार म्हणतील, की दुबईत तेलाच्या निर्यातीपासून भरपूर श्रीमंती आल्यानं हे सर्व चालू शकते; परंतु पश्‍चिम आफ्रिकेतले देश तर गरीब आहेत. तिथं- विशेषतः सेनेगालमध्ये पाणी आणि अन्नपुरवठा या समस्यांवर तोडगा काढण्याच्या आकांक्षेनं अनेक युवक, अभ्यासक, अधिकारी आणि राजकीय नेते भारलेले आहेत.
आपलं शहर तंत्रज्ञानाचं अग्रगण्य केंद्र बनावं ही आकांक्षा सॅनफ्रान्सिस्को, सिएटल, सिंगापूर, आयर्लंडमधलं डब्लिन, इस्टेनियातलं तालिन, कोरियातलं सोल अशा अनेक शहरांत दिसते. त्या शहरातले विद्यार्थी, प्राध्यापक, बॅंक अधिकारी, उद्योजक, नागरी अधिकारी असे सर्वच घटक आकांक्षा बाळगून असतात आणि परस्परसहकार्य करून ती पूर्तीस नेण्याचा ध्यास घेतात. त्यांच्या आकांक्षा संकुचित, स्वयंकेंद्रित नसतात, तर त्या व्यापक स्वरूपात असतात.

आपण जगातलं शांतीकार्याचं एक केंद्र बनावं ही आकांक्षा प्रामुख्यानं युरोपातल्या अनेक शहरांत दिसते. जीनिव्हा, व्हिएन्ना, देन हाग, सारायेवो, स्टॉकहोम ही शहरं त्यांत प्रामुख्यानं आहेत. तिथं एखाद्या नवीन कल्पनेच्या आधारानं आंतरराष्ट्रीय सामंजस्य वृद्धिंगत करता येईल असं वाटलं, तर ती कल्पना वास्तवात आणण्यासाठी शहरातल्या अनेक व्यक्ती आणि नेते सामग्री जमा करण्यासाठी पुढं येतात.
व्यापक परिणाम करणारी आकांक्षा कोणाकडं असेल आणि तिला मूर्त स्वरूप देण्याची तळमळ असेल, तर ती संपूर्ण समाजाची अथवा शहराची आकांक्षा बनते, याची जगात अनेक उदाहरणं आहेत. त्यासाठी आकांक्षा प्रामाणिक असावी लागते. मग पैसा, सामग्री, ओळखी यांची गरज लागत नाही. त्याचबरोबर परस्परसहकार्यानं सकारात्मक बदल करण्याची संस्कृती आणि सवय असलेला समाज लागतो. केवळ राजकीय फायद्यासाठी अथवा वर्तमानपत्रांत बातमी प्रसिद्ध होण्यासाठी काही केलं, तर त्याला आकांक्षा म्हणता येत नाही. तो केवळ आकांक्षेचा आभास असतो. यशस्वीरीत्या आभास निर्माण करून प्रसिद्धी, प्रायोजक आणि राजकीय पाठबळ मिळूही शकतं; परंतु परिणाम शून्य होतो. परिवर्तन फक्त ब्रोशरमधल्या गुळगुळीत कागदावरच्या फोटोंमध्येच मर्यादित राहतं. आकांक्षा प्रामाणिक असतील आणि त्यांच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची तयारी असेल आणि आकांक्षांना भरीव स्वरूप देण्याची समाजाची प्रकृती असेल, तर सर्व काही शक्‍य होतं. आपल्याला आभास हवा का आकांक्षा हव्यात, हा विचार आपला आपणच करणं जास्त योग्य होईल.

Web Title: sundeep waslekar write article in saptarang