वादळ-वारं सुटलं गं... (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 18 डिसेंबर 2016

राजकीय, वैज्ञानिक व नैसर्गिक असं तिहेरी वादळ सुटलेलं असताना जगातल्या सगळ्याच देशांत आर्थिक व सामाजिक विषमता वाढत आहे. साधारणतः साडेचार वर्षांपूर्वी हे वादळ-वारं क्षितिजाच्या पलीकडं होतं. या काळात ते पुढं पुढं सरकत पृथ्वीतलावर पसरलं आहे. त्यातून मनुष्याचं जीवन सुखी करणारे महत्त्वाचे बदल होऊ शकतील अथवा महाकाय विध्वंसही होऊ शकेल. या पुढचं प्रत्येक वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे!

राजकीय, वैज्ञानिक व नैसर्गिक असं तिहेरी वादळ सुटलेलं असताना जगातल्या सगळ्याच देशांत आर्थिक व सामाजिक विषमता वाढत आहे. साधारणतः साडेचार वर्षांपूर्वी हे वादळ-वारं क्षितिजाच्या पलीकडं होतं. या काळात ते पुढं पुढं सरकत पृथ्वीतलावर पसरलं आहे. त्यातून मनुष्याचं जीवन सुखी करणारे महत्त्वाचे बदल होऊ शकतील अथवा महाकाय विध्वंसही होऊ शकेल. या पुढचं प्रत्येक वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे!

आपण रोज बातम्या वाचतो व सर्वसाधारणपणे प्रत्येक बातमीकडं सूक्ष्मपणे पाहतो; परंतु या सगळ्या बातम्या एकमेकींशी निगडित असतात. जर आपण या बातम्यांचा एकमेकींशी संबंध काय आहे हे तपासून पाहिलं, तर आपल्याला एक वेगळंच चित्र दिसतं.
गेल्या पाच-सहा वर्षांतल्या घटनांकडं पाहिलं, तर एक प्रचंड मोठं वादळ सुटलं आहे व सगळं जग त्यात सापडलं आहे, हे पटकन कळणार नाही.
अमेरिकेतल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेलं यश, भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियात पुतीन व जपानमध्ये पंतप्रधान शिंझो आबे यांची लोकप्रियता, फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत मरीन ल पेन यांना विजय मिळण्याची शक्‍यता या सगळ्या घटना एकमेकींशी संबंधित आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर १९४५ ते १९८५ या सुमारे ४० वर्षांच्या काळात जगात डाव्या विचारसरणीचं राजकीय प्रभुत्व होतं. त्यात टोकाची भूमिका असलेले साम्यवादी होते. थोडी नरम भूमिका असलेले समाजवादी होते, तर काही डावीकडं झुकणारे उदारमतवादी होते. पंडित जवाहरलाल नेहरू, जॉन केनेडी, फ्रांसवा मित्तरां, हेल्मुट श्‍मित, विली ब्रॅंड अशा नेत्यांनी जगभरातल्या लोकांवर भुरळ टाकली होती. नेत्यापेक्षाही त्याच्या विचारसरणीला जास्त महत्त्व होतं. आर्थिक धोरणात सार्वजनिक क्षेत्राचा वाटा मोठा होता. १९८५-९० नंतर व विशेषतः सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यावर राजकीय मतप्रवाह मध्यममार्गाकडं सरकला. टोनी ब्लेअर हे मजूर पक्षाचे नेते असूनही त्यांनी समाजवादाला सोडचिठ्ठी दिली. भारतात पंतप्रधान नरसिंह राव यांनी उदारमतवादी आर्थिक धोरण स्वीकारलं. अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवडून येऊन राष्ट्राध्यक्ष झालेले बिल क्‍लिंटन पक्षाच्या पारंपरिक विचारसरणीपासून दूर जाऊन मध्यम मार्गाकडं सरकले. आशिया, पश्‍चिम आशिया, आफ्रिका अशा सगळ्याच विभागांत समाजवाद मागं पडू लागला. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे चीननं साम्यवादी विचारसरणी सोडून दिली.

गेल्या पाच- सहा वर्षांत राजकीय मतप्रवाह आणखी उजवीकडं सरकला. या स्थित्यंतराला समाजातल्या सगळ्याच स्तरांतून पाठिंबा मिळाला. डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी, शिंझो आबे हे गरीब, मध्यमवर्गीय व श्रीमंत अशा सगळ्या स्तरांतून मिळालेल्या पाठिंब्यानं प्रबळ झाले. त्यांना स्वतःच्या देशाबाहेरूनही मोठ्या प्रमाणात समविचारी लोकांकडून पाठिंबा मिळाला.

उजव्या विचारसरणीचं राजकीय वादळ मोठ्या वेगानं जगभर पसरत आहे. हे सर्वसामान्य लोकांच्या पाठिंब्यानं शक्‍य झालं आहे. त्याकडं विरोधकांनी नाकं मुरडून पाहिलं, तरी हे वादळ काही शमणार नाही. याची कारणं अनेक आहेत. काही धार्मिक आहेत, काही सामाजिक आहेत, काही आर्थिक आहेत. येत्या काही वर्षांत हे वादळ कुठं कुठं पसरेल व त्याचा काय परिणाम होईल, याचा अंदाज कुण्याही पंडितांनी अजून मांडलेला नाही.

आपलं लक्ष जरी राजकीय वादळाकडं असलं, तरी त्याहीपेक्षा मोठं वादळ वैज्ञानिक क्षेत्रात सुटलं आहे. यात अमेरिका, चीन व काही प्रमाणात जपान, जर्मनी, स्वीडन, स्वित्झर्लंड, कॅनडा, नॉर्वे हे देश पुढं आहेत. मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक क्रांती होण्याची क्षमता सध्या जगातल्या २० देशांमध्ये आहे, त्यात भारतही आहे. भारताची कामगिरी; विशेषतः अवकाशशास्त्रात आहे. अमेरिका व चीन यांनी अवकाशशास्त्र, जैविकशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, नॅनो तंत्रज्ञान या पाच क्षेत्रांत मोठं तुफान उठवलेलं आहे.

चीनकडं सध्या जगातला सगळ्यात वेगवान संगणक आहे. त्याचा वेग २.५ पेटाफ्लॉप आहे. भारतातील सगळ्यात वेगवान संगणकाचा वेग ०.२ पेटाफ्लॉप आहे. खोल अवकाशात पाहू शकणाऱ्या दुर्बिणी तयार करण्याची स्पर्धा चीन व अमेरिका यांच्यात लागली आहे. फुटबॉलची २० मैदानं सामावू शकतील अशी मोठी तबकडी असणारी दुर्बीण चीननं डोंगराळ प्रदेशात बसवली आहे. कृत्रिम जीव, तसंच मनुष्यपेशी व इतर प्राण्यांच्या पेशी यांचा संकर करून नवीन पेशी व जीव तयार करण्याचे मोठे प्रयोग चीन व अमेरिकेत सुरू आहेत. नॅनो तंत्रज्ञानाच्या साह्यानं एका पदार्थाच्या रेणूंचं विघटन करून दुसरा पदार्थ बनवणं आता शक्‍य झालं आहे. इतर ग्रहांवर पाणी शोधणं, अंतराळात मनुष्यवस्तीची तयारी करणं असे अनेक प्रयोग सध्या सुरू आहेत.

जागतिक वैज्ञानिक बदलांचं वारं राजकीय बदलापेक्षा जास्त मोठं वादळ निर्माण करेल. राजकीय विचारप्रणाली दर २०-२५ वर्षांनी बदलते; परंतु सध्या विज्ञान जे आमूलाग्र बदल घडवून आणत आहे, त्यामुळं हळूहळू मानवाच्या उत्क्रांतीवर परिणाम होईल. येत्या ३०-४० वर्षांनंतर मानवोत्तर महाबुद्धिमान जीव निर्माण होतील. आज जे शाळकरी विद्यार्थी आहेत, त्यांना हे बदललेलं विश्व त्यांच्या आयुष्यात पाहायला मिळेल. आज जे महाविद्यालयीन विद्यार्थी व इतर युवक आहेत, त्यांनाही कदाचित हे पाहायला मिळेल.

तिसरं मोठं वादळ नैसर्गिक व हवामानातल्या बदलांमधून पसरत आहे. येत्या १५-२० वर्षांत जगात सर्वत्र पाण्याचं दुर्भिक्ष्य असेल. काही अभ्यासक पाण्याची तुलना तेलाशी करतात; पण ही तुलना चुकीची आहे. तेलाला नैसर्गिक वायू, सौरशक्ती, पवनशक्ती, शेल गॅस असे पर्याय आहेत. पाण्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे पाणी! जगभरातल्या नद्या व तळी हळूहळू क्षीण होत जाऊन वाळवंटी प्रदेश वाढत चालला आहे. दुसरीकडं समुद्राचीही उंची वाढत आहे. भारताभोवतालचे देश म्हणजे पाकिस्तान, चीन व बांगलादेश इथं समुद्राची पातळी वाढल्यानं किनाऱ्याला लागून असलेली हजारो मैलांची जमीन शेतीसाठी कामाची राहिलेली नाही. जमिनीखाली क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे. हवामानबदलामुळं समुद्रावरील दाबाचे पट्टे व मोसमी वारं यात नवीन प्रवाह निर्माण झाले आहेत.
राजकीय, वैज्ञानिक व नैसर्गिक असं तिहेरी वादळ सुटलेलं असताना जगातल्या सगळ्याच देशांत आर्थिक व सामाजिक विषमता वाढत आहे. मी सप्टेंबरमध्ये कोंगोची राजधानी ब्राझव्हिल इथं कामासाठी गेलो होतो. त्या शहरात एक पूल आहे. पुलाच्या एका बाजूला मोठमोठे प्रासाद, सुंदर रस्ते, हिरवीगार झाडं असं वैभव दिसतं. केवळ पाच मिनिटांत पूल ओलांडला की शहराच्या दुसऱ्या भागात गलिच्छ वस्ती, हातगाड्यांवरच मांडलेली दुकानं, रस्त्याच्या बाजूला हताश होऊन बसलेले लोक असं दृश्‍य दिसतं. हे ब्राझव्हिलपुरतंच मर्यादित नाही. काही शहरांत दोन वेगळे आर्थिक विभाग असतात. काही शहरांत टोलेजंग इमारती व झोपडपट्ट्या शेजारी शेजारी असलेल्या आढळतात. एकीकडं वैभवात न्हाऊन गेलेली शहरं, तर दुसरीकडं मागासलेली खेडी असं चित्र दिसतं. अशी विषमता सगळीकडंच आहे. विषमता पसरत नाही, असा जगात आज एकही देश नाही. परिणामी धार्मिक अतिरेक, दहशतवाद, गुन्हेगारी यांचीही वेगानं वाढ होत आहे.

साडेचार वर्षांपूर्वी मी ‘सप्तरंग’मध्ये हे सदर लिहायला सुरवात केली तेव्हा हे वादळ, हे वारं क्षितिजाच्या पलीकडं होतं. गेल्या साडेचार वर्षांत ते पुढं पुढं सरकत पृथ्वीतलावर पसरलं आहे. त्यातून मनुष्याचं जीवन सुखी करणारे महत्त्वाचे बदल होऊ शकतील अथवा महाकाय विध्वंसही होऊ शकेल. गेल्या साडेचार वर्षांचा हा जगाचा संक्षिप्त अहवाल. यापुढचं प्रत्येक वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे!

----------------------------------------------------------------------------------
‘एका दिशेचा शोध’ नव्या वर्षातही !

‘एका दिशेचा शोध’ हे सदर नव्या वर्षात (२०१७) सुरू ठेवावं किंवा थांबवावं, याबाबत वाचकांचा अभिप्राय याच सदरातल्या चार डिसेंबरच्या लेखाद्वारे मागवण्यात आला होता. त्यावर ‘हे सदर सुरूच ठेवावं,’ असं मत सर्वच स्तरांतल्या हजारहून अधिक वाचकांनी मेल, व्हॉट्‌सॲप, ई-सकाळचं संकेतस्थळ (beta1.esakal.com) आदींच्या माध्यमातून व्यक्त केलं होतं. त्यानुसार हे पाक्षिक सदर नव्या वर्षीही सुरूच राहील.
----------------------------------------------------------------------------------

Web Title: sundeep waslekar's saptarang article