नातं शोधणारी ‘वेटिंग रूम’

रेल्वे स्थानकांनी नात्यांचा ‘वियोग’ घडवलेले असे काही चित्रपट. त्यातलाच हा एक. त्याला ‘पडद्यावरची कविता’ म्हणावं की ‘कवितेतून स्फुरलेला चित्रपट?’ की आणखी काही?
naseeruddin shah and rekha
naseeruddin shah and rekhasakal

रेल्वे स्थानकांनी नात्यांचा ‘वियोग’ घडवलेले असे काही चित्रपट. त्यातलाच हा एक. त्याला ‘पडद्यावरची कविता’ म्हणावं की ‘कवितेतून स्फुरलेला चित्रपट?’ की आणखी काही? गुलजार यांचा ‘इजाज़त’ बघताना पस्तीस वर्षांपूर्वी पडलेला प्रश्न आजही पडतो. खुद्द गुलजार यांना कवी म्हणावं की गीतकार म्हणावं, की पटकथा-संवाद लेखक म्हणावं की दिग्दर्शक म्हणून संबोधावं, हे कोडं अनेकदा पडतं, तसाच हा प्रश्न. यातल्या कोणत्याही परिप्रेक्ष्यातून ‘गुलजार’ या व्यक्तीकडे पाहायला गेल्यास आपल्याला जाणवतो मानवी नातेसंबंधांवर अतिशय तरलतेनं भाष्य करणारा एक कविमनाचा माणूस. मग हे नातेसंबंध सामाजिक स्तरावरचे असोत वा पती-पत्नीच्या खासगी समजल्या जाणाऱ्‍या पातळीवरचे असोत.

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘इजाज़त’ हा पती-पत्नीच्या असफल नात्याचा वेध घेणारा गुलजार यांचा एक महत्त्वाचा चित्रपट. (त्याआधी ‘अचानक’ व ‘आंधी’ या कलाकृतींमधून त्यांनी हा विषय हाताळला होता आणि ‘इजाज़त’च्या आगेमागेच तयार झालेला ‘लिबास’ हाही याच मालिकेत शोभणारा; परंतु रूढ अर्थाने अप्रदर्शित राहिलेला आणखी एक चित्रपट. तो प्रेक्षकांपर्यंत पोचता तर गुलजार यांचं हे आगळं ‘चित्र-चतुष्ट्य’ पूर्ण झालं असतं. असो.)

एक मात्र खरं की, वर उल्लेख केलेले गुलजार यांचे चित्रपट केवळ पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारे नसतात, तर समाजजीवनाचे इतर कंगोरेही त्यातून झळकत असतात. ‘इजाज़त’पुरतंच बोलायचं तर, विवाहसंस्थेचं पावित्र्य, लीव्ह इन रिलेशनशिप’ या मुद्द्यांवर हा चित्रपट सूचक भाष्य करून जातो. बंगाली लेखक सुबोध घोष यांच्या ‘जतुगृह’ (लाक्षागृह) या कथेवर हा चित्रपट बेतलेला होता. याच कथेवर १९६४ मध्ये तपन सिन्हा यांनी त्याच नावानं एका बंगाली चित्रपटाची निर्मिती केली होती. ‘इजाज़त’ बनवताना गुलजार यांनी या कथेचा एक धागा घेतला असला, तरी कथेचं श्रेय त्यांनी सुबोध घोष यांना दिलं होतं.

चित्रपटाचा आरंभ आणि शेवट रेल्वेच्या एका वेटिंग रूममध्ये घडतो. कुठल्याशा रेल्वे स्थानकावर एका पावसाळी रात्री आलेल्या गाडीतून महेंद्र (नसिरुद्दीन शाह) उतरतो. सकाळी दुसऱ्‍या गाडीने अन्य ठिकाणी मार्गस्थ व्हायचं असल्याने रात्रीचा मुक्काम त्याला वेटिंग रूममध्ये करायचा असतो. तिथं सुधा नावाची एक स्त्री (रेखा) आधीपासूनच थांबलेली असते. तिलाही बहुधा दुसऱ्‍या गाडीची प्रतीक्षा असावी. त्याला अचानक तिथं पाहून ती चमकते आणि हातातल्या मासिकाआड स्वतःचा चेहरा लपवते; पण तो प्रयत्न फार वेळ टिकत नाही आणि दोघांची नजरानजर होते. महेंद्र आणि सुधा हे एकेकाळचे पती-पत्नी. त्यांना विभक्त होऊन आता पाच वर्षं उलटलेली असतात. एवढ्या काळानंतर प्रथमच त्यांची भेट होते आणि संवादातून उलगडतात दोघांच्या आयुष्यातल्या काही ज्ञात व काही अज्ञात गोष्टी.

महेंद्र हा शहरात काम करणारा व्यावसायिक छायाचित्रकार असतो. पाचगणीला राहणारे त्याचे आजोबा अर्थात ‘दादू’ (शम्मी कपूर) यांनी त्यांच्या स्नेही कुटुंबातल्या सुधाशी त्याचं लग्न काही वर्षांपूर्वी ठरवून ठेवलेलं असतं. पाचगणीत शिक्षिकेची नोकरी करणारी सुधा ही सुंदर, सुशील, पारंपरिक वळणाची आणि ठाम विचारांची मुलगी असते. ठरलेलं लग्न लवकर पार पडावं असा सुधाच्या विधवा आईचा नि महेंद्रच्या आजोबांचाही आग्रह असतो. महेंद्र मात्र शहरातली त्याची मैत्रीण माया (अनुराधा पटेल) हिच्या प्रेमात पडलेला आणि तिच्यासोबत लीव्ह-इन’मध्ये राहणारा. माया ही कविमनाची, रूढ संकेतांना न जुमानता स्वच्छंदीपणे जगू पाहणारी, मुक्त विचारांची मुलगी असते. ‘लहरी’ हा शब्द थिटा ठरावा अशा वृत्तीची, आई-वडिलांपासून वेगळी राहणारी ही माया. तिचं वागणं अतर्क्य, अनाकलनीय किंवा आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘अशक्य’ प्रकारातलं. महेंद्र म्हणतो त्याप्रमाणे तिच्या बाबतीत काहीही घडू शकतं. (किंवा ती काहीही घडवू शकते!) मनात येईल तेव्हा ती निघून जाणार, दोन-तीन महिने गायब होणार आणि ध्यानीमनी नसताना हजर होणार. मात्र, एवढं असूनही माया ही नितळ स्वभावाची नि हळव्या मनाची निरागस मुलगी असते.

सुधाशी लग्न करण्याबाबत दादूंचा निर्वाणीचा निरोप येतो तेव्हा महेंद्र पाचगणीला जाऊन सुधाला भेटतो आणि मायाशी असलेल्या आपल्या प्रेमसंबंधांविषयी कल्पना देतो. सुधादेखील त्याची मनःस्थिती समजून घेत, त्याने मायाला दादूंसमोर हजर करून त्यांना स्पष्ट कल्पना द्यावी असं सुचवते. (‘जो सच है और सही है वही कीजिये’ हे तिचे शब्द!) महेंद्र मायाला आणण्यासाठी जातो तेव्हा ती नेहमीप्रमाणे कुठंतरी गायब झालेली. आरशावर लिपस्टिकच्या साहाय्याने लिहून ठेवलेला तिचा निरोप - ‘बिना बताए चले जाते हो, जा के बताऊं, कैसा लगता है?’. तिच्या अनिर्बंध वागण्यामुळे विचित्र कोंडीत सापडलेला महेंद्र अखेर दादूंचं म्हणणं ऐकून सुधाशी लग्न करून मोकळा होतो. महेंद्र आणि सुधा यांचा संसार सुखात सुरू असतो. मायाच्या आठवणींना मागे टाकून महेंद्र सुधाशी रममाण होण्याचा प्रयत्न करत असतो. (मायाचा फोटो मात्र त्याने आपल्या पाकिटात ठेवलेला असतो.) वेळीअवेळी येणारे मायाचे फोन आणि कवितेच्या रूपात येणारे तिचे निरोप यांना तो टाळू शकत नाही. घरात राहून गेलेल्या तिच्या काही वस्तू तो तिच्याकडे पाठवून देतो, तेव्हा तिचं पत्र येतं, ‘माझ्या वस्तू मिळाल्या; पण तुझ्यासोबत घालवलेले काही मधुर क्षण तसेच आहेत, तेही पाठवून दे ना!’ (‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...’) महेंद्र तिचं वागणं हसण्यावारी नेत असला आणि सुधालाही एका मर्यादेपर्यंत तिचं वागणं सुसह्य वाटत असलं, तरी पुढे माया प्रकरण तिच्यासाठी जड ठरू लागतं.

माया मात्र सुधाला ‘दीदी’ म्हणून संबोधत असते आणि सुधाला भेटायची तिची तीव्र इच्छा असते. पण सुधा तिला भेटायचं टाळत असते. आपल्या तटबंदी संसाराच्या कक्षेत मायाने कोणत्याही प्रकारे शिरकाव करू नये अशी तिची स्वाभाविक भूमिका असते. ते दोघं मधुचंद्रासाठी गेले असताना इकडे माया आत्महत्येचा प्रयत्न करते. महेंद्रला नंतर हे कळूनही तो सुधाला काही सांगत नाही. मात्र मायासोबत त्याच्या भेटीगाठी सुरू राहतात. तिच्या नाजूक मनःस्थितीत तिला मानसिक आधाराची गरज आहे, हे तो जाणत असतो आणि सुधाशी प्रतारणा करण्याचा त्याचा मुळीच हेतू नसतो. मायाला घरी बोलावून आपण काही तरी मार्ग काढू, असं महेंद्र सुचवतो; पण सुधा ते धुडकावून लावते. मायाचा फोन आलेला असताना तिच्याशी बोलायचंही ती टाळते. (फोन बाजूला ठेवलेला असताना त्या दोघांमध्ये उडालेला खटका मायाच्या कानी गेलेला असतो.) महेंद्र मायाची समजूत काढायला जातो आणि इकडे सुधा घर सोडून पाचगणीला निघून जाते. त्या धक्क्याने महेंद्रला हृदयविकाराचा झटका येतो. त्याच्याकडून कोणताही संपर्क नाही हे पाहून सुधा त्याला घटस्फोट देते आणि पुन्हा शाळेत नोकरी करू लागते. (‘मी घटस्फोट घेत नाही, त्याला घटस्फोट देत्येय’ हे तिचं म्हणणं.) त्यापूर्वी महेंद्रला मुक्त करणारं पत्र तिने त्याला पाठवलेलं असतं.

...आणि आज पाच वर्षांनी महेंद्र व सुधा वेटिंग रूममध्ये एकमेकांना भेटतात. रात्री झालेल्या संवादात मधल्या काळातला घटनाक्रम तो तिच्यासमोर उघड करतो, जो आजतागायत त्याने तिच्यापासून लपवून ठेवलेला असतो. मायाचा आत्महत्येचा प्रयत्न, तिला आधार देण्याकरिता त्याने घेतलेल्या भेटी, त्याला आलेला हृदयविकाराचा झटका आणि सर्वांत धक्कादायक म्हणजे मायाचा एका अपघातात झालेला मृत्यू! पाचगणीहून सुधाचं पत्र आल्यानंतर मायाने दोघांमध्ये समेट घडवायचा विचार बोलून दाखवणं, मानसिक घालमेल असह्य झाल्यानंतर मोटारसायकल घेऊन बाहेर गेलेल्या मायाचा स्कार्फ चाकात अडकून झालेला तो भीषण अपघात आणि तिला रोखण्यासाठी बाहेर पडल्यावर हाती लागलेलं तिचं निष्प्राण कलेवर... हे सगळं तो सुधाला सांगतो. सुधा ऐकून सुन्न होते.

‘‘माझ्याविषयी तू जाणून घेतलंस, पण तुझं सांग ना... आई कशी आहे?’’ तो विचारतो. आईचं निधन झाल्याचं ती सांगते. ‘‘म्हणजे तू एकटीच राहतेस?’’ तो चमकून विचारतो. किंचितशी आशा त्याच्या चेहऱ्‍यावर झळकून जाते. पण सुधा काही बोलण्याच्या आत वेटिंग रूमचं दार उघडून तिचा नवरा (शशी कपूर) वेगाने आत येतो. ‘‘गाडी रद्द झाल्याचं कळल्यानंतर मी किती तरी वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! शेवटी मोटारीची व्यवस्था करून कसाबसा इथवर पोचलो... तू थांब, मी कुली वगैरे मिळतोय का पाहतो.’’ सुधाचा नवरा त्याच वेगाने बाहेर जातो. तो गेल्यावर ती म्हणते, ‘‘मै चलूं? पिछली बार बिना पूछे चली गयी थी. इस बार इजाज़त दे दो. पिछले साल मैने शादी कर ली.’’ भावना अनावर होऊन ती अश्रू ढाळू लागते. तो तिला दिलासा देतो, ‘‘सुखी रहा... खूष रहा... खूप चांगला नवरा मिळालाय तुला. देव करो, उदंड आयुष्य मिळो तुम्हाला. शक्य झालं तर मला क्षमा कर...’’ ती त्याला वाकून नमस्कार करत असतानाच तिचा नवरा येतो आणि तिला बाहेर घेऊन जाताना विचारतो, ‘‘कोण होते ते? कुणी नातलग की ओळखीतले?’’ तिच्या नजरेतले भाव पाहून अखेर तो ओळखतो, ‘‘महेंद्र?’’ ती होकारार्थी मान हलवते. तो मागे वळून महेंद्रकडे पाहतो, हसतो आणि तिला घेऊन पुढे चालू लागतो. मागे राहिलेला महेंद्र त्या दोघांकडे बघत राहतो. एकटा... निःशब्द....

गुलजार हे काय प्रकरण आहे, याचा पूर्ण प्रत्यय आणून देणाऱ्‍या ज्या मोजक्या कलाकृती आहेत, त्यांच्यात ‘इजाज़त’चा समावेश करावा लागतो. पटकथा, संवाद, गीतं आणि दिग्दर्शन या चारही पातळ्यांवर गुलजार यांची सरस कामगिरी यात दिसून येते. प्रसंग हलकाफुलका असो अथवा गंभीर, संवाद लेखनातली त्यांची चमक इथंही जाणवते. याशिवाय गुलजार यांच्या हातखंडा ‘फ्लॅशबॅक’ तंत्राचा वापर इथं आहेच. ज्याला खास ‘गुलजार टच’ म्हणतात, तो श्रेयनामावलीपासूनच जाणवतो. स्टेशनवर गाडी थांबल्यावर दारात उभा असलेला महेंद्र ‘कुलीऽऽ’ अशी जोरात हाक मारतो आणि पाठोपाठ पडद्यावर ‘लेखक - दिग्दर्शक : गुलजार’ ही अक्षरं झळकतात, हा मिष्किलपणा त्यातलाच. वेटिंग रूमच्या बाथरूमचा दिवा हवा तेव्हा न लागता उशिरा लागणं, हाही एक गमतीशीर प्रकार. मधुचंद्राहून परत येताना सुधाने ‘‘मै ज्यादा सफर नही कर सकती,’’ असं म्हणताक्षणी महेंद्रने ‘‘सफर हिंदी में या इंग्रजी में’’ असं विचारणं किंवा गंभीर प्रसंगांमधले प्रत्ययकारी संवाद या चित्रपटाला वेगळी उंची देतात.

नसिरुद्दीन, रेखा आणि अनुराधा या तीनही कलाकारांचा सरस अभिनय आणि आर. डी. बर्मनचं जमून आलेलं संगीत या ‘इजाज़त’च्या जमेच्या बाजू. श्रेयनामावलीसोबत येणाऱ्या ‘छोटी सी कहानी से’ या गीतापासूनच यातल्या संगीताचं वेगळेपण ठसत जातं. ‘मेरा कुछ सामान’ ही तर भावगर्भ दीर्घकविताच आणि त्यातले वाद्यसंगीताचे तुकडेही बहारदार! ‘कतरा कतरा मिलती है’ या गाण्यातला ‘डबल ट्रॅक रेकॉर्डिंग’चा अफलातून प्रयोग आणि त्याला अनुसरून अशोक मेहता यांनी चालवलेला कॅमेरा यांना सलाम! शेवटी येणारं ‘खाली हाथ शाम आयी’ हे गाणंही खोलवर भिडणारं. वेटिंग रूममध्ये नायकाच्या सूटकेसची चावी हरवलेली असणं व नेमकी नायिकेकडे असलेली चावी तिला लागणं यासारखे काही फिल्मी योगायोग किंवा मायाचा मृतदेह हातात धरून महेंद्रने आभाळाकडे पहात टाहो फोडणं यासारखे प्रकार टाळता आले असते. अर्थात, ते असूनही चित्रपटाचा परिणाम उणावत नाही. ‘इजाज़त’सारखा चित्रपट पाहताना तो ‘प्रेमाचा त्रिकोण’ असल्याचा विचारही मनात येत नाही. उलट नातेसंबंधांवरचं एक उत्कृट भाष्य अनुभवल्याची तृप्ती हा चित्रपट देतो. लेखक-दिग्दर्शक गुलजार यांचं हेच मोठेपण!

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार व हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com