थॉट ऑफ द वीक : 'जाऊ दे' एक हानिकारक विचार

Thought-of-the-week
Thought-of-the-week

गोष्टी मी ठरवलेल्या मार्गाने गेल्या नाहीत तर? काहीतरी वाईट घडलं तर...मी पुन्हा दुखावलो गेलो किंवा दुखावली गेले तर? मी पुन्हा मानसिक नियंत्रण गमावले तर?

आपण सर्व अशा प्रकारचे विचार कधीतरी करतोच. विचार करणे चांगले आहे, मात्र अतिविचार हानिकारक. हे केवळ आपल्याला अस्तित्वात नसलेल्या समस्यांमध्ये सखोल ड्रॅग करते. आपण स्वतःशीच दीर्घकाळ बोलत राहतो आणि वेळ, ऊर्जा आणि विचार वाया घालवतो. बाह्य जगामध्ये जे काही घडत असते, त्याचा परिणाम आपल्या अंतर्मनावर नकळत होतो. तो विचार व आचारदेखील प्रभावित करीत असतो. आपले मन आपल्याशी खेळ खेळत असते आणि कल्पनारम्य संभाव्य परिस्थिती तयार करते.

बऱ्याच वेळा आपण काय विचार करतो याची आपल्याला जाणीव असते; परंतु त्याबद्दल आपल्याला काय वाटते, हे विसरून जाण्याचा आपला कल असतो. ही एखाद्या प्रिय व्यक्तीची टिप्पणी असू शकते, घर किंवा कार्यालयातील परिस्थिती किंवा भूतकाळातील आठवणी. लहानपणापासूनच रडणे, भीती वाटणे यासारख्या भावनांना ‘चुकीचे’ म्हटले जाते. आपण एकतर त्यांना दडपतो किंवा दुर्लक्ष करतो आणि ‘जाऊ दे’ म्हणून पुढे जातो.

पण आपण सारखेच ‘जाऊ दे’ म्हणत राहिलो, तर ते मानसिक स्वास्थ्याला हानिकारक ठरते. मागील लेखात आपण विचारांच्या गोंधळाबद्दल आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल शिकलो. तोंडावर ‘जाऊ दे’ म्हणायचे आणि स्वत: विचारांच्या साखळीत अडकायचे, हे आपल्याला प्रगतीकडे नेत नाही. विचारांबद्दल आणि भावनांबद्दल स्पष्टता आणणे व त्यांच्यात समन्वय साधणे हाच मानसिक आरोग्याचा मूळ आधार आहे! अंतर्मनाचा आवाज ऐका, तोच मदत करेल!

अशा नियंत्रणात आणा विचार आणि भावना...
माझा अंतर्गत आवाज

पहिली पायरी म्हणजे आंतरिक आवाज शांतपणे एेका. मन काय सांगत आहे ते समजून घ्या. आपण विशिष्ट मार्गाने का विचार करत आहोत? मला नक्की काय वाटत आहे ? कोणत्या भावना निर्माण होत आहेत? मला माझ्याबद्दल काय वाटते किंवा त्याबद्दल मी काय विचार करतो/करते याची उत्तरे शोधणे इतर लोकांना माझ्याबद्दल काय वाटते त्यापेक्षा महत्त्वाचे आहे.

ही वेळ तात्पुरती आहे
आपल्या मनात अप्रिय विचार येतात, त्या क्षणी अप्रिय भावनाही निर्माण होतात. आपल्याला असे वाटते की, हा टप्पा बराच काळ टिकेल. खरे म्हणजे, आपण मनाला सांगू शकतो, हा टप्पा तात्पुरता आहे आणि ही परिस्थिती बदलेल. 

भावनांकडे दुर्लक्ष नको
निराकरण करण्यासाठी परिस्थितीला सामोरे जावे लागते. ‘जाऊ दे’ म्हणून दुर्लक्ष करणे किंवा पळ काढणे हा मार्ग नाही. दीर्घकाळ दडवलेली अप्रिय भावना चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या लोकांसमोर व चुकीच्या वेळी येते. प्रत्येक परिस्थितीत भावनांना प्राधान्य द्या. 

भावना आणि विचार संक्रमित करा
कोणत्याही परिस्थितीत, स्वत:ला विचारा की मी काय विचार करत आहे? मला काय वाटते? स्वतःला पटवून द्या की, ही परिस्थितीही जाईल. भावना दडपण्याऐवजी किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्या भावना ओळखू द्या आणि त्याभोवती काम करू द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com