हरवत चाललेली 'गोष्ट' (स्वाती राजे)

swati raje
swati raje

इयत्ता तिसरीतल्या मुलांना सलग गोष्ट वाचता येत नाही, असं बिल अँड मेलिंदा गेट्‌स फाउंडेशननं केलेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. मात्र, फक्त हीच इयत्ता नव्हे, तर एकूणच मुलांचं लहानपण समृद्ध करणारी आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या विकासाला पोषक अशी "गोष्ट' हरवत चाललीय असं दिसतं. नेमकी का हरवत चालली आहे ही गोष्ट, गोष्टीचं महत्त्व लहान मुलांच्या आयुष्यात नेमकं का आहे, त्यामुळं काय होतं, गोष्टींची "रुजवात' करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न होत आहेत आदी गोष्टींबाबत मंथन.

फार-फार नसली, तरी काही वर्षापूर्वीची गोष्ट. आमच्या "भाषा पुस्तकघरात' गोष्टीचा तास चाललेला. कधीच न तोंड उघडणाऱ्या एका वीरांना जरा थोडं घोड्यावर बसवत गोष्ट सांगायला उभं केलेलं. खिशाला हात चोळत, डोळे फिरवत महाभयंकर संकटात पडल्यासारख्या आविभार्वात बहुधा कधीतरी एकदा आजीकडून ऐकलेली एक गोष्ट सुरू झाली ः ""दोन "ब्रदर्स' होते. त्यांना एक "फादर' होते.'' वडील सामान्यतः जगात आधी येतात, हा निसर्गक्रम समजावून सांगण्याचा अतीव मोह टाळत मी पुढे ऐकू लागले ः ""तर ते "फादर किंग' होते. दोन्ही "ब्रदर्स' फार "नॉटी' होते. ते सारखे भांडायचे. त्या दोघांना "किंग' व्हायचं होतं... म्हणून त्यांनी मोठं झाल्यावर "वॉर' करायचं ठरवलं.'' दरम्यान, मग युद्धभूमीवर "एके 47'पासून यच्चयावत शस्त्रास्त्रं "श्रोत्यां'च्या सहभागातून जमा झाली आणि "वॉर' सुरू झालं... ""अँड देन द यंगर ब्रदर पांडवा किल्ड एल्डर ब्रदर कौरवा!''

गोष्ट संपली. श्रोतृवर्गानं टाळ्या वाजवल्या. गोष्ट आवडल्याची पावती. मला वाटलं, मी काही चुकीचं ऐकते आहे. जरा सावरत समोरच्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या श्रोत्यांना विचारलं ः "यात तुम्हाला काही चुकीचं, वेगळं वाटतंय का?' काही माना होकारार्थी. काही नकारार्थी हलल्या. बऱ्याच जणांना ती बहुधा टीव्हीमधली गोष्ट वाटली असावी. बारा जणापैकी चार-पाच जणांना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं; पण काय, ते नेमकं सांगता येईना. तिघांनी पांडव पाच आणि कौरव शंभर होते हे सांगितलं. त्यातल्या फक्त एकानं, दुसऱ्याच्या मदतीनं पाच पांडवांची नावं सांगून मला सद्‌गदित केलं...

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे परवा मेलिंदा अँड बिल गेट्‌स फाउंडेशनं केलेल्या पाहणीचा अहवाल. इयत्ता तिसरीच्या सर्वसामान्य मुलांतली फक्त एक चतुर्थांश मुलं सामान्य वाक्‍यांचा समावेश असलेली गोष्ट वाचू आणि समजू शकतात, असं त्यात दिसून आलं आहे. आकडेवारी समोर आल्यावर बरीचशी मंडळी खडबडून जागी होत आहेत. त्यात दुःखाची गोष्ट अशी, की "गोष्ट' आपल्या आयुष्यातून हद्दपार होत चालली आहे, हे समजून घ्यायला गणिताची गरज लागावी! आणि त्याहीपेक्षा कथेची रससशीत परंपरा या मातीत शतकानुशतकं जोमदारपणे रुजली, उक्रांत होत गेली, विविधांगांनी बहरत गेली- ती नष्ट होत आहे हे समजण्यासाठी कुणा सातसमुद्रापारच्या फाउंडेशननं डोळ्यात अंजन घालण्याची वेळ यावी!

कधी हरवली ही गोष्ट?
कधी हरवली ही गोष्ट आपल्या जगण्यातून? उत्तरेच्या गर्भाशयातून गोष्ट ऐकणाऱ्या अभिमन्यूचे हुंकार परवापरवापर्यंत तर ऐकत होतो ना आपण! आणि मंदबुद्धी राजपुत्रांना शहाणपणाच्या गोष्टी सांगून व्यवहारचतुर बनवणाऱ्या विष्णूशर्म्याच्या पंचतंत्राची द्वाही तर मिरवत होतो ना जगात? ग्रीक इसापच्या गोष्टी, इटलीचा डेकॉमेरॉन आणि अमेरिकेत्या ब्रदर रॅबिट्‌सच्या कथांवर पडलेला पंचतंत्राचा प्रभाव जगही जाणत होतं. कथासरित्सागराच्या गोष्टींनी घातलेली मोहिनी अजून अजून तर मनावर होती... आणि फार दूर कशाला? चिऊ-काऊच्या गोष्टीवर तर वरण-भाताचा घास आपल्या बालपणाला पोसत राहिला होता. आजीच्या धुवट मऊ लुगड्याचा गंध हरिविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत आणि चमत्कृतीपूर्ण नवग्रहांच्या कथांना वेढाळून राहत होता. संध्याकाळी देवळात कीर्तनकारांच्या रसाळ वाणीतून रंगणाऱ्या जटायूवधाच्या आख्यानानं हृदय विदीर्ण होत असे. कृष्ण-रुक्‍मिणी स्वयंवराची कथा ऐकताना पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावरचे आपले गाल आरक्त होत. नवरसांचा परिपोष जगण्याच्या सर्वांगातून करणाऱ्या या कथा... कुठं हरवल्या? गोष्ट रोज लगटूनच होती की आपल्या आयुष्याला... कुठं आटला हा झुळझुळ प्रवाह? कुठं दूर केलं आपण गोष्टीला? कुठे झाली या पडझडीला सुरवात?

गेल्या तीन दशकात जगण्याचा नूर अन्‌ गती बदलली. पोत बदलला. जग जवळ आलं. तंत्रज्ञानाच्या जादूनं जुन्या भिंती वितळत गेल्या... आणि नव्या उभारल्या गेल्या. स्वतःभवती उभारल्या गेल्या. विज्ञानाचा उजेड आत-बाहेर लख्ख पसरत गेला... आणि आपले हळवे, किंचित अंधारे गूढरम्य कोपरे संपत गेले. नव्या माध्यमांनी जुन्या कथन परंपरांना छेद दिला. वैश्‍विकीकरण आणि तंत्रज्ञानानं, नव्या साधनांनी आपल्या खासगी, वैयक्तिक अवकाशावर पकड बसवली. टीव्ही- कॉंप्युटर- व्हिडिओ गेम्स - तळहातातला मोबाईल या साऱ्यांनी आपली मुलं पाइड - पायपरसारखी, पळवली!! गोष्टीची पडझड तिथं सुरू झाली... पण या साऱ्याला दोष देताना, आपण तरी त्यांची "राखण' नीट केली होती का?

गोष्टीच्या तहानेकडे दुर्लक्ष
एका कार्यक्रमाची आठवण झाली. वाचनसंस्कृतीच्या जोपासनेसाठीचं एक व्याख्यान संपवून मी खाली उतरताना एका श्रोत्यानं मला अडवलं ः ""तुम्ही म्हणता, मुलांना रोज रात्री एक गोष्ट सांगा; पण मी काय म्हणतो, आमच्या आई-वडिलांनी आम्हाला कधी गोष्ट सांगितली नाय. माझ्या मुलांना गोष्ट सांगायला मला वेळ भेटत नाय. पण त्यांना चांगले सेवंटी परसेंट मार्क मिळतात. मग गोष्ट काय कंपल्सरी आहे काय?'' थेट आलेल्या प्रश्‍नानं मी हडबडलेच. "भल्या माणसा, तुझी पत्नी रोज संध्याकाळच्या टीव्ही सिरियलचा एक तरी एपिसोड चुकवते का? किंवा गोष्ट कळणार नाही, यासाठी तू सिनेमागृहातून सिनेमा सोडून अर्धवट येतोस का?' असे प्रश्‍न मी सौजन्यापोटी विचारले नाहीत; परंतु एक प्रश्‍न माझ्यापुरता उरलाच. गोष्टीची तहान मोठ्याबरोबर लहानालाही असते. याकडे आपण पालक म्हणून सोयीस्कर दुर्लक्ष करत आहोत का?
केवळ भारतातच नाही साऱ्या जगभर हे सावट येऊ घातलं आहे. मुलं दिवसेंदिवस गोष्टीपासून दूर चालली आहेत, याची चिंता जगात सर्वत्र पसरलेली आहे. "इंटरनॅशनल बोर्ड ऑन बुक्‍स फॉर यंग पीपल'बरोबर गेली सतरा वर्षं काम करताना याचं प्रत्यंतर मला पावलोपावली येतं आहे.

माणसाची संवाद साधण्याची मूलभूत गरज भागवणारी गोष्ट. माणसाला माणूसपण बहाल करणारी ही जादुई शक्ती. मानवजातीच्या स्वप्न- इच्छा- आकांक्षा यांचं प्रतिबिंब कथन वाङ्‌मयात पडतं. पिढ्या-पिढ्यांची कमावलेलं, जतन केलेलं, संस्कारित केलेलं ज्ञान आणि त्यातून उपजणारी शहाणीव पुढच्या पिढीत निगुतीनं संक्रमित करणारं हे मोलाचं माध्यम आहे. याची जाणीव बाळगून जगात ठिकठिकाणी "गोष्ट जपण्या'चे प्रयत्न सुरू आहेत. हिंसाचारानं, अनिश्‍चिततेनं बरबटलेल्या जगात "जग सुंदर आहे' हा विश्‍वास गोष्टीच्या माध्यमातून कोवळ्या पिढीला देण्यासाठी माझे कित्येक मित्रमैत्रिणी अहमहमिकेनं काम करतायत. दक्षिण आफ्रिकेत अस्मानी आणि सुलतानीच्या झळांपासून कोवळ्या पिढीला दूर नेण्यासाठी गोष्टीचा आधार घेतला गेला.

मंगोलियात गोबीच्या वाळवंटातल्या भटक्‍या तांड्यांवरच्या मुलांना स्थैर्याचं स्वप्न देण्यासाठी आमचे आज ऐंशी वर्षं वयाचे देशदुंग जांबा गेली चाळीस वर्षं खेचरांच्या पाठीवरचं फिरतं ग्रंथालय चालवत आहेत. रवांडामधल्या वांशिक संघर्षात गावंच्या गावं बेचिराख झाली. त्यात भावनिकरित्या पूर्ण होरपळलेल्या मुलांना गोष्टींच्या माध्यमातून सावरण्यासाठी स्वतः होरपळलेल्या आमच्या ऍग्नेसनं गेली वीस वर्षं कंबर कसली आहे. हिवाळ्यात गोठून एकाकी पडणाऱ्या बेटांवर राहणाऱ्या मुलांसाठी खास "बुक बोट' स्वीडनमध्ये फिरत असते आणि अस्थिर वातावरणात मुलांना आशेचा किरण दाखवण्यासाठी व्हेनेझुएलात "बॉंको द लिब्रो'ची मंडळी "स्टोरी टेलिंग'च्या माध्यमातून काम करते.

आपण पुरेसे प्रयत्न करतो का?
त्सुनामी, भूकंप आणि निर्वासितांच्या छावणीतल्या चिमुकल्यांच्या दुःख- वेदनांचं लिंपण करायला गोष्टीचं माध्यम वापरणारी अनेक मित्रमंडळी जगभर पसरलेली आहेत... आणि आपण काय करतो आहोत? आपण पुरेसे प्रयत्न करतो आहोत का? आजी भले घराबाहेर पडली असेल; पण आई- वडील म्हणून आपला कथनपरंपरेचा समृद्ध वारसा आपण आपल्या कोवळ्या पिढीसाठी निगुतीनं जपतो आहोत का? चित्र जसजसं धूसर होत गेलं, तसतसं आम्ही "भाषा' संस्थेच्या माध्यमातून "कथे'ला, "गोष्टी'ला केंद्रस्थानी मानून उपक्रमांची आखणी सुरू केली. आमच्या "साप्ताहिक भाषा पुस्तकघर' ग्रंथालयात त्या- त्या आठवड्याची गोष्ट मुलांपर्यंत पोचवू पाहिली. मराठी "भाषा' ऑलिंपियाडसारख्या परीक्षेतून मुलं गोष्ट वाचतील, मनन करतील, चिंतन करतील आणि रसग्रहण करतील याची काळजी घेण्यात आली आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपल्या व्यस्त आयुष्यातून हद्दपार होणाऱ्या गोष्टीचं महत्त्व पुन्हा आपल्या जगण्यात रुजवण्यासाठी, गोष्ट साजरी करण्यासाठी "कथायात्रा' या राष्ट्रीय पातळीवरच्या महोत्सवाची बांधणी केली. मुलांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी कथावाचन, अभिवाचन आणि कथा-निर्मितीच्या कार्यशाळा घेऊ लागलो.
या प्रयत्नांना हळूहळू यश येत चाललं आहे. पालकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. मुलाला रोज वीस मिनिटं पुस्तक वाचून दाखवलं पाहिजे किंवा गोष्ट सांगितली पाहिजे, या आवाहनालाही पालक आवर्जून प्रतिसाद देत आहेत. मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीत फरक पडत आहे, हे आवर्जून पालक आणि शिक्षक कळवत आहेत.

आज माध्यमांतून हिंसाचार थेट घराघरापर्यंत पोचला आहे. निनटेन्डोसारख्या खेळांतून मुलांच्या हातात व्हर्चुअल शस्त्रं आली आहेत. बिनदिक्कतपणे व्हर्चुअल शत्रूवर गोळी झाडून रक्ताच्या थारोळ्यात खाली पाडण्यात आजच्या मुलाला काही चुकीचं करतोय असं वाटत नाहीसं झालंय. या असंवेदनशील, असहिष्णू वातावरणात गोष्टीच्या माध्यमातूनच मुलाच्या मनाची कोवळीक जपायला हवी आहे. पालकांपुढचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.
मुलाच्या डोळ्याला थेंब आणि हृदयात करुणेचा कोंब फुटेल, याची काळजी आज आपण घ्यायला हवी आहे. निरोगी समाजाच्या जडणघडणीच्या शक्‍यता, आज आपण गोष्ट किती निगुतीनं मुलापर्यंत पोचवतो आहोत, यात सामावलेल्या आहेत.

गोष्ट काय देते?
गोष्ट निव्वळ मनोरंजनाचं साधन नसतेच मुळी. गोष्टीचं असतं आपलं एक समांतर जग. तिच्या विश्‍वाचे वेगळेच ताल-तोल. स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून आपलं बोट धरून घेऊन जायची असते तिच्यात ताकद. तिच्या अंतरंगात झुलवून देताना ती आपल्याला बहाल करते कुणी वेगळंच व्यक्तिमत्त्व. ती सह-अनुभूती रुजवते, ती सहसंवेदन जागवते, ती कल्पनाशक्तीला जोजवते, ती मायेची पाखर घालते, दुःखावर फुंकर घालते. गोष्ट आपल्याला "माणूस' बनवते.

नव्या माध्यमांनी जुन्या कथन परंपरांना छेद दिला. गोष्टीची पडझड तिथं सुरू झाली... पण या साऱ्याला दोष देताना, आपण तरी त्यांची "राखण' नीट केली होती का?

पिढ्या-पिढ्यांची कमावलेलं, जतन केलेलं, संस्कारित केलेलं ज्ञान आणि त्यातून उपजणारी शहाणीव पुढच्या पिढीत निगुतीनं संक्रमित करणारं गोष्ट हे मोलाचं माध्यम आहे. याची जाणीव बाळगून जगात ठिकठिकाणी "गोष्ट जपण्या'चे प्रयत्न सुरू आहेत.

असंवेदनशील, असहिष्णू वातावरणात गोष्टीच्या माध्यमातूनच मुलाच्या मनाची कोवळीक जपायला हवी आहे. पालकांपुढचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.

नवरसांचा परिपोष जगण्याच्या सर्वांगातून करणाऱ्या या कथा... कुठं हरवल्या? गोष्ट रोज लगटूनच होती की आपल्या आयुष्याला... कुठं आटला हा झुळझुळ प्रवाह? कुठं दूर केलं आपण गोष्टीला?

केवळ भारतातच नाही साऱ्या जगभर हे सावट येऊ घातलं आहे. मुलं दिवसेंदिवस गोष्टीपासून दूर चालली आहेत, याची चिंता जगात सर्वत्र पसरलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com