
डॉ. रमजान तडवी - saptrang@esakal.com
‘तिकळं पाणी पळ्ळा का?’ (तिकडे पाऊस पडला का?), ‘बारीपासून खालच ह’ (‘बारीपासून खालीच आहे’. बारी- सातपुडा पर्वतरांगांजवळील ठिकाण), ‘म्हणूनच भिजी आला तु’, ‘अरं गह्यरा ठोकाला बापा मी’ (अरे, खूप झोडपला गेलो रे मी!), ‘खेतात काय काम होता’, ‘जवारी इरावली गह्यरी दाट उंगेल’ (ज्वारीचे पीक पातळ केले, दाट उगवले होते)... सहजसुंदर आणि नैसर्गिक संभाषण हा ‘तडवी भिल्ल’ बोलीचा सहजसुंदर स्वभावच आहे. ‘काय चल्ला ह?’, ‘कसा काय हान?’, ‘अवल त हान!’ ही तीन लघुवाक्ये या बोलीत मराठीतल्या ‘कसा आहेस?’ या ख्यालीखुशाली विचारणाऱ्या वाक्यासाठी उच्चारली जातात. सांत्वन करण्यासाठी किंवा दिलासा देण्यासाठी ‘जी होतो ती अवलसाठीज होतो!’, ‘हे भी दिन निघी जाशेन’, ‘सब उप्परवालाची हातात ह,’ हे बोलायलाच हवे! ‘चल्ला’ (चाललो), ‘हान’ (आहे), ‘तुल’ (तुला), ‘तुह्या’ (तुझे), ‘सांगवा’ (सांगायचे) या तडवी भिल्ल बोलीच्या शब्दांचा अर्थ मराठी भाषकाला सहज समजतो. ‘काय’, ‘होतो’, ‘हातात’ हे मराठी शब्द तडवी बोलीतही प्रचलनात आहेत.