जिहादचा विजय की अमेरिकेची माघार?

Taliban peace treaty: Who won-Jihad or America?
Taliban peace treaty: Who won-Jihad or America?

अफगाणिस्तानात गेली 19 वर्षे धुमसणारी आग शांत होण्याची आशा निर्माण झाली आहे. अतिरेकी संघटना तालिबान आणि अमेरिका यांनी कतार या देशातील दोहा येथे 29 फेब्रुवारी 2020 शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. विशेष भारताच प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होता. लाखो नागरिकांचा बळी घेणारे हे गृहयुद्ध तात्पुरते संपुष्टात आले असले तरी लोकनियुक्त सरकारचा या करारात समावेश नसल्याने हा कराराचे पालन कितपत होईल यावर शंका उत्पन्न केली जात आहे. 14 महिन्यांत संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. मात्र, त्यानंतर तालिबान शांत राहील काय, हा यक्षप्रश्‍न आहे. कारण अफगाणिस्तानचा इतिहास पाहता या देशात कधीही दीर्घकाळ शांतता नांदली नाही. अमेरिकेची माघार ही जिहादचा विजय असल्याची भावना कटटरपंथीयांमध्ये घर करून गेली आहे. जिहादचे हे भूत गिलगिटमार्गे काश्‍मिरात घुसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

ज्या देशांचा भूतकाळ अनीती, अधर्म, हिंसाचार, अत्याचार आणि लुटमारीने बरबटलेला असतो त्या देशात कधीच शांतता, सुख आणि समृद्धी नांदत नाही हे अफगाणिस्तानच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तिन्ही अवस्थांमध्ये या देशात केवळ हिंसाचार, अनाचाराने थैमान घातले. "जशी प्रजा तसा राजा' या युक्तीप्रमाणे अफगाणी जनताच मुळात असंस्कृत आणि हिंसाचारी आहे. मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील दहशतवादाचा केंद्रबिंदू हा देश राहिला आहे. वर्तमान अंधकारमय, रक्तरंजित असला तरी कधीकाळी हा देश अत्यंत वैभवशाली, प्रबळ आणि समृद्ध होता.

कौरवांचा मामा शकुनी हा याच गांधार अर्थात अफगाणिस्तानचा राजा होता. दुसऱ्या शतकातील कनिष्क हा बौद्ध सम्राट आणि त्यानंतर आलेले हिंदू राजांचा काळ सोडला तर या देशात कधीही शांतता आणि समृद्धी नव्हती. कुशान वंशाच्या या अत्यंत शूर आणि महापराक्रमी, दानशूर सम्राटाच्या राज्याच्या सीमा सध्याच्या उझबेकीस्तानापासून ते थेट मथुरेपर्यंत भिडल्या होत्या. महायान पंथाचा पुरस्कर्ता असलेल्या या सम्राटाच्या काळातच बौद्ध धर्म गांधार ओलांडून चीनमध्ये पोहचला. "सील्क रूट' चा निर्माता कनिष्कच होता. त्याच्या काळात शेकडो भव्य असे स्तूप उभारण्यात आले आहेत. काश्‍मीरही त्याच्या राज्याचा भाग होता. आजही बारामुल्ला शहराजवळ कनिशपोरा नावाचे गाव असून, तेथे आजही स्तूपांचे अवशेष आढळतात. तर पाकिस्तानातील पेशावर येथे केलेल्या उत्खननात गांधार स्थापत्य कलेवर आधारित असलेल्या भव्य स्तूपाचे अवशेष आढळले आहेत. याचाच अर्थ मध्य आशियात बौद्ध सम्राटांच्या काळात श्रीमंती आणि भरभराट होती.

मात्र, त्यानंतर अरबस्थानातून आलेल्या आक्रमकांनी घातलेल्या थैमानानंतर हिंदकुश पर्वताच्या पलीकडे असलेल्या या विशाल प्रदेशात रक्तपात घडविले. पंजाबातील जयपाल, अनंगपाल या हिंदू राजांनी शेवटपर्यंत या आक्रमकांशी सामना केला. गझनीचा शासक सबुक्‍तगीन हा अत्यंत रानटी आणि क्रूर होता. त्याच्या मृत्यूनंतर गादीवर आलेला त्याचा पुत्र महम्मद गझनीने तर मध्य आशियात धुमाकूळ घातला. त्याच्या क्रौर्यापुढे हिंदू राजे गर्भगळीत झाले. हिंदूशाहीचा शेवटचा राजा त्रिलोचनपालचा नायनाट झाल्यानंतर मुस्लीम राजवटीला सुरुवात झाली. 879 मध्ये हिंदूशाही अस्तित्वात आली आणि सन 1026 मध्ये त्रिलोचनपालचा पराभव झाल्यानंतर ही वैभवशाली राजवट नष्ट झाली.
सबुक्तगीन (964) ते अहमदशहा अब्दाली (1761) ह्या मुस्लीम शासकांच्या काळात केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर थेट दिल्लीपर्यंत कधीही फार काळ शांतता नव्हती. स्वतहा अशांततेत जगायचे आणि दुसऱ्यांनाही शांततेत जगू दयायचे नाही हे मुस्लीम राज्यकर्त्यांचा मूलभूत गुणधर्म. आज जो अफगाणिस्तान अशांत आहे तो याच गुणधर्मामुळे! सतत 800 वर्षे भारतावर स्वाऱ्या करून अगणित संपत्ती अफगाणिस्तानातील मुस्लीम शासकांनी लुटली असली तरी हा देश आजही भिकारीच आहे. जे पेराल तेच उगवणार असे जे म्हटले जाते ते उगीचच नाही.


काळ कुठलाही असो, "जगा आणि जगू द्या' हे तत्त्व तालिबान आणि त्यांच्या पाठिराख्यांच्या डोक्‍यात कधी घुसलेच नाही. म्हणूनच आज अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक, सीरिया, इराण, येमेन, जॉर्डन या देशांसह कित्येक मूलतत्त्ववादी देशांमध्ये अशांतता आणि गृहयुद्धासारखी स्थिती आहे. 2001 पासून अफगाणिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात झाली. ओसामा बिन लादेनने न्यूयॉर्कवर हल्ला करून 5 हजारांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला. निष्पाप नागरिकांना क्रूर मरण देणाऱ्या तालिबान आणि अफगाणिस्तानला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. 2001 पासून सुरू झालेल्या गृहयुद्धाला 19 वर्षे पूर्ण झाली.

संयुक्त राष्ट्र संघ, अमेरिकन परराष्ट्र खाते, पाकिस्तान, अफगाणिस्तानचे सरकार आणि जगभरातील विविध संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार या 19 वर्षात प्रत्यक्ष युद्धात 1 लाख 60 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये सामान्य नागरिक, अफगाणिस्तानचे सैनिक आणि अतिरेक्‍यांचा समावेश आहे. परंतु, प्रत्यक्ष युद्धात सहभागी नसलेले पण बॉम्बस्फोट, हवाई हल्ले यात जखमी होऊन, रोगराई, उपासमारीमुळे मरणाऱ्यांचा आकडा 340 लाखांच्या घरात आहे. अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले. 2400 च्या आसपास अमेरिकन सैनिक ठार झाले तर अब्जावधी डॉलर्सचा चुराडा झाला. अमेरिकन आणि नाटो सैनिक सोडता अफगाण गृहयुद्धात मारले गेलेले मुस्लीमच आहेत.

पुन्हा एकदा व्हिएतनाम?


ज्यांना काहीच गमवायचे नसते त्यांच्याशी युद्ध करण्यात काहीच अर्थ नसतो हे अमेरिकेला व्हिएतनाम, इराक आणि अफगाणिस्तानच्या उदाहरणावरून कळून चुकले आहे. सोव्हिएत रशियाचे हातही अफगाणिस्तानात पोळले आहेत. खरे पाहता रशियाने घेतलेली सुरक्षित माघार होती पण रानटी, असंस्कृती प्रवृत्तीच्या अतिरेक्‍यांना तो विजय वाटला. अमेरिकेने जी माघार घेतली त्यासंदर्भातही तालिबानचा हाच होरा असेल पण रशिया असो की अमेरिका, मारले गेले तर मुस्लीमच!


भारतापुढील धोके


तालिबान आणि अमेरिका शांतता करार तर झाला पण भारताविरोधात आणखी एक आघाडी उघडण्याची चिन्हे आहेत. कारण तालिबान आणि पाकिस्तान यांची दोस्ती सर्वश्रुत आहे. तालिबानचा जन्मच पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात झाला असल्याने या दोघांची दोस्ती भारतासाठी घातक ठरणारी असेल. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी हे भारताचे मित्र! दुर्देवाने शांतता चर्चेतून घनी सरकारला वगळले. परिणामी भारताने कोटयवधी खर्च करून अफगाणिस्तानात जे विकासकार्य चालविले आहे त्याची फलनिष्पती शुन्य होण्याचा धोका आहे. कारण उद्या जर तालिबानने सत्ता काबीज केली तर भारताची सर्व मेहनत वाया जाऊ शकते. इराणमधील चाबाहार बंदराचा जो विकास सुरू केला आहे त्यालाही मग अर्थ उरणार नाही. कारण चाबाहारमार्गे युरोपात पाय ठेवण्याचे भारताचे मनसुबे उधळले जाऊ शकतात.
लेखक सकाळ विदर्भ आवृत्तीत सहाय्यक वृत्तसंपादक आहेत.
9657867747

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com