‘नाही’ म्हणायला मुलांना शिकवा

ऑनलाईन जगात कुणीही कुणालाही स्पर्श करत नाही तरीही मुलांना मोठ्या प्रमाणावर शोषणाला सामोरं जावं लागतं.
online exploitation
online exploitationsakal

- मुक्‍ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com

मूल जेव्हा जरा कळण्याच्या वयात येतं तेव्हा आई-बाबा, शाळा त्यांना ‘चांगला स्पर्श’ आणि ‘वाईट स्पर्श’ यांविषयी शिकवतात. अनोळखी आणि ओळखीच्या लोकांनीही कुठं स्पर्श केलेला चालणार नाही, करू द्यायचा नाही, ‘नाही’ म्हणायचं, आई-बाबांना येऊन सांगायचं या सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी शिकवल्या जातात. सांगितल्या जातात. मात्र, हीच चिमुकली मुलं गेमिंगच्या निमित्तानं, गुगलवर काहीबाही शोधण्याच्या निमित्तानं, नाहीतर यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ आणि रील्स बघण्याच्या निमित्तानंही ऑनलाईन जगात असतात.

ऑनलाईन जगात कुणीही कुणालाही स्पर्श करत नाही तरीही मुलांना मोठ्या प्रमाणावर शोषणाला सामोरं जावं लागतं. ऑनलाईन जगात थेट शारीरिक स्पर्श नाही; पण म्हणून तिथं मुलं सुरक्षित असतात अशी समजूत अत्यंत घातक आहे. ऑनलाईन जगात मोठ्या प्रमाणावर पीडोफाईल रुग्ण व्यक्ती असतात. पीडोफिलिया म्हणजे असा आजार - ज्यात प्रौढ व्यक्तींना लहान मुलांविषयी तीव्र लैंगिक आकर्षण असतं.

हे लोक ऑनलाईन जगात मुलांचे फोटो, व्हिडिओ मिळवण्यात आणि त्यांच्याशी ऑनलाईन संवाद करण्यासाठी धडपडत असतात. काही वेळा जाणीवपूर्वक त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर व्हिडिओ-चॅट करणं, त्यांच्याशी मैत्री करून त्यांना चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडणं असले प्रकार होऊ शकतात. ऑनलाईन जगात आपल्या मुलांपर्यंत पोहोचणाऱ्या या माणसांचे नेमके उद्देश काय आहेत हे सांगता येणं अवघड असतं. अडनिड्या वयातल्या मुलांना अनेकदा यातले धोके माहीत नसतात, लक्षात येत नसतात.

हल्ली वयात येण्याचं वय झपाट्यानं कमी होतंय. शारीरिक वय कमी होतंय तसं मानसिक वयही कमी होतंय. सॉफ्ट आणि हार्ड पॉर्नची प्रचंड उपलब्धता असल्यानं ‘ज्या वयात त्या गोष्टी’ हा प्रकार फारसा उरलेला नाही. लहान वयात बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंडपासून सेक्सपर्यंत अनेक गोष्टी मुलं बोलतात, बघतात, काही वेळा प्रयोगही करतात.

पुण्यातल्या एका शाळेत घडलेल्या घटनेत, दहा-बारा वर्षांच्या मुलांनी त्यांच्या एका मित्राचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला.

ऑनलाईन जगात जे बघितलं जातं त्याचे परिणाम कळत-नकळत ऑफलाईन जगण्यावर होतात हे नाकारून चालणारच नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही जगांतले धोके जेव्हा आपण मुलांना अगदी मोकळेपणानं सांगू शकू तेव्हाच मुलं या दोन्ही प्रकारच्या जगांत सुरक्षित असतील.

प्रत्यक्ष जगात चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणजे तरी काय, तर चांगलं वर्तन आणि वाईट वर्तन. ‘जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि जे वाईट आहे ते वाईट आहे,’ हा विचार मुलांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.

ऑनलाईन जगाविषयी मुलांना काय सांगाल?

1) तिथं कुणीही थेट स्पर्श करत नाही; पण चॅटिंग करताना नग्न फोटो दाखवले तर, सेक्सविषयी गप्पा मारल्या तर, पॉर्न साईट्सच्या लिंक्स शेअर केल्या तरी ते वाईट स्पर्शाइतकंच गंभीर आहे.

2) अशा व्यक्तीशी पुढं संवाद नको. त्याविषयी आई-बाबांना किंवा विश्वासातल्या मोठ्या व्यक्तीला सांगितलं गेलं पाहिजे.

3) कुणी मुलांकडं त्यांचे अर्धनग्न किंवा नग्न फोटो मागितले तर ते देऊ नका. कुणाकडंही त्यांचे नग्न फोटो मागणं चुकीचं आहे. ‘असा ट्रेंड आहे,’ असं कुणी म्हणत असेल तर तेही चूक आहे, याची मुलांना जाणीव करून द्या.

4) ऑनलाईन लैंगिक छळ करणारे बहुतेक जण मुलांना ‘हा आपला काहीतरी गुप्त खेळ आहे, आपलं सिक्रेट आहे’ असं सांगतात. ‘आई-बाबांना सांगू नकोस’ असंही सांगतात. शरीराच्या अवयवांविषयी आणि लैंगिक अवयवांविषयी असं कुणी सांगत असेल तर तिथं धोका आहे हे मुलांना सांगितलं पाहिजे.

5) ऑनलाईन लैंगिक छळात मुलांना धमकावण्याचे प्रकारही होतात हे पोलिसांकडे नोंदवल्या गेलेल्या अनेक केसेसमधून दिसून आलं आहे. ‘आई-बाबांना सांगितलंस तर त्यांना मारून टाकेन...’, ‘घरात जर पाळीव प्राणी असतील तर त्यांना इजा करू...’ तसंच खुद्द मुलांनाही प्रत्यक्ष इजा करण्याविषयीही बोललं जातं. त्यामुळे मुलं घाबरतात आणि ‘ऑनलाईन जगात आपल्याबाबत काहीतरी चुकीचं घडतंय’ हे मुलं सांगत नाहीत. त्यामुळे मुलांना याविषयीही सांगितलं गेलं पाहिजे. कुणीही ऑनलाईन जगात धमकावत असेल तर आई-बाबांशी बोलायलाच हवं हा विश्वास निर्माण केला गेला पाहिजे.

6) काही वेळा पीडोफाईल्स व्यक्ती मुलांशी मैत्री करून त्यांच्याकडून त्यांचे नग्न आणि अर्धनग्न फोटो मागतात किंवा त्यांच्या लैंगिक अवयवांचे फोटोही मागितले जाऊ शकतात. त्यामुळे ‘अशी मागणी करणारे गुन्हेगार आहेत,’ हे मुलांना सांगितलं गेलं पाहिजे.

7) मुलांना ‘नाही’ म्हणायला शिकवा. ऑनलाईन जगात ते फार आवश्यक असतं. ‘ब्लॉक करणं’, ‘अनफ्रेंड करणं’ या गोष्टींची माहिती त्यांना द्या. हे उपाय वापरायला मुलांना शिकवा. समजा, एखादी व्यक्ती काही गैरवर्तन करत असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीला ब्लॉक केलं पाहिजे, हे मुलांना सांगा.

8) काही वेळा मुलं तेरा वर्षांच्या आधीच समाजमाध्यमांवर जातात. अशा वेळी आपल्या सामाजिक सीमारेषा काय आहेत हे मुलांच्या लक्षात येतंच असं नाही. ‘सगळे करतात म्हणून आपणही करू या’ असा विचार अनेकदा मुलांच्या मनात असतो. शिवाय, हे सगळं ऑनलाईन सुरू आहे म्हणजे आई-बाबांना समजणार नाही आणि आपल्या काही धोका नाही असंही त्यांना वाटत असतं. मात्र, धोके दरवेळी शारीरिकच असतात असं नाही. ते मानसिकही असतात. त्यामुळे मुलांना ऑनलाईन जगात सजग कसं राहायचं, आपल्या सीमारेषा कशा ओळखायच्या, ‘नाही’ का म्हणायचं या गोष्टी शिकवणं, नीट समजावून देणं आवश्यक आहे.

9) काही वेळा असंही घडतं की, असल्या चुकीच्या गोष्टी मुलांकडे मागितल्या जात नाहीत; मात्र, समोरचा गुन्हेगार सतत त्यांना प्रायव्हेट मेसेज पाठवत असतो, त्यांच्या दिसण्यावरून कॉमेंट्स करत असतो, त्यामुळं मुलांच्या मनावर दडपण येऊ शकतं. अशा वेळी लगेच कुणा मोठ्याला सांगितलं गेलं पाहिजे, हे मुलांना माहीत असायला हवं.

10) इंटरनेटला ‘डिलिट’ हे बटण नाहीय, हे मुलांना सांगा. एकदा ज्या गोष्टी ऑनलाईन पोस्ट झाल्या त्या तिथून कधीही डिलिट होऊ शकत नाहीत. त्यामुळे आपण काय पोस्ट करतोय, कशासाठी पोस्ट करतोय, आपल्याला एखादा फोटो आणि व्हिडिओ का टाकावासा वाटतोय याचा नीट विचार करणं गरजेचं आहे. कारण, अपलोड केलेले फोटो आणि व्हिडिओ सायबर-स्पेसमधून डिलिट होत नाहीत.

(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com