कोरोना आला आणि भारतात शिक्षक ‘दीन’ झाला

teachers
teachersgoogle


खरंतर भारतातील शिक्षक कोरोनाआधीसुद्धा दीनच होता. म्हणजे ५ सप्टेंबरला शिक्षक किती महान असतात, याचे गोडवे गातात; पण व्यवहारात शिक्षकांना तेवढा सन्मान मिळत नाही. जे प्रोफेशन जगातल्या इतर प्रोफेशन्सना घडवतात त्या शिक्षकी पेशाला आदर, मान, सन्मान रोजच्या जगण्यात नसतो. हल्ली विद्यार्थी, पालक यांच्या मनात शिक्षकांविषयी प्रेम दिसत नाही.

संस्थाचालकांना वाटतं, शिक्षक म्हणजे आपले नोकरच आहेत. हवं ते काम सांगा. राजकारण्यांना वाटतं शिक्षक म्हणजे मोठी वोट बँकच आहे. आपली राजकारणातली कामं सांगायचं हक्काचं व्यासपीठ. सरकारला वाटतं, कोणत्याही योजना अमलात आणायच्या असतील, तर ‘बिनपगारी फुल अधिकारी’ म्हणजे शिक्षक. त्यांना हल्ली अशैक्षणिक कामांत इतकं अडकवून ठेवलं जातं, की ते शिकवायचं विसरून जातील. एवढं होऊनही शिक्षक वस्त्या-वस्त्यांत, गावा-गावांत, पाड्यांवर शिकवतात. ग्रामीण ते शहरी भागात सगळीकडे शिक्षक ज्ञानदानाचं कार्य करतात.
पालकांनो, तुम्ही जर या पेशाला मान-सन्मान दिला नाही, संस्थाचालकांनी त्यांना चांगला मोबदला दिला नाही, तर या पेशात उत्तम दर्जाचं मनुष्यबळ येणार नाही. चांगले, ज्ञानी शिक्षकी पेशातून निघून जातील किंवा हा पेशा करिअर म्हणून निवडणार नाहीत. मग तुमची-आमची मुलं घडतील कशी? हो, अशी परिस्थिती आली आहे. कोरोनामुळे कितीतरी खासगी शाळा बंद पडल्या. पालकांच्या आणि सरकारच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली. आज बरेच शिक्षक शेतावर काम करताहेत. पार्टटाइम ट्युशन्स घेताहेत. तर बाकी वेळ छोट्या- मोठ्या दुसऱ्या नोकऱ्या शोधताहेत. उत्तम ऑनलाइन शिक्षण देण्यात यशस्वी झालेल्या शाळांतील शिक्षकांनासुद्धा स्वतःला तंत्रज्ञानावर आधारित नवं कौशल्य शिकायला खूप संघर्ष करावा लागला. पण त्यांनी तो केला. पहिले ऑनलाइन स्क्रीन शिकण्याचा संघर्ष, मग नेटवर्क मिळवण्याचा, घरातील सर्व सदस्यांसमोर शिकवण्याचा, मग गुगल क्लासरूमवर विद्यार्थ्यांना कंट्रोल करण्याचा, मग त्या विद्यार्थ्यांजवळ त्यांच्या महान आया बसलेल्या असतात, फक्त शिक्षकांच्या चुका काढण्यासाठी. त्यांना न चिडता, हसून समजून घेऊन, बऱ्याच वेळा अपमान गिळून, पुन्हा आनंदी मूडने शिकवायला सुरवात करणं... अशा अनेक संघर्षांतून हे शिक्षक गेले. विद्यार्थ्यांना चुकीची माहिती जाऊ नये म्हणून एक व्हिडिओ अनेक वेळा रेकॉर्ड केला. तो शंभर वेळा एडिट केला आणि विद्यार्थ्यांना शेअर केला.


पालकांनो, विचार करा की आपल्या चिमुकल्यांना ऑनलाइन शिक्षण मिळालं नसतं, तर ही दोन वर्ष कशी गेली असती? असा विचार करा, की या टीचर्सनी स्वतःमध्ये बदल केला नसता तर? तुमच्या मुलांचा किती लर्निंग लॉस झाला असता? मुख्य म्हणजे या शिक्षकांमध्ये ५० वर्ष वयाचे उत्तम गणित, शास्त्र शिकवणारे शिक्षक आहेत. ज्या वयात आराम करायचा असतो, त्या वयातील ज्येष्ठ अनुभवी शिक्षकांना हे सर्व नवीन कौशल्य शिकावं लागलं. फक्त विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आणि त्यांच्या प्रेमापोटी शिक्षकी पेशाला समर्पित केल्यामुळे त्यांनी ऑनलाइन शिक्षणाचं कौशल्य आत्मसात केलं. त्यांची मुलं मोठी झाली आहेत, चांगली नोकरी करतात. त्यांनी वडिलांना/आईला सांगितलं, की या वयात दहा-दहा तास स्क्रीनवर काम करण्यापेक्षा नोकरी सोडून द्या. तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो. चार तास शिकविण्यासाठी स्क्रीनवर सहा तास अधिकचा वेळ खर्च करावा लागतो. तेव्हा हे शिक्षक म्हणतात, ‘अरे बाळा, तुझ्या टीचर्सनी पंधरा- वीस वर्षांपूर्वी असा विचार केला असता तर? तुला आज चांगली नोकरी लागली असती का रे?’


वाईट याचं वाटतं, की ज्या घरात दुसरं कोणी कमावणारं नसतं आणि या शिक्षकांच्या पगारावर घर चालतं, तेव्हा त्यांची परिस्थिती बघवत नाही. बऱ्याच संस्थाचालकांनी नाइलाजाने शिक्षकांचा पगार ५० टक्के केलाय. त्यांचीपण मजबुरी आहे. आधीच बँकेचं कर्ज काढलेलं, त्यात बऱ्याच संस्थाचालकांनी शिक्षकांचं घर चालावं म्हणून अधिकचं कर्ज काढलं. भारतात ६६ टक्के विद्यार्थी खासगी शाळेत शिकतात. त्यांचे लाखो शिक्षक कोरोनामुळे ‘दीन’ होत आहेत. म्हणून मी म्हणालो, ‘शिक्षक दिनाला शिक्षक ‘दीन’ होत आहे.


हे थांबवायचं असेल, तर त्या प्रत्येक शिक्षकाच्या पाठीशी उभे राहा. या कोविडमध्ये त्यांनी असामान्य कर्तव्य बजावलं आहे. तंत्रज्ञान महान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही, पण महान शिक्षकांच्या हाती जेव्हा तंत्रज्ञान जातं, तेव्हा परिवर्तन होतं. समाज म्हणून आपण सर्वांनी या महान शिक्षकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कितीतरी सरकारी शिक्षकांनी कोविडकाळात नोकरी केली. त्यामुळे त्यांना प्राणही गमवावे लागले. आपण इतकं असंवेदनशील होऊन चालणार नाही, की शिक्षक ‘दीन’ होतोय आणि आपल्याला काही फरक पडणार नाही. अशीच असंवेदनशीलता दाखवली, तर उद्याची पिढी दीन झालेली तुम्हाला चालेल का? नाही ना? मग चला, खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा करू. तुमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना फोन करा, मेसेज नाही, फोनच करा आणि मनापासून Thank you म्हणा आणि sorry सुद्धा..!
‘आम्ही तुम्हाला चुकीचं आणि लागेल असं बोललो असू तर माफ करा. तुम्ही ग्रेट आहात.’ बघा, शिक्षक काय म्हणतील... फोन ठेवल्यावर ते फक्त डोळे पुसतील.

टीप : ‘दीन’चा अर्थ दुबळा, गरीब, बिचारा...
आणि ‘दिन’ म्हणजे दिवस

teachers
शिक्षकदिन विशेष : ऑनलाईन तासांमुळे मुलं झाली धाडसी अन्‌ तंत्रस्नेही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com