esakal | ...आणि देशपातळीवर झाला गौरव
sakal

बोलून बातमी शोधा

Kalpana Kamadi

...आणि देशपातळीवर झाला गौरव

sakal_logo
By
टीम SFA

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी '' सोशल फॉर अॅक्शन'' क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. मागील रविवारी ‘माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेची माहिती पाहिली. यावेळी संस्थेच्या माध्यमातून कुणाला कशी प्रेरणा मिळाली याविषयी...

कल्पना उत्तम कामडी या धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या मारुतीपाडा गावात उषा शिलाई स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत आहेत. गावात उषा शिलाई स्कूल सुरू होण्यापूर्वी कल्पना आणि त्यांचे पती कृषी कामगार म्हणून काम करत होते. मारुतीपाडा हे गाव खूप लहान असून, आदिवासीबहुल आहे, त्यामुळं गावात इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. कल्पना यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्या व त्यांचे कुटुंबीय दोनवेळच्या जेवणासाठी संघर्ष करीत असत. कल्पना त्यांच्या कुटुंबात पती, वडील, सासू व मुलासोबत राहत होत्या. कुटुंबातील सर्व सदस्य शेतमजुर म्हणून काम करीत होते.

गावात रोजगाराच्या संधी नसल्यामुळं कल्पना व त्यांच्या पतीनं कामाच्या व रोजगाराच्या शोधात गावातून अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांसाठी स्थलांतर केलं होतं. त्या दोघांनाही नगर जिल्ह्यात रोजंदारीवर काम मिळालं खरं; पण कामात सातत्य नव्हतं आणि कामाचा मोबदलासुद्धा अत्यल्प मिळत होता, त्यामुळं घरखर्च, घरभाडं इत्यादी स्वरूपाचा खर्च त्यांना भागविता येत नसे. अशा परिस्थितीतही ते अहमदनगर इथं सहा वर्षं राहिले; पण त्यांच्या पदरात फारसं काही पडलं नाही. त्यामुळं कल्पना व त्यांच्या पतीनं परत गावाकडं जाऊन शेतीत काम करण्याचं ठरविलं आणि ते गावी आले. शेतीच्या कामातून मिळणारी मजुरीदेखील अत्यल्प होती. म्हणून एके दिवशी त्यांनी शेतीच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणतंतरी काम करण्याचं ठरविलं, कारण शेतीच्या कामातून कल्पना यांना दररोज आठ तास काम करून, साठ रुपये मजुरी मिळत असे. तसंच, शेतीतील काम दररोज उपलब्ध होत नव्हतं. म्हणूनच कल्पना यांनी दुसरं काम करण्याचं ठरविलं आणि सुदैवानं त्यांना अफार्म व ‘ माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं राबविण्यात येणाऱ्या उषा शिलाई स्कूल प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली.

कल्पना यांनी संस्थेच्या कार्यालयात जाऊन प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती घेऊन, शिलाई व टेलरिंगचं प्रशिक्षण घेण्यास सुरू केलं. कल्पना यांनी स्वतःचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावातील इतर महिलांना शिलाई व टेलरिंगचं सशुल्क प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत कल्पना यांनी गावातील व परिसरातील एकूण तीस महिलांना प्रशिक्षण देऊन, स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिलं आहे. तसंच, प्रशिक्षित तीस महिला इतर महिलांना प्रशिक्षण देत आहेत. कल्पना दिवसाला किमान दोन ब्लाऊज शिवून शंभर रुपये मिळवीत आहेत. शिलाई व टेलरिंगच्या उत्पन्नातून कल्पना व त्यांचे पती या दोघांनी बचत करून चारचाकी वाहन खरेदी केलं आहे. आज त्यांचे पती स्वत:च्या वाहनामध्ये ड्रायव्हर म्हणून प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात.

दोघंही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत आणि दोघंही त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी व खर्चासाठी कुटुंबावर अवलंबून नाहीत. कल्पना यांनी एक पिको-फॉल मशिन खरेदी करून, फक्त शिलाई स्कूलमध्ये जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. कल्पना यांच्या मेहनतीनं त्यांचं कुटुंब आनंदी झालं. एन. डी. टीव्ही मार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी ''कुशलता के कदम २'' हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि देशभरातून महिलांची निवड यासाठी केली जाते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' संस्थेकडून कल्पना यांच्याबरोबरच इतर दोन महिलांची त्यांच्या या कामामुळं निवड झाली होती.

साक्री परिसर व इतर तालुका स्तरावरील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरजू महिलांना टेलरिंग व शिलाईचं प्रशिक्षण देण्याकरिता व महिलांना स्वतःचा टेलरिंग व शिलाईचा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी शिलाई मशिन व इतर पूरक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेला निधीची आवश्यकता आहे आणि हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संस्थेला आपल्या सर्वांच्या सामूहिक मदतीची गरज आहे.

मदत कशी कराल...

‘माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळं संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ''सोशल फॉर अॅक्शन'' या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक :- ८६०५०१७३६६

loading image