निराधारांचा भक्कम आधार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social for Action
निराधारांचा भक्कम आधार...

निराधारांचा भक्कम आधार...

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईटचा नवा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. या वेबसाईटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी व क्राउड फंडिंगसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म उदयास आला. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. आजच्या भागात ‘प्रार्थना फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून निराधार, बेघर, भिक्षेकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या आयुष्याला कशी दिशा मिळाली याविषयी माहिती घेऊ....

लहानपण देगा देवा..... या ओळी प्रत्येकाच्या बाबतीत योग्य ठरतील असं नाही. ज्या वयात खेळायचं, बागडायचं त्या वयात जर जबाबदारी आली, तर कोणालाही हे लहानपण नको वाटेल. सिद्धू इपोळेसमोर कुटुंबाच्या उपजीविकेसाठी भिक्षा मागून व गावो-गावी जत्रेत जाऊन फोटो विकणे हा पर्याय होता. सिद्धूचे आई वडील आज या जत्रेत तर उदया दुसऱ्या गावातील जत्रेत जात असे त्यांच्याबरोबर सिद्धूही जात असे. ज्या वयात शिक्षणाचे, संस्काराचे व जीवन घडवण्याचे धडे गिरवायचे त्या वयात पोटापाण्यासाठी त्याला वणवण फिरावं लागत होतं. सिद्धूची शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती , पण तसे पोषक वातावरण नव्हतं.

याच दरम्यान अनंतअम्मा कृष्णय्यानं व प्रसाद मोहिते या तरुण दाम्पत्यानं ‘प्रार्थना फाउंडेशन’च्या माध्यमातून भिक्षा मागणाऱ्या, वंचित, निराधार, स्थलांतरित व शाळेत न जाणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘वंचितांची शाळा - एक पाऊल प्रगतीकडे’ हा प्रकल्प सुरू केला होता. प्रसाद यांनी सिद्धूला आपल्या शाळेत आणले, सिद्धू शाळेत थोडावेळ येऊन बसू लागला, शिकू लागला, जीवनाचे धडे गिरवू लागला. त्याला शिकण्याची खूप इच्छा होती, ती अधिक प्रबळ झाली. मात्र एखादी जत्रा आली की, आई वडिलांच्या सोबत परत फोटो विकण्यास जात असे. त्यामुळे त्याच्या शिक्षणात खंड पडत होता. सिद्धूच्या आई वडिलांचा त्याच्या शिक्षणाला विरोध होता पण त्याला शिक्षणाची आवड होती.

मोहिते दाम्पत्याने सिद्धूच्या पालकांचे समुपदेशन करून, त्याला वंचितांच्या शाळेत दाखल केले होते. यादरम्यान शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, भिक्षा मागणाऱ्या, वंचित, निराधार मुलांना आधार देण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी पुढे जाऊन, निवासी प्रकल्प उभारण्याचे प्रसाद मोहिते यांनी ठरवले आणि ‘प्रार्थना बालग्राम’ हा निवासी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातील सिद्धू हा पहिला विद्यार्थी. गेली चार वर्षे झाले तो प्रार्थना बालग्राम मध्ये शिक्षणाचे व जीवनाचे धडे घेत आहे. आज प्रार्थना बालग्राममध्ये तीनशे विद्यार्थी आहेत. कालांतराने सिद्धूमध्ये खूप बदल झाले. कधीच शाळेत न जाणार सिद्धू आज रोज शाळेत जत आहे, प्रकल्पातील बारीक - सारीक हिशोब तोच पाहतो, किचन मध्ये लागणारे साहित्य, भाजीपाला याची सर्व जबाबदारी तो पाहतो. सिद्धू प्रार्थना बालग्राम मध्ये दाखल झाला नसता, तर आजही तो रस्त्यावर भिक्षा मागताना दिसला असता,त्याच बालपण हरवलं असतं.

सिद्धू सारखेच रोहिणी लेंढवे या मुलीच्या आयुष्याला सुद्धा ‘प्रार्थना बालग्राम’ मुळे दिशा मिळाली आहे. रोहिणीच्या शेतकरी वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वाट्याला येणारी सर्व दुःख, रोहिणीच्या वाट्याला आली तेव्हा रोहिणी अगदी लहान होती. तिला मोठ्या दोन बहिणी होत्या, आईच्या वाट्याला प्रचंड दुःख, वेदना आल्या त्याचबरोबर कुटुंबाचा भार ही पडला. जबाबदारी म्हणून आईने दोन बहिणींची लग्ने लवकरच केली. आईने मोलमजुरी करून रोहिणीचा सांभाळ केला. दोन बहिणींप्रमाणे रोहिणीचेसुद्धा लवकर लग्न होऊ नये, तिचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून ‘प्रार्थना बालग्राम’ हा निवासी प्रकल्प सुरू केल्यावर प्रसाद मोहिते दाम्पत्याने रोहिणीला प्रकल्पात दाखल करून घेतले. आज तीन वर्ष झाली रोहिणी प्रकल्पात राहत असून, उत्तम शिक्षण घेत आहे. आज रोहिणी दहावी पास झाली असून, तिला ७० टक्के गुण मिळाले आहेत. पुढील शिक्षण घेऊन, ती स्वतःच्या पायावर उभी राहण्याची जिद्द बाळगून आहे. शिक्षण घेता-घेता रोहिणी ‘प्रार्थना फाउंडेशन’च्या माध्यमातून कौशल्य विकासाचे धडे सुद्धा घेत आहे. आज ती शिलाई मशीन, टेलरिंग व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेत आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुली शिकाव्या त्या स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्या हा संस्थेचा प्रयत्न आहे. ‘वंचितांची शाळा-एक पाऊल प्रगतीकडे’ या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावरची बेघर आणि निराधार तीनशे मुलं-मुली आणि वृद्धांसाठी ‘प्रार्थना बालग्राम’ हा निवासी प्रकल्प हक्काच्या जागेत उभा राहत असून प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. सध्या प्रकल्प भाड्याच्या जागेत सुरु आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ‘प्रार्थना फाउंडेशन’ला आपल्या सर्वांच्या सामुदायिक मदतीची गरज आहे.

कशी कराल मदत...

‘प्रार्थना फाउंडेशन’या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर "प्रार्थना फाउंडेशन" या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https ://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन "प्रार्थना फाउंडेशन" या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

आधिक माहितीसाठी क्रमांक : ८६०५०१७३६६

Web Title: Team Sfa Writes Social For Action Help Support

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Team SFA