नजर हटी दुर्घटना घटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नजर हटी दुर्घटना घटी

नजर हटी दुर्घटना घटी

लहान मुलांनी घरच्या आणि आजूबाजूच्या झाडाची फुलं तोडून आणली आणि आजीच्या फोटोसमोर ठेवली. माझा भाऊ त्यांना रागवू लागला. दुसऱ्याच्या झाडाची फुलं कशाला तोडली म्हणून. त्यावर त्या बोलल्या असू दे रे आज्जीच प्रेम.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या आईला जाऊन दोन-तीन दिवस झाले होते. आम्ही बहीण-भावंडं उदास बसलो होतो. बाबा गेलेले आणि आता आईही आमच्यात नाही. आठवणी काढत बसलो होतो. कुणी ना कुणी भेटायला येत असायचं. त्यांच्यासोबत बोलण्यात वेळ जायचा. कशातच मन लागत नव्हते. आई आजारी झाली झाली म्हणता म्हणता लगेच सोडूनही गेली कायमची. खूप काही सांगायचं राहिलं होतं. खूप काही विचारायचं राहिलं होतं. तिची सेवासुद्धा करता आली नाही. मन अगदी खट्टू झालं होतं. जायच्या आधी तिच्या साड्या मी आवरून देत असताना म्हणाली होती, ‘‘ती जांभळ्या रंगाची शांतिनिकेतन साडी तू घे, तुला आवडते ना.’’ मी म्हटलं, ‘‘बरं मी नेसते आणि मग तुला परत करते.’’ तर म्हणाली, ‘‘नको तुझ्याकडेच ठेव.’’ आज आईची सारखी आठवण येतेय. वाटत होतं जणुकाही हिला जाण्याची चाहूल लागली होती. राहून राहून डोळ्यांत पाणी येत होतं.

हेही वाचा: आयोडीनयुक्त मीठ खा स्वस्थ राहा

त्याचवेळी आमच्या जवळच्या एक नातेवाईक भेटायला आल्या. त्या आम्हाला आमच्या आईसारख्याच वाटायच्या. आधी शिक्षिका असल्याने त्यांना बोलायची भारी सवय होती. शिवाय कुठलीही गोष्ट कशी रंगवून गमतीदार बनवून सांगायची, हे त्यांना चांगलेच माहिती होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू असताना आमच्या लहान मुलांनी घरच्या आणि आजूबाजूच्या झाडाची फुलं तोडून आणली आणि आजीच्या फोटोसमोर ठेवली. माझा भाऊ त्यांना रागवू लागला. दुसऱ्याच्या झाडाची फुलं कशाला तोडली म्हणून. त्यावर त्या बोलल्या असू दे रे आज्जीच प्रेम. लहान मुलांचं काही सांगता येत नाही. त्यांच्या मनात काही नसतं. निरागस असतात ती... एकदा असंच झालं म्हणून त्यांनी एक गंमत सांगितली.

ते दोघे नोकरीवर जायचे. म्हणजे यजमान ऑफिसमध्ये, त्या शाळेत मुख्याध्यापिका होत्या आणि मुलं शाळेत. रोज मुलं आधी येणार आणि मग त्यानंतर त्यांचे यजमान. असा रोजचा त्यांचा दिनक्रम असायचा. एकदा एका शनिवारी त्यांच्या यजमानांना सुटी होती. पण बाकी सगळे आपापल्या शाळेत गेलेले. ठरल्याप्रमाणे यजमानांनी गरम गरम खिचडी, पापड, कढी असा बेत करून ठेवला आणि वाट पाहू लागले. मुलं शाळेतन येऊन गेली. पण त्या काही आल्या नाही. सगळ्यांना भूक लागली. बरं आई आल्याशिवाय मुलं जेवायला तयार नव्हती. शेवटी मुलं इकडे तिकडे पसार झाली आईची वाट बघत.

आणि यजमान पुस्तक वाचण्यात गुंग झाले. त्यांना थोडा उशीर झाला होता शाळेतून यायला. आल्याबरोबर सगळे नेहमीप्रमाणे टेबलावर जेवायला बसले. एक-दोन घास घेतल्यानंतर त्या पाणी प्यायल्या. पाणी एकदम गार. त्यांना आश्चर्यच वाटलं. आपल्याकडे फ्रिज नाही. कारण त्यावेळी सगळ्यांकडे बहुदा फ्रिज नसायचे. पाणी एवढे गार कसे? त्यांनी मुलांना विचारले, ‘‘आज माठातले पाणी एवढे गार कसे काय?’’ त्यावर त्यांचा लहान मुलगा अगदी शांतपणे बोलला, ‘‘अगं गल्लीतल्या शेवटच्या घरातले आजोबा देवाघरी गेलेले ना. तिथे खूप सारा बर्फ त्या आजोबांना ठेवायला आणला

हेही वाचा: पोहे डोसे

होता.’’ हे ऐकून त्यांना काय करावे आणि काय नाही, काहीच सूचत नव्हते. उलटीसारखं व्हायला लागलं. एक ग्लासभर पाणी पोटात गेलं होतं. त्यांनी यजमानांकडे पाहिले. बिचारे त्यांना कुठे पाहू न काय करू काहीच कळेना. कारण ‘नजर हटी अन् दुर्घटना घटी’ झालं होतं. पुढे काय झाले याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. पण आम्ही मात्र लोटपोट हसलो खूप दिवसानंतर. ही खरीखुरी गंमत नाटकात वापरली. ज्याला प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली.

- अलका मोकाशी, नागपूर ९६६५४११९७०

loading image
go to top