

Sangli Natya Shatabdi Mahotsav
esakal
आशुतोष पोतदार - potdar.ashutosh@gmail.com
माणूस एकट्याने जगत नाही. तो एकत्र येतो, सण साजरे करतो, खेळ खेळतो, गोष्टी सांगतो आणि ऐकतो. हजारो वर्षांपासून हे चालत आलंय. प्राचीन इजिप्तमध्ये, ग्रीसमध्ये, आशियातल्या विधी परंपरांमध्ये माणसं एकत्र येऊन असे सोहळे करत आली आहेत. अव्याहत चालत असलेल्या धार्मिक किंवा विधी परंपरा असोत किंवा आपली ओळख सिद्ध करण्याच्या हेतूने घातलेला घाट असो किंवा अगदी गंमत-जंमत करत एकमेकांना रिझवण्यासाठी लहान-थोर माणसं छोटे-मोठे सोहळे करण्यासाठी एकत्र येतात. आपण निर्माण केलेलं इतरांनी पाहावं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं यासाठी पुढे नाट्यसोहळे आले. एकापेक्षा जास्त नाटकं एकत्र आणून जो सोहळा साजरा होतो तो नाट्यमहोत्सव. मग नाटक बंदिस्त नाट्यगृहात असो किंवा मोकळ्या जागेत, बोलणारं असो किंवा नाचत-गाणारं, एका पात्राचं असो किंवा अनेकांचं... नाट्यमहोत्सव म्हणजे विशिष्ट सूत्रात गुंफलेली, तात्पुरत्या काळासाठी समुदायाला मिळणारी रंगावकाशी काल्याची अनुभूती. काही दिवसांसाठी इथे एक समुदाय जमतो. वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, राजकीय भूमिका एकत्र येतात. रोजच्या साच्यातल्या जगण्याला विराम मिळतो आणि अवकाश तयार होतो, सामूहिक अनुभवाचा, विचारमंथनाचा.