
पुस्तक परिचय
esakal
पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव : रावसाहेब कसबे : नव्या विचारवाटा
संपादन : डॉ.मिलिंद कसबे
प्रकाशक : पुस्तक मार्केट पब्लिकेशन
पृष्ठे : ८०८ मूल्य : १००० रु.
इतिहास, तत्वज्ञान, विचारसरणी व आधुनिक ज्ञान-विज्ञान यांची चिकित्सक व अभ्यासपूर्ण मांडणी करणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या वयाची ८१ वर्षे येत्या १२ नोव्हेंबरला पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांचे मागील पन्नास-साठ वर्षांतील निवडक लेख, भाषणे आणि मुलाखती यांचा संग्रह करून ते ग्रंथरूपाने मांडण्याचा प्रयत्न त्यांचे पुतणे डॉ. मिलिंद कसबे यांनी या पुस्तकाच्या संपादनाच्या रूपाने केला आहे. रावसाहेबांनी आजवर लिहिलेल्या स्वतंत्र ग्रंथांपेक्षा हा ग्रंथ वेगळा व स्वतंत्र आहे. रावसाहेबांनी महत्त्वाच्या विषयावर जे लेख, भाषणे, मुलाखती दिल्या आहेत ते सगळेच आजच्या वर्तमान प्रश्नांना थेटपणे भिडणाऱ्या आहेच. त्यामुळे हा ग्रंथ केवळ संकलन नसून आजच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संघर्षाच्या काळात नवी विचारवाट रुजविणारा आहे. रावसाहेबांनी धर्म, समाज, संस्कृती, साहित्य, चळवळी, बुद्ध तत्वज्ञान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जातिअंत, मार्क्सवाद, आजची आव्हाने, मराठा आरक्षण, जागतिकीकरण, सामाजिक न्याय, आदी महत्वाच्या प्रश्नांवर सखोल असे चिंतन आयुष्यभर केले.