

Dr Shriram Lagoo National Theatre Festival Pune
esakal
आशुतोष पोतदार
भारतीय रंगभूमीची चर्चा होत असताना मराठी रंगभूमीचा आणि डॉ. श्रीराम लागू यांचा गौरव होणं साहजिकच आहे. पण डॉ. लागूंच्या नाट्यकर्तृत्वाचा प्रवास फक्त भारावून टाकणाऱ्या नाट्यपरंपरेच्या चौकटीत पाहता येणार नाही. तर, तो महाराष्ट्रातील समृद्ध अशा प्रागतिक परंपरेतही शोधावा लागेल. स्मरणरंजनाच्या पलीकडे जात, सर्जनशील नाट्यतत्त्व आणि लोकशाहीवर दृढ श्रद्धा असणाऱ्या उंबरठ्यावरल्या रंगावकाशी समतेच्या अवकाशात घडणारी, विचारास प्रवृत्त करणारी त्यांची नाटके या दृष्टीने महत्त्वाची ठरतात.
बहुचर्चित श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्यमहोत्सवाचा सोहळा पुण्यात सुरू झाला आहे. महोत्सवाची सुरुवात झाली ती आपल्यापैकी अनेकांना सहजी विसरता येणार नाही त्या परेश रावल आणि नसीरुद्दीन शाह यांच्यातील संवादाने. हे दोघे जण आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे असे अभिनेते, परस्परभिन्न नाट्यविषयक धारणा असणारे आणि वेगवेगळ्या प्रकारचं नाटक करणारे. दोघांची अभिनयाकडे पाहण्याची दृष्टी आणि अभिनयशैलीही वेगळी. एका भाषेत जे म्हणता येत नाही ते दुसऱ्या भाषेत सापडतं आणि एका परंपरेत जे मिळत नाही ते दुसऱ्या परंपरेतून दिसतं. अगदी असं या दोघांच्या संवादातून जाणवलं. नाट्यमहोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे आपल्या मार्मिक आणि समयोचित प्रास्ताविकात म्हणाले तसं हा महोत्सव ‘सांस्कृतिक संवाद’ आहे आणि असा संवाद या दोन अभिनेत्यांनी केला.