

Best Marathi Adventure Stories for Kids
esakal
प्राची गावस्कर- prachi.gawaskar@esakal.com
उन्हाळ्याची सुट्टीत अनेक मुलांचा एक आवडता कार्यक्रम असतो, तो म्हणजे पुस्तकांचे वाचन करणे. अशा वेळी आई-बाबांनाही मुलांना कोणती पुस्तके वाचनासाठी द्यायची याचा प्रश्न पडतो. यंदाच्या सुट्टीत मात्र एक छान पुस्तक मुले वाचू शकतात. ते म्हणजे, भारत सासणे यांची ‘समशेर आणि राक्षसाचे पाऊल’ ही कादंबरी! बुद्धिमान गुप्तहेर समशेर कुलूपघरे एका नव्या रहस्यमय कथानकासह मुलांच्या भेटीला आला आहे. एका गावातील मौल्यवान खजिना चोरण्याचा काही चोरांनी हुशारीने आखलेला कट समशेर आपल्या मित्रांच्या मदतीने कसा उधळून लावतो, हे उत्कंठावर्धक कथानक कादंबरीत मांडण्यात आले आहे.
भारत सासणे यांचा हा मानसपुत्र समशेर कुलूपघरे यापूर्वी लांब मिशीवाल्या माणसाचं रहस्य, भूतबंगला, अफलातून प्रकरण चाळीस मिनिटांचं आव्हान अशा अनेक कादंबऱ्यामधून मुलांच्या भेटीला आला आहे. धाडसीवृत्ती आणि साहसी करामतींची आवड असलेला कुमारवयीन समशेर बुद्धिमान आहे. तो गणित सोडवतो, कोडी सोडवतो आणि संगणकही शिकतो आहे. तो बुद्धिबळ खेळतो, वेगवेगळ्या भाषा शिकतो. मुख्य म्हणजे व्यायामसुद्धा करतो. निरीक्षणशक्तीच्या, तर्कनिष्ठ विचारांच्या बळावर मोठ्या साहसाने अतिशय धूर्त, कपटी लोकांचे कारस्थान तो उधळून लावतो, त्यामुळे हा समशेर मुलांच्या मनात लगेच घर करतो. त्याच्या रहस्य उलगडण्याच्या आवडीमुळे त्याचे मित्र प्रेमाने त्याला ‘शेरलॉक होम्स्’ असं म्हणतात.