मनभेद नव्हतेच! : डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे
रविवार, 26 मे 2019

विरोधक कमजोर असल्याने शिवसेनेने सातत्याने जनतेच्या प्रश्‍नांवर आवाज उठविला. भाजपशी मतभेद होते. पण, मनभेद होऊ दिले नाहीत. एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे गेलो.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असूनदेखील योग्य प्रश्‍न आणि मुद्द्यावर शिवसेना आवाज उठवत होती. मात्र लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना व्यापक राष्ट्रहितासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीला आलेले फळ म्हणजे निवडणुकीतील विजय आहे. 

सर्व व्यासपीठांवरून सरकारचे घटक म्हणून शेतकरी कर्जमुक्ती व्हावी, भूसंपादनाचे विधेयक लोकाभिमुख व्हावे, जीएसटीचा परतावा महापालिकांना थेट अगोदरच मिळावा, महाराष्ट्र अखंड राहावा, नाणार प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी जाहीर भूमिका घेतली. राज्यात विरोधक कमजोर असल्याने सत्तेत राहूनही जनतेच्या प्रश्‍नांवर शिवसेना आवाज उठवत राहिली. हेच शिवसेनेचे वेगळेपण आणि बळ आहे. निवडणुकीला मात्र आम्ही एकदिलाने सामोरे गेलो. युतीत मतभेद झाले तरी मनभेद होऊ दिले नाहीत. 

शिवसेनेने सत्तेत राहून प्रश्न उपस्थित केले होते, त्याचबरोबर प्रत्यक्षात थेट मदत व सेवा करण्यातही शिवसेना जनतेसोबत राहिली. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांसाठी शिवसेनेने अनेक सेवाभावी योजना केल्या. उदा. शिवजलक्रांती योजना, बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना, जनावरांसाठी पशुखाद्य यासोबतच आमदार, खासदार यांनी महिन्याचे मानधनही दुष्काळ मदतसेवेसाठी दिले. याबाबत समाजात सकारात्मक भूमिका दिसून आली. शिवसेनेची विश्वासार्हता वाढली. त्याचा परिणाम म्हणजे सरकारमधील दोन्ही घटकांची परत एकदा युती झाली आणि ते मतदारांनी  स्वीकारले. 

डॉ. नीलम गोऱ्हे, प्रवक्त्या, शिवसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There was a difference of opinion with the BJP but there was no dispute