नोकरीत समाधानी नाही? निर्णय घेण्याआधी या 4 गोष्टींचा विचार करा!

बुधवार, 29 मे 2019

अनेकदा असं होतं, की एक नोकरी सोडल्यानंतर दुसर्‍या ठिकाणी काम सुरू करतो खरं; पण तिथंही कामाचा आनंद मिळेनासा होतो. असं झालंय तुमच्या बाबतीत? असं का होतं? वाचा सविस्तर... 

नोकरी कुठेही करा, कशीही करा.. 'कामातून मिळणारा आनंद' हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. 'जॉब सॅटिसफॅक्शन' आणि 'पगार' या दोन गोष्टी नोकरीमध्ये होणार्‍या बदलांसाठी सर्वांत महत्त्वाच्या असतात. पण अनेकदा असं होतं, की एक नोकरी सोडल्यानंतर दुसर्‍या ठिकाणी काम सुरू करतो खरं; पण तिथंही कामाचा आनंद मिळेनासा होतो. असं झालंय तुमच्या बाबतीत?

यावर काही सोपे तोडगे आहेत. कुठलंही नवं काम सुरू केलं, की त्यात लगेचच फार अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू नका. त्यातून घाईघाईत चुकीचं विश्लेषण होणं आणि त्यातून आणखी चुकीचं निर्णय घेणं ही 'सायकल' सुरू होते. याचा अर्थ, नव्या कामामध्ये तुम्ही खुश नाही, हे नाकारा असं नाही. 'हे काम समाधानकारक नाही' असं जाणून घेत काही ठोस पावलं उचलली, तर समाधानकारक किंवा योग्य निर्णयापर्यंत येऊन आपण पोचू शकतो.

1. सतत अंतर्मुख होऊन विचार करू नका
नव्या ठिकाणी काम सुरू केल्यानंतर लगेचच त्या कामातून तुम्हाला हवा तसा आनंद मिळेल किंवा जॉब सॅटिसफॅक्शन मिळेल, असं नाही. अशी जाणीव व्हायला लागली, तर लगेच कोणत्याही निर्णयाकडे झुकू नका. आणखी दोन-तीन आठवडे किंवा महिन्याभराने पुन्हा याचा विचार करा. त्यासाठी पुन्हा विचार करण्याचा एक रिमाईंडर लावा आणि रोजचं काम त्याच उत्साहानं सुरू करा. कदाचित त्या महिन्याभरात फरक जाणवू शकेल.

2. थोडी अजून वाट पाहा
कुठल्याही नव्या कामामध्ये आपण सुरवातीपासूनच पारंगत नसतो, हे लक्षात घ्या आणि मान्य करा. तुम्ही हे काम आज सुरू केलं आहे आणि तुमच्या सोबत असलेले त्याही आधीपासून हे काम करत आहेत. त्यामुळे सुरवातीचे काही दिवस तरी तुम्ही त्यांच्या कामाच्या वेगाला किंवा दर्जाला साजेसं काम करू शकणार नाही. त्यामुळे सुरवातीलाच तुमचे नवे सहकारी किंवा बॉसला अतिउत्साहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त आश्वासनं देत दडपण वाढवून घेऊ नका. तुम्हाला वाटतं, त्यापेक्षा थोडी जास्तच 'डेडलाईन' ठेवा; जेणेकरून त्या वेळेत तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता.

3. नव्या जागी रुळायला थोडा वेळ लागतो
फक्त काम कधीच महत्त्वाचं नसतं. तुमची वर्क-प्लेस, डेस्क, ऑफिसचं वातावरण या सगळ्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. अनेकदा काम आवडीचं असलं, तरीही ऑफिसच्या वातावरणाशी जुळवून घेणं थोडं अवघड जात असतं. त्यामुळे तुमचा डेस्क किंवा वर्क-स्पेस शक्य तितकी कम्फर्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नव्या ऑफिसशी जुळवून घेणं सोयीचं जाईल.

4. बॉसशी मनमोकळेपणाने बोला
कामामध्ये, ऑफिसमध्ये एखादी गोष्ट खटकत असेल किंवा त्यामुळे तुम्ही खुश नसाल तर इकडे-तिकडे गॉसिप करण्याऐवजी थेट बॉसशी मनमोकळी चर्चा करा. कदाचित ते काम करण्याठी तुम्हाला अधिक मार्गदर्शनाची किंवा एखाद्या प्रशिक्षणाची किंवा सहकार्याची गरज असू शकेल. हे ओळखून त्या दिशेने योग्य ते प्रयत्न करता येऊ शकतील. तुम्हाला अडचण होत आहे किंवा काही प्रॉब्लेम्स येत आहेत, हे तुमच्या बॉसला आपोआप कळणार नाही. त्यामुळे स्वत:हून चर्चा करा आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा.

तुम्हालाही असं झालंय? एखादं नवं काम आवडलं नाही किंवा नव्या ऑफिसमध्ये रुळला नाहीत वगैरे? तुम्ही यातून तोडगा कसा काढला? तुमचा अनुभव नक्की शेअर करा webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये लिहा 'करिअर्स'!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: think about these 4 points before quitting a job