डब्बा पॉवरपॅक

प्रिया पालन, आहारतज्ज्ञ, झेन रुग्णालय, मुंबई
रविवार, 9 जून 2019

पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात...त्यासाठी बनवा त्यांचा डब्बा असा...

पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात...त्यासाठी बनवा त्यांचा डब्बा असा...

शालेय मुलांना रोज खायला काय द्यायचे आणि त्यातून त्यांच्या आरोग्य संतुलित कसे राखायचे, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या घरात सतावतोय. भाजीपोळीपेक्षा पिझ्झा, बर्गर, वडापाव, नूडल्स, चायनीज अशा पदार्थांना त्यांची पसंती राहते. मूल घरचे खातच नाही, त्यासाठी काय करावे, अशी विचारणा पालक डॉक्‍टर आणि आहारतज्ज्ञांकडे करतात. अगदी कमी वयात मुलांची वाढ झपाट्याने होत असते. त्यासाठी त्यांच्या आहारात पोषक घटक मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे असते. यादृष्टीने प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण प्रथिनांमुळे मुलांची हाडे विकसित होण्यासाठी मदत होते. कार्बोदके मुलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. या तीन मुख्य घटकांचा मुलांच्या रोजच्या आहारात समावेश असलाच पाहिजे. प्रामुख्याने १ ते ५ वयोगटातील मुलांच्या वाढीसाठी कॅल्शियम आणि लोह हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. कॅल्शियम मुलांच्या हाडांना मजबूत बनवते. लोहामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुलभ राखण्यासाठी, तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होते. हे लक्षात घेता मुलांच्या चांगल्या शारीरिक वाढीसाठी लोह आणि कॅल्शियमयुक्त अन्नाचा आहारामध्ये समावेश करण्यावर भर द्यावा.

आजकालची मुले रोजचे पूर्णपणे जेवण घेण्यास टाळाटाळ करतात. त्यांना जेवणामध्ये वैविध्य हवे असते. दैनंदिन खाण्यातील फास्टफूडचे प्रमाण वाढत असल्याने मुलांना घरचे जेवण रुचेनासे होतंय. त्यामुळे पालकांनी घरातील पदार्थांमध्ये वेगळेपण आणून ते आकर्षक, रुचकर होण्यावर भर दिला पाहिजे. उहारणार्थ दाल पराठा, मिश्र भाज्यांचे पराठे, वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांचा वापर पदार्थांमध्ये करणे, वेळोवेळी भाजीत पनीर वापरणे, साध्या चपतीऐवजी पालक आणि मेथीचा वापर करून चपाती बनवणे अशा विविध पद्धतीने रोजचे जेवण लहान मुलांसाठी आकर्षक बनवून त्यांच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेले घटक आहारातून देता येतील.

पालकांसमोर आज जंकफूडचे सर्वात मोठे आव्हान आहे. जंकफूडच्या आहाराने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे. त्याने आज लहान मुलांच्या आरोग्याबाबत सर्वात मोठी समस्या निर्माण होते आहे. पालकांनी मुलांना जंकफूडपासून दूर ठेवावे. कारण अशा पदार्थांच्या सेवनाने त्यांच्या शरीरामध्ये अनावश्‍यक कॅलरीज वाढतात. परिणामी मुलांमध्ये स्थूलपणा येतो. त्यामुळे मुलांची कार्यक्षमता मंदावते. वजन वाढते आणि आणखी नव्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

मुलांच्या आहारमध्ये काजू, बदाम, अक्रोड अशा सुकामेव्याचा समावेश नियमितपणे करावा. त्यामुळे त्यांचा मेंदू विकसित होण्यास आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. आहारमध्ये रोज एक केळ द्यावे, त्यामुळे शरीरातील फायबरचे प्रमाण राखण्यास मदत होते. क जीवनसत्त्व असलेली फळे मोसंबी, संत्री, आवळा मुलांना खाण्यास द्यावीत. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि ते संसर्ग होण्यापासून बचावतात.
(शब्दांकन - उत्कर्षा पाटील)

असे वेळापत्रक, असे खाणे
सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुले शाळा आणि क्‍लासेसच्या वेळापत्रकात खूप व्यग्र असतात. बहुतांश मुलांच्या शाळा सकाळी लवकर असतात. त्यांच्या नाश्‍त्याकडे दुर्लक्ष होते किंवा ती नाश्‍ता करतच नाहीत. मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी सकाळचा नाश्‍ता खूप महत्त्वाचा आहे. 

  • सकाळी शाळेत जाण्यापूर्वीचा नाश्‍ता - एक कप दूध, केळ किंवा अन्य फळ, सुकामेवा. 
  • मधली सुटी (साधारणतः सकाळी नऊ वाजता) - पराठा, गव्हाच्या पिठाची विविध प्रकारच्या भाज्यांच्या समावेशाची फ्रॅंकी, व्हेजिटेबल शॉलो फ्राय कटलेट, इडली, डोसा, सॅंडविच असे पदार्थ.
  • दुसरी सुटी - विविध फळांचे काप.
  • दुपारचे जेवण (मुले घरी आली तर) - वरण भात, चपाती, भाजी, भात, कोशिंबीर.
  • थेट सायंकाळी ४ ते ५ (दुपारी मुले घरी न आल्यास) - पोहे, उपमा यांसारख्या जड पदार्थांचा नाश्‍ता किंवा मिक्‍स कडधान्याचे पदार्थ. 
  • मधल्या वेळेत शरीरातील ऊर्जा राखण्यासाठी (प्रथिने मिळण्यासाठी) चिक्की, ड्रायफ्रूट किंवा विविध प्रकारचे लाडू. 
  • रात्रीचे जेवण - पचायला हलके हवे. जड पदार्थांचे सेवन शक्‍यतो टाळावे. 
  • आरोग्यास हानिकारक शितपेये मुलांना देऊ नयेत, त्या ऐवजी लस्सी, ताक आणि शहाळाचे पाणी द्यावे. 
  • कॅल्शियम आणि प्रथिनांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी मांसाहारींनी अंडी, चिकन, मासे तर शाकाहारींनी दूध, पनीर, चीज, सोयाबीन, नाचणी, चणे यांचा वापर करावा.

आहार म्हटले, की कमी खा किंवा जास्त खा किंबहुना काही पदार्थ तर चक्क वर्ज्य करा, असाच सल्ला वेगवेगळे लोक देतात. आहार किती असावा, यावर खूप चर्चा करतो. पण, आहार कसा असावा, याकडे पुरेसे लक्ष देत नाही. आपले पारंपरिक जेवण हे सर्वांत आदर्श आहे. खूप विचार करून हा आहार निश्‍चित केला आहे.
- मधुरा भाटे, आहारतज्ज्ञ

संपूर्ण शरीराच्या जडणघडणीसाठी दिवसांतून तीन वेळा चौरस आहार घेणे आवश्‍यक असते. दिवसाच्या सुरवातीचा नाश्‍ता व्यवस्थित घ्यावा. दोन्ही जेवणांच्या जास्त असावा, तर रात्रीचे जेवण अगदी हलके, पचण्यास सोपे असे असावे, तसेच जेवणाच्या वेळा सांभाळणेदेखील गरजेचे आहे.
- डॉ. सागर जोशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiffin Nutrition food child fast food junk food health care