विश्वविक्रमी ‘वॉकर’

प्रत्येक वाघाचे जंगलात आपले क्षेत्र असते. त्यात ते कित्येक चौरस किलोमीटरचा प्रवास करतात. एका वाघाच्या नावावर तर सर्वाधिक चालण्याचा विश्वविक्रम जमा आहे. ‘वाॅकर’ त्याचे नाव.
tiger make World record walker 3 thousand 17 km
tiger make World record walker 3 thousand 17 km Sakal

- संजय करकरे

प्रत्येक वाघाचे जंगलात आपले क्षेत्र असते. त्यात ते कित्येक चौरस किलोमीटरचा प्रवास करतात. एका वाघाच्या नावावर तर सर्वाधिक चालण्याचा विश्वविक्रम जमा आहे. ‘वाॅकर’ त्याचे नाव. त्याच्या गळ्यात जीपीएसचा पट्टा असल्याने त्याची चाल मोजली गेली. आठ जिल्हे आणि एक राज्य पार करून सुमारे तीन हजार १७ किलोमीटरचे अंतर त्याने पार केले होते.

आज मात्र ‘वॉकर’ नेमका कुठे आहे, याबद्दल कल्पना नाही. वाघांना आपल्या जोडीदाराच्या शोधात किती भटकावे लागते ते ‘वॉकर’च्या भ्रमंतीवरून समोर आले. जंगलात राहणारा प्रत्येक वाघ आपले क्षेत्र निश्चित करत असतो.

नर वाघाचे क्षेत्र साधारण ३० ते २५० चौरस किलोमीटर इतके मोठे असते. मादी वाघाचे क्षेत्र त्याहून अतिशय कमी म्हणजे वीस ते पन्नास चौरस किलोमीटर इतके असू शकते. अर्थात या आकड्यांना अनेक अपवादही आहेत.

सुप्रसिद्ध ‘जय’ वाघ हा साधारण चारशे-साडेचारशे चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात फिरत होता. वाघांची घनता, माद्यांची उपलब्धता, त्या परिसरात असणारे खाद्य, जंगलाची सलगता व संरक्षण या बाबीही हे क्षेत्र निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जातात.

नर वाघ मादीच्या शोधात दूरवर गेल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होत असतात. अलीकडेच चंद्रपूर जिल्ह्यातील एक वाघ ओडिसाच्या जंगलात गेल्याच्या बातमीने सर्वांना धक्का बसला होता. मग हे वाघ एवढे क्षेत्र कसे पादाक्रांत करतात, ते कोणाच्या नजरेस पडत नाहीत का, महामार्ग, रस्त्यांचे जाळे, नद्या, नाले, शेती, पाणवठे,

तलाव या सर्व बाबी त्यांच्या मार्गावर अथवा त्यांचे मार्ग अडवण्यास कारणीभूत ठरत नाहीत का, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मी आज ज्या वाघाची गोष्ट सांगणार आहे त्याने सर्वाधिक चालण्याचा विश्वविक्रम केला आहे. तो इतका कसा चालला, हे अंतर कोणी मोजले, हा स्वाभाविक पडणारा प्रश्न आहे.

या वाघाला गळ्यात जीपीएसचा पट्टा लावल्याने तो नेमके किती अंतर चालून गेला हे स्पष्ट झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील या वाघाने आठ जिल्हे आणि एक राज्य पार करून सुमारे तीन हजार १७ किलोमीटरचे अंतर पार करून एका अनोख्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

या वाघाला त्याच्या अशा कर्तृत्वामुळेच ‘वॉकर’ हे नाव मिळाले आहे. त्याचे असे झाले, टिपेश्वर अभयारण्यातील पिलखान परिसरातील ‘T-१’ नावाच्या वाघिणीला २०१६ मध्ये तीन पिल्ले होती. ही पिल्ले दोन वर्षांची झाल्यानंतर स्वतंत्र झाली.

त्यातील एक पिल्लू म्हणजे आपल्या आजच्या कथेचा नायक. हा पूर्ण वाढ झालेला नर वाघ जंगलाच्या परिसरात फिरत असतानाच पर्यटकांच्या असे लक्षात आले की त्याच्या पोटाला तारेची वायर गुंडाळली आहे.

जंगलात शिकारीसाठी लावलेल्या तारेच्या फासात हा कदाचित अडकला असावा. त्याने जोर लावल्याने तो तारेचा फास मुळापासून निघून या वाघाच्या पोटाकडील भागाला अडकलेला होता. या घटनेची दखल वनविभागाने घेतली आणि त्याचा शोध सुरू झाला.

याच वेळेस वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पथक पूर्व विदर्भातील वाघांचा अभ्यास करत होते. काही काळानंतर टिपेश्वरमधील या नर वाघाला या टीमने बेशुद्ध केले. त्याच्या पोटाखाली अडकलेली तार काढण्यात आली.

त्यानंतर त्याच्या गळ्यात जीपीएस कॉलर लावण्यात आली.  २०१९ च्या २७ फेब्रुवारीला ती लावण्यात आली. साधारण एक महिन्यानंतर त्याला तारेमुळे झालेली जखम बरी झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या लक्षात आले. या वाघाची आठवण पांढरकवडा येथील वन्यजीवप्रेमी व वाईल्डलाईफ वॉर्डन रमजान विरानी सांगतात, ‘T-१ नावाची एक वाघीण टिपेश्वर अभयारण्यातील पिलखान परिसरात दिसत असे.

तिला २०१६ मध्ये तिच्या दुसऱ्या बाळंतपणात तीन पिल्ले झाली होती. साधारण दोन वर्षांनी ही तीनही नर पिल्ले मोठी झाल्यानंतर येथून बाहेर पडली. त्यातील दोन नर यवतमाळ जिल्ह्याच्या प्रादेशिकच्या जंगलात गेले. नंतर त्यातील जॉनी नावाचा एक नर यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्यात गेला. मी ही सर्व पिल्ले लहान असताना किमान चार वेळा टिपेश्वरच्या जंगलात बघितली आहेत.’

२७ फेब्रुवारी २०१९ ला आपल्या कथेचा नायक म्हणजेच ‘C-१’ ऐन जवानीत आला होता. वर म्हटल्याप्रमाणे त्याला गुंडाळलेली तार काढून टाकून यावेळेस त्याच्या गळ्यात जीपीएस कॉलर लावण्यात आली.

सोबतच त्याच्यावर उपचारही केले गेले. या कॉलरमुळे या ‘C-१’ वाघाचे नेमके ठावठिकाण वनविभागाला तसेच त्याच्या मार्गावर असणाऱ्या तज्ज्ञांना मिळत होते. त्यानंतर साधारण चार महिने हा वाघ टिपेश्वरच्या आजूबाजूला फिरत राहिला. या वेळी ३६० किलोमीटरचा टप्पा त्याने पार केला होता.

त्यानंतर ‘C-१’ने यवतमाळ प्रादेशिकचे जंगल पार करून तो बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला. टिपेश्वर ते ज्ञानगंगा हे अंतर त्याने सात महिन्यांत पूर्ण केले. या सात महिन्यांत त्याने  १४७५ किलोमीटर अंतर पार केले होते. ज्ञानगंगा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक सुंदर अभयारण्य आहे. त्यात प्रामुख्याने बिबट्यांची संख्या अधिक आहे.

तेथे पूर्वी वाघ असल्याच्या नोंदी होत्या. ५ डिसेंबर २०१९ रोजी ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झालेला हा ‘C-१’ वाघ तेथे मार्चपर्यंत राहिला. या वेळेस तो १,१८५ किलोमीटर चालला. मी जरी येथे दोन जिल्ह्यांमधील हे अंतर सांगत असलो,

तरी या वाघाने १९ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत साधारण यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, आदिलाबाद, हिंगोली, नांदेड व औरंगाबाद या जिल्ह्यांत प्रवास केल्याचे त्याच्या गळ्यात लावलेल्या जीपीएसच्या आधारे स्पष्ट झाले. ज्या ठिकाणी कधीही यापूर्वी वाघ दिसला नव्हता तिथे त्याने दस्तक दिली होती.

साधारण १३ महिने त्याच्या गळ्यात हा जीपीएसचा पट्टा होता, त्या आधारे त्याने ३,०१७ किलोमीटरचे अंतर पार केल्याचे वन्यजीव अभ्यासकांच्या लक्षात आले. त्याच वेळी त्याला ‘वॉकर’ ही उपाधी बहाल केली गेली.

तीन हजारांहून अधिक किलोमीटर अंतर पार करणारा विश्वविक्रम त्याच्या नावावर जमा झाला. केवळ आणि केवळ तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या वाघाचे नेमके ठावठिकाण लक्षात येत होते. या काळात या वाघाने गावाजवळील शेती, कालवे, नदी, नाले, कच्चे-डांबरी रस्ते, झुडपी जंगल आणि मोठे जंगल पार केल्याचे लक्षात येते.

या इतक्या काळात त्याने केवळ एक किरकोळ घटना वगळता कोठेही माणसाला अथवा जनावरांना दुखापत केली नाही. दिवसा हा वाघ जणू अदृश्य झाल्यासारखा राहत होता. रात्र झाल्यानंतर याची पदभ्रमंती सुरू होत असे. एका माहितीनुसार या वाघाच्या ६,२४० जीपीएस लोकेशन मिळाल्या, ज्या आधारे त्याने इतका भलामोठा टप्पा गाठल्याचे लक्षात येते.

टिपेश्वर अभयारण्यासोबतच पैनगंगा, ज्ञानगंगा, काटेपूर्णा आणि अखेरीस औरंगाबाद जिल्ह्यातील गवताळा अभयारण्यापर्यंत त्याची मजल गेलेली लक्षात आली. या वाघाच्या संदर्भात टिपेश्वर येथे कार्यरत असलेले तत्कालीन विभागीय वनाधिकारी सुभाष पुराणिक म्हणतात, ‘मी टिपेश्वरमध्ये असताना आम्ही काही काळ या वाघाच्या मागावर होतो. तो टिपेश्वरच्या बाहेर पडल्यानंतरही मी त्याचा मागोवा घेतला आहे.

एकदा माहुरगडाच्या जवळ हा वाघ आला होता. आम्हाला त्याचा ठावठिकाणा कळला होता. आम्ही भाविकांना त्रास होऊ नये यासाठी गावकऱ्यांना जरा सावध राहा, इतकाच सल्ला दिला. वाघाच्या अनुषंगाने आम्ही काहीही माहिती ग्रामस्थांना दिलेली नव्हती.

परिणामी कोणतीही अनुचित घटना न घडता हा वाघ ज्या पद्धतीने शेतातून, नाल्यातून, गावाजवळून फिरला ते अद्‍भुतच आहे. या वाघाने विनाकारण काहीही उद्योग केला नाही.’ ‘वॉकर’ वाघाच्या गळ्यातील जीपीएस कॉलर घट्ट होऊ लागल्याचे लक्षात आले होते.

त्यामुळे या मागावर असणाऱ्या तज्ज्ञांनी २ एप्रिल २० मध्ये ज्ञानगंगा अभयारण्यात असताना त्याची कॉलर एका रिमोटच्या साह्याने काढली. हा कॉलर काढण्याचा एक व्हिडीओ आजही यू-ट्युबवर आपल्याला बघायला मिळतो.

त्यात ‘वॉकर’ वाघाचा भारदस्तपणा, त्याचा मोठा चेहरा आणि निष्पाप डोळे बघायला मिळतात. गळ्यातील कॉलर रिमोटच्या साह्याने काढताना ती अचानक खाली पडल्यावर बसलेला हा वाघ पटकन घाबरून उभा राहतो. काहीसा मागे फिरून पुन्हा आरामात येऊन बसल्याचा हा व्हिडीओ आहे. कदाचित गळ्यात लावलेला हा पट्टा १३ महिन्यांच्या काळानंतर निघाल्याने मुक्ततेचा आनंद जणू त्याच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो.

आज हा ‘वॉकर’ नेमका कुठे आहे, याबद्दल कल्पना नाही. त्याचा जीपीएसच्या साह्याने माग घेतला जात होता; पण ती कॉलर निघून गेल्यानंतर मात्र तो यवतमाळ जिल्ह्यात आहे की बुलढाणा, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.

‘वॉकर’ वाघाच्या इतक्या प्रचंड भ्रमंतीमुळे दोन जंगलांना जोडणारा कॉरिडॉर म्हणजेच जंगलाच्या सलगतेबाबत मोठी माहिती समोर आली. वन्यप्राण्यांना वावरण्यासाठी पुरेशी जागा हवी, हे पण फार महत्त्वाचे आहे. विकासाच्या नावाखाली होणारी जंगलांची तोड, सुसाट वेगाने जाणाऱ्या रस्त्यांमुळे दुभंगणारी जंगले, कालव्यांच्या विळख्यात तुटत चाललेले जंगलाचे सलगपण हा मोठा चिंतेचा विषय आहे.

आपण या मुक्या आणि दुर्मिळ होत चाललेल्या जीवांसाठी काही क्षेत्र ठेवतो का, हे आता काळच ठरवणार आहे. वाघांना आपल्या  जोडीदाराच्या शोधात किती भटकावे लागते ते ‘वॉकर’च्या भ्रमंतीवरून समोर आले. भर जवानीत असलेला वाघ शक्यतो उपद्रवी राहत नाही, असेही एक निरीक्षण यानिमित्ताने समजले.

sanjay.karkare@gmail.com (लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com