बाप-लेकीची भावस्पर्श कथा

महंमद अली जिना यांच्या आयुष्यावर आलेल्या पुस्तकांत त्यांचे राजकीय व सार्वजनिक आयुष्य समोर येते. मात्र ‘जिना व दिना - एक संघर्षमय कहाणी’मधून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश पडतो.
jina and dina story book
jina and dina story booksakal

महंमद अली जिना यांच्या आयुष्यावर आलेल्या पुस्तकांत त्यांचे राजकीय व सार्वजनिक आयुष्य समोर येते. मात्र ‘जिना व दिना - एक संघर्षमय कहाणी’मधून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश पडतो.

भारताच्या फाळणीचे व प्रकर्षाने पाकिस्तानचे जनक ठरलेले बॅरिस्टर महंमद अली जिना यांनी आपल्या जीवनात सर्वोच्च राजकीय ध्येय गाठले. मात्र, त्यांचे वैयक्तिक आयुष्य दुःखाने भरलेले होते. मुंबईतील त्या वेळचे सर्वात श्रीमंत पारशी उद्योगपती सर दिनशॉ पेटिट यांची एकुलती एक मुलगी, जेआरडी टाटा यांची भाची असलेल्या रतनबाई ऊर्फ रुट्टी पेटिट जिना यांच्या प्रेमात पडल्या.

घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी जिना यांच्यासोबत लग्न केले. दोघांची प्रेमाची कथा एका परिकथेसारखी भासत असली तरी त्याचा अंत दुःखद होता. जिना यांच्या एकुलत्या एक मुलीने १९३८ मध्ये आपल्या आईप्रमाणे बंडखोरी करून पारशी उद्योगपती नेविल वाडिया यांच्याशी लग्न केले. एक राष्ट्र जन्माला घालणाऱ्या बापाच्या मुलीने पाकिस्तानला आपले राष्ट्र म्हणून स्वीकारले नाही.

असेही म्हटले जाते, की पत्नीचा मृत्यू आणि मुलीचे लग्न अशा दोन घटनांनी जिना यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. एवढा की, धर्मनिरपेक्ष विचारांचे जिना पुढे कडवे आणि धार्मिक होत गेले. जिना एकाकी पडले. बहीण फातिमा हिच्याशिवाय त्यांचे कुणीच नव्हते. त्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केवळ १३ महिन्यांतच जिना यांचा मृत्यू झाला. शेवटच्या वेळी आपली एकुलती एक मुलगी आपल्यासोबत नव्हती याची त्यांना खंत होती.

बॅरिस्टर जिना बाहेरून कितीही रुक्ष, कठोर वाटत असले तरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात पत्नी, मुलीविषयी उत्कट प्रेम होते. असेही म्हटले जाते, की जिना आपल्या आयुष्यात दोनदा सार्वजनिकरीत्या रडले. एकदा, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा आणि दुसऱ्यांदा, त्यांच्या मुलीने मनाविरुद्ध लग्न केले तेव्हा. जिना यांच्या आयुष्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत गेल्या.

त्यांचे जीवन एवढे धावपळीचे, विलक्षण घटनांनी भरलेले होते की एक तर त्यांना प्रेम व्यक्त करायलाही फार वेळ मिळाला नाही किंवा मुस्लिम जगत काय म्हणेल म्हणून कधी ते सार्वजनिकरीत्या व्यक्तच होऊ शकले नसावेत. जिना यांची एकुलती एक लेक दिना हिचे वडिलांवर खूप प्रेम होते. मात्र, आईप्रमाणे दिनाचे जीवनही अधांतरी होते. पाकिस्तानच्या जन्मदात्याच्या या मुलीला ना भारताने स्वीकारले ना पाकिस्तानने... अशाच विमनस्क अवस्थेत भारत-पाकिस्तानापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या न्यूयॉर्कमध्ये दिना एकाकीपणे जग सोडून गेली.

‘जिना व दिना - एक संघर्षमय कहाणी’ या कादंबरीतून बाप-लेकीची भावस्पर्शी कथा मांडण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश सतीश चौधरी यांनी ती लिहिली आहे. त्यांची ही पहिलीच कादंबरी. या कादंबरीच्या जन्माची कथाही तेवढीच विशेष आहे. २०१७ मध्ये दिना वाडिया यांच्या मृत्यूनंतर ‘सकाळ’सह दोन वर्तमानपत्रांत त्यांच्या आयुष्यावर विस्तृत लेख प्रकाशित झाला. तो लेख वाचून लेखकाच्या मनात त्याबद्दलचे कुतूहल जागे झाले.

कोविड काळात जिना यांच्या आयुष्यावरील अनेक पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ त्यांनी वाचून काढली. इंटरनेटवरून बरीच माहिती जमवली. हा विषय कादंबरीचा आहे, असे त्यांना वाटले. त्यातून तीन वर्षांनंतर ही कादंबरी जन्माला आली. या कादंबरीतीतील संवाद जरी काल्पनिक असले तरी ते प्रसंग मात्र खरेखुरे आहेत. या कादंबरीत जिना यांच्या आयुष्याशी संबंधित सर्वच व्यक्तिरेखा येतात.

जिना, बहीण फातिमा, वडील जिनाभाई पुंजा, आई ईमीबाई, पहिली बायको मिथीबाई, दिनशा पेटिट, रतनाबाई, मुलगी दिना, नेविल वाडिया, नेस्ली वाडिया इत्यादी विविध व्यक्तिरेखा आपल्याला भेटतात. त्या वाचकांशी संवाद साधतात... आपली कहाणी आणि व्यथाही सांगतात.

बॅरिस्टर जिना यांना भारतात फाळणीचे खलनायक म्हणून समजले जाते. मात्र, ते आयुष्याच्या सुरुवातीला कमालीचे धर्मनिरपेक्ष होते. ते धार्मिक व्यक्ती नव्हते. त्यांचे खानपान, राहणीमान अगदी ब्रिटिशांसारखे होते. इंग्लंडला शिकायला जाणारा महंमद जिना ते तल्लख, कुशाग्र बुद्धीचा बॅरिस्टर, काँग्रेस ते मुस्लिम लीगपर्यंतचा प्रवास ते पाकिस्‍तानची निर्मिती असा धांडोळा लेखकाने कादंबरीतून मांडला आहे.

जिना यांच्यावर टिळक, आगरकरांचा प्रभाव होता. लोकमान्य टिळक यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरल्यानंतर त्यांनी जिना यांची वकील म्हणून नियुक्ती केली होती. राजद्रोहाच्या या गाजलेल्या खटल्यात जिना यांनी कसा युक्तिवाद केला याचे लेखकाने जे वर्णन केले आहे त्यातून जिना कसे निष्णात कायदेपंडित होते ते वाचकांसमोर येते.

प्रसंगातील जिवंतपणा

भावी पत्नी रतनबाईसोबत महंमद जिना यांची झालेली पहिली भेट, पुढे रतनाबाईला लग्नाची मागणी घालताना वडील दिनशा पेटिट यांचा संताप, अल्पवयीन असल्यामुळे झालेला कोर्टातील वाद-विवादाचा प्रसंग लेखकाने जिवंत केला आहे. लग्नानंतर रतनबाईला मूल नको होते. मात्र तिला नकळत दिवस गेले. त्यातून लंडनमधील एका चित्रपटगृहातच दिना जन्माला आली. लहानग्या दिनाकडे आईने दुर्लक्ष केले. एवढे, की दहा वर्षे तिचे नावच ठेवले नाही.

दिना मुंबईत वाढली तर आई रतनबाई लंडनमध्ये राहत होती. त्यामुळे दिनाचा सांभाळ जिना यांची बहीण फातिमा यांनी केला. लंडनमध्ये रतनबाईंनी जगाचा निरोप घेतला. जिना हे राजकीय जीवन आणि वकिलीमध्ये व्यस्त होते. आई-बाबाच्या प्रेमाला मुकलेल्या दिनाच्या मनात वडिलांबद्दल कशी अढी होती हे अनेक प्रसंगांतून लेखकाने दाखवून दिले आहे. पुढे दिनाने वडिलांच्या इच्छेविरुद्ध नेविल वाडिया यांच्यासोबत लग्न केले.

या लग्नामुळे मुस्लिम समाजातील आपल्या नेतृत्वाला धोका संभवतो, अशी भीती जिना यांना होती. त्यातून बाप-लेकीची जी ताटातूट झाली ती कायमचीच! पुढे स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा मार्ग स्पष्ट झाला होता. पाकिस्तानात जाण्यापूर्वी जिना यांनी दिनाला भेटायला बोलावले. तिला पाकिस्तानात येण्याची विनंती केली. मात्र, दिनाने ती धुडकावून लावली. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जिना आपल्या लेकीला भेटायला कासावीस होत असत.

कादंबरीत आलेल्या एका प्रसंगात जिना याची जाहीर कबुली देत म्हणतात, ‘मी माझ्या राजकीय क्षेत्रात जिंकलो; पण वैयक्तिक आयुष्यात हरलो.’ दिना दुरावल्याचे शल्य माझ्या मनातून जात नाही. दिना, हे काय केलेस तू. एकदा तरी मला भेटायला ये. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर महिन्यात जिना यांचे निधन झाले. हे वृत्त ऐकताच दिना तडकाफडकी पाकिस्तानला रवाना होते.

कराचीत पोहोचल्यानंतर काय होते. दुसऱ्यांदा जेव्हा दिना पाकिस्तानच्या निमंत्रणावरून पाकिस्तानला जाते तेव्हा ती आपल्या वडिलांच्या कबरीजवळ जाऊन बराच वेळ शांत बसते... आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करतानाच्या तिच्या भावना लेखकाने कादंबरीत टिपल्या आहेत.

कादंबरीचे एक एक पान उलगडताना महंमद जिना यांचे व्यक्तिगत जीवन, त्यांचा स्वभाव, पत्नी रतनबाईंबद्दलचे प्रेम, बाप-लेकीच्या संबंधातील घालमेल असे विविध पैलू वाचकांसमोर उलगडत जातात.

जिना एक कठोर राजकारणी असले तरी ते आपली पत्नी, मुलीबद्दल किती हळवे होते, हे देखील कादंबरीतून समोर येते. लेखकाने जिना यांच्या राजकीय, धार्मिक मत, विचारांबद्दल वैयक्तिक मते किंवा टिपण्णी करणे टाळले आहे.

सोप्या, सहज आणि ओघवत्या शब्दांतून जिना यांचे वेगळे रूप उभे करण्यात लेखकाला यश आले आहे. अनेकांना इतिहास हा जड विषय वाटतो. जिना यांचे जीवन, भारत-पाकिस्तानच्या फाळणीची पार्श्वभूमी अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल तर ही कादंबरी नक्की वाचावी.

vinod.raut@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com