मला कोण शिक्षा करणार?!

टीम ई सकाळ
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

काय उपाय आहे यावर? कशी सुधारता येईल वाहतूक व्यवस्थ्या? पायी चालणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे रस्ते ओलांडणे कसे सुलभ केले जाऊ शकते?

यावर उपाय काय?
या निमित्ताने तुमच्या मनात पुण्यातील वाहतूक समस्येवर उपाय शोधण्यासाठी काही सूचना, कल्पना आहेत का? कशी लावता येईल वाहनचालकांना शिस्त? कसा करता येईल पादचाऱ्यांचा सन्मान? शिक्षेच्या पलीकडे जाऊन नियम न पाळण्याची मानसिकता बदलण्यासाठी काय करता येईल? कळू द्या जगाला. 
प्रतिक्रियांमध्ये नोंदवा तुमचे मत.
किंवा सविस्तर अनुभव ईमेल करा- webeditor@esakal.com

(ईमेलच्या 'Subject' मध्ये लिहा- Accidental)

सोमवारी पुण्यातील बाणेर रस्त्यावर असाच एक भीषण प्रसंग घडला. या अपघातामुळे पुण्याची वाहतूक पुन्हा चर्चेत आली आहे. वारंवार अशा घटना समोर येत राहतात. पुण्यातील वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवे, त्यामध्ये नागरिकांनी व प्रशासनाने कोणती भूमिका बजावायला हवी, याबद्दल वाचकांनी सविस्तर प्रतिक्रिया 'ई सकाळ'ला कळविल्या आहेत. त्यापैकी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया संकलित स्वरुपात इथे देत आहोत : 

कंपल्शन अॅट द सोर्स :

वाहतूक व्यवस्थेवर मते मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद देत 'ई सकाळ'चे वाचक नितीन कुरणे यांनी पुढील युक्ती सुचवली आहे : 
१. माणसाच्या वागणुकीवर नियंत्रण करताना तो ज्या स्त्रोतांवरती उदरनिर्वाह करतो त्याच्यावर सक्तीचे नियम लावणे हे सोयीस्कर आणि परिणामकारकसुद्धा ठरू शकते. उदाहरणार्थ : एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये कामासाठी गाडीवरून ये-जा करत असेल तर कंपनीने त्याच्याकडून काही महत्वाच्या बाबींवर बंधने असली पाहिजेत. (हेल्मेट सक्ती, परवाना, तसेच PUC असणे).

२. जर थोड्या अंतरावरून तो कंपनीमध्ये येण्यासाठी सायकलचा वापर करत असेल तर त्याला महिन्याकाठी ठराविक रक्कम ही त्याला बक्षीस स्वरूपात देण्यात यावी. अशा योजनांमुळे वाहनसंख्येत काही प्रमाणात घट दिसून येईल त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत चालेल. 
 

मला कोण शिक्षा करणार?! 
शहरातील वाहनचालकांच्या मानसिकतेवर मंगेश नावाच्या वाचकाने मार्मिक टिपण्णी केली आहे. ते म्हणतात : 
पुण्यात कुठल्याही अशा गर्दीच्या रस्त्यावर जा. पादचाऱ्याला रस्ता पार करणे म्हणजे जिवावरचा खेळच आहे. कदाचित बाणेरमध्ये जे घडले तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते. रस्ता ओलांडण्यासाठी योग्य पादचारी मार्ग असता तर अशी घटना घडली नसती. याला कारणीभूत बाबी म्हणजे रस्त्यांचे डिझाईन आणि कायद्याची नसलेली भीती होय. राजकीय ओळख असल्यामुळे मला कोण शिक्षा करणार?! अशा अविर्भावात अनेकजण असतात. 

पुण्यातील रस्ते असे बनवले आहेत की जणू कोणी रस्त्यावरून चालणारच नाहीत फक्त भरधाव वाहनेच जातील.. वेगवान रस्ता पार करण्यासाठी सरळ सोपे मार्ग नाहीत. त्यामुळे लोक रस्ते चुकीच्या जागेवरून असुरक्षित पणे पार करतात. रस्त्याच्या बाजूला कुठेही सलग पादचारी मार्ग नाहीत. रस्त्यांवर योग्य जागी सूचनाफलक ही नाहीत. सगळंच विचित्र आणि भयावह आहे. 

आधी केलेले भूयारी व उड्डाणपूल पादचारी मार्ग फार कमी लोक वापरतात. तेव्हा अशा प्रत्येक वेगवान रस्त्यावर रस्ता पार करण्यासाठी चांगले, सुरक्षित  व सोपे पादचारी मार्ग बनवले पाहिजेत. जे कोणत्याही वयाचे लोक आरामात वापरू शकतील. नाहीतर अशा घटना घडतच राहतील.

मुंढवा चौकात उड्डाण पूल होणे गरजेचे
मुंढवा चौकातील वाहतूक कोंडीकडे दीपा दामू लोखंडे यांनी लक्ष वेधले आहे. लोखंडे लिहितात : 
मुंढवा चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. मागील वर्षी महापौर आणि उपमहापौर मुंढवा भागातील होते. आताही जनतेने त्यांना निवडून दिले आहे. परंतु वाहतुकीची समस्या कायम आहे. हडपसर, मगरपट्टा सिटी ते खराडी, वाघोली तसेच केशवनगर, मांजरी ते घोरपडी, कोरेगाव पार्क जाणारी वाहतूक याच चौकातून जाते. सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत या चौकातून पुढे जाताना किमान १५ ते ३० मिनिटे वेळ जातो. तसेच मुंढवा चौक ते मगरपट्टा सिटी यादरम्यान प्रचंड वाहतूक तुंबलेली असते. हडपसर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वे पुलावर तर सायंकाळी प्रचंड कोंडी होते. मुंढवा चौकात उड्डाण पूल होणे गरजेचे आहे तसेच या चौकातील काही अतिक्रमण हटवण्याची गरज आहे. मुंढवा चौकात उड्डान पूल न झाल्यास भविष्यात मोठी समस्या उदभवणार आहे. तसेच घोरपडीमध्ये दोन रेल्वे क्रॉसिंग गेट आहेत. या दोन्ही ठिकाणी पूल होणे आवश्य्क आहेत. घोरपडीच्या रेल्वे पुलाला केव्हा मुहूर्त लागणार आहे?

Web Title: traffic will improve with our mindsets