सफर नयनरम्य युरोपची

आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस, आयुष्यभर कसा स्मरणात राहील, हा विचार अनेक दिवस मनात घोळत होता आणि अखेर त्यावर उपाय सापडला, अर्थातच नितांत सुंदर युरोपची भेट घेणं.
Europe
Europesakal

- महेश निलंगेकर, saptrang@esakal.com

आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस, आयुष्यभर कसा स्मरणात राहील, हा विचार अनेक दिवस मनात घोळत होता आणि अखेर त्यावर उपाय सापडला, अर्थातच नितांत सुंदर युरोपची भेट घेणं. वाढदिवस जरी आम्हा दोघांच्या लग्नाचा असला, तरी आमच्या संसार वेलीवरच्या दोन फुलांशिवाय आम्ही हा वाढदिवस साजरा करणं शक्‍य नव्हतं. त्यामुळे युरोप पर्यटनाची सर्व योजना आखून मी, पत्नी आणि आमच्या दोन मुली असे आम्ही चौघांनी लंडनसाठी प्रस्थान केलं.

पर्यटन कंपनीमार्फत युरोपमधील एकूण दहा देशांना भेट देण्याचा योग आला. मुंबईहून आम्ही कुवेत एअरलाइन्सनं रात्री अकराला निघून कुवेतमार्गे अंदाजे साडेचार हजार मैलांचा प्रवास करून लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरलो तेव्हा आम्ही बऱ्यापैकी थंडीनं कुडकुडत होतो. लंडनच्या लहरी वातावरणाला अनुसरून पावसानं आमचं स्वागत केलं.

जगातील इतर देशांतील पर्यटकाप्रमाणे भारतीयांच्या मनातही इंग्लंडबद्दल एक अनामिक ओढ असावी असं वाटतं. तिथं विशेषतः उन्हाळ्यात जगभरातील पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अर्थात हा अनुभव जागोजागी युरोपच्या दौऱ्यात येत होता. लंडनची लोकसंख्या अंदाजे ९७ लाख आहे व शहर जवळजवळ १०० चौरस किलोमीटरवर पसरलेलं आहे. तसंही जागतिक पातळीवर लंडनची एक ऐतिहासिक, भौगोलिक व राजकीय ओळख आहेच, अशा लंडनचे वेगळेपण पावलोपावली जाणवतं.

लंडन आय नावाच्या एका प्रचंड मोठ्या आकाश पाळण्यातून दूरवर पसरलेलं शहराचं, थेम्स नदीचं, पार्लमेंट हाउस, बिगबेन घड्याळाचं, वेस्ट मिनिस्टर पुलाचं व सर्वत्र पसरलेल्या लहानमोठ्या इमारतींचं एक विलोभनीय दृश्‍य आपल्या डोळ्यांना सुखावत असतं. नागमोडी वळणं घेत शहरातून वाहणारी थेम्स नदी, तिचं स्वच्छ, नितळ पाणी, त्यावर विहार करणाऱ्या लहानमोठ्या बोटी, नदीवर जागोजागी दिसणारे, निरनिराळ्या रंगरूपाचे, आकाराचे पूल, आपल्याच मस्तीत भटकणारी तरुणाई हे सगळं निरखून पाहताना आपण केव्हाच स्वतःला हरवून जातो.

आपलं भारतीय मन कळत-नकळत त्या गोष्टींची आपल्या जीवन पद्धतीशी तुलना करीत राहतं. कुठेही प्लास्टिकच्या पिशव्या, पान टपऱ्या, पानाच्या गुटख्याच्या पिचकाऱ्या, रस्त्याच्या कडेला लावलेल्या चहाच्या, वडापावच्या गाड्या वगैरे काहीही दिसले नाहीत. त्यामुळे वेगळ्या अर्थाने चुकचुकल्यासारखे वाटत होते. सगळ्यात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे आमच्या संपूर्ण प्रवासात कुठेही भटकी कुत्री, मांजरे, डुकरे, गाढव, बैल, म्हैस काहीही दिसले नाही. दिसल्या फक्त हिरव्यागार कुरणात मनसोक्त चरणाऱ्या गलेलठ्ठ जर्सी गाई व मेंढ्या.

शाळकरी वयात क्रमिक पुस्तकात वाचलेल्या व नंतरच्या आयुष्यात वारंवार वाचण्यात आलेल्या सर्वाधिक भावलेल्या गोष्टी म्हणजेच बकिंगहम पॅलेस, पार्लमेंट हाउस, बिगबेन घड्याळ, टॉवर ब्रिज, मादाम तुसॉंनी उभारलेल्या मेणाच्या पुतळ्याचे म्युझियम आणि अत्यंत देखण्या शेकडो नव्या-जुन्या इमारती. बहुतेक सर्व शहरात हॉटेलच्या बाहेर फुटपाथ लागत टेबल-खुर्च्या मांडलेल्या असतात. लोक निवांतपणे गप्पागोष्टी करत, सिगारेटचे झुरके घेत, बिअर-दारूचा आस्वाद घेत, बर्गर-पिझ्झा खाण्यात गुंग असतात.

आपल्याकडं पुणे-मुंबई, सांगली-मिरज, हैदराबाद-सिंकदराबाद अशा शहरांच्या नावाचा अतूट जोड्यांमध्ये उल्लेख करण्याचा जसा प्रघात आहे, तशा पद्धतीनं जागतिक पातळीवर लंडन-पॅरिस असा उल्लेख केला जातो. या दोन देखण्या शहरामध्ये अंदाजे चारशे किलोमीटर अंतर असावं. लंडन-पॅरिस दरम्यान युरो-स्टार नावाची रेल्वे धावते. एरवी जमिनीवरून धावणाऱ्या या वेगवान गाडीचा मार्ग इंग्लिश खाडी खालून काढलेला आहे. लंडनहून निघालेली ही गाडी ताशी तीनशे किलोमीटर वेगानं दोन ते अडीच तासांत थेट पॅरिसलाच थांबते.

पॅरिस हे फ्रान्समधील एक अद्‌भुत शहर आहे. ज्याची सुंदरता, कला, सांस्कृतिक, रोमांचक इतिहास जगप्रसिद्ध आहे. पॅरिसमध्ये केलेल्या कोणत्याही भ्रमणाच्या मार्गातून आपण आयफेल टॉवरच्या विशालतेचे दर्शन घेत असतो. चॅम्प्स एलिजे हा दोन किलोमीटरचा रस्ता आहे जो की पॅरिसमधील विविध लक्‍झरी शॉपिंग, कॅफे, थिएटरसाठी प्रसिद्ध आहे. आयफेल टॉवरवरून पॅरिसच्या दूरवर पसरलेल्या नयनरम्य शहराचे दर्शन घडते.

पॅरिसपासून रोमपर्यंत अंदाजे तीन हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही एका आराम बसने केला. आपल्या दृष्टीने कौतुकाची गोष्ट म्हणजे युरोपमध्ये जेवढ्या मोटारी आहेत तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त सायकल्स आहेत. युरोपमधील सर्वच रस्ते किमान चार पदरी असतात. आमचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच आमच्या टुर गाइड मेव्हुलने आम्हाला सांगितले होते, की संपूर्ण प्रवासात तुम्ही कोठेही, कोणत्याही नळाचे पाणी निःसंकोचपणे पिऊ शकता.

हॉलंडमधील कुकेन हाफ येथील ट्यूलिप गार्डन तर जगप्रसिद्धच आहे. हे गार्डन निरनिराळ्या रंगाच्या व आकाराच्या ट्यूलिप्सनं बहरलेलं आहे. अनेक रंगीबेरंगी ट्यूलिप्स्‌च्या पार्श्‍वभूमीवर मनाला प्रसन्न करणारी ताजी मऊशार हिरवळ यांचा एक विलोभनीय संगम येथे साकारला आहे.

ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी, येथील ग्रॅंड पॅलेस स्क्वेअरमध्ये एका पेक्षा एक देखणे, गौथिक पद्धतीने बांधकाम केलेल्या अनेक मजली इमारती अत्यंत सुबक, मोहक कलाकुसरीने सजविलेल्या आहेत. युरोपमधील अजून एक वैशिष्ट असं, की येथील देश एकमेकांच्या इतके जवळ आहेत, की एके दिवशी आम्ही नाश्ता फ्रान्समध्ये केला तर, दुपारचं जेवण बेल्जियममध्ये केलं आणि रात्रीचं जेवण हॉलंडमध्ये केलं.

जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्टमधून प्रवास करत पृथ्वीवरच्या स्वर्गाला भेट देण्यासाठी आम्ही स्वित्झर्लंडला मार्गस्थ झालो. प्राकृतिक सौंदर्य व अत्यंत उत्तम वातावरण ही या देशाची खासियत आहे. तसे आम्हाला स्विस ऍलप्स्‌चे दर्शन विमानातूनच झाले होते, पण प्रत्यक्षात ते खूपच मनमोहक आहेत.

ऱ्इाईन फॉल्स, माउंट इटलीस, लुसेन लेक करत आम्ही युंगफ्राऊ या युरोपमधील सर्वांत उंच व बर्फाच्छादित स्नो फॉलचा सुद्धा आनंद लुटला. स्वित्झर्लंडमधील आमचे हॉटेल सर्वांत सुंदर होते, कारण ते अगदी लूसन लेकच्या किनारी व स्वीस ऍल्पस्‌च्या रांगांनी घेरलेले होते.

युरोप दर्शनमधील आमचा शेवटचा देश होतो तो म्हणजे इटली. व्हेनिसला कालव्याचे शहर म्हणतात पण हे कालवे समुद्राच्या पाण्याचे आहेत. समुद्रातील छोट्या-मोठ्या बेटांवर एका रांगेत योजनाबद्ध रीतीने बांधलेली घरं म्हणून तेथील रहिवाशांना बाजारहाट करण्यासाठी, इतर कामांसाठी छोट्या नावांमधून जा-ये करावी लागते, आपल्या केरळमधील बॅकवॉटरच्या स्वरूपाचीच ही रचना.

आपल्या नागरी जीवनात काहीशी अनोखी व स्तिमित करणारी. व्हेनिसमध्ये सेंट मार्क बॅसिलिका चर्चच्या परिसरात प्रचंड मोठा चौक आहे. हे चर्च अत्यंत देखणे आहे. तेथे जवळजवळ एक हजार वर्षापूर्वी उभारलेला ३२५ फुट उंचीचा क्‍लॉक टॉवर आहे. शेजारीच असलेल्या मोरेन ग्लास फॅक्‍टरीमध्ये प्रवाशांच्या देखत रंगीबेरंगी काचांच्या अत्यंत सुबक वस्तू पाहता पाहता तयार करून दाखविल्या जातात.

पिसा येथील पांढराशुभ्र संगमरवरी सात मजली झुकलेला मनोरा पाहताना शाळकरी वयाच्या आठवणी चाळवल्या गेल्या. रोमचं महत्त्व सारं जग जाणतं. साधारणतः दोन ते तीन हजार वर्षांपासून बहरत गेलेल्या रोमन संस्कृतीच्या पाऊलखुणा कुणालाही भुरळ घातल्याशिवाय राहत नाहीत.

इटली, बेल्जियम, इंग्लड, हॉलंड, स्वित्झर्लंड अशा एकाहून एक सरस आणि निसर्गरम्य देशांतील विविध प्रेक्षणीय स्थळांनी आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस संस्मरणीय केला, यात शंकाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com