संस्कारक्षम कथांचा खजिना

‘आपले सण आपली संस्कृती’ पुस्तकात पूर्वजांचा संदेश देऊन नवी पिढी साहित्यातून घडवण्याचा लेखक एकनाथ आव्हाड यांचा प्रयत्न स्तुत्य असाच आहे.
aaple san aapli sanskruti book
aaple san aapli sanskruti booksakal

- ऋता ठाकूर

‘आपले सण आपली संस्कृती’ पुस्तकात पूर्वजांचा संदेश देऊन नवी पिढी साहित्यातून घडवण्याचा लेखक एकनाथ आव्हाड यांचा प्रयत्न स्तुत्य असाच आहे. संस्कारक्षम कथांचा खजिनाच त्यांच्या पुस्तकात पाहायला मिळतो. आपल्या कथांतून ते मुलांना भारतीय पारंपरिक सणांची जवळून ओळख करून देतात.

आपले सण आपली संस्कृती’ नावाचा एकनाथ आव्हाड यांचा बालकथासंग्रह पाहताच त्याच्या नावावरूनच लेखकाने आपले सण आणि संस्कृतीविषयीच्या गोष्टी त्यात सांगितल्या असल्याचे प्रथमदर्शनी सहज लक्षात येते. एकनाथ आव्हाड सुप्रसिद्ध बालसाहित्यकार असून त्यांच्या गोष्टी आणि कविता बालमनाचा ठाव घेणाऱ्या असतात.

आई-वडील मुलांना आपला देश, आपली संस्कृती आणि आपल्या सणांविषयीच्या परंपरा अन् श्रद्धा सांगत असतात. जेव्हा नुसते सांगणे होते तेव्हा ते मुलांच्या लक्षात राहणे तितके सोपे नसते; पण त्याच गोष्टी कथांद्वारे मुलांना सांगण्यात येतात तेव्हा त्यांना त्या जास्त आवडतात आणि त्याची अंमलबजावणी करणे सोपे जाते... हीच गोष्ट आव्हाड यांनी कथा लिहिताना लक्षात घेतली आहे. गोष्टींच्या वेष्टनातून दिलेला ज्ञान मनोरंजक खाऊ मुलांना आवडतो.

९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची अभ्यासपूर्ण आणि नेमकेपणाने लिहिलेली प्रस्तावना आव्हाड यांच्या बालकथासंग्रहाला आहे. लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची पुस्तकाची उंची वाढवणारी पाठराखण लाभली आहे. पुस्तकात एकूण ११ कथा आहेत. ठळक आणि ठसठशीत अक्षरातील ८० पानांचे हे पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण होते आणि वाटते, हा संस्कारक्षम कथांचा खजिना प्रत्येकाच्या घरी असावा!

संस्कारक्षम कथांच्या माध्यमातून एकनाथ आव्हाड मुलांना भारतीय पारंपरिक सणांची जवळून ओळख करून देतात. म्हणजे संक्रांत, होळी, दिवाळी... त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची ओळखही लेखकाने खूप छान करून दिली आहे. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी अशा विभूतींच्या कथाही त्यात आहेत.

मनोरंजनातून ज्ञानाकडे या कथांचा प्रवास होतो. त्यामुळे बालकांची, कुमारवयीन मुलांची संस्कारक्षम मने घडविण्याचे खूप मोठे कार्य आव्हाड करत आहेत. ते मुळात शिक्षक असल्यामुळे मुलांच्या सहवासातून, त्यांचे मानसशास्त्र त्यांना समजते.

घरात मुलांच्या लहान-सहान गोष्टी हरवतात. एकदा वस्तू हरवली की शोधायची असते, ही गोष्टच हल्लीच्या मुलांना माहीत नाही. मग ते सरळ आई-वडिलांजवळ कुरकुर करत बसतात. आई-वडील कधी कधी कामाच्या व्यापात वस्तू शोधण्यापेक्षा, नवीन आणण्याचे सोपे काम करतात.

छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते, म्हणून वेळीच सावरण्यासाठी ‘शतायुषी हो’ या कथेतील माधवचे बाबा त्याला कोणता मोलाचा सल्ला देतात? सल्ला दिल्यामुळे माधव आणि त्याची बहीण मालती यांच्यात काय बदल होतो? कथानकातील माधव कोणत्या स्पर्धेत भाग घेतो? हे पुस्तकात वाचता येते.

‘एक नवी सुरुवात’ या कथेतील वैष्णवी कोणता संकल्प करते, असा संकल्प करावा हे कोणत्या घटनेमुळे ती ठरवते, या सर्व गोष्टींसाठी तिला कोण मार्गदर्शन करते इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ती कथा वाचल्यावर मिळतील.

होळी, रंगपंचमी, धुळवड, लठ्ठमार होळी, बैठिका होळी, खडी होळी, होला मोहल्ला, ढोल जात्रा, शिग्मो, याओसांग, मंजल कुली, फगुआ, रॉयल होळी एवढ्या नावांची विविधता एका सणासाठी!

भारताच्या वेगवेगळ्या राज्यांत कोणत्या भागात हा सण, कोणत्या नावाने ओळखला जातो? या ज्ञानाची भर घालायची असेल तर आपल्या मुलांच्या हाती आपल्याला एकनाथ आव्हाड यांचा ‘आपले सण आपली संस्कृती’ हा बालकथासंग्रह द्यावा लागेल.

‘देश हाच देव’ या कथेत आपल्या देशाबद्दलचे प्रेम १५ ऑगस्टच्या कार्यक्रमातून बाळू आणि शमिका कसे व्यक्त करतात, आपल्या आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांचा प्रत्यक्ष जगताना कसा वापर करतात, हे तिथे घडलेल्या काही प्रसंगांतून, त्यावरच्या प्रतिक्रिया म्हणून केलेल्या कृतीतून लक्षात येते. आपणसुद्धा खूप कौतुकाने त्या घटनेकडे बघतो. अर्थात हे संपूर्ण अनुभवायचे असेल तर या सर्व कथा वाचाव्या लागतील.

वडील आपल्या मुलाला राघवला म्हणतात, ‘तुझ्या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकात मिळेल.’ राघवला आश्चर्य वाटते. आपल्या प्रश्नाचे उत्तर स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात कसे बरे मिळेल? राघवचा प्रश्न काय असतो? त्याला त्याचे उत्तर मिळते का? मिळालेल्या उत्तरामुळे त्याचे समाधान होते का? विवेकानंदांच्या चरित्रात नक्की आहे तरी काय? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ‘ज्ञानरूपी वसा’ ही कथा आपल्याला वाचावी लागेल. कथा वाचताना आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे उलगडत जातील. राघवला जेव्हा त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळते आणि हे आपल्याला जेव्हा कळते तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो.

आपला भारत देश हा परंपरेने नटलेला आहे. आपण थोरा-मोठ्यांच्या तोंडी ‘भारत देश कृषीप्रधान आहे’ असे कायम ऐकत आलो, वाचत आलो. आपला हा देश संस्कृतीप्रधानसुद्धा आहे. आपण जे सण समारंभ करतो त्यामागे आपल्या परंपरा असतात. या सण-समारंभांकडे जर डोळसपणे पाहिले, तर ते साजरे करण्यामागील पूर्वजांचा उद्देश अर्थातच विज्ञानवादी असल्याचे दिसते. ‘आपले सण आपली संस्कृती’ या पुस्तकात पूर्वजांचा संदेश देऊन नवी पिढी साहित्यातून घडवण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य असाच आहे.

चित्रकार घनश्याम देशमुख यांचे सुंदर, समर्पक मुखपृष्ठ आणि चित्रांमुळे कुणालाही सहज, आवडेल असा व वाचायची उत्सुकता वाढवणारा हा बालकथासंग्रह साकेत प्रकाशनाने अतिशय आकर्षक पद्धतीने प्रसिद्ध केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com