पुन्हा एकदा यती-कथा (डॉ. प्रमोद जोगळेकर)

डॉ. प्रमोद जोगळेकर
रविवार, 5 मे 2019

'हिमालयात आढळलेल्या मोठ्या आकाराच्या पावलांचे बर्फात उमटलेले ठसे हे यतीचे आहेत,' असं भारतीय लष्करानं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं आणि यती या विषयाला पुन्हा एकदा चालना मिळाली. हे ठसे अस्वलांच्या पायाचे आहेत, असं नंतर नेपाळतर्फे स्पष्ट करण्यात आलं असलं तरी या विषयाची उत्सुकता कायमच आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर 'यती' या विषयाचा वेध..

'हिमालयात आढळलेल्या मोठ्या आकाराच्या पावलांचे बर्फात उमटलेले ठसे हे यतीचे आहेत,' असं भारतीय लष्करानं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं आणि यती या विषयाला पुन्हा एकदा चालना मिळाली. हे ठसे अस्वलांच्या पायाचे आहेत, असं नंतर नेपाळतर्फे स्पष्ट करण्यात आलं असलं तरी या विषयाची उत्सुकता कायमच आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर 'यती' या विषयाचा वेध..

हिमालयात आढळलेल्या मोठ्या आकाराच्या पावलांचे बर्फात उमटलेले ठसे हे यतीचे असल्याचं भारतीय लष्करानं काही दिवसांपूर्वीच जाहीर केल्यानं 'यती' या विषयाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. माणसांसारखे; परंतु धिप्पाड...आणि दोन पायावर चालणारे प्राणी हे यती अथवा हिममानव या नावानं ओळखले जातात. यती हा विषय मात्र नवीन नसून गेली किमान शंभर वर्षं त्याबद्दल चर्चा होतं आहे. 

यती अथवा हिममानव यांच्याप्रमाणेच अनेक प्रकारचे गूढ प्राणी अस्तित्वात असून ते अद्याप सापडलेले नाहीत, असं मानणारे काही लोक आहेत. अशा गूढ अथवा अज्ञात राहिलेल्या प्राण्यांना 'क्रिप्टिड' (cryptid) असं म्हटलं जाते. यात यतीखेरीज अमेरिकेतील बिगफूट (bigfoot), लेक नेसमधील राक्षसी आकाराचा जलचर, सागरी सर्प, अहूल (ahool) ही अवाढव्य आकाराची वाघळं आणि अद्याप पृथ्वीवर दडून बसलेले डायनोसॉर असल्याचा दावा केला जाणारे प्राणी यांचा समावेश होतो. 

गूढ अथवा अज्ञात राहिलेल्या प्राण्यांचा अभ्यास काहीजण करतात. ते त्याला क्रिप्टोझूलॉजी (crytozoology) असा शब्द वापरतात. हा शब्द बेन्जियन-फ्रेंच शास्त्रज्ञ बर्नार्ड हॉवेलमन्स यांनी रूढ केला. 

'अजून आपल्याला पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांचा शोध लागलेला नाही. काही प्राणी अजून गुप्त असून ते अद्याप सापडायचे आहेत, असं हे अभ्यासक मानतात. मात्र, क्रिप्टोझूलॉजी ही मुख्य प्रवाहातली प्राणिविज्ञानाची शाखा नाही, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या प्राण्यांचा तथाकथित 'संशोधनात्मक पाठपुरावा' हा खरंतर छद्मविज्ञानाचा (pseudoscience) एक भाग आहे. 

यती अथवा हिममानव यांना अनेक नावांनी ओळखलं जाते. यती (yeh-tay) हा शब्द सिनोतिबेटन भाषाकुळातील नेवारी भाषेतला आहे. याचा अर्थ 'खडकांमधील प्राणी' असा होतो. हिमालयातील शेर्पा लोक तीन प्रकारच्या यतींची माहिती देतात. तथापि, यती हा शब्द त्यांच्या भाषेत 'अस्वल' या अर्थानंही वापरला जातो हे लक्षात घेणं आवश्‍यक आहे. शेर्पा लोक 'छोटं अस्वल' या अर्थानं 'ती लमा' (teh-lma) आणि याक हा प्राणी मारू शकणारं 'मोठं अस्वल' या अर्थानं 'झू-ती' (dzu-teh) अशा संज्ञा वापरतात. हिममानव या अर्थानं ते 'मी-ती' (mi-teh) असा शब्द वापरतात. अनेकदा भाषेच्या अडथळ्यामुळे ज्या प्राण्यांना शेर्पा अस्वल म्हणूनच सांगतात त्यांना बाहेरचे लोक हिममानव समजण्याची शक्‍यता असते. 

यतीचा पहिला उल्लेख सन 1832 मधील आहे. नेपाळमधील तत्कालीन ब्रिटीश रेसिडेंट बी. एच. हॉजसन यांनी 'जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल' यात प्रसिद्ध केलेल्या लेखात धिप्पाड आकाराच्या केसाळ आणि माणसासारख्या दिसणाऱ्या प्राण्यांची माहिती दिली आहे. तथापि, हॉजसन यांनी हा प्राणी 'ओरांगउटान' असावा असं म्हटलं होतं. 

हिमालायातील यतीसदृश प्राण्यांच्या पावलांच्या ठशांचा पहिला उल्लेख मेजर एल. ए. वॅडेल यांनी त्यांच्या 'अमंग द हिमालयाज्‌' या सन 1889 मधील पुस्तकात केला होता. हिमालयात 17000 फूट उंचीवर हे माणसासारखे जंगली प्राणी आहेत असं शेर्पा लोकांनी त्यांना सांगितले होतं; परंतु त्या प्राण्यांचे वर्णन आणि इतर माहिती ऐकल्यावर हे वर्णन पिवळसर भुऱ्या रंगाच्या अस्वलाचं असल्याची वॅडेल यांची खात्री पटली होती. 

कुणा पाश्‍चिमात्य माणसानं यतींच्या पाऊलखुणा पाहिल्याची पहिली नोंद सन 1921 मधली आहे. त्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान लेफ्टनंट कर्नल सी. के. हॉवर्ड बुरी यांना 27000 फुटांवर मोठ्या पाऊलखुणा आढळल्या. त्यांचा आकार मानवी पावलाच्या तिप्पट होता. शेर्पा लोकांनी त्या पाऊलखुणा 'मी-ती' याच्या असल्याचं सांगितलं. त्यांना या नावातून 'माणसाप्रमाणे; पण माणूस नाही' असं सूचित करायचं होतं; परंतु 'कलकत्ता स्टेट्‌समन' या वृत्तपत्राचे स्तंभलेखक हेन्री न्यूमन यांनी त्याचं 'घृणास्पद माणूस' (Abominable man) असं चुकीचं भाषांतर केलं आणि त्यांच्यात खरोखर काहीही घृणास्पद किंवा अनैतिक वर्तन नसूनही यतींना हे नाव चिकटलं. 

सन 1951 मध्ये एरिक शिप्टन, शेर्पा तेनसिंग आणि मायकेल वॉर्ड यांना एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान माणसाच्या पावलांसारख्या दिसणाऱ्या पाऊलखुणा मिळाल्या. 27000 फूट उंचीवरच्या या पाऊलखुणा ताज्या होत्या. शिप्टन यांनी या पाऊलखुणांचा घेतलेला उत्कृष्ट फोटो जगभरातल्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाला. आणि यती या विषयात एकदम सगळीकडं रस निर्माण झाला. त्या वेळी शिप्टन यांनी यतीच्या पावलाचा फोटो आणि बर्फात एक-दीड किलोमीटरपर्यंत ते चालत गेल्याचा खुणा यांचे फोटो प्रसिद्ध केले असले तरी नंतर मात्र या दोन्हींचा संबंध नव्हता असं जाहीर केलं. या खुणा आयबेक्‍स जातीच्या बोकडाच्या किंवा हिमालयीन थर या प्राण्यांच्या पायांच्या असल्याचं त्यांनी सांगितले. 

सन 1950-60 या दशकात यतींचा विषय चांगलाच गाजू लागला होता. सन 1957-58 मध्ये टेक्‍सासमधील एक श्रीमंत तेलव्यापारी टॉम स्लिक यांनी यतींच्या शोधमोहिमांची जबाबदारी घेतली. या मोहिमांदरम्यान स्लिक आणि इतरांनी अनेक पाऊलखुणांचे फोटो काढले. त्यांनी पॅन्गबोशे मठात यतीची म्हणून ठेवलेली कवटी आणि एक हात बघितला व त्यांचे फोटो घेतले. या मोहिमांचा उद्देश वरवर बघता वैज्ञानिक वाटला तरी प्रत्यक्षात त्यांना काहीही करून यतींचं अस्तित्व सिद्ध करायचं होतं. त्यासाठी त्यांनी जेम्स स्टेवर्ट या हॉलिवूडमधल्या अभिनेत्याच्या मदतीनं पॅन्गबोशे मठामधल्या यतीच्या हाताचा काही भाग चोरट्या मार्गानं नेपाळबाहेर नेला. हा तुकडा त्यांनी अखेर प्रायमेट विज्ञानातील तज्ज्ञ डब्ल्यू. सी. ऑसमन हिल यांच्याकडं लंडनमध्ये सुपूर्त केला. या नमुन्याची तपासणी करून तो 'काही भाग माणसाचा वाटावा' असा असल्याचा निर्वाळा हिल यांनी दिला. तथापि, हा नमुना मुळातच काही मानवी हाडं आणि प्राण्यांच्या हाडांचे काही भाग जोडून बनवलेला होता. यतीच्या अस्तित्वाचा पुरावा पुढं आणण्याच्या नादात केल्या जाणाऱ्या धादांत खोट्या तथाकथित संशोधनाचं हे एक ठळक उदाहरण आहे. 

यतींबद्दलच्या एकूण पुराव्यांचा आढावा घेतला तर असं दिसतं की यातला सर्वांत मोठा भाग यतींच्या पाऊलखुणांचा आहे. असंख्य गिर्यारोहकांनी अशा खुणा पाहिल्याचं म्हटलं आहे. भारतीय लष्करानं या वर्षी खुणा पाहिल्याचं जाहीर करण्याच्या अगोदर सन 2007 मध्ये अमेरिकन टीव्ही कलाकार जोश गेट्‌स यांनी, आपण नेपाळमध्ये एका नाल्यात तीन 'गूढ' अशा हिममानवाच्या पावलांचे ठसे पाहिले' असं जाहीर केलं होतं. स्थानिक लोकांनी 'त्या अस्वलाच्या पायांच्या खुणा आहेत,' असं सांगूनसुद्धा त्या वेळीही पुन्हा एकदा यतीबद्दलचं कुतूहल एकदम वाढलं होतं. 

ब्रिटीश प्राणिशास्त्रज्ञ रॉबर्ट मॅकॉल यांना सन 2001 मध्ये भूतानमध्ये एका ठिकाणी मिळालेले केस यतींचे असल्याचं सांगण्यात आलं होतं; परंतु त्यांच्यामधील डीएनएची तपासणी केल्यानंतर ते मानवी अथवा मानवसदृश कोणत्याही इतर प्राण्याचे नसल्याचं आढळलं. त्याचप्रमाणे यतींची कातडी म्हणून गाजलेल्या कातड्याचंही झालं. सन 1959-60 दरम्यान मिळालेली यतींची कातडी प्रत्यक्षात वैज्ञानिक तपासणीत हिमालयातल्या ब्राऊन बेअर या अस्वलाची निघाली. अगदी अलीकडं सन 2017 मध्ये अमेरिकेच्या बफेलो विद्यापीठातील तियानलिंग यान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, यती मानल्या गेलेल्या नमुन्यांमधून डीएनए मिळवून त्यांचं विश्‍लेषण केलं. ते डीएनए अस्वलांचे असल्याचं निर्विवादपणे सिद्ध झालं आहे. 

अनेक गिर्यारोहक व शेर्पादेखील, आपण यती प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगतात; परंतु हिमालयात भटकंती केलेल्या कुणालाही हे माहीत असतं की बर्फावर ऊन्ह पडल्यावर परावर्तित किरण तीव्र असल्यानं डोळ्यांना त्रास होतो, तसंच विलक्षण प्रकाशछायांचे खेळ तिथं दिसतात. अशा वेळी दृष्टिभ्रम होण्याची शक्‍यता खूप मोठी असते. काही जणांनी यतींचे म्हणून फोटो प्रसिद्ध केले आहेत; परंतु ते एवढ्या दूर अंतरावरचे आहेत की 'एखादा काळा ठिपका' यापलीकडं त्यातून काहीही ओळखता येत नाही. 

'यती अस्तित्वात आहेतच,' असे मानणारे लोक प्रामुख्यानं बर्फात उमटलेल्या माणसाच्या पावलांसारख्या; पण मोठ्या आकाराच्या ठशावरच सगळी भिस्त ठेवून त्याचं स्पष्टीकरण मागतात. मात्र, याचं योग्य वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येतं. हिमालयात 3000 ते 5500 मीटर उंचीवर हिमालयीन ब्राऊन बेअर या प्रजातीची अस्वलं राहतात. या धिप्पाड अस्वलांचे पाय मजबूत असून, त्यांच्या केसांचा रंग भुरकट तपकिरी असतो. त्यांची उंची 2.2 मीटरपर्यंत असून, वजन 1000 किलोग्रॅमपर्यंत असू शकतं. यांचं वैशिष्ट्य म्हणजे, ती दोन पायांवर उभी राहू शकतात. प्राण्यांच्या अस्थींचा अभ्यास करणाऱ्या (प्रस्तुत लेखकाप्रमाणे) हे माहीत आहे, की अस्वलांचे पंजे आणि माणसाचे पाय यांच्यातील हाडांच्या रचनेत विलक्षण साम्य असतं. काळजीपूर्वक पाहिल्यानंतर त्यांच्यातील सूक्ष्म फरकामुळे ती वेगवेगळी ओळखता येतात. ही रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की अस्वलाच्या उजव्या पंजाचा ठसा माणसाच्या डाव्या पायासारखा दिसतो. अस्वलं चार पायांवर चालताना काही वेळा त्यांचा मागचा पाय त्यांच्या पुढच्या पायाच्याच जागी; पण जरासा बाजूला टाकतात. त्यामुळे तिथं उमटणारा ठसा मूळ आकारापेक्षा मोठा होतो व तो माणसाच्या पायाच्या ठशासारखा; पण खूप मोठा असतो. त्यातच मऊ बर्फ कडक होताना आणि ते वितळताना त्या आकारात बदल होतो. 

यतीसारख्या प्राण्याबद्दल निर्विवाद पुरावे नसूनही लोक त्यांच्या अस्तित्वाबद्दल विश्‍वास ठेवतात. यती आणि तत्सम काल्पनिक प्राण्यांबद्दलच्या कथा कशा तयार होतात, याचं उत्तम वर्णन डॅनिएल क्रेसी या 'नेचर' नियतकालिकासाठी काम करणाऱ्या पत्रकारानं सन 2013 मध्ये केलेलं आहे. सुरवातीला कुणाला तरी काहीतरी वेगळं किंवा चमत्कारिक दिसतं. त्यात स्थानिक लोककथा आणि समजुती मिसळून एक नवीन कहाणी हळूहळू आकार घेऊ लागते. अशा सुरस व चमत्कारिक कहाण्यांवर विश्‍वास असलेल्या आणि प्रचलित विज्ञानाचा तिरस्कार करणाऱ्यांना ही कथा आवडू लागते. अशा कथेच्या प्रसारासाठी बनावट पुरावे तयार केले जातात. मग त्या विषयातले 'तज्ज्ञ'ही तयार होतात! अशाच कथित यतितज्ज्ञांची एक परिषद सन 2011 मध्ये सैबेरियात भरली होती. त्यातल्या रॉबिन लिन नावाच्या बाईनं तर 'आपल्या मिशिगनमधील इस्टेटीत यतींसारखे दहा प्राणी राहतात आणि आपण त्यांना नेहमी खायला घालतो' असं सांगितलं. अशा लोकांमुळे आणि त्याबद्दलच्या गूढ कल्पनांकडं आकर्षित झालेल्या अनेक हौशी व स्वयंघोषित यतितज्ज्ञांमुळे यती हा विषय जवळपास हास्यास्पद पातळीवर पोचला आहे. 

यतींच्या अस्तित्वाबद्दल मांडले जाणारे सगळे 'पुरावे' बघता त्यांच्यातून काहीही ठोस मिळत नाही. कारण बहुसंख्य पुरावे अस्पष्ट, ढोबळ, 'कुणीतरी पाहिलं आहे' अथवा धूसर फोटो यांच्यापलीकडे जात नाहीत. यतींची हाडं, दात किंवा केस यांचा एकही नमुना आजवर वैज्ञानिक कसोट्यांवर टिकलेला नाही. थोडक्‍यात सांगायचं तर, यती ही सध्यातरी कपोलकल्पित कथा असून तिला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truth and myths about Yeti snowman by Dr Pramod Joglekar