'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा'

netaji subhas chandra bose
netaji subhas chandra bose

4 जुलै 2018 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तसेच आझाद हिंद सेनेच्या सिंगापूर येथील ऐतिहासिक घटनेस 75 वर्षे झाली. त्यानिमित्त 1 जुलै, 2019 रोजी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेला विशेष लेख:

भारतातील ब्रिटिश राजवट हा केवळ दोन देशांमधला संबंध नव्हता. जेव्हा एक देश दुसऱ्या देशावर जुलमी राजवट लादतो, तेव्हा ती राजकीय, सामाजिक, आर्थिक व एकंदरीत जागतिक मानवीय समूहाच्या पार्श्वभूमीवरील घटना होत असते. या विचारांचा आवाका असणारे व त्यादृष्टीने विचार करणार नेताजी एकुलते एक होते. म्हणून त्याच्यावर उपाय काढताना त्या पार्श्वभूमीचाच आधार घेणे जास्त सयुक्तिक ठरते. जागतिक घटनांचा आपल्या स्वातंत्र्यासाठी कसा उपयोग करून घ्यावयाचा, याचा ते नेहमी विचार करीत असत. दुसऱ्या महायुध्दाची नांदी व त्याचे होणारे पडसाद ही त्यांना एक मोठी संधीच वाटत होती. राष्ट्र व राष्ट्रवाद या संकल्पना ही दुसऱ्या महायुध्दाची परिणती आहे, हे ते जाणत होते. 

पॅसिफिक मंचावर मित्रराष्ट्रांनी बरीच आघाडी मारली होती. पूर्व आशियातील भारतीय चळवळ शिथिलावस्थेत होती. आजारी रासबिहारी नेताजींची चातकासारखी वाट पहात होते. जून 1943 मध्ये नेतजींचे टोकियोत आगमन झाल्यानंतर परिस्थितीत खूप फरक पडला. नेताजींनी एक स्पष्ट मुद्दा मांडला व तो जपानचे पंतप्रधान तोजो यांच्याकडून वदवून घेतला व तो म्हणजे 'आमचे अंतिम लक्ष्य भारत व भारतात आहे. ते कोणत्याही परिस्थितीत साध्य झाले पाहिजे.' 

जपानच्या मदतीने इंफाळमधून ब्रिटिशांना हाकलून दिल्यानंतर बंगालमध्ये मोठा उठाव होऊ शकतो, तसे झाले तर त्याचे परिणाम संपूर्ण भारतभर होईल. असा नेताजींचा व जपान्यांचा अंदाज होता. भारतीय सरहद्दीवरील कोणताही प्रदेश ताब्यात आल्यानंतर लगेच तो प्रशासकीय नियंत्रणाखाली आणावा हा पुढला टप्पा होता. 

सुभाषबाबूंचे सर्वात मोठे यश जर कोणते असेल तर त्यांनी जपान्यांवर आपला प्रभाव टाकून त्यांना आपल्या राजकीय हालचालींचे महत्त्व समजावून सांगितले व ते आपल्या इच्छेप्रमाणे करवून घेतले. तेसुद्धा नाराजी न पत्करता तर त्यातील व्यावहारिकता पटवून देऊन. त्यांची राष्ट्रभावना एवढी प्रबळ होती, की टीकाकार म्हणतात त्याप्रमाणे ते कोणत्याही राष्ट्राच्या आधीन होणे अशक्‍य होते. म्हणूनच अग्नेय आशियातील या लष्करी व राजकीय चळवळीचे नेताजी सुभाषचंद्र बोस हे केंद्रस्थानी होते. जपानबरोबर आयर्लंड, जर्मनी, इटली, बर्मा, नॅनकिग, क्रोएशिया वगैरे देशांचा नैतिक पाठिंबा होता. 

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील भारताच्या स्वातंत्र्ययुध्दाचा लढा चालू होता.अग्नेय आशियात जपान एकेक राष्ट्र पादाक्रांत करत होता. तेथील ब्रिटिश भारतीय नागरिक शरणार्थींच्या रूपात असहायतेने जागतिक घडामोडीकडे लक्ष देऊन होते. क्रांतिकारक रासबिहारी घोष जपानच्या साहाय्याने आझाद हिंद सेनेतर्फे प्रयत्न करत होते. ते वाट बघत होते एका ध्येयवादी राष्ट्रवेडया माणसाची. 

अशा पार्श्वभूमीवर नेताजींचे सिंगापूर येथे आगमन झाले होते. ताबडतोब त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. सगळीकडे बोस ह्याच नावाची चर्चा चालू होती. ऊर्जेची एक सळसळती लहर जमावाच्या उत्साहातून दिसत होती. भारतीय युद्धकैदी व स्थानिक भारतीय नागरिक यांच्या अनोख्या मिलनातून हा जमाव तयार झाला होता ज्याचे रूपांतर एका शिस्तबद्ध सेनेमध्ये होणार होते. 

सिंगापूरमधील कॅथे इमारतीमधील सिनेमगॄह. नेताजींच्या सिंगापूरमधील आगमनानंतर होणारी पहिलीच जाहीर सभा. तारीख 4 जुलै 1943 (बुधवार). सकाळपासूनच तेथे लोकांचे लोंढे लागले होते. आदल्या दिवशीच नेताजींचे जपानहून आगमन झाले होते. त्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. गर्दी एवढी होती, की अनेक जणांना रस्त्यावर उभे राहूनच समाधान मानावे लागले. ठीक साडेदहा वाजता मोटारींचा ताफा चित्रपटगृहासमोर आला. सुभाषचंद्र, रासबाबू आणि कर्नल भोसले उतरताच घोषणा सुरू झाल्या. सभागृह तीन हजार प्रतिनिधींनी भरले होते. सभागृहात नेताजींचे आगमन होताच जमावाने उभे राहून त्यांना मानवंदना दिली. टाळ्यांचा जो गजर सुरू झाला, तो पाच मिनिटे सतत चालू होता. मंचावर तिरंगा व जपानी ध्वज फडकत होते. जमादार रामसिंगच्या व्हायोलिन वादनाच्या नंतर सरस्वतीने गीत गायिले. वातावरण एका वेगळ्या उंचीवर पोचले होते. व्यासपीठावर दोन बोस होते. पहिल्या महायुध्दाचे साक्षीदार रासबिहारी व दुसऱ्या महायुध्दाचा शेवट भारतीय स्वातंत्र्यात करू इच्छिणारे सुभाषचंद्र बोस. एकच आठवडा आधी रासबाबू तेथे येऊन गेले होते. नेताजींच्या भेटीची वार्ता गुप्त ठेवतानाच त्यांनी एका मोठ्या घटनेविषयी सूतोवाच केले होते. समुदायाला आता त्याचा प्रत्यय येत होत. वर्षांच्या रासबाबूचे अवघे जीवनच क्रांतिमय होते. त्यांच्या अनुभवाचे बोल, त्यापाठोपाठ कर्नल जगन्नाथ भोसले यांचे आझाद हिंद सेनेबद्दल विवेचन झाल्यावर नेताजी उठले. 'गेल्या दोन वर्षापासून मी जगाच्या कानाकोपऱ्यात वणवण भटकतो आहे. युध्द्‌परिस्थीचा जवळून अभ्यास करतो आहे. युद्ध कितीही लांबू दे. त्याची परिणती होणार आहे ब्रिटिशांच्या ऱ्हासात व हिंदुस्थानच्या मुक्ततेत', 'बंधूंनो आमच्या डोळ्यापुढे मोठा संघर्ष आहे. आमचा शत्रू जितका बलवान तेवढाच तो धूर्त कपटी व उलट्या काळजाचा आहे. आपण सर्व जण आझादीच्या अखेरच्या टप्प्यावर आहोत. तहान, खडतर प्रवास, अनन्वित अत्याचार हेच आमचे आता सोबती असणार आहेत. पण त्यातूनच आपल्याला स्वातंत्र्याचे दर्शन होणार आहे. चला उठा, पेटा आपल्या मंगल मातृभूमीला मुक्तीचा आणि वैभवाचा राजरस्ता मिळवून देउया'

मग ती क्रांतिकारी घोषणा - 'तुम मुझे खून दो ...मै तुम्हे आझादी दूँगा'. घोषणा त्रिखंडात गाजली. ब्रिटिश सरकारला भूकंपाचे हादरे बसले. 

...'हिंदुस्थानात यशस्वी क्रांती घडवून आणण्यासाठी हंगामी सरकारची स्थापना करणे हे आमचे कर्तव्य आहे'. महानायकाच्या त्या भाषणाने इतिहास घडविला. लोक मंत्रमुग्ध झाले. आझाद हिंद सेनेचे शंख फुंकले गेले होते. शेकडो लोकांनी आपल्या सर्वस्वावर पाणी ओतले. कॅथे चित्रपटगृह धन्य झाले. बाजी प्रभूमुळे खिंड पावन झाली. नेताजींमुळे ते सभागृह पावन झाले.

आजचा दिवस होता आझाद हिंद सेनेच्या जवानांचा. आग्नेय आशियातील जवान या दिवसाची कित्येक दिवस वाट पहात होते. त्यांचा आवडता नेता आज त्यांची मानवंदना स्वीकारणार होता. कोणतेही अधिकृत पद नसताना, अंगाखांद्यावर कोणत्याही पदकांची रांग वा भडक रिबिनी वा चमकता कातडी पट्टा नसणारा नेता, आज आपल्या जवानांची सलामी घेणार होता. जगाच्या इतिहासात घडणारी अशी दुर्मिळ घटना. महायुद्धाच्या पडझडीचे पडसाद दाखविणाऱ्या सिंगापूरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारीत नेताजी बसले होते. गाडीच्या पुढील भागात तिरंगी ध्वज फडकत होता. आय. सी. एस. झालेला एक गृहस्थ आज लष्करी गणवेशात होता. बरोबर होते रासबिहारी आणि कर्नल भोसले. समोर सहाबारा मोटरसायकलस्वारांचा ताफा चालला होता. पाठीमागून लष्करी मोटारी धावत होत्या. 

रोमन वास्तुशास्त्राचा प्रभाव असणारी टाऊन हॉलची इमारत. दर्शनी असलेले उंचच भव्य खांब, डौलदार कमानी ही मुख्यतः: त्याची खासियत. समोर असलेला एक ओटा. त्यावर उभारलेले व्यासपीठ. पडांग नावाचे भव्य पटांगण. मग डांबरी रस्ता व अमर्यादेची जणीव करून देणारा विशाल समुद्र. पटांगणावर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढावयास तयार असलेले दहा हजारांहून अधिक जवान. शस्त्रे घेऊन ते संचलनासाठी सज्ज असलेल्या अवस्थेत. 

व्यासपीठावर भारतमातेची व गांधीजींची भव्य प्रतिमा. मध्यवर्ती तिरंगी ध्वज. कमतरता फक्त एका स्फूर्ती देवतेची. पांढऱ्या मोटारीतून नेताजी उतरले. कर्नल भोसले, जपानी अधिकारी कनिझुका व रासबिहारी त्यांच्या पाठोपाठ उतरले. गणवेशधारी नेताजींकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. डोक्‍यावर घडीची खादी टोपी. त्यावर ब्रासची दोन बटणे. टोपीच्या कोनामुळे आधीच्याच आकर्षकतेत भर चालणारा त्यांचा चेहरा. गुडघ्यापर्यंत असलेले लांब चामड्याचे बूट. मांड्यांजवळ फुगीर असणारी आणि गुडघ्यापासून खाली घट्ट पकडणारी खाकी विजार. कोटावर दोन बिल्ले. एक तिरंगी तर दुसऱ्या बिल्ल्यावर अखंड भारताचा नकाशा. त्या संपूर्ण पेहरावात ते एक देखणे व्यक्तिमत्त्व दिसत होते. क्वचितच एखादा आय. सी. एस. अधिकारी या तेजोमय गणवेशात वावरला असेल. पुढील दोन तास व्याख्यान चालू होते. एक मंगलमय पण तेवढेच बेहोषी चढवणारे वातावरण तयार होत होते. नेताजींच्या प्रत्येक वाक्‍यानुसार त्याची पातळी वाढतच होती. 'बोला हिंदमातेच्या रक्षणासाठी मृत्यूला माळ घालावयाची कोणाची तयारी आहे. माझ्या जवान बंधूंनो आज मोठ्या आनंदाने मी जगापुढे घोषित करीत आहे: हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सेना सज्ज झाली आहे. ज्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नाही तो सूर्यही आमच्या मदतीस येत आहे. कोणतेही साम्राज्य जसे भरभराटीस येते तसे ते लयालाही पावते. तो काळ आता जवळ आला आहे. थोड्याच काळात इंग्रजी साम्राज्य इतिहास जमा होईल. तो इतिहास लिहिणे आज आपल्या हातात आहे.'जॉर्ज वॉशिंग्टनने अमेरिकेसाठी जे केले, इटलीच्या एकिकरणासाठी गॅरिबाल्डीने जे केले, तेच आम्हाला हिंदुस्थानसाठी करावयाचे आहे. त्यांच्याजवळ सैनिकी बळ होते, म्हणून ते यशस्वी झाले. आतापर्यंत आमच्याजवळ ते नव्हते. आज या दहा हजार जणांच्या स्वरूपात ते आहे. त्यात दररोज वाढ होणार आहे. तेव्हा आमचा विजय निश्‍चित आहे.' समुदायातून त्याला प्रतिसाद म्हणून 'चलो दिल्ली, चलो दिल्ली' अशा आरोळ्या उठत होत्या.

'आज माझ्याजवळ तुम्हाला देण्यासारखे काही नाही. भूक, तहान, खडतर आगेकूच, कदाचित मृत्यूही ह्याच गोष्टी मी देऊ शकतो. पण शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमची सोबत करेन. मग तो दुर्दैवी अंधकार असेल वा स्वातंत्र्याचा राजरस्ता असेल.' डोळ्यातून पाणी येत होते. आपले स्वप्न अर्धे तरी सत्यात उतरले ह्याबद्दल ते उत्साहाने पुढे बोलत होते. ते दोन तास आझाद हिंद सेनेची वाटचाल नक्की करत होते.

पुढची दिशा ठरवत होते. भाषण संपता संपता सैनिकांच्या एक एक तुकड्या पुढे सरकल्या. लष्करी बॅडच्या तालावर प्रत्येक तुकडेची सलामी नेताजी स्वीकारत होत. रणगाडे, चिलखती गाड्या, तोफा अशी सुसज्ज यंत्रणा संचलनाची शोभा वाढवीत होती. सिंगापूर शहरात आज वेगळेच वातावरण तयार झाले होते. अग्नेय आशियातील ते संचलन एका मोठ्या देशाचे भवितव्य ठरवणार होते. ब्रिटिश नेत्यांनी पहिला धसका घेतला तो ह्या संचलनाचा.. एखाद्या देशाचे अनिवासी नागरिक, ज्यांनी फक्त नागरीकी जीवन अनुभवले आहे, असे एकत्र येतात, त्यांना शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले जाते व ते लढाईसाठी तयार होतात हे जगाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना. पडांग मैदानाने तो इतिहास घडविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com