ट्युनिंगमुळे काम करणे सोपे 

स्नेहल सांबरे
शनिवार, 6 जुलै 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

जोडी पडद्यावरची - मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले
मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले या जोडीनं गेली अनेक वर्षं एकत्र काम केलं असून, आता ते ‘लालबत्ती’ या चित्रपट पती-पत्नीच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. या दोघांनाही त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारले असता मंगेश म्हणाला, ‘‘भार्गवी आणि माझी पहिली भेट २००३मध्ये झाली. ही भेट एका कामानिमित्त होती. तिनं केलेल्या मालिकांमुळं आणि मी केलेल्या नाटकांमुळं आम्ही एकमेकांबद्दल ऐकून होतो, एकमेकांना ओळखत होतो.’ याबाबत भार्गवी म्हणते, ‘‘आम्ही दोघांनी बऱ्याच चित्रपट आणि नाटकांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण मला आठवतंय, ‘फू बाई फू’ या कॉमेडी शोदरम्यान अनेकदा एकमेकांबरोबर काम केले आहे. ‘झी वाहिनी’च्या ऑफिसमध्ये आमची ओळख झाली. तिथं आमचं ‘हाय, हॅलो’ वगैरे झालं. या शोमध्ये तो माझा पार्टनर होता. मला त्या वेळी कॉमेडी येत नसल्यानं मी पहिल्यांदा त्याचा नंबर मिळवून त्याला फोन केला. फोन उचलल्यावर त्याचं पहिलंच वाक्‍य होतं, ‘आता मी तुलाच फोनच करणार होतो....’ या प्रसंगानंतर आमचं बोलणं वाढत गेलं आणि आमची मैत्री झाली.’’ मैत्री वाढत गेल्यावर एकमेकांचे स्वभाव आपण ओळखू लागतो आणि स्वभावाबरोबरच आवडत्या-नावडत्या गोष्टीसुद्धा आल्याच. याबद्दल विचारल्यावर भार्गवी म्हणते, ‘‘मंगेश इतरांना खूप मदत करणारा आहे. एखाद्या कामासाठी मंगेशला फोन केला आणि ते काम झालं नाही, असं कधीच होत नाही. तो एक ‘हेल्पिंग हॅंड’ आणि अजातशत्रूसारखा आहे. त्याला माणसं जोडायला खूप आवडतं. मलाही काही मदत हवी असल्यास माझ्या मनात पहिलं नाव मंगेशचं येतं. पण मला त्यांच्यातला नावडता गुण आवर्जून सांगावासा वाटतो, तो म्हणजे तो इतरांना मदत करताना तो स्वतःकडं दुर्लक्ष करतो.’’ 

भार्गवीच्या स्वभावाबद्दल आणि तिच्या एकूणच गुणांबद्दल मंगेश म्हणतो, ‘‘भार्गवी खूपच स्पष्टवक्ती आहे. तिला एखादी गोष्ट पटत असल्यास ती लगेचच मान्य करते आणि एखादी गोष्ट नाही पटली, तर ती लगेचच बोलून मोकळी होते. ती खूप सुंदर नृत्यांगना आहे आणि अभिनेत्री म्हणूनही ती अष्टपैलू आहे. ती तिच्या को-आर्टिस्टला छान समजून घेते. तिचा अतिस्पष्टपणा हा गुण मला आवडत नाही. मला असं वाटतं, काही वेळा अतिस्पष्टपणामुळं माणसं दुखावली जाऊ शकतात.’’ ‘लालबत्ती’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या गमती-जमतींबद्दल मंगेश म्हणतो, ‘‘या चित्रपटात आमच्या दोघांचेही जास्तीत जास्त घरातले सिन्स होते. भार्गवीचा स्वभाव गमत्या असल्यानं काम करताना खूप मजा यायची. आणि भार्गवीच नेहमीच मला, ‘अरे मंग्या, तुला हे कळलं का? असं झालं? तसं झालं...’ असे सर्व सांगायची. बऱ्याचदा सेटवर बोलताना आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमायचो.’’ 

अनेक वर्षं एकत्र काम केल्यानंतर एकमेकांसोबत चांगलं ट्युनिंग जुळून येतं, याबाबत भार्गवी म्हणते, ‘‘आम्ही आधी एकत्र काम केलं असल्यानं आमचं ट्युनिंग अप्रतिम आहे. त्यामुळं आम्हाला ‘लालबत्ती’ चित्रपटात काम करायला फार कठीण गेलं नाही. बरीच वर्षं एकमेकांसोबत को-आर्टिस्ट म्हणून काम केल्यानं एखादा सिन आल्यावर मंगेश हा सीन कसा करणार, हे मला समजायचं.’’ 

(शब्दांकन : स्नेहल सांबरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuning makes it easy to work