चराचर व्यापणारे माझे बापू

या देशाच्या कणाकणांत गांधी वसले आहेत; पण लोकांना बापू फक्त खिशात ठेवायलाच आवडतात, ते फार कमी लोकांच्या डोक्यापर्यंत पोचतात.
Mahatma Gandhi
Mahatma GandhiSakal
Summary

या देशाच्या कणाकणांत गांधी वसले आहेत; पण लोकांना बापू फक्त खिशात ठेवायलाच आवडतात, ते फार कमी लोकांच्या डोक्यापर्यंत पोचतात.

- तुषार गांधी

या देशाच्या कणाकणांत गांधी वसले आहेत; पण लोकांना बापू फक्त खिशात ठेवायलाच आवडतात, ते फार कमी लोकांच्या डोक्यापर्यंत पोचतात. तुम्हाला गांधी नको असतील तर तो तुमचा प्रश्न आहे, मी मात्र माझ्या पणजोबांना कायमस्वरूपी हृदयाजवळ ठेवलंय आणि भविष्यातदेखील ठेवेन. बापूंचा वसा आणि वारसा पेलणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. तुमचं गांधी असणं एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देतं. एक मोठं नैतिक दडपण तुमच्यावर असतं. दुर्दैवाने आपल्या लोकांना मात्र गांधीजी त्यांच्या सोयीपुरतेच हवे असतात. जसं आपलं देवमाहात्म्य काही सणावारांपुरतं मर्यादित असतं आणि नंतर आपण त्या देवांकडं ढुंकूनही पाहत नाही, तसंच आपलं गांधीजींबाबतही झालंय.

आपण सिलेक्टिव्ह (निवडक) गांधी घेऊ पाहतोय; पण ते कसं काय शक्य आहे? ज्या माणसाने अवघ्या जगाचा समग्र विचार केला, तोच महापुरुष असा निवडक कसा काय स्वीकारता येईल? गांधीजी प्रत्येकाला हवे असतात, काहींसाठी ते नोटांपुरते मर्यादित असतात.

आपल्या प्रधानसेवकांना परदेशात फोटो काढण्यासाठी बापू लागतात, काही कट्टरपंथीयांना त्यांच्या तसबिरींना गोळ्या घालून भडास काढायची असते, काहींना भूतकाळातील चुका आणि पापं या राष्ट्रपित्याच्या माथी मारायची असतात... गांधीजींना वगळून भारतवर्षाचा विचार होऊ शकत नाही.

बदनामीचं आश्चर्य नाही

आज जेव्हा काही लोक जाणीवपूर्वक बापूंची बदनामी करतात, तेव्हा त्याचं मला फारसं आश्चर्य वाटत नाही. दरवर्षी बापूंची जयंती अथवा पुण्यतिथी आली, की ही मंडळी नथुराम पुढं करणार, मग आपल्या सोयीनं ५५ कोटींचे बळी, पाकिस्तानला झुकतं माप आणि फाळणीला मान्यता हे मांडलं जाणार. आता नित्यनेमानं होणाऱ्या या टीकेला आपण आणखी कितीकाळ उत्तरं देत राहायची, याचा सोक्षमोक्ष गांधीवाद्यांना लावावा लागेल; अन् नेहमीच आपण सगळ्यांच्या टीकेला उत्तरं देत बसलो,

तर रचनात्मक काम कधी करणार?

गांधीद्वेष ही काही आताची गोष्ट नाही, ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या घडविली, त्याच विचारधारेनं आपल्या सिस्टिममध्ये हे टूलकिट फिट केलंय. त्यांचा गांधीद्वेष हे पूर्वनियोजित कटकारस्थान असतं. हरिद्वार येथील धर्मसंसदेत काही कथित धार्मिक महंत बापूंची जाहीर निंदानालस्ती करत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान त्याबाबत अवाक्षरही काढत नाहीत. तुम्हाला खरोखरच बापू नको असतील, तर द्या त्यांना सोडून, ते थोडीच तुम्ही मला स्वीकारा असा आग्रह करत आहेत. मी मात्र माझ्या पणजोबांना प्राणपणाने जपलंय आणि जपत राहीन. काही संघटनांचा गांधीद्वेषाचा कार्यक्रम पूर्वनियोजित आहे, आपण त्याच्याकडं तुटकतुटकपणे पाहिल्यास गोंधळ होण्याचीच शक्यता अधिक असते. मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटना सातत्याने गांधीजींची बदनामी करत असतात; पण गांधीवाद्यांनी या सापळ्यात फार काळ अडकून पडू नये, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

नथुरामच्या हातात बंदूक कोणी दिली?

नथुरामनं फक्त गांधीजींवर गोळी झाडली होती; पण त्याच्या हातात बंदूक कोणी दिली? मुळात गांधीजींना मारण्याचं कारस्थान एका विचारधारेने आखलं होतं, आज त्याच विचारधारेची चलती आहे. मग हीच लोकं बिटिंग रिट्रिटमधून बापूंची प्रिय धून वगळतात, नथुरामची पूजा केली जाते. गांधींना मारल्यानंतरदेखील त्यांचा विचार आपल्याला संपविता आलेला नाही, उलट तो अधिक प्रबळ झाला हे पाहून, ही मंडळी त्यांच्या चारित्र्यावर हल्ले करत असतात. भविष्यात हे असे प्रकार वाढतील, कारण त्याचं टाइमटेबल ठरलेलं आहे.

तेव्हा कोल्हेंना विरोध करा...

शरद पोंक्षे यांचं मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक आणि आता अमोल कोल्हे यांचा व्हाय आय किल्ड गांधी? हा चित्रपट या कलाकृतींकडं मी फार तटस्थपणे पाहतो. तसंही अभिनय करणाऱ्या कलाकाराकडं स्वतःचं असं मांडण्याचा अधिकार मुळात असतोच कोठे? जे स्क्रीप्टमध्ये असतं, तेच तो बोलतो. पैशांसाठी ते कोणतीही भूमिका करायला तयार असतात. अॅक्टरला स्वतःचं कॅरेक्टर नसतं, ते लढाईतील व्यावसायिक सैनिकासारखे असतात. त्यांना किती गांभीर्याने घ्यायचं, हे लोकांनी ठरवायला हवं. अमोल कोल्हे हे जर पोंक्षे यांच्याप्रमाणे सार्वजनिक जीवनात वावरताना नथुरामच्या विचारांचा प्रसार करू लागले, तर त्याचा प्रतिवाद केला जाऊ शकतो.

गांधींना लक्ष्य करण्यामागे छुपा मुस्लिमद्वेष दडलेला असतो, त्यांच्यावर अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचा आरोप केला जातो. खिलाफतला प्रोत्साहन देणारे, फाळणीला जबाबदार असणारे गांधी रंगविले जातात. पुढे जाऊन हीच मंडळी नेहरू विरुद्ध पटेल, नेहरू - गांधी विरुद्ध सुभाषबाबू किंवा गांधी विरुद्ध डॉ. आंबेडकर अशी मांडणी करतात; पण विवेकीजनांनी हे लक्षात घ्यायला हवं की, हे सगळेच महापुरुष आपापल्या ठिकाणी खूप महान होते. हा देश घडावा म्हणून त्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम केलाय. आज त्यांनाच परस्परांच्या विरोधात उभं करून आपण नेमकं काय सिद्ध करू पाहतोय? पटेल आणि नेहरू या दोघांचीही उंची खूप मोठी आहे. नेहरूंना काम करण्यासाठी सोळा वर्षं मिळाली, पटेलांना उणापुरा दोन ते अडीच वर्षांचा काळ मिळाला. पटेलांचं वय पाहता गांधीजींनी पंतप्रधानपदासाठी केलेली नेहरूंची निवड किती सार्थ होती, हे पुढे त्यांनी केलेल्या कामावरून दिसून येतं. त्यामुळे गांधीजींनी पटेलांना नाकारलं या टीकेत फारसं तथ्य नाही.

नेताजींच्या लढ्याविषयी

सुभाषबाबूंच्या लढ्याबाबतही आपल्याला हेच म्हणता येईल. राजकीय लढाईबाबत गांधीजी आणि नेताजी हे दोन्ही नेते दोन टोकांवर उभे होते. बापूंनीही सुभाषबाबूंना वेगळा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना त्यातूनच झाली. सुभाषबाबूंच्या लढ्याला सगळ्याच देशाचा पाठिंबा होता असंही नाही. ज्या पद्धतीने छोडो भारतच्या वेळी गांधीजींच्या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसं सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेबाबत झालेलं दिसत नाही. कदाचित यामुळेच असेल, सुभाषबाबूंना त्यांच्या लढ्याची सुरुवात देशाबाहेरून करावी लागली. सुभाषबाबूंचं कर्तृत्व मोठं होतं आणि ते जगाने मान्य केलं आहे. आता ते सांगण्यासाठी पंतप्रधान मोदींची आवश्यकता नाही. किमान हा प्रतिमांचा सोहळा तरी सरकारने निश्चितपणे टाळायला हवा.

भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचं खापरही गांधीजींवर फोडलं जातंय; पण प्रत्यक्षात फाळणीच्या वाटाघाटी होत असताना गांधीजी निर्णयप्रक्रियेत कोठेही सहभागी नव्हते. जे झालं ते मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये झालं. गांधीजींचा फाळणीला विरोध होता; पण शेवटी कुणीच आपल्याबाजूने राहिलं नसल्याचं पाहून त्यांनाही नाइलाजाने त्याला संमती द्यावी लागली. जेव्हा फाळणीच्या वेळी बापू एकटे होते, तेव्हा तरी ही ढोंगी राष्ट्रभक्त मंडळी त्यांना पाठिंबा द्यायला कुठे पुढे आली होती. या मंडळींना फाळणी झाली याचं फारसं वैषम्य वाटत नाही, फाळणी होऊनदेखील या देशात मुस्लिम कसे काय राहिले, याचं त्यांना वाईट वाटतं. यासाठीच ते गांधीजींना जबाबदार धरतात. येथून सगळेच मुस्लिम गेले असते, तर त्यांना फाळणी आवडलीच असती. फाळणीप्रमाणेच भगतसिंगांच्या फाशीबाबतही चुकीची माहिती पसरविली जाते. ही फाशी टाळण्यासाठी गांधीजींना जे काही करणं शक्य होतं, ते त्यांनी केलं, त्याचे लिखित पुरावेदेखील उपलब्ध आहेत; पण शेवटी माणूस म्हणूनही त्यांना मर्यादा होती, हे आपण विसरतो. स्वतः भगतसिंग आणि अन्य सहकारी क्रांतिकारकांनी स्वतःहून हौतात्म्य स्वीकारलं होतं. भगतसिंग यांनाही दया याचना नामंजूर होती. तत्कालीन ब्रिटिश सरकारची आक्रमक भूमिका पाहता, त्यांनी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांची फाशी कितपत रद्द केली असती, याबाबत साशंकता आहेच.

हल्ली कुठंही काही खुट्ट झालं की, गांधी-नेहरूंना जबाबदार धरलं जातं. सोशल मीडियातूनही अपप्रचार मोहीम फार जोरात सुरू असते. या मंडळींकडून नेहमीच नेहरूंना लक्ष्य केलं जातं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, भारतीय इतिहासातील पंडितजींचं स्थान हे होय. तुम्ही पाहू शकाल, स्वतंत्र भारतातील सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांची पायाभरणी ही नेहरूंच्या काळात झाली आहे. आज जागतिक पातळीवर याच संस्था देशाच्या प्रतिष्ठेत मोलाची भर घालत असतात. नेहरू या नावामागे मोठं यश, प्राप्ती आणि साधना आहे, त्यांच्या टीकाकारांकडं असं काहीही नाही, त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने नैराश्यापोटी चिखलफेक होत असते.

गांधीजींचा विसर पडलेली काँग्रेस

सध्याच्या तत्त्वविरहित राजकारणात सर्वांनाच गांधीजींचा विसर पडलाय. ज्या पक्षाचं सर्वांत मोठं राजकीय अॅसेट हे गांधी हेच आहे, ती काँग्रेसदेखील त्याला अपवाद नाही. आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस सत्ताधीश होताच आरपार बदलली. साधारपणे सत्तरच्या दशकानंतर ती मतपेढीत अडकल्याचं दिसतं. काँग्रेसच्या आजच्या नेत्यांनाही गांधीवादात फारसा रस असल्याचं दिसत नाही. राजकीय स्थितीबाबत बोलायचं झालं, तर आज राहुल गांधी खूप मॅच्युअर झाल्याचं दिसतं. प्रियांका याही आक्रमकपणे उत्तर प्रदेशच्या प्रचारात उतरल्या आहेत. मोदींच्या एककल्ली हिंदुत्वासमोर राहुल यांनी सर्वसमावेशक हिंदुत्ववाद उभा केलाय, तो सत्ताधाऱ्यांना टक्कर देऊ शकतो; पण त्यासाठी राहुल यांचं सातत्य खूप महत्त्वाचं आहे. गांधीवादापासून दूर गेलेली काँग्रेस, हीच राहुल यांची खरी कमजोरी आहे असं मला वाटतं. आज अनेक मंडळी गांधी कुटुंबाला वगळून काँग्रेसचा विचार मांडू पाहत आहेत; पण ते फारसं व्यवहार्य ठरणार नाही. गांधी हा विचारच सगळ्यांना एका सूत्रात बांधू शकतो. गांधी कुटुंबालाच वगळलं तर काँग्रेस पक्ष एक दिवसही टिकणार नाही.

गांधीजी जीवनात उतरण्यासाठी

  • मानवकेंद्री धोरणांची आखणी करावी लागेल

  • वसुधैव कुटुम्बकम या विचाराचा स्वीकार हवा

  • राष्ट्रवाद केवळ राजकारणापुरता मर्यादित नको

  • पर्यावरण अन् सजीवांच्या सहअस्तित्वाला मान्यता

  • सर्वांना सोबत घेणारी, पुढे नेणारी आत्मनिर्भरता हवी

कोरोनाकाळात देशाची अर्थचक्रं अवरुद्ध झाली होती. उद्योग-धंदे ठप्प झाले असताना ग्रामीण भारत, पर्यायाने कृषी अर्थव्यवस्थेने देशाला आधार दिला. अनेक नवउद्योजकांनी गांधीविचारांचा आधार घेत नवे स्टार्टअप सुरू केले, उद्योग थाटले. खादीचे कपडे असो अथवा नैसर्गिक, सेंद्रिय शेती; देशी गोवंशाचं पालन असो अथवा बचत गटांची चळवळ. गांधीजी फक्त नोटांवर नाही, तर उद्योग अन् श्रमप्रतिष्ठेच्या विचारातही असतात, हे दिसून आलं. लोकांच्या आयुष्यात प्रॅक्टिकली उतरत असलेले बापू पाहून मनाला समाधान वाटतं अन् आनंदही होतो, युवा पिढीपर्यंत गांधीविचार पोचतोय. खरंतर साबरमती आणि सेवाग्रामच्या आश्रमात गांधीजींनी खूप आधीच हे प्रयोग केले होते. आज लोकांना त्याचं महत्त्व कळतंय, ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट मानावी लागेल. बापू बिर्ला भवनमध्ये राहत म्हणून अनेकदा त्यांच्यावर टीका केली जायची, त्यांच्या साधेपणाची टिंगल व्हायची; पण हेच गांधीजी बिर्लांच्या गुजरातमधील ज्यूट कारखान्यामध्ये कामगार संप करतात, तेव्हा मात्र ते कामगारांच्या बाजूने उभे राहतात, हे मात्र टीकाकार सोईस्कररीत्या विसरलेले असतात. भांडवलदारांसोबत राहूनही गांधीजी कधीच भांडवलदार झाले नाहीत, हेच या महात्म्याचं यश होतं. म्हणूनच कोणत्याही एका चष्म्यातून बापू कधीच दिसत नाहीत, त्यासाठी समग्राला डोळा भिडवावा लागतो.

(लेखक महात्मा गांधी यांचे पणतू आहेत.)

(शब्दांकन : गोपाळ कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com