ब्रिटिश समुद्रातील दोन कुप्रसिद्ध ‘महरट्टे’

२००८ मध्ये इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर ‘प्राईड ऑफ कॅटरबरी’ नावाच्या एका खासगी नौकेला बुडालेल्या दोन जुन्या जहाजांची धडक बसली. योगायोगाने दोन्ही जहाजांचं नाव होतं, ‘महरट्टा’.
Mahratta ships accident
Mahratta ships accidentsakal

- वैभव वाळुंज

२००८ मध्ये इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर ‘प्राईड ऑफ कॅटरबरी’ नावाच्या एका खासगी नौकेला बुडालेल्या दोन जुन्या जहाजांची धडक बसली. योगायोगाने दोन्ही जहाजांचं नाव होतं, ‘महरट्टा’. तीस वर्षांच्या अंतराने बुडालेल्या दोन ‘महरट्टा’ जहाजांच्या मोडतोडीतून तयार झालेल्या ढिगाऱ्यांमुळे जहाजांना मोठा धोका निर्माण झाला...

इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर खलाशी वाहतूक आणि समुद्रप्रवास करणाऱ्या हौशी व व्यावसायिक खलाशांमध्ये काही वर्षांपूर्वी एक नाव अनायसे लोकप्रिय झालं आणि ते म्हणजे ‘महरट्टा’. दक्षिण ससेक्स आणि केंट भागामध्ये ‘मराठा’ नावाचा जुना अपभ्रंश अचानक नव्याने रूढ झाला, त्याचं कारण म्हणजे २००८ मध्ये या भागात झालेला मोठा अपघात होता.

२००८ च्या जानेवारीत ‘प्राईड ऑफ कॅटरबरी’ नावाची एक खासगी प्रवासी वाहतूक करणारी नौका इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावरील भागांमध्ये प्रवास करत होती. अचानक हवामान खराब झाल्यामुळे तिला आपला मार्ग बदलावा लागला. त्या मार्गावर या नौकेला बुडालेल्या दोन जुन्या जहाजांची धडक बसली. या जहाजांपासून वाचण्यासाठी हा मार्ग शक्यतो टाळला जातो. योगायोगाने या दोन्ही जहाजांचं नाव होतं ‘महरट्टा’.

आपल्या वसाहतीतील जनतेला सैन्यात भरती करून घेण्यासाठी ब्रिटिश सत्तेने स्थानिक रूढी आणि परंपरांचा मोठा वापर केला. विशेषतः ब्रिटिश सैन्याने काही जातींना ‘मार्शल रेस’ म्हणून हुरळून लावत, तसेच ऐतिहासिक व्यक्तींचा व नावांचा वापर करत आपल्या सैन्यात मोठी भरती केली.

ब्रिटिश सैन्याच्या बटालियनमध्ये सैन्यात जाती-धर्मावर आधारित रचना असो वा छत्रपती शिवाजी व इतर ऐतिहासिक व्यक्तींचे पुतळे उभारणे असो, १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी इथल्या धर्मातीत पायंड्यांना विरोध करण्याऐवजी आपल्या स्वार्थासाठी त्याचा लाभ घ्यायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटिश नौदलातील जहाजांना भारतीय पठडीवर नावे देण्यात आली होती.

साम्राज्यवादी काळात जिथे जिथे ब्रिटिशांचे राज्य असेल त्या त्या भागातील नावे जहाजांना दिली गेली. त्याचाच एक भाग म्हणून हिंदी महासागरात प्रवास करणाऱ्या युद्धनौका आणि जहाजांना महाराष्ट्रातील ठिकाणांची व पठडीची नावे देण्यात आली. त्यात एचएमआयएस गोदावरी, एचएमआयएस कोकण, एस. एस. महरट्टा, एस. एस. माथेरान इत्यादी अनेक जहाजांचा समावेश होता.

पहिले ‘महरट्टा’ जहाज १८९१ मध्ये बनवले गेले होते. दक्षिण आफ्रिकेवर कब्जा घेण्यासाठी इंग्लंड आणि नेदरलँडच्या दरम्यान झालेल्या १९०० मधील बोअर युद्धात ही युद्धनौका वापरण्यात आली होती. जवळपास दीड लाख भारतीय सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने आफ्रिकेच्या भूमीवर लढा दिला. महात्मा गांधीही या युद्धात सहभागी होते. त्यामुळे या नौकेची कीर्ती ब्रिटिश सैन्यात पसरली होती.

१९०९ मध्ये कोलकात्याहून लंडनकडे प्रयाण करत असताना विविध भारतीय सामग्री व व्यापारी मालाने भरलेले ‘महरट्टा’ जहाज इंग्लंडच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावरून पुढे जात होते. मात्र किनारा दृष्टिक्षेपात आला असतानाच अनपेक्षितपणे जहाज वाळूच्या ढिगात रुतले आणि त्याला जलसमाधी मिळाली. जहाज पूर्णपणे बुडण्यासाठी दोन दिवस लागले. मात्र, जहाजावरील प्रवासी वगळता इतर कोणतेही सामान वाचू शकले नाही.

अनेक युद्धांमध्ये ब्रिटिश सैन्याला मदत करणाऱ्या आणि भारतीयांशी वसाहतीचे नाते असणाऱ्या या जहाजाला ब्रिटनच्या दक्षिण किनाऱ्याजवळ कायमची जलसमाधी मिळाली. या जहाजाचे अवशेष आजही येथील किनाऱ्याच्या तळाशी पडून आहेत. मात्र यामुळे ब्रिटिश नौदलाचे मराठी नावांवरील प्रेम कमी झाले नाही.

हा अपघात घडल्यानंतर जवळपास २० वर्षांनी या जहाजाच्या आठवणीत ब्रिटिश नौदलात पुन्हा एकदा सारख्याच बनावटीच्या जहाजाला ‘एस. एस. महरट्टा’ नाव देण्यात आले. १९१७ मध्ये बनलेल्या या जहाजाचा वापर प्रामुख्याने भारतातून मालाची लूट करण्यासाठी होई. लवकरच या जहाजाची ख्याती मजबूत मालवाहू नौका म्हणून ब्रिटिश साम्राज्यात पसरली.

१९३६ मध्ये ‘एस. एस. माथेरान’ नावाची नौका पूर्व आफ्रिकेच्या सुदान बंदरात अडकून पडली होती. मुंबई प्रांतात काम करणारे तत्कालीन ब्रिटिश नोकरदार व सैन्य अधिकारी अनेकदा माथेरानमध्ये राहत असत, म्हणून या नौकेला असे नाव देण्यात आले होते. दुरुस्तीसाठी ती नौका इंग्लंडमध्ये घेऊन जाणे गरजेचे होते. मात्र, ती ओढण्यासाठी पुरेसे मोठे जहाज उपलब्ध नव्हते.

‘माथेरान’पेक्षा कमी आकाराचे असूनही ‘महरट्टा’ जहाजाने त्याला इजिप्तमधील सुएज कालव्यापर्यंत ओढत नेले होते. १९३९ मध्ये हे नवीन जहाज पुन्हा भारताच्या कलकत्ता बंदरातून इंग्लंडमधील लिव्हरपूल बंदराकडे निघाले होते. वाटेत या जहाजाचा मार्ग बदलून त्याला लंडनकडे जायला सांगण्यात आले. जुन्या ‘महरट्टा’ जहाजाने पार केलेला हा मार्ग होता.

मात्र या वेळी एका मजबूत जहाजाद्वारे कोणता अपघात होईल, अशी कोणाला शक्यताही वाटत नव्हती. अचानक किनारा दृष्टिक्षेपात आल्यानंतर जहाजावरील संयंत्रे बंद पडली आणि नौकायन करण्यासाठी दिवाबत्तीची सोयही झाली नाही. अनुभवी खलाशांनी आपल्या अंदाजानेच जहाज पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र किनाऱ्यापासून अवघ्या काही मैल असताना हे जहाज वाळूमध्ये रुतले आणि त्याचा पुढे जाण्याचा मार्ग अडून राहिला.

अचानक आलेल्या लाटेच्या तडाख्यांनी महरट्टा जहाजाचे दोन तुकडे झाले. दुर्दैवविलास म्हणजे तीस वर्षांपूर्वी बुडालेले याच नावाचे एस. एस. महरट्टा जहाज नव्या जहाजाच्या अपघात स्थळापासून फक्त एक मैल अंतरावर समुद्रमग्न चिरनिद्रा घेत होते. हे जहाज पूर्णपणे बुडण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला व जहाजावरील सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवीन ‘महरट्टा’ जहाजाचे मोडतोड झालेले भाग वाहून जाऊन जुन्या महरट्टा जहाजाच्या ढिगाऱ्यांवर जाऊन आपटले.

तीस वर्षांच्या अंतराने बुडालेल्या दोन ‘महरट्टा’ जहाजांच्या मोडतोडीतून तयार झालेल्या ढिगाऱ्यांमुळे इंग्लंडच्या दक्षिण समुद्रातच जहाजांना जाण्या-येण्यासाठी मोठा अडसर निर्माण झाला. ब्रिटिश खलाशी इतिहास पाहिला तर या ठिकाणी आजवर जवळपास दोन हजार जहाजांचे अपघात झाले आहेत. सर्वात अलीकडील अपघातात वाळूमुळे नव्हे; तर चक्क या दोन महरट्टा जहाजांच्या ढिगाऱ्यांमुळे एका जहाजाला जलसमाधी मिळाली व त्याचे प्रचंड नुकसान झाले.

त्यानंतर मात्र या बनावटीच्या जहाजांना ‘महरट्टा’ नाव देण्याचा क्रम थांबला. नंतरच्या काळात बुडालेले जहाज या नावाचे शेवटचे जहाज ठरले. इथून प्रवास करणाऱ्या इतर जहाजांना ‘महरट्टा’च्या ढिगाऱ्यांपासून कसे वाचवता येईल, यासाठी इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन शहरातील मरिन ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्रँचने विस्तृत अहवाल तयार केला आहे. विसाव्या शतकात या दोन ‘महरट्टा’ जहाजांचे ब्रिटिश समुद्रात पानिपत झाले खरे, मात्र त्याच्या आठवणी अजूनही ब्रिटिश समुद्रात धुडगूस घालत आहेत.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com