एव्हरेस्टची उंची !

एव्हरेस्टसोबतच अनेक हिमशिखरे हिमालयात डौलाने उभी आहेत. आठ हजार मीटरपेक्षा उंच असलेली १४ शिखरे हिमालयात आहेत.
Everest
EverestSakal

हिमाच्छादित शिखरांनी नटलेली पर्वतरांग ही विलोभनीय दिसते. उंचच उंच शिखरांच्या माथ्यांवर पहाटेच्या सोनकिरणांनी न्हावून निघालेला हिमालय अनुभवताना होणारा आनंद शब्दातीत आहे. सुदैवानं गेल्या चाळीस वर्षांत या हिमशिखरांचा जवळून अनुभव घेता आला.

उंचीचे वलय विलक्षण असते. आपल्याकडे उंची म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो माउंट एव्हरेस्ट. उंचीचे, उत्तुंगतेचे सर्वोच्च परिमाण म्हणजे एव्हरेस्ट. उंची आणि एव्हरेस्ट हे समीकरण दृढ आहे.

मात्र, एव्हरेस्टसोबतच अनेक हिमशिखरे हिमालयात डौलाने उभी आहेत. आठ हजार मीटरपेक्षा उंच असलेली १४ शिखरे हिमालयात आहेत. हिमालय वगळता इतर कोणत्याही पर्वतरांगेत आठ हजार मीटर त्यापेक्षा उंच शिखरे आढळून येत नाहीत. सात हजार मीटरपेक्षा उंच अशा १०० पेक्षा जास्त शिखरांचे हिमालय हेच माहेरघर आहे. त्यामुळे जगातील सर्वांत तरुण पर्वतरांग असे बिरुद असलेला हिमालय जगातील सर्वांत उंच पर्वतरांग म्हणून देखील ओळखला जातो.

हिमालयातील उंचीचे अप्रूप फार पूर्वीपासून आहे. भारतीय उपखंड जेव्हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता, तेव्हा हिमालयात असलेल्या विविध शिखरांची उंची मोजण्यासाठी ‘द ग्रेट ट्रिग्नोमेट्री सर्व्हे ऑफ इंडिया’सारख्या शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यात येत असे. १९व्या शतकातील पूर्वार्धात याच पद्धतीद्वारे हिमालयातील चिरपरिचित शिखरांची उंची मोजण्यात आली. १८५० पर्यंत नेपाळ-भारत सीमेवर सिक्कीम राज्यात वसलेले व ८ हजार ५८६ मीटर उंच असलेले माउंट कांचनजुंगा हेच जगातील सर्वोच्च शिखर होते. मात्र, कांचनजुंगापेक्षाही उंच शिखरे हिमालयात आहेत, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. ट्रिग्नोमेट्री पद्धतींचा वापर करून नेपाळ - तिबेटच्या सीमेवर वसलेल्या एका दुर्गम शिखराची उंची ही कांचनजुंगापेक्षा अधिक म्हणजेच ८ हजार ८४८ मीटर इतकी नोंदविण्यात आली. त्यावेळी या शिखरासंदर्भात कोणतेही दस्तावेज नसल्याने त्याचे नाव ‘माऊंट XV’ असे करण्यात आले व जगातील सर्वांत उंच शिखर म्हणून त्याची नोंद करण्यात आली. उंची मोजण्याच्या कामांमध्ये जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या योगदानामुळे या शिखराला नाव देण्यात आले एव्हरेस्ट आणि जन्म झाला माउंट एव्हरेस्ट’चा!

एव्हरेस्टचे सगळ्या जगाला आकर्षण आहे त्याच्या उंचीमुळे. जेव्हा १९५३ साली सर एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर चढाई यशस्वी केली, तेव्हा पुन्हा एकदा ‘एव्हरेस्ट शिखराची नेमकी उंची किती?’ हा प्रश्न ऐरणीवर आला. १९५४ मध्ये करण्यात आल्या ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या माध्यमातून माउंट एव्हरेस्ट शिखराची नेमकी उंची ८ हजार ८४८ मीटर किंवा २९ हजार ०२९ फूट एवढी निश्चित करण्यात आली व ९ डिसेंबर २०२० पर्यंत एव्हरेस्टची अधिकृत उंची म्हणून ग्राह्य धरण्यात येत होती.

दरम्यानच्या काळात इटली, अमेरिका, चीन इत्यादी देशांनी केलेल्या सर्व्हेत काही फुटांनी कमी- जास्त करत एव्हरेस्टची उंची मोजण्यात आली मात्र अधिकृतपणे एव्हरेस्टची उंची ही ८ हजार ८४८ मीटर अथवा २९ हजार ०२९ फूट एवढीच ग्राह्य धरण्यात येत होती. एव्हरेस्टच्या उंचीबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उभे केले गेले, अनेक चर्चा घडल्या. भूकंपानंतर एव्हरेस्टची उंची कमी होते तर भूगर्भातील इतर हालचालींमुळे एव्हरेस्टच्या उंचीत काही सेंटिमीटरने दरवर्षी वाढ होते, असे गृहीतक शास्त्रज्ञांनी मांडले. एव्हरेस्टची उंची ग्राह्य धरताना सर्वांत वरचा खडकाळ भाग हे टोक मानावे की त्यावर असलेला हिम देखील ग्राह्य धरावा, याविषयी शास्त्रज्ञ व गिर्यारोहक यांच्यात आजही मतांतरे आहेत.

एव्हरेस्ट किंवा इतर अनेक शिखरमाथ्यांवर असलेले हिम हा देखील चर्चेचा एक मोठा विषय आहे. अतिउंचीमुळे हिम वितळत नाही. वर्षानुवर्षे तसेच असते. नेपाळमध्ये एव्हरेस्टची उंची हा भावनिक विषय आहे. त्यांच्यासाठी एव्हरेस्ट ही राष्ट्रीय प्रतीक आहे. एव्हरेस्ट ही नेपाळची प्रमुख ओळख आहे. त्यामुळे एव्हरेस्टविषयी कमालीची आत्मीयता येथे बघायला मिळते. एव्हरेस्ट शिखरावर, त्याच्या उंचीला असलेल्या वलयावर संपूर्ण नेपाळची अर्थव्यवस्था तरलेली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे एव्हरेस्टची उंची ही कमी झालीच नाही किंवा होऊच शकत नाही, अशी भावना नेपाळमध्ये आहे. खरंतर एव्हरेस्टनंतर उंचीनुसार क्रमांक लागतो तो माउंट के-२ या शिखराचा. पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थित के-२ या शिखराची उंची ८६११ मीटर, म्हणजे एव्हरेस्टपेक्षा तब्बल २३७ मीटरने कमी आहे. एव्हरेस्टची उंची इतक्या मोठ्या प्रमाणात कमी होऊच शकणार नाही. जगातील सर्वांत उंच शिखराचे बिरुद हे एव्हरेस्टलाच असणार आहे, तरी देखील उंचीमध्ये येणारा काही फुटांचा फरक हा अनेकांसाठी भावनिक मुद्दा आहे.

नेपाळमधील भावनांचा विचार करता, तसेच गेल्या काही दशकांमध्ये घडलेल्या भौगोलिक घटनांमुळे २०२० मध्ये नेपाळ व चीन यांनी संयुक्तपणे एव्हरेस्टची उंची मोजण्याची मोहीम हाती घेतली व ८ डिसेंबर २०२० रोजी एव्हरेस्टची नवीन उंची जाहीर केली, ती आहे २९०३२ फूट किंवा ८८४८.८६ मीटर. म्हणजे पूर्वीच्या उंचीपेक्षा ८६ सेंटिमीटर किंवा ३ फुटांनी अधिक. सर्वसाधारणपणे बघितल्यास हा काही फार मोठा फरक नाही पण गिर्यारोहण जगतामध्ये, नेपाळमध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नवीन उंची मोजण्याच्या मोहिमेने एव्हरेस्टचे ‘एव्हरेस्टपण’ अबाधित ठेवलं, नव्हे तर आणखी दृढ केलं. सोबतीला हे देखील स्पष्ट केलं की पूर्वीच्या काळी उपकरणांची कमतरता, आधुनिक तंत्रज्ञान यांची अनुपलब्धता असताना देखील केवळ गणितीय पद्धतीने, शिखर चढाई न करता देखील मोजलेली एव्हरेस्टची उंची अचूकच होती.

अशा घटनांनी खरंतर आमच्या सारख्या गिर्यारोहकांच्या ध्येयावर वेगळा असा काही परिणाम होत नाही. आम्हाला फक्त ध्यास असतो तो शिखर चढाईचा व सुखरूप उतराईचा. फक्त येथून पुढे एव्हरेस्ट शिखर चढाई केल्यावर शब्दशः ‘नवी उंची’ गाठली जाईल, एवढे मात्र नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com