मंगळ मोहिमेवर ट्रम्पची वक्रदृष्टी?

USA President Donald Trump change NASAs Mars goals
USA President Donald Trump change NASAs Mars goals

मंगळावरील मानवी वसाहतीचा मुद्दा हा जगभरातील सर्व अवकाश संशोधकांच्या अजेंड्यावर अग्रक्रमावर राहिला आहे. यंदाच्या वर्षात तर या विषयीच्या घडामोडींनी वेग घेतला. मंगळावरील मानवी वस्तीच्या आशा पल्लवित व्हाव्या, असं काही ना काही अवकाश कार्यक्रमातील वेगळे आविष्कार कानावर पडत आहेत. मंगळावर पहिलं पाऊल ठेवण्यासाठी महत्त्वाकांक्षी राष्ट्रांसोबत काही खासगी कंपन्यांनीही जोरदार तयारी केली आहे. अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करून या खासगी कंपन्या उघडपणे अवकाश स्पर्धेत उतरल्या असताना, अवकाश प्रयोग आणि संशोधनात जगाचं नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेच्या नासाच्या मंगळ मोहिमेवर वक्रदृष्टी पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. निदान नासामधील अवकाश संशोधकांना तसं वाटू लागलं आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका मंगळाला पदस्पर्श करेल का? या चिंतेनं सध्या नासातील संशोधकांना ग्रासलं आहे. 2030 ला मंगळावर मानवी पाऊल ठेवण्याचं उद्दिष्ट अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ठेवलं होतं. ट्रम्प व त्याच्या सहकाऱ्यांकडून सध्या जे अवकाश धोरण स्पष्ट केलं जातंय, ते संदिग्ध आहे. मंगळावर मानवाचं पहिलं पाऊल ठेवण्याच्या मोहिमेला ते बळकटी देणार, की नजीकच्या टप्प्यात चांद्र मोहिमेला प्राधान्य देणारं ठरणार याबाबत स्पष्टता नाही. पृथ्वीवरील वातावरणीय बदलाबाबत ट्रम्प यांची तिरकस भूमिका जगजाहीर आहे. अमेरिकेला बदनाम करण्यासाठी चीननं रचलेलं हे षड्‌यंत्र आहे, अशी त्यांची धारणा आहे. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर चुकीच्या धोरणांची दलदल पहिल्या शंभर दिवसांत साफ करण्याची प्रतिज्ञा ट्रम्प यांनी केली आहे. यामध्ये नासाविषयीचं धोरण असणार का?

नासाला पृथ्वी विज्ञानाच्या संशोधनापासून मुक्‍त करण्याची गरज आहे, असं विधान ट्रम्प यांनी केल्यामुळे संशोधकांमध्ये गोंधळ उडाला आहे. नासासाठी ट्रम्प सरकार किती बजेट देणार? पृथ्वी विज्ञानापासून नासाला अलिप्त करणार का? धोरणांच्या स्वच्छता मोहिमेत पहिल्या शंभर दिवसांत आपला समावेश असेल का? ओबामा यांच्या मंगळ मोहिमेच्या उद्दिष्टांना तिलांजली देणार काय; इथपासून ते मंगळ मोहीम रद्द केली जाईल, की ती खासगी कंपन्यांना या मोहिमेत सामावून घेतले जाईल? अशा अनेक शंका-कुशंका सध्या नासाच्या संशोधकांच्या मनात घोंघावत आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाबाबतच्या ट्रम्प यांच्या अस्पष्ट धोरणामुळं संशोधक व या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अवकाश उड्डाण करणारे जगातले देश आणि समुदाय अवकाश प्रयोग कार्यक्रमात अमेरिकेकडं नेतृत्वाच्या अपेक्षनं पाहतात; हे वास्तव आहे. ट्रम्प यांच्या निवडीनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाची नव्यानं फेरमांडणी होते आहे. तीच अवस्था विज्ञान तंत्रज्ञानाबाबतही आहे. ट्रम्प यांच्या गुलदस्त्यातील अवकाश संशोधनाचे पडसाद अवकाश कार्यक्रमावर निश्‍चितपणे पडणार आहेत. मंगळावरील मानवी वस्ती हे आता स्वप्नरंजन नाही, की कल्पनाविलास; ते आता प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. 

चंद्रस्पर्श ते मंगळ मोहीम हा अवकाश मोहिमेचा प्रवास रोमांचकारी आहे, तसा भुरळ घालणाराही आहे. कारण कुतूहल हे मानवाच्या डीएनएमध्येच आहे. त्याच कुतूहलापोटी तो ज्ञात-अज्ञात गोष्टींचा पिच्छा करत असतो. भले त्या गोष्टी त्याच्या जीवनाशी निगडित असो, वा नसो; उपयुक्‍त ठरो वा न ठरो. त्याच्यातली शोधवृत्ती त्याला गप्प बसू देत नाही. म्हणूनच सूर्यमंडळाचा भेद करून त्यानं अफाट विश्‍वाच्या पोकळीत डोकं घातलं. चमचमणारे तारे, उल्का, ग्रहांचे भ्रमण, ग्रहणं, धुमकेतू, कृष्णविवरं हे त्याच्या निरीक्षणाचे विषय बनले. आतापर्यंत सूर्यमालेबाहेरील शेकडो ग्रहताऱ्यांचा त्यानं अभ्यास केला आहे. पण आता तो पृथ्वीसदृश, म्हणजे जीवसृष्टी असलेल्या वा त्याची संभावना असलेल्या ग्रहाचा तो शोध घेतोय. यातूनच पृथ्वीचा सख्खा शेजारी मंगळ त्याला खुणवतोय. पृथ्वीशी त्याचे साधर्म्य आहे. रखरखीत-ओसाड मंगळ ग्रहावर तो मानवी वस्ती उभी करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. गेली 70 वर्षे मंगळाला जाणून घेण्यासाठी त्याचा झगडा सुरू आहे. पृथ्वीवरील मानवनिर्मित वातावरणीय बदलामुळे येथील जीवसृष्टी नष्ट होण्याची त्याला भीती वाटते. त्यासाठी तो पर्यायी घर शोधतोय. अन्य ग्रहांसमोरील अनंत अडथळे पाहता मंगळाशिवाय त्याच्यापुढे दुसरा पर्याय नाही.

अवकाश उड्डाण आणि अवकाश संशोधनात आघाडीवर असणारी महत्त्वाकांक्षी राष्ट्रे मंगळावर नजर ठेवून आहेत. या सर्वांनाच भविष्यात मंगळ आपल्या कब्जात हवा आहे. मानवी संस्कृती तिथं स्थापित करायची आहे. या स्पर्धेतूनच अवकाश तंत्रज्ञानाची लढाई सुरू आहे. अब्जावधी रुपये यावर लावले जाताहेत. या शतकातील अवकाशातील ही सर्वात मोठी स्पर्धा ठरेल. मंगळावर कॉलनी उभी करण्याच्या इराद्याने तर अब्जाधीश उद्योगपती आणि खासगी कंपन्या या मोहिमेत उतरल्या आहेत. मंगळावरून रिटर्न तिकीट नाही, प्रवासावरून माघारी येण्याची शक्‍यता नाही; तिथं जगण्याची शाश्‍वती नाही, याची जाणीव असूनही कंपन्यांनी वेबससाईटवरून मंगळावर जाण्याचा कार्यक्रम जाहीर करताच काही हजारो लोकांनी यासाठी अर्ज केले आहेत. मंगळावरील स्वारी यशस्वी होईल का? हा ग्रह आपल्यासाठी सुरक्षित आहे काय? तिथं घरं कशी असतील? पाणी? हवा? नैसर्गिक साधनसंपत्ती कुठून आणणार? असे अनंत प्रश्‍न असूनही पाच खासगी कंपन्या मंगळावर मानव पाठवण्याच्या इराद्याने झटत आहे. स्वत:च्या मालकीची रॉकेटस्‌ बनवताहेत. 

देशांतर्गत वाद, ताणलेले संबंध असूनही मंगळ मोहिमेच्या मुद्द्यावर मात्र जगभरातील तंत्रज्ञ संशोधक ठाम आहेत व हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पैशापासून ते तंत्रज्ञानापर्यंत एकमेकांना सहकार्य करण्यासही तयार आहेत. विसाव्या शतकात अमेरिका आणि रशिया या दोन प्रतिस्पर्ध्यांदरम्यान अवकाश कार्यक्रमावरून शीतयुद्ध पेटलं होतं. 1955 मध्ये अवकाशात कृत्रिम उपग्रह सोडायचं अमेरिकेनं जाहीर केल्यावर ही ठिणगी पडली. तथापि स्पुटनिक-1 या कृत्रिम उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण करून रशियानं अमेरिकेला चकवलं आणि पाठोपाठ अवकाशात युरी गॅगरिन हा अंतराळवीर पाठवून चकितच केलं. मात्र अमेरिकेनं 1969 मध्ये अपोलो-11 यान पाठवून नील आर्मस्ट्रॉंगच्या माध्यमातून चंद्रावर पहिले पाऊल ठेवत त्यावर कडी केली. रशियाची मोहीम अयशस्वी ठरली. रशियाच्या विभाजनानंतर हे अवकाशीय शीतयुद्ध थंडावलं आणि त्यानंतर उभय राष्ट्रांदरम्यान अवकाश उड्डाणाच्या सहकार्याचं नवीन पर्व सुरू झालं. त्यातून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची संकल्पनाही प्रत्यक्षात उतरली. मात्र आता ट्रम्प यांच्या निवडीनंतर आंतराष्ट्रीय राजकीय रंगमंचावरील संहितेची नव्याने फेररचना सुरू आहे; ट्रम्प त्याचे सूतोवाचही करताहेत. त्यातून आता ट्रम्प व पुतीन ही जोडगोळी अवकाश संशोधनाच्या निमित्ताने पुन्हा एका रंगमंचावर येतील का? हे देखील यानिमित्ताने पाहावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com