अबोल वेदना (उत्तम कांबळे)

अबोल वेदना (उत्तम कांबळे)

आपण वावरत असलेल्या जगापलीकडंही कितीतरी जग असतात. त्याच वेळी आपल्यात वावरत असणारं जग निराळंच! पण त्या दिवशी आपल्या भोवतालच्याच जगातलं; पण या जगापासून खूप दूर असणारं एक जग पाहायला मिळालं. वेगवेगळ्या कारणांनी कुठं कुठं वाहत वाहत जाऊन समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेलं... आणि पुन्हा या मुख्य प्रवाहात येऊ पाहणारं जग. या जगातल्या जिवांशी बोलायची संधी मिळाली...आणि वाटून गेलं, का आले असतील हे भोग यांच्या वाट्याला? हे साधे-भोळे जीव दैवाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडतीलही... पण किती काळ लागेल हे व्हायला?

खरंतर माणसातलं वेडेपण काढून टाकण्याचा प्रयत्न गेल्या ५०-५५ वर्षांपासून समर्पित भावनेनं करणाऱ्या या केंद्रासमोरून मी मोजता येणार नाही एवढ्या वेळा गेलो असेन. बऱ्याच वेळेला वाटायचं, की मुख्य प्रवाहात वेडं ठरलेलं किंवा ठरवलं गेलेलं जग एकदा आत जाऊन पाहावं...पण तसं कधी घडलं नाही. १४ जानेवारी २०१७ ला मिरजेत विजय कांबळे या रेडलाइट एरियात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भेटलो. काही वर्षांपूर्वी त्याला भेटायला गेलो होतो. आपल्या मुलांची नावं त्यानं ‘नैतिक’ आणि ‘वर्तन’ ठेवल्याचं ऐकून मला खूप उत्सुकता वाटली होती. आता त्याची दोन्ही मुलं खूप मोठी झालीयत... दोघंही इंग्लिश शाळेत जातात. पोरांच्या आणि बापाच्या डोळ्यांतही वेगळी स्वप्नं...त्यांच्या आईच्या डोळ्यांतही लेकरांविषयी असंच स्वप्न दिसत होतं...

मिरजेतून सांगलीच्या रस्त्याला लागलो. शांतिनिकेतनमध्ये थोडी विश्रांती घेऊन डॉ. मोहन पाटील यांच्यासोबत बितूरमध्ये व्याख्यानाला जायचं होतं. सगळं नियोजन मनातल्या मनात सुरू असतानाच गाडी माणसं शहाणी करणाऱ्या केंद्रासमोरून गेली. हे केंद्र पाहताच गाडीत माझ्याबरोबर असलेला प्रा. नितीन सावंत म्हणाला ः ‘‘सर, मी एकदा माझ्या नातेवाइकाला घेऊन इथं आलो होतो. आत फारच आगळंवेगळं वातावरण आहे.’’ त्याचा अनुभव ऐकताच माझंही मन तिकडं ओढ घेऊ लागलं. काही करून उद्या तिथं जाण्याचा निश्‍चय केला. पण जायचं कसं? मला ओळखणारं तिथं कुणी नव्हतं. परवानगी कशी काढायची? डॉ. नामदेव, डॉ. विजय आणि आमच्या शांतिनिकेतनचा एक माजी विद्यार्थी डॉ. अविनाश यांनी प्रयत्न करायला सुरवात केली.

सायंकाळपासून प्रयत्न सुरू झाले. दुसऱ्या दिवशी यश आलं. केंद्राच्या प्रमुख असलेल्या महिला डॉक्‍टरांनी संध्याकाळी चारला या केंद्रात येण्याची परवानगी दिली. खूप आनंद वाटला. माणूस मनोरुग्ण का होतो...? त्याचं नेमकं काय होतं...? शहाण्यांच्या दुनियेतून तो दुसऱ्या दुनियेत कसा जातो? आणि तिथून पुन्हा शहाण्यांच्या दुनियेत कसा येतो...? दुनिया शहाण्यांची आहे हे दुनियेतलं कोण आणि कशाच्या आधारावर ठरवत असतो...? खरंच आपण शहाणे आहोत, हे ठरवण्याचा अधिकार आपल्याबरोबरच जगणाऱ्या पशू-पक्ष्यांना, जिवांना दिला तर? चित्र-विचित्र आणि कवितेत शोभावेत, असे प्रश्‍न निर्माण होत होते. पोपटराव पवारांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम शांतिनिकेतनमध्ये सुरू झाला खरा; पण माझं मन मात्र भटकत भटकत तिकडंच ओढ घेत होतं...‘पुरस्कारवितरणानंतर मला लगेच समारंभाबाहेर पडण्याची परवानगी द्या,’ अशी विनंती मी डॉ. जयसिंगराव पवार आणि नवभारत शिक्षण संस्था प्रचंड आत्मविश्‍वासानं पुढं नेणाऱ्या गौतम पाटलांना केली. हा प्राचार्य पी. बी. पाटलांचा मोठा मुलगा आणि माझ्यासह अनेकांचा गुरुबंधू...दोघांनीही परवानगी दिली; पण ‘एवढं अर्जंट काय? कुठं जाणार?’ असा प्रश्‍नही विचारला. मी हसतच उत्तर दिलं ः ‘शहाण्यांच्या दुनियेतून वेड्यांच्या दुनियेत...’ ते क्षणभर चक्रावले. माझ्या भाषणानंतर लगेचच बाहेर पडलो. मस्तपैकी वालांच्या बियांची उसळ आणि भाकरी खाऊन मिरजेच्या रस्त्याला लागलो.

दुपारी साडेतीनच्या आसपासच केंद्राबाहेर थांबलो. आत शिरताच भिंतीवर उजव्या आणि डाव्या बाजूला मनाच्या हालचालींची माहिती देणारे फलक होते. मी वाचत वाचतच ‘यात आपण कुठं बसतो का,’ याचाही विचार करू लागलो. क्षणभर वाटलं, की बाहेरच्या अनेकांना ही माहिती लागू होत असावी. मी मनातल्या मनातच हसलो. वॉचमननं एका शिपायाला बोलावलं. त्यांनी किल्ली लावून आत शिरायच्या दरवाजाचं कुलूप काढलं. दोन नर्स, एक शिपाई, मी, नामदेव, त्याची बायको सोनिया, मुलगी अनुजा आणि नितीन सगळेच आत गेलो. आत सर्वत्र पसरलेली एक अनामिक, अबोल अशी शिस्त दिसत होती.

भेट पहिल्याची
पहिल्या मजल्यावर समोरच्या खोलीतून साठीतला एकजण पुढं आला. त्याच्याबरोबर आणखी एकजण होता. खोलीत अन्य दोघं आपापल्या बिछान्यावर झोपले होते. ते उठले. आम्हाला पाहिलं. पुन्हा झोपले; पण त्यांच्या चेहऱ्यावर आमच्याविषयी एक अदृश्‍य प्रश्‍न असावा. कुठून हे आले इथं... ? काल संध्याकाळी नव्हते...! ‘हे’च्या ठिकाणी मी स्वतःच ‘वेडे’ हा शब्द घालून टाकला. शेजारून एक उंच माणूस इंग्लिश-मराठीत जोरजोरात ओरडत आला. शिपायानं त्याला शांत व्हायला सांगितलं. गंमत म्हणजे आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणं तो शांत झालाही...मग हा समोरचा म्हणाला ः ‘‘थांबा, थांबा...तुम्हाला एक गाणं ऐकवतो...आम्ही हो-ना करण्यापूर्वीच त्यानं गायला सुरवात केली.’’ म्हणालो ः ‘‘थांब दादा, मी लिहून घेतोय...’’ तो गाऊ लागला...
दुनिया में कहाँ सार है...
धन, माया के पीछे
क्‍यूं बहाते नीर

गाण मध्येच थांबवून तो म्हणाला ः ‘‘गुरू देवराज यांची ही रचना आहे. माणसाचा स्वार्थ, त्याच्या भावना यावर ती प्रकाश टाकते.’’ ते जाऊ द्या, माझीच रचना ऐका ः-
जो करेल काम आणि म्हणेल राम
त्याला सतावणार नाही काम
जो म्हणेल सर्वांना राम राम
त्याला क्षणात मिळेल आराम

मी त्याच्या रचनांचं कौतुक करत असतानाच तो म्हणाला ः ‘‘हा माझ्याजवळ उभा आहे ना, त्याला मी ‘राम राम’ शिकवलं आहे आणि माझं विचाराल तर मी स्वतः नाही आलो इथं... परिस्थितीनं आणलंय...’’

भेट दुसऱ्या-तिसऱ्याची
चालच चालतच दुसऱ्या खोलीसमोर पोचलो. तिथंही दोघं-तिघं पुढं आले. बघता बघता लक्षात आलं, की बहुतेक खोल्यांमधले मनोरुग्ण बाहेर येत आहेत आणि आपल्यात सहभागी होण्यासाठी, आपल्याप्रमाणे शहाणे होण्यासाठी तर हे बाहेरचे इथं येत नाहीत ना, अशी एक वळवणारी शंका त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
आपण नेमकं कधी इथं आलो आणि आपलं नेमकं काय काय झालं, हे त्यानं अंदाजानंच सांगितलं. त्यानं वय इंग्लिशमध्ये सांगितलं. फिफ्टी थ्री...आणि संस्थेतल्या वास्तव्याचा काळ असेल २०-२५ वर्षं.

या दुसऱ्याजवळच एक १८ वर्षांचा युवा तरुण भेटला. वर्गात अगदी करेक्‍ट उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाण तो म्हणाला ः ‘‘माझा खूप हट्टी स्वभाव होता...कायपण हट्ट करायचो...कळत नव्हतं असं का होतंय... ५० दिवस इथं राहिलोय...स्वभाव बदललाय...शहाणा झालोय... घरी जाईन आता लवकर...’’
चौथा एकजण माहिती तंत्रज्ञानात अभियंता झालेला...अगदी तरुण. त्याला स्वतःलाच कळलं, की आपल्याला मानसिक विकार झालाय. नेमकं काय, हे त्याला कळत नव्हतं. पालकांच्या मदतीनं तो खुलेआम इथं दाखल झाला...‘इम्प्रूव्हमेंट आहे सर’, असं हसत हसत म्हणाला.
आणखी एक तरुण...अपघातात त्याच्या डोक्‍याला म्हणजे खरंतर मेंदूला धक्का बसलेला.
‘सर, काही केलं तरी वाचलेलं लक्षात राहत नव्हतं. थर्ड सेमिस्टरला पेपरातली सगळी पानं कोरी सोडून बाहेर पडलो. इथं आलोय...’ त्याच्या बोलण्यावरूनच तो आता विस्मरणाच्या दुनियेतून स्मरणाच्या दुनियेत आला आहे, याची खात्री वाटत होती. तोही डिस्चार्जच्या तयारीत...

हा सहावा डॉक्‍टर ः
याचं ऐकून तर आश्‍चर्यच वाटलं. अतिशय शुद्ध मराठीत तो बोलत होता. हा स्वतः आयुर्वेदातला डॉक्‍टर. एका मोठ्या डॉक्‍टरकडं नोकरीही केलेली; पण याला झोप लागायचं बंद झालं... रात्र रात्रभर जागाच राहायचा...आपण झोपण्याऐवजी काहीतरी सतत करत राहतोय, असं त्याला वाटायचं...खरंतर याला क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांचाही सहवास लाभलेला. हायस्कूलमध्ये असताना तो इंग्लिशमध्ये भाषण करायचा...डॉ. आंबेडकर यांच्यावर केलेलं भाषण त्यानं थोडक्‍यात ऐकवलं...सगळ्यात आश्‍चर्य म्हणजे, मला धक्का बसावा, अशी एक गोष्ट त्यानं सांगितली. ती म्हणजे, नागनाथअण्णा आणि आईवर लिहिलेली माझी दोन पुस्तकं त्यांनी कॉलेजजीवनात वाचलेली...मी त्याला सहजच म्हणालो ः ‘‘झोप आली नाही की माणूस मनोरुग्ण होतो का? मलाही झोप येत नाही...’’

तो हसत म्हणाला ः ‘‘तुम्ही बाहेरच राहायचं आणि इथं आम्हाला भेटायला यायचं...’’
या डॉक्‍टरशी बोलणं सुरू असतानाच आणखी एक तरुण जवळ आला. तो कोल्हापूरच्या अगदी जवळ राहणारा. तो म्हणाला ः ‘‘सर, मी तुमची तीन भाषणं ऐकली आहेत. कुठं आणि कधी मला नेमकं आठवत नाही; पण विश्‍वास ठेवा, मी ऐकली आहेत...’’

का कुणास ठाऊक या छोट्या जिवाविषयी माझ्या मनात करुणा जागी झाली. गहिवरून आल्यासारखं वाटायला लागलं. थोडा ताण वाढला. तो कमी व्हावा म्हणून पुणेरी पद्धतीचा एक विनोद करून मी स्वतःच हसलो. बाकी कुणीच हसलं नाही. असं काही घडलं तर पुण्यात याला विनोद घडला म्हणतात. माझ्या विनोदामुळे माझाच ताण कमी झाला. मी त्याला म्हणालो होतो, की ‘भाऊ, माझं भाषण ऐकलं, असं यापुढं कुणाला सांगू नको!’

...आणि हा सातवा
एकेक खोली आणि मजले चालत पुन्हा आम्ही पहिल्या मजल्यावर आलो. तिथं एक तरुण भेटला. केंद्रानं दिलेला वेश त्याच्या अंगावर होता. एकदम सहज आणि भारी इंग्लिश तो बोलत होता. आपण त्याला ब्रिटिश-इंग्लिश म्हणू शकतो. समोर येताच त्यानं आपलं नाव, गाव, शिक्षण सांगितलं. कोणत्या साली कोणतं शिक्षण घेतलं, हेही तारीख, साल यांसह सांगितलं. विशेष म्हणजे, तो या केंद्रात २०-२५ वर्षांपासून आहे. एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शेवटच्या पेपरात दोन-तीन मार्क कमी पडल्यामुळं तो नापास झाला. थेट इथं आला. इथल्या वैद्यकीय रचनेत तो थोडंफार काम करतो. स्वतःचा परिचय डॉक्‍टर असाच करून देतो...मनात एक सहजच प्रश्‍न आला आणि तो म्हणजे, हा नापास झाला नसता आणि त्याच अवस्थेत सगळ्यांनी त्याला स्वीकारून पुन्हा लढण्यासाठी प्रेरणा दिली असती तर...? खरंतर या प्रश्‍नांना व्यवस्थेशी काही देणं-घेणं नसतं...कारण, व्यवस्था शहाणी असते आणि वेडे तयार करते...याबाबतचं पेटंट तिच्याकडंच असतं...‘वेडेपणा हा शहाणपणाचा प्रारंभबिंदू असतो,’ हे ताओवादातलं आणि ओशोवादातलं वाक्‍य तिला ठाऊक नसतं...

...आणि या साऱ्या जणी
महिलादालनात प्रवेश करताच एकजण पुढं आली आणि म्हणाली ः ‘‘माझं आईवरचं एक गाणं ऐका...’’ म्हणालो ः ‘‘इथंच थांब परतताना ऐकतो...’’ दोन-चार पावलं पुढं गेलो. कायद्याची भली मोठी पदवी असलेली एक भगिनी भेटली. ती एका मोठ्या कंपनीत सॉलिसिटर म्हणून काम करत होती. दुसरी एकजण प्राध्यापक म्हणून बरीच वर्षं काम केलेली. तिसरी बरीच वर्षं लग्न न झालेली, तर आणखी एकजण उच्चविद्याविभूषित होती. सगळ्याच जणी भळभळणाऱ्या वेदनांसारख्या वाटत होत्या. त्यांना कळत नव्हतं. प्रवास कुठून सुरू झाला, किती चालणार तो आणि मुक्कामाचं ठिकाण कोणतं? आणि हो, या ठिकाणावर शहाणपणाचा शिक्का घेऊन कुणी उभं असंल का?
ठरल्याप्रमाणं मागं वळून आईवरच गाणं म्हणू पाहणाऱ्या त्या भगिनीजवळ आलो. एक घोळका होता. काहीतरी सांगावं म्हणून बऱ्याच जणींचे ओठ थरथरत होते; पण हिनं मोठा आवाज काढून सगळ्यांना गप्प केलं. थंडीमुळं बसलेल्या आवाजातच ती म्हणाली ः ‘‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना...’ मग लगेच चूक दुरुस्त करत म्हणाली ः-
आई तुझे उपकार, ध्यानात येई
ऋण तुझे या जन्मी फिटणार नाही
पाळणा हाताचा, दीप नयनांचा
गोड घास घालुनि मला वाढवली...

हिचं गाणं सुरू असताना दुसरी एक जया आग्रहानं पुढं येत म्हणाली ः ‘‘सर, मैं भी गाती हूँ...’’ आणि तिनं लगेचच सूर लावला.
यह तो भगवान है
मगर अनजान है
ममता के रूप में वरदान है...

पहिली या दुसरीवर खूप रागावली. ‘मलाच गाणं म्हणायचं होतं,’ दोघींमध्ये भांडण सुरू झालं. तिसरी पुढं आली आणि म्हणाली ः ‘‘सर, तुमची जन्मतारीख काय?’’ लगेचच म्हणालो ः ‘‘३१ मे...’’ ती लगेच म्हणाली ः ‘‘या वर्षी ३१ मे रोजी गुरुवार येणार आहे. १५ ऑगस्टला गोपाळकाला. २६ ला हरतालिका आहे.’’ खूपच आश्‍चर्य वाटलं. कारण, यंदा ३१ मे रोजी बुधवारच होता. तारखेवरून तिनं वार सांगितला होता...

आता हा शेवटचा प्रश्‍न होता - ‘हे सगळे वेडे कसे झाले?’ आणि त्यांना मूळ प्रवाहात नेण्यासाठी हे केंद्र किती कष्ट घेत असेल... रुग्णांच्या शारीरिक जखमा साफ करणं, टाके घालणं आणि ते उसवणं खूप सोपं असतं; पण मनाशी खेळणं, तिथल्या जखमा शोधणं आणि त्या सुखवणं खूपच कठीण...मन, जखम आणि व्हाया व्यवस्था, असा एक लांब प्रवास करत हे केंद्र इथपर्यंत पोचलंय... ‘तुम्ही लेख लिहिणार असाल तर रुग्णाचं नाव-गाव देऊ नका,’ असा सल्ला केंद्राच्या संचालक डॉक्‍टरांनी दिला. ‘केंद्राचंही नाव टाकू नका,’ असं त्या म्हणाल्या. शेवटी मी त्यांना खात्री दिली ः ‘‘माझा उद्देश वेड्यांचं वर्णन करणं हा नाहीय. कारण, प्रत्येकातच एक वेडा लपलेला असतो. नव्या जगात प्रचंड गतिमान, प्रचंड अस्थिर होऊन कधी वस्तूमागं, तर कधी स्वतःमागंच धावणारा समाज आणि त्यातून जन्माला आलेला एक घटक मला सांगायचा आहे. शेवटी देबसिकदार मॅडम ‘‘हो’’ म्हणाल्या आणि मग मी संस्थेचं नाव लिहिलं ‘कृपामयी’- इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ, मिरज... लेख संपला... तरी मनोरुग्णांनी रेखाटलेली चित्रं सारखी आठवत होती. पाण्याचा वापर कसा करायचा, झाडं कशी लावायची आणि जग सुंदर कसं करायचं, याचाही संदेश ती देत होती... डोकं काम देत नव्हतं आणि कोण कसला संदेश देतंय तेही कळतही नव्हतं. डॉ. सुमित्रा देबसिकदार (९८२३१७९२५९)आणि त्यांचा डॉ. पुत्र आशिष देबसिकदार यांना मात्र तो कळत असावा. त्यांच्या तीन पिढ्या या भळभळणाऱ्या; पण अबोल जखमांवर फुंकर घालत आहेत... या जखमांना पुन्हा मेन स्ट्रीममध्ये सोडत आहेत... असो. वेडे जन्माला घालणारं शहाणं मेन स्ट्रीम...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com