मळ्याकडं धावताहेत गावं (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 14 मे 2017

नाशिक जिल्ह्यातलं शिंदवड हे गाव मळ्याकडं धाव घेतंय. गावातली बहुतेक जुनी घरं बंद...काही काळाच्या ओघात कोसळलेली... अनेक वर्षं आपलं शरीर टिकवून धरणाऱ्या घरांचे अवयव विखुरल्यासारखे...घरांचे अनेक ढिगारे झालेले...त्यावर गवत उगवलेलं...अशी एकंदर स्थिती. असं होण्याचं कारण काय, तर गाव बागायती झाल्यावर बहुतेक शेतकरी गाव सोडून मळ्यात राहायला गेले हे. मळ्यात राहून शेती मस्तपैकी करता येते, असा त्यामागचा विचार. अशी स्थिती असणारं एकटं शिंदवड हेच गाव आहे, असं नाही.

नाशिक जिल्ह्यातलं शिंदवड हे गाव मळ्याकडं धाव घेतंय. गावातली बहुतेक जुनी घरं बंद...काही काळाच्या ओघात कोसळलेली... अनेक वर्षं आपलं शरीर टिकवून धरणाऱ्या घरांचे अवयव विखुरल्यासारखे...घरांचे अनेक ढिगारे झालेले...त्यावर गवत उगवलेलं...अशी एकंदर स्थिती. असं होण्याचं कारण काय, तर गाव बागायती झाल्यावर बहुतेक शेतकरी गाव सोडून मळ्यात राहायला गेले हे. मळ्यात राहून शेती मस्तपैकी करता येते, असा त्यामागचा विचार. अशी स्थिती असणारं एकटं शिंदवड हेच गाव आहे, असं नाही. स्वेच्छेनं आणि आनंदानं स्थलांतरित होणारी महाराष्ट्रात अशी असंख्य गावं आढळतील...मळ्याकडं धावणाऱ्या गावांचे दीर्घकालीन परिणाम काय, हे मात्र लगेचच सांगता येणार नाही.

कोण्या एके काळी शिंदीच्या आणि वडाच्या झाडांनी वेढलेल्या गावाला शिंदवड असं नाव पडलंय. शिंदवड हे गाव नाशिकपासून पन्नासेक किलोमीटरवर निफाड, चांदवड या तालुक्‍यांच्या सीमेवरचं. स्वतः मात्र दिंडोरी तालुक्‍यातलं. या गावाच्या आसपास अनेकदा गेलो होतो. पलीकडं इंदोऱ्यालाही गेलो होतो. बेनझीर भुट्टोंच्या आजोबांचं गाव, असं कुणीतरी मला सांगितलं होतं. दोन्ही बाजूंना बऱ्यापैकी उंच टेकड्या, बाजूनं धरणाच्या दोन चाऱ्या शिंदवडला समृद्धीचं वरदान देऊन गेलेल्या. गाव आता बऱ्यापैकी बागायती आणि त्यातून अर्थातच सधन झालंय. द्राक्ष, डाळिंब, भाज्या आणि अजून काय काय नगदी पिकं तिथं होतात. गावाच्या हातात पैसा खुळखुळतोय. त्याचा आवाज पार नाशिकपर्यंत ऐकू येतोय. शिक्षणाचं आणि त्यातही उच्च शिक्षणाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलंय. या भागात जीवनेश्‍वर काळूबाबा नावाचे कुणी सत्पुरुष होऊन गेले. ते सत्पुरुष म्हणून लौकिक पावले, ते एवढ्या एका मोठ्या कारणासाठी, की ते सांगतील त्या ठिकाणी विहिरींना पाणी लागायचं. शिंदवडमध्ये अशा अनेक विहिरी त्यांच्या सांगण्यावरून घेतल्या गेल्या. आजही त्यांना बऱ्यापैकी पाणी असतं. त्यावर द्राक्षाच्या बागा डुलतात. अनेक ठिकाणी शेततळी उभी राहिली आहेत. पन्नास-पन्नास हजार लिटर पाणी घेऊन ती तग धरून राहतात. काहींनी नैसर्गिक, तर काहींनी कृत्रिम तळी तयार केली आहेत. गावात चारचाकी, दुचाकी यांची काही कमतरता नाही. मोबाईल न बाळगणारा माणूस दुर्मिळ समजावा लागेल. गावाचं अर्थकारण, समाजकारण आणि हो राजकारणही, बदलून गेलंय. तालुक्‍यात जे काही राजकारण होतं ते जोरदारच. तालुका बऱ्यापैकी आदिवासी असल्यामुळं ‘ओपन’मध्ये खेळणाऱ्यांना मर्यादा येतात. शेजारचा निफाड तालुका तर राजकारणासाठी प्रसिद्धच आहे. दर दहा लोकांमागं एक छोटा किंवा मोठा नेता तिथं असेल.

...एवढं नमन एवढ्यासाठी केलं, की शिंदवड या आपल्या गावाचं ऋण फेडावं, या विचारानं ज्येष्ठ वकील भास्करराव पवार यांनी स्वखर्चातून इथं वाचनालय स्थापन करायचं ठरवलं. अतिसुबत्तेमुळं चंगळवादाकडं आणि काही प्रमाणात विकृतीकडं झुकणाऱ्या अनेक गावांना ग्रंथालयं संस्कृतीकडं खेचू शकतात. विशेषतः तरुण पिढीला ती घडवू शकतात, याची खात्री झाल्यानं त्यांनी वाचनालय सुरू करायचं ठरवलं. त्याला नाव दिलं ‘जीवनेश्‍वर काळूबाबा वाचनालय, शिंदवड.’ जीवनेश्‍वर म्हणजे जल, पाणी उपलब्ध करून देणारा. एकेकाळी कपाळावर दुष्काळाचा शिक्का कोरून जगणाऱ्या या गावाला काळूबाबांच्या शहाणपणाची खूपच मदत झाली. या गावात बहुतेक जण माळकरी आहेत. मांसाहार सहसा कुणी करत नाही. असो. शहरात जाऊन गावाकडं परतायला सहसा कुणी तयार होत नाही. मुंबईतला कोकणी माणूस मात्र मुंबईत राहून गावाच्या विकासाच्या कल्पना राबवतो. गावाकडं वारंवार जातो. इतरत्र असं खूप मोठ्या प्रमाणात जाणवत नाही. सध्या ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत आणि नंतर स्वतःच्या जागेत वाचनालय विकसित करण्याचा ॲड. पवार यांचा विचार आहे.
कार्यक्रमाआधी गावात एक चक्कर मारली. मुठीत मावू शकेल अशा या सगळ्या गावाला चक्कर मारताना वेळ लागला नाही. चक्कर मारताना एक दृश्‍य दिसलं आणि मन थोडं हळहळलं. बहुतेक जुनी घरं बंद होती. काही काळाच्या ओघात कोसळली होती. अनेक वर्षं आपलं शरीर टिकवून धरणाऱ्या घरांचे अवयव विखुरल्यासारखे वाटत होते. घरांचे अनेक ढिगारे झाले होते. त्यावर गवत उगवलं होतं. झुडपं उगवली होती. गावाला फेरा मारल्यानंतर ॲड. पवार यांना पहिला प्रश्‍न विचारला ः ‘गावाचं हे असं का झालंय? गाव कोसळतंय का? आणि बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असूनही गावाला ठिकठिकाणी तडे का गेले आहेत?’

ॲड. पवारांनी दिलेली माहिती मोठी मजेशीर होती. गाव बागायती झाल्यावर बहुतेक शेतकरी गाव सोडून मळ्यात राहायला गेले. तिथं काहींनी बंगले बांधले. काहींनी मोठी घरं बांधली. गावात राहून आता दूरवरची शेती करता येत नाही. बागायती शेतीवर सतत नजर ठेवावी लागते. त्यातच मजुरांची कमतरता आहे. पूर्वी मळ्यात मजूर राहायचे. ते शेतकऱ्यांची शेती कसायचे. आता असं घडत नाही. अनेकांनी गाव सोडणं पसंत केलं. मळ्यात ठिकठिकाणी घरं उभी राहू लागली; पण त्यांना गावासारखं स्वरूप नाही. अंतराअंतरावर ती उभी आहेत. एका शेतात तीन भाऊ असतील, तर तीन ठिकाणी त्यांची घरं उभी राहिली. घरं चांगली, पक्की, आधुनिक असली, तरी समूहजीवन आणि गावपण ती गमावून बसली. गावात आता राहायला कुणीच तयार नाही. त्यामुळं गावाच्या विकासाच्या कल्पनाही मागं पडल्या. रात्री-अपरात्री आणि दिवसाही गावात खूप कमी माणसं दिसतात. ज्यांना शेती नाही, जे केवळ मजूर आहेत, ते गावात राहतात. शेतावर काम करून मागं परततात आणि जमिनीला चिकटलेली म्हातारीकोतारी वगळता गावात कोण राहणार आता?

- फक्त शिंदवडमध्येच असं घडतंय, असं कुणी समजायचं कारण नाही. महाराष्ट्रात अनेक गावं मळ्यात स्थलांतरित झाली आहेत. विखुरलेल्या घरांमुळं गाव डोळ्यात मावत नाही. गावानं स्थलांतर करण्यामध्ये काही नवं नाही. अनेक दुष्काळी गावं काही महिन्यांकरिता रोजगारासाठी शहरातल्या फुटपाथवर बसतात. पुन्हा मागं वळतात. प्रकल्पग्रस्तांचं असंच होतं. कधी अन्य कोणत्या ना कोणत्या कारणासाठी गाव धावतं. डुलत बाहेर पडणारी गावंही काही कमी नाहीत. आता त्यांचा प्रवास शेताकडं-मळ्याकडं सुरू आहे. म्हणजे दोन-दोन गावं तयार होताहेत. एक जुन्या ठिकाणी राहणारं आणि दुसरं मळ्याच्या वाटेला लागणारं...मळ्यात राहून शेती मस्तपैकी करता येते; पण नागरी सोई-सुविधा गावाप्रमाणे मिळवता येत नाहीत. तुकड्यातुकड्यासाठी स्वतंत्रपणे सुविधा तयार करता येत नाहीत; पण काहीही असो; स्वेच्छेनं आणि आनंदानं हे स्थलांतर होत आहे.

-महात्मा गांधी म्हणाले होते ः ‘शहरं सोडून गावाकडं चला.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ः ‘गावं सोडून शहराकडं चला’
आणि सध्याची रीत आहे ः  ‘गावं सोडून मळ्याकडं चला...!’
उत्पादनाची साधनं, विकासाची साधनं माणसालाच नव्हे, तर त्याच्या गावाला कुठं नेतील, हे काही सांगता येत नाही. -मळ्याकडं धावणाऱ्या गावांचे दीर्घकालीन परिणाम काय, यावर चटकन भाष्य करता येणार नाही, अशी स्थिती आहे.

Web Title: uttam kamble's article in saptarang