ससेक्सच्या सात बहिणींचं गूढ

इंग्लंडमध्ये एकमेकांजवळ दाटीवाटीने उभ्या ठाकलेल्या सात टेकड्यांना स्थानिक लोक ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणतात.
england seven sisters
england seven sisterssakal

- वैभव वाळुंज

इंग्लंडमध्ये एकमेकांजवळ दाटीवाटीने उभ्या ठाकलेल्या सात टेकड्यांना स्थानिक लोक ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणतात. अलीकडे वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम या टेकड्यांवर झाला आहे. त्यासाठी येथील फुलांचं व झाडांचं संरक्षण करून ‘सेव्हन सिस्टर्स’चे गूढ अबाधित ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहेत. हे गूढ नक्की काय, ते जाणून घेऊ या.

एखादं नैसर्गिक गूढ असलेल्या भागात जाण्यासाठी सहसा सरकार मज्जाव करताना आढळते. मात्र अशा एका गूढ ठिकाणी लोकांनी जात राहावं म्हणून सरकार प्रयत्नशील आहे असं सांगितलं तर? भारतातील उत्तर पूर्वेकडील सात राज्यांना ‘सेव्हन सिस्टर्स’ अर्थात ‘सात बहिणी’ असे संबोधले जाते.

‘कृतिका’ या नक्षत्राच्या सात चांदण्यांवरून आलेलं हे ग्रीक नाव भारतीयांसाठी एक प्रशासकीय व भौगोलिक परवलीचा शब्द बनलं आहे; पण इंग्लंडमध्ये मात्र ‘सेव्हन सिस्टर्स’ या नावाची एक निराळी भौगोलिक रचना दृष्टीस पडते.

इंग्लंडच्या दक्षिणेकडील भागात ‘साऊथ डाऊंस’ हे राष्ट्रीय अभयारण्य आहे. या अभयारण्याच्या आधी-मध्ये अनेक लहान-लहान गावं वसलेली आहेत. या गावांना व समुद्राला जोडणारी टेकड्यांची एक मालिका तसेच प्रांताच्या दक्षिण तटावर उभी आहे. एकमेकांजवळ दाटीवाटीने उभ्या ठाकलेल्या या सात टेकड्यांना स्थानिक लोक ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून संबोधतात. त्यांना टेकड्या जरी म्हटलं जात असलं तरी हा एकूण परिसर २८० हेक्टरमध्ये पसरला आहे.

विशेष म्हणजे या भागातील खडक हा जिप्सम व चुन्यापासून बनलेला असल्याने सभोवती सगळीकडे खडू पसरले असल्याचा भास होतो. अशा पद्धतीचे किनारे युरोपमध्ये दुर्मिळ असल्यानं फ्रान्समधून आलेल्या सॅक्सन लोकांनी याभोवती अनेक मिथके व कोड्यांचं जाळं विणलं होतं.

हा किनारा अवैध व्यापार करणाऱ्या व युरोपातून आक्रमण करणाऱ्या टोळ्यांसाठी कुप्रसिद्ध होता. म्हणून या भागात नेहमीच संशयास्पद हालचाली होत असत. लख्ख उन्हाच्या दिवशी यातील पांढरे खडक चकाकताना दिसत. त्यामुळे या टेकड्यांवर दैवी शक्ती राहत असावी, असा लोकांचा कयास होता. म्हणूनच या भागाला ‘सेव्हन सिस्टर्स’ अशी नावं देण्यात आली, तर येथील प्रत्येक टेकडीलाही वेगवेगळं नाव देण्यात आलं. हेवेनब्रोव, शॉर्टब्रोव, रफ ब्रोव, ब्रासपॉइंट, फ्लॅगशाफब्रोव, फ्लॅटहील आणि बेलीची टेकडी अशी अजब नावे आहेत.

एरवी ब्रिटिश इतिहासकारांनी आपल्या इतिहासाची खडान्‌खडा माहिती नोंदवून ठेवली असली तरीही नावे नेमकी कुठून आली व लोकांमध्ये कशी प्रचलित झाली, याविषयी अद्यापही गूढ कायम आहे. त्यातही ‘मूर्खांच्या सोन्या’ने या भागाला वेगळीच प्रसिद्धी देऊ केली आहे.

या किनाऱ्यावर चालताना अनेकदा सोन्यासारखा चकाकणारा पदार्थ पायाशी दिसतो. अनेकदा हा धातू इतका लख्ख असतो की दगड फोडल्यानंतर आत सोनेच असल्याचा भास होतो. अनेक लोक येथे येऊन हा दगड घेत व त्यापासून नफा कमावण्याचा विचार करत तो घरी घेऊन जात. मात्र तोपर्यंत त्यातील सोने नाहीसे झालेले असे.

खरंतर पायराईट नावाचा दगड येथे मोठ्या प्रमाणात आढळतो. रासायनिक अभिक्रियेमुळे तो चुन्यासोबत मिसळल्यानंतर कधी-कधी सोन्याचा आभास देतो, मात्र हवेच्या संपर्कात आल्यानंतर लगेचंच त्याचे ऑक्सिडीकरण होऊन त्याचा रंग काळा पडतो. म्हणूनच या खडकाला ‘मूर्खांचे सोने’ असे संबोधले जाते.

अनेक पर्यटक संस्मरणाखातर येथील खडक सोबत नेतात. या भागात शेरलॉक होम्स, हॅरी पॉटर अशा प्रसिद्ध इंग्रजी चित्रपटांसोबतच अनेक बॉलीवूड चित्रपटांचेही चित्रीकरण झाले आहे. चित्रपटांनंतर येथे पर्यटकांचा ओढा वाढल्याचे येथील स्थानिक लोक सांगतात. 

चार्ल्स याच्या राज्याभिषेकानंतर या भागाला ‘किंग चार्ल्स तृतीय इंग्लंड कोस्ट पाथ’ असं नाव देण्यात आलं आहे. २० सप्टेंबरला हा मार्ग सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. इंग्लंडच्या किनाऱ्यावर असणारा हा सर्वाधिक लांबीचा मार्ग असेल.

यानिमित्ताने अनेक आठवडे येथील ‘सेव्हन सिस्टर्स’ टेकड्यांवर पारंपरिक व्यवसाय, सण व कलाकुसर यांच्यावर आधारित विविध कार्यक्रमांचं व मेजवान्यानंचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्षाच्या ठराविक दिवशी येथे जाणाऱ्या बस व आघाडीच्या फेऱ्या लोकांसाठी मोफत खुल्या करण्यात येतात. यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीकडून स्थानिक नागरिकांच्या सहभागासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत.

नजीकच्या काळात वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम या टेकड्यांवर होऊन अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. प्रदूषण व मातीची धूप होऊन अनेक टेकड्यांना धोका निर्माण झाला आहे. येथील फुलांचं व झाडांचं संरक्षण व्हावं यासाठी स्थानिक पद्धतीने हाताने गवत कापणं असो की लहान मुलांकडून येथील इतिहासाचा संवर्धन करणे असो, स्थानिक प्रशासनाकडून ‘सेव्हन सिस्टर्स’चे हे गूढ अबाधित ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहेत.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com