ब्रिटनमधील जातीवास्तव

इंग्लंडमध्ये गेल्यानंतर तिथे भारतीय हीच ओळख मोठी ठरत असेल आणि बाकीच्या लहान-मोठ्या ओळखी मागे पडत असतील, असा बहुतेकांचा समज असतो.
Caste Reality in Britain england
Caste Reality in Britain englandsakal

- वैभव वाळुंज

इंग्लंडमध्ये गेल्यानंतर तिथे भारतीय हीच ओळख मोठी ठरत असेल आणि बाकीच्या लहान-मोठ्या ओळखी मागे पडत असतील, असा बहुतेकांचा समज असतो. पण भारतीयांच्या प्रचंड संख्येने होणाऱ्या स्थलांतरामुळे लंडनमधील अनेक ठिकाणांमध्ये, तसेच इंग्लंडमधील इतर शहरांमध्येही फक्त भारतीय रंगरूपाच्या अनेक वस्त्या, गावे आणि उपनगरे तयार झाली आहेत.

‘जेव्हा मी एका जपानी कंपनीसाठी ब्रिटनमध्ये आयटी क्षेत्रामध्ये नोकरी करत होतो. कित्येक वर्षांच्या उच्चपदस्थ ठिकाणी काम करण्याच्या अनुभवानंतर अनेक भारतीय गोष्टी मागे ठेवून आलो होतो. तेव्हा अचानक एक दिवस माझ्यासोबत काम करणाऱ्या एका भारतीय महिलेनं मला माझी जात विचारली.

अचानक आलेल्या या प्रश्नामुळे मी गडबडलो, पण त्यानंतर मी तिला माझी दलित पार्श्वभूमी सांगून मला त्याचा अभिमान आहे, असं उत्तर दिलं. यावर तिने कंपनीमध्ये माझ्याविषयी मी अस्पृश्य असल्याची आणि इतर विविध प्रकारची माहिती कानोकानी पसरवली. तिने माझ्या सहकाऱ्यांच्या मनात याविषयी बरेचसे गैरसमज पसरवून दिले.

इतर देशातून आलेल्या माझ्या सहकाऱ्यांना याविषयी नेमकी माहिती नसल्याने माझ्याविषयी पूर्वग्रह तयार झाले. यातून मला प्रचंड त्रास झाला व मला कुणीतरी मी दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे, असं जाणवून दिलं. इतकी वर्षे बाहेर राहिल्यानंतरही जातीने माझा पिच्छा सोडला नव्हता, ती पाठलाग करत करत माझ्या मागे आली.’

ब्रिटनमध्ये काम करणारे व इंग्लंडमध्ये असणाऱ्या एकूण जातीय भेदभावाविषयी जागृती पसरवणाऱ्या विविध संस्थांना मदत करणारे क्रियाशील कार्यकर्ते व सॉफ्टवेअरतज्ज्ञ राम धारीवाल यांनी इंग्लंडमध्ये सभांमध्ये, बैठकांतून, संसदेत आपला हा अनुभव सांगितला होता.

त्यांच्या तोंडून हा अनुभव ऐकताना जात किती किचकट समस्या निर्माण करू शकते आणि भारतीयांच्या पाठोपाठ ती इंग्लंडमध्येही आपले पाय किती खोलात रोवून बसली आहे याचा मला प्रत्यय आला. जातीला आतापर्यंत फक्त भारताच्या किंवा किमान दक्षिण आशियाई संदर्भात पाहण्याच्या सवयीमुळे ही बाब माझ्यासाठीही आश्चर्यकारक होती.

अशा कित्येक घटना इंग्लंडमध्ये राहणाऱ्या जवळपास १५ ते २० लाख भारतीयांच्या, तसेच भारतीय उपखंडामधून इंग्लंडमध्ये आलेल्या विविध लोकांच्या आयुष्यात घडत असतात. स्वतः धारीवाल यांनी हे अनुभव मांडताना, माझ्या कुटुंबाचा व विविध देशांतील जातीविरोधी संघटनेच्या मित्रमंडळींचा पाठिंबा नसता तर मी कदाचित आपला अनुभव सांगू शकलो नसतो, हेही विशेषत्वाने सांगितलं.

दरवर्षी इंग्लंडमध्ये शिकायला येणाऱ्या लाखो भारतीय विद्यार्थ्यांचाही या पेचामध्ये आपसूक समावेश असतो. विमानात बसल्यानंतर जात फक्त भारतात राहत नाही. एका वेगळ्या देशात आल्यानंतर अंतःस्तरात जातीची उतरंड सोबत घेऊन भारतीय स्थलांतर करतात. त्यामुळे अनेकदा जग हे जागतिक खेडं बनलं तरीही त्या खेड्यांमधील विविध उतरंडी या भारतातील एखाद्या खेड्यामधूनच निर्यात केलेल्या आणि तशाच कायम केलेल्या दिसतात.

‘जर भारतीय जगाच्या सर्व कोपऱ्यामध्ये गेले तर जात ही भारतीय समस्या राहणार नाही तर ती आंतरराष्ट्रीय समस्या बनेल’ ही बाबासाहेबांनी वर्तवलेली भविष्यवाणी इंग्लंडमधील जातीयतेचे अनुभव पाहिल्यानंतर तंतोतंत खरी ठरल्याचं दिसतं.

पश्चिम युरोपातील एक देश म्हणून इंग्लंडमध्ये विविध प्रकारच्या भेदभावांना आळा घालण्यात आला आहे, मात्र विविध देशांमधील असणारे भेद परदेशी गेल्यानंतर कायद्याच्या लेखी मान्य होत नाहीत. ब्रिटिश लोकांची मुख्य ओळख आणि गरज नसलेल्या अनेक प्रकारच्या भेदभावांना नजरेआड केलं जातं.

आफ्रिकेतून, चीन तसेच जपानमधून आलेल्या अनेक लोकांना आपापल्या देशातील विविध प्रकारच्या भेदभावांना मांडण्यासाठी इंग्लंड एक पार्श्वभूमी तयार करून देतं, मात्र आपल्या भूमीवर ते नाकारण्यासाठी इथे फारशा तरतुदी नाहीत. मात्र यामुळे इंग्लंडमधील जातीवास्तव लपत नाही. एकेकाळी ब्रिटिश खानेसुमारीमुळे तसेच ब्रिटिश भारतातील तत्कालीन सरकारच्या दिरंगाईपूर्ण धोरणांमुळे भारतामध्ये जातीच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केलं.

स्वतंत्र झाल्यानंतर भारताने ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र इंग्लंडमध्ये गेलेल्या आणि सध्या ब्रिटिश नागरिक असलेल्या अनेक भारतीयांना अजूनही याचा सामना करावा लागतो. ही समस्या फक्त इंग्लंडमध्ये नसून पाकिस्तान आणि बांगलादेशातून इंग्लंडमध्ये गेलेल्या विविध गटांमध्ये बिरादरी, तसेच विविध वंशाच्या व पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये होणाऱ्या भेदभावातून शीख, ख्रिश्चन आणि इस्लाममध्येही पसरली आहे.

असं विविध संस्थांच्या व स्वतः ब्रिटिश सरकारने केलेल्या सर्वेक्षणामधून दिसून येतं. यासाठी पुरेसे कायदे नसल्यामुळे, तसेच इंग्लंडच्या संविधानामध्ये यासंबंधी कोणतीही ठोस तरतूद नसल्यामुळे विविध लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

इंग्लंडमधील इतर शहरांमध्येही फक्त भारतीय रंगरूपाच्या अनेक वस्त्या, गावे आणि उपनगरे तयार झाली आहेत. यामध्ये भारताच्या कोणत्याही शहरात आढळतील अशा पाट्या, विविध रंगाढंगाच्या भाषा आणि पोशाख, मंदिरे, गुरुद्वारे आणि मशिदी तयार झाल्या आहेत. अनेकदा लंडनच्या रस्त्यांवर चालताना विविध प्रकारच्या संघटनांची नावे आपल्या जातीय आधारावर पडलेली दिसतात.

अशाप्रकारे जातीयतेला खुलेआम हवा देणे भारतामध्ये थांबलं असलं तरी या देशात असे कोणतेही कायदे नसल्याने ही समस्या मोठी बनली आहे. अनेकदा विविध जातींची वेगवेगळी मंदिरे व प्रार्थनास्थळे तयार झाली आहेत, हेही लंडनच्या अनेक भागांमध्ये निदर्शनास येतं. भारतीयांमध्ये असलेल्या गुणांसोबत त्यांच्यामध्ये असणारे पूर्वग्रह व गैरसमज इथे आल्यानंतर, तसेच राहून किंवा काहीदा कित्येक पटीने वाढलेले दिसून येतात.

इंग्लंडच्या संसदेने या समस्येला आळा घालण्यासाठी जातीच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणली होती, मात्र त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही. मात्र आता विविध संघटना याविषयी आवाज उठवत आहेत. त्यातूनच अनेक कंपन्या आणि विद्यापीठांमध्ये जातीसंबंधी जागृती होत आहे.

सिस्को आणि गुगल यांसारख्या जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये जातीविषयक विविध भेदभाव पूर्ण अनुभवांची नोंदणी झाल्यानंतर ऑक्सफर्ड आणि इतर काही विद्यापीठांनी आपल्या धोरणांमध्ये जात या प्रकारच्या भेदभावाला विशेषत्वाने नाकारत त्यासंबंधीच्या उपाययोजना करायला सुरुवात केली आहे.

विद्यार्थ्यांना अनेकदा जातीय भेदभाव झाल्यानंतर दाद मागण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपस्थित नसते, तसेच न्यायालयात यासंबंधी खटले भरल्यानंतर तेथील न्यायाधीशांना ही नेमकी काय संकल्पना आहे याविषयी अंदाज नसतो. मात्र अलीकडील काळात संसदेकडून, तसेच इंग्लंडमधील न्यायालयाकडून यासंबंधी कायदे व नियम बनवण्यासाठी चाचपणी केली जात आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्ती अंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com