किपलिंगचे घर...

समुद्रकिनाऱ्याला लागून असल्याने तसेच येथील नॅशनल पार्कच्या जवळ असल्याने रॉटिंगडीन गावात पर्यटकांची रेलचेल असते.
Kipling Home
Kipling HomeSakal

- वैभव वाळुंज

समुद्रकिनाऱ्याला लागून असल्याने तसेच येथील नॅशनल पार्कच्या जवळ असल्याने रॉटिंगडीन गावात पर्यटकांची रेलचेल असते. येथे फिरत असताना मला भारतात जन्मलेल्या आणि लेखनासाठी जगभर प्रसिद्ध झालेल्या लेखकाचे एक घर सापडलं. तो म्हणजे रुडयार्ड किपलिंग.

मोगलीच्या ‘जंगलबुक’साठी तसेच कवितांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या किपलिंगने या लहानशा गावात येऊन अनेक उत्तमोत्तम रचना केल्या. किपलिंगच्या कुटुंबानं येथील स्थानिक चर्चला लागून असणारं ‘द एल्म्स’ नावाचं एक घर बांधलं. याच घराला लागून असणारं लहानसं तळं त्याच्या अनेक लघुकथांसाठी प्रेरणा बनलं.

‘इथं भारतात कोणत्याच  गोष्टीची कमी नाही; पण ससेक्सच्या त्या टेकड्यांवर तुझ्यासोबत बागडता आलं, तर त्यासाठी मी जग त्यागायला तयार आहे.’

- किपलिंग, आत्यास पत्र, लाहोर १८८३

ससेक्सच्या गावाकडील भागांमध्ये फिरताना ठिकठिकाणी राहणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नोंदी नीलफलकावर दिसतात. हे नीलफलक शोधून त्यांचा इतिहास धुंडाळणे हा इथली सामाजिक विण समजावून घेण्याचा सोपा मार्ग आहे. अनेकदा या नीलफलकांवर अनेक भारतीय नेते, कवी व लेखकांच्या नोंदी दिसतात. बहुतेक कवी-लेखक लंडनमध्ये राहत असले, तरी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी ससेक्सच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये राहणं अनेकांनी पसंत केलं. येथील असेच एक गाव म्हणजे रॉटिंगडीन.

समुद्रकिनाऱ्याला लागून असल्याने तसेच येथील नॅशनल पार्कच्या जवळ असल्याने रॉटिंगडीनमध्ये पर्यटकांची रेलचेल असते. गावामध्ये फिरत असताना मला भारतात जन्मलेल्या आणि भारताशी विशेषत्वाने जोडल्या गेलेल्या व आपल्या लेखनासाठी जगभर प्रसिद्ध झालेल्या लेखकाचे एक घर सापडले. तो म्हणजे रुडयार्ड किपलिंग.

मुंबईमध्ये जन्मलेल्या या लेखकाचे नाव आजही जगभर प्रसिद्ध आहे. त्याचे एकूण लेखन ब्रिटिश साम्राज्याचा भारतातील राजकीय व सामाजिक प्रभाव दर्शवण्यासाठी एक महत्त्वाचं माध्यम मानलं जातं; पण या साम्राज्यवादाला घडवणाऱ्या मानसिकतेचे दर्शन इंग्लंडच्या खेडोपाडी राहणाऱ्या नागरिकांकडून त्याच्या मूळ स्वरूपात समजून घेता येतं.

मोगलीच्या ‘जंगलबुक’साठी तसेच आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या किपलिंगने या लहानशा गावात येऊन अनेक उत्तमोत्तम रचना केल्या. किपलिंगच्या कुटुंबानं येथील स्थानिक चर्चला लागून असणारं द एल्म्स नावाचं एक घर बांधलं. याच घराला लागून असणारं लहानसं तळं त्याच्या अनेक लघुकथांसाठी प्रेरणा बनलं.

विशेष म्हणजे त्याचे स्वतःचे नाव रुडयार्ड हेदेखील इंग्लंडमधील एका तळ्यापासूनच आले आहे. तो सुट्ट्यांमध्ये या घरी येऊन राहत असे व भारतातील आपले अनुभव व आठवणी कल्पकतेने नोंदवत असे. १८९७ ते १९०२ या काळामध्ये तो अनेकदा या ठिकाणी राहिला असल्याच्या नोंदी आहेत.

या काळात त्याने लिहिलेल्या ‘जस्ट स्टोरीज’ कथासंग्रहातील जागांची अनेक वर्णने या रॉटिंगडीन गावातील काही महत्त्वाच्या ठिकाणांशी मिळतीजुळती आहेत. त्याला प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेक लोक या घराच्या आसपास येत असत. म्हणून त्याने आपल्या घराच्या आजूबाजूला एक मोठी उंच भिंत बनवली होती; तरीही लोकांचा त्रास सुरू राहिल्यानंतर त्यानेही भिंतीची उंची वाढवत नेली, असं लोक म्हणतात.

अनेक उत्सुक पर्यटक अजूनही टाचा उंच करून भिंतीच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करत असतात. किपलिंगच्या नावाने एक अंगणवाडीही येथे सुरू करण्यात आली आहे. या भिंतीविषयी एक गोष्ट या अंगणवाडीत सांगितली जाते ती म्हणजे या भिंतीचा एक दगड जादुई आहे, ज्यावर नाक टेकवून व डोळे बंद करून लहान मुलांनी एखादी इच्छा व्यक्त केल्यानंतर ती खरोखर पूर्ण होते. अनेक स्थानिक नागरिकांचा यावर विश्वास आहे.

किपलिंगने लिहिलेल्या किम या कादंबरीमध्ये लाहोरमध्ये राहणाऱ्या व त्यानंतर पूर्ण भारतभर प्रवास करणाऱ्या लहान मुलाची हकिकत आढळते. म्हणूनच त्याने लहान मुलांसाठी केलेल्या रचना आजही उत्सुकतेनं वाचल्या जातात. किपलिंग हा माझ्यासाठी नेहमीच एक आश्चर्य आणि प्रेरणा असल्याचं रस्किन बाँड या आजघडीच्या प्रसिद्ध बालसाहित्यिकानेही म्हटलं आहे. आपल्या लिखाणामधून किपलिंगने भारताचे वर्णन जगभरातील वाचकांसाठी खुले केले.

अर्थात भारतात राहणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी भारत हे एक प्राण्यांनी भरलेलं जंगल आहे व आपण ब्रिटिश म्हणून मोगलीसारखे एकटेच सुजाण, पुढारलेले, जंगलाचे उद्धारकर्ते आहोत; ही भावना त्याच्या लेखनामागे आहेच. आपल्या अनेक रचनांमध्ये त्यांनी ब्रिटिश साम्राज्याचा गौरव केला आहे; तसेच ब्रिटिशांनी भारतासाठी केलेल्या तथाकथित परोपकाराचा ठसा त्याच्या लेखनात जागोजागी आढळतो. म्हणून अनेक भारतीय विद्वानांनी किपलिंगच्या लेखनावर टीकाही केली आहे.

एवढे सगळे असूनही रॉटिंगडीनमध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी किपलिंग हा अभिमानाचा विषय आहे. येथील स्थानिक पंचायतीने एकत्र येऊन या ठिकाणची डागडुजी करून याला पर्यटकांसाठी आकर्षणस्थळ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. किपलिंगच्या घराशेजारीच किपलिंग गार्डन आहे.

काही वर्षांपूर्वी हे गार्डन हटवून येथे एक टोलेजंग इमारत बांधण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र गावकऱ्यांनी याला विरोध करून हा प्रस्ताव हाणून पाडला. आपला वारसा जपण्यासाठी (मग भलेही तो साम्राज्यवादी का असेना) येथील नागरिक फार हिरिरीने सहभाग घेत असतात, ही बाब येथील गावांमध्ये मला विशेषत्वाने जाणवली. गावातील नागरिकांनी किपलिंगच्या नावे जपलेल्या अनेक गोष्टी एका छोटेखानी संग्रहालयात ठेवल्या आहेत.

तसेच पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या स्थानिक सैनिकांच्या नावे एक छोटेखानी स्मारक किपलिंगच्या घराच्या भिंतीला लागूनच बनवण्यात आलं आहे. गावात बनवलेल्या छोटेखानी सिनेमाघरात वेळोवेळी त्याच्या स्मरणार्थ त्याच्या लेखनाशी निगडित असणाऱ्या फिल्म्स, डॉक्युमेंट्रीज दाखवल्या जातात.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये युके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com