निसर्गाशी नातं सांगणारं ‘व्हॅनकुवर’

व्हॅनकुवर म्हणजे कॅनडातील तिसऱ्या क्रमांकाचं जास्त लोकसंख्या असलेलं शहर; पण लोकसंख्या फक्त सात लाख. व्हॅनकुवर शहराचं रूप अगदी राजधानीसारखंच आहे.
Vancouver city
Vancouver citysakal

- विशाखा बाग

व्हॅनकुवर म्हणजे कॅनडातील तिसऱ्या क्रमांकाचं जास्त लोकसंख्या असलेलं शहर; पण लोकसंख्या फक्त सात लाख. व्हॅनकुवर शहराचं रूप अगदी राजधानीसारखंच आहे. अनेक नैसर्गिक आकर्षणांबरोबरच मानवनिर्मित गोष्टीसुा व्हॅनकुवरमध्ये बघायला मिळतात. निसर्गाशी कोणतीही नाळ तुटू न देता शहराची बांधणी कशी असावी, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून व्हॅनकुवर शहराकडे बघता येईल.

व्हॅनकुवर शहर कॅनडाची राजधानी नाही. तरीही त्याची राजधानीचं शहर म्हणण्यासारखी ऐट आणि रूपडं राजधानीसारखचं आहे. कॅनडाच्या आजच्या आपल्या भटकंतीमध्ये आपण व्हॅनकुवर शहर बघायला आलो आहोत. म्हणायला जरी हे आधुनिक आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त असं शहर असलं तरीही तिथे दोन-तीन मोठ्या बागा, एका बाजूला वाहणारी फ्रेझर नदी, दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला प्रशांत महासागर, दूरवर दिसणारे ज्वालामुखीचे डोंगर या सर्वांमुळे हे शहर म्हणजे एक निसर्गरम्य ठिकाणच म्हणावं लागेल.

स्टॅन्ली पार्क नावाचे जगातील एक मोठे अर्बन पार्क एक हजार एकरमध्ये पसरलेल्या व्हॅनकुवर शहरामध्येच आहे. नाव जरी पार्क असलं तरी तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगलच पसरलेलं आहे. असं जंगल जिथे तुम्ही भेट देऊ शकता, सुट्टी एन्जॉय करायला जाऊ शकता... ते एक पर्यटन केंद्रसुद्धा आहे. तिथली झाडं जवळपास अडीचशे फूट उंच आहेत आणि अनेक शतकांपासून अजूनही ती मातीशी घट्ट नाळ जोडून उभी आहेत.

झाडांजवळ गेल्यानंतर खोडावरच्या वेगवेगळ्या खुणांनी त्यांचं वय आपल्याला कळू शकतं. या मोठ्या पार्कमध्ये फिरताना खरोखरच खूप छान वाटत होतं. रेड इंडियन्स लोक हे कॅनडातील मूळ रहिवासी होते. त्यांच्या संस्कृतीच्या आणि कलेच्या आठवणी या पार्कमध्ये मांडलेल्या आहेत.

तसं म्हटलं तर व्हॅनकुवर हे कॅनडातील तिसऱ्या क्रमांकाचं जास्त लोकसंख्या असलेलं शहर आहे; पण आपल्याला म्हणजे भारतातल्या लोकांना तिथे गेल्यानंतर अजिबात तसं वाटत नाही; कारण मुख्य शहराची लोकसंख्या फक्त सात लाख आहे. व्हिसलर गावाहून आम्ही बसनेच व्हॅनकुवरला आलो. बघताक्षणीच आवडेल असं हे शहर नक्कीच आहे. आम्ही गावात मध्यवर्तीच हॉटेल बुक केलं होतं, म्हणजे सर्व ठिकाणी जाण्यासाठी पायी किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने ते सोपं पडतं. चार दिवस आम्ही व्हॅनकुवरमध्ये होतो. जूनपासून नोव्हेंबरपर्यंतचा काळ कॅनडामध्ये जाण्यासाठी योग्य आहे.

व्हॅनकुवरमध्ये आर्ट गॅलरी, सायन्स वर्ल्ड, फ्लायओव्हर कॅनडा, बॉटनिकल गार्डन, ग्रेनविले आयलंड ॲण्ड मार्केट अन् व्हॅनकुवर म्युझियम हे सर्व बघण्यासारखं आहे. मला आवडलेल्या अजून दोन महत्त्वाच्या जागा म्हणजे कॅनडा प्लेस आणि व्हॅनकुवर कन्व्हेन्शन सेंटर. ही दोन्ही ठिकाणं वेळ घालवण्यासाठी, समुद्राच्या बाजूला फिरण्यासाठी आणि सी प्लेन बघण्यासाठी अतिशय आकर्षक आहेत.

अनेक प्रकारची वेगवेगळी समुद्री पाण्यावर उतरणारी विमानं तुम्हाला इथे दिसतील. विशेषतः श्रीमंत व्यावसायिक आजूबाजूच्या छोट्या-छोट्या आयलंडला जाण्यासाठी ही विमानं वापरतात. पर्यटकांसाठीसुद्धा या विमानांच्या फेरी उपलब्ध आहेत. ‘फ्लायओव्हर कॅनडा’ शोमध्ये आपल्याला संपूर्ण कॅनडाची सैर करवली जाते. व्हर्चुअल रिॲलिटीमध्ये आपण संपूर्ण कॅनडाच्या वरून विमानातून फिरतोय, असा आभास होतो.

हा अनुभव खरोखरच खूप वेगळा आणि एकदा तरी घेण्यासारखा आहेच. ग्रेनविले मार्केटमध्ये विविध खाण्याचे पदार्थ, भाज्या आणि वेगवेगळ्या गोष्टी विकण्यासाठी स्थानिक येत असतात. ज्यांना लोकल फूडची चव चाखायची आहे, स्थानिक बाजारात फिरायचे आहे त्या लोकांनी इथे अवश्य भेट द्यायला हवी.

कॅपॅलिनो सस्पेन्शन ब्रिज हे अजून एक मोठं पर्यटनाचं आकर्षक केंद्र. कॅपॅलिनो पार्कमध्ये ते आहे. कॅपॅलिनो नदीवर असलेला हा कॅपॅलिनो ब्रिज ४६० फूट लांब आणि २३० फूट उंच आहे. या पार्कमध्ये संपूर्णतः देवदार वृक्षांचं जंगल आहे आणि पर्यटनासाठी जंगलातील आकर्षक वेगवेगळे साहसी खेळ इथे उपलब्ध आहेत. आपल्याकडे जसा ऋषिकेशमधील ‘लक्ष्मण झुला’ प्रसिद्ध होता तशाच प्रकारचा हा मोठा पूल आहे.

कॅपॅलिनो सस्पेन्शन ब्रिज पूर्णपणे क्रॉस केल्यानंतर दुसऱ्या बाजूला गेल्यावर आपल्याला ब्रिज क्रॉस केल्याचे एक सर्टिफिकेटसुद्धा मिळतं. हे वाचताना जरी आता तुम्हाला गंमत वाटत असली तरीही मी तिथे प्रत्यक्षात अनेक लोकांना त्या पुलावरून चालताना घाबरताना बघितलेलं आहे. याचं कारण असं की खाली खोल मोठी नदी वाहत असते आणि चालताना हा ब्रिज प्रचंड हलत असतो. त्यामुळे अर्थातच अनेक पर्यटक ब्रिजवरून चालताना घाबरतात.

ट्री टॉप ॲडव्हेंचर आणि क्लिफ वॉक या दोन्ही महत्त्वाच्या साहसी आकर्षण खेळांची मजा तुम्ही इथे घेऊ शकता. ट्री टॉप ॲडव्हेंचरमध्ये देवदार वृक्षांच्या मध्ये जमिनीपासून जवळपास १०० फुटांवर लाकडी वॉक-वे तयार करण्यात आलेले आहेत आणि जंगलांमधून या लाकडी पूल वजा रस्त्यावरून चालताना खूपच भारी वाटतं.

त्यामुळे एक तर आपल्याला जंगलामध्ये फिरण्याचा अनुभव घेता येतो, त्याचबरोबर वृक्षांचा आणि जंगलांचा इतिहास, वृक्षांचे वेगवेगळे प्रकार, झाडाच्या बुंध्यांचे वेगवेगळे प्रकार आणि आकार, त्याचबरोबर निरनिराळे वन्यजीव या सर्वांची आपल्याला माहिती होते. एकंदरीतच कॅपॅलिनो सस्पेन्शन ब्रिज पार्क मला अजून एक आवडलेलं महत्त्वाचं ठिकाण. कोणताही पर्यटक इथून निराश होऊन जात नाही.

शहरात फिरत असताना अचानक समोर आलेलं छोटंसं आकर्षण म्हणजे स्टीम इंजिनवर चालणारं रस्त्यात उभं असलेलं स्टीम क्लॉक. चालता चालता अचानक माझ्यासमोर आलं आणि खरं तर दर अर्ध्या तासाने त्यामधून छान ध्वनिलहरी उत्पन्न होतात आणि नेमकी त्याच वेळेस मी बाजूने जात असताना ते वाजले आणि मग ते स्टीम क्लॉक एकदम बघायला मिळाले. त्याचा आनंद काही वेगळाच होता. जुन्या पद्धतीचं असलेलं टॉवरसारखं हे स्टीम क्लॉक व्हॅनकुवरमधील गॅसटाऊन या भागात तुम्हाला बघायला मिळेल.

अनेक नैसर्गिक आकर्षणांबरोबरच मानवनिर्मित गोष्टीसुद्धा व्हॅनकुवरमध्ये बघायला मिळाल्यानंतर, आपल्याला एकंदरीतच शहरं कशी असावीत हा विचार करायला शिकवतात. शहराची एकंदर बांधणी निसर्गाशी कोणतीही नाळ तुटू न देता कशी असावी याचं एक चांगलं उदाहरण म्हणून व्हॅनकुवर शहराकडे बघता येईल. कॅनडामध्ये अजूनही अगणित ठिकाणं बघण्यासारखी आहेत, भेट देण्यासारखी आहेत; पण त्याबद्दल भविष्यात पुन्हा कधी तरी... आता आपली कॅनडाची ही सैर इथेच थांबवूयात.

gauribag7@gmail.com

(लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com